ए दिल है मुश्कील (२०१६): एकुणात मुश्कीलच ए सगळं!
-पाहुणा लेखकः 'अ सेन मॅन'
'ऐ दिल है मुश्कील' हा सिनेमा पाहायचा घाट अाम्ही का घातला? तर 'मनसे'मार्फत अाम्हांला कळलं की राष्ट्रद्रोह होऊ घातलाय. मग जाऊन तो सिनेमा पाहणं ही अामची नैतिक जबाबदारी बनली. करण जोहर तर करण जोहर, प्रश्न तत्त्वाचा झाल्यावर काय करता! त्यात गाणी छान होती. अामचे अावडते नि चिकणे कलाकार त्यात होते. करण जोहरचा सिनेमा म्हणजे नेत्रसुखद असणार असं अाम्ही गृहीत धरलं होतं. त्यातच अनेक लोकांनी ही करण जोहरची अाजवरची सर्वोत्तम कलाकृती अाहे अशी प्रमाणपत्रं बहाल केली होती. त्यामुळे 'किती असेल वाईट असून असून?' असा विचार करून, करण जोहर या नावानिशी सिनेमाबाबतचे जे ठोकताळे समोर येतात तितकेच मनात ठेवून, माफक नावीन्याची अपेक्षा करत, अाम्ही हा सिनेमा पाहायला गेलो. त्यातली पहिल्यांदा 'चन्ना मेरीया’ वाजतं तेव्हाची तीन मिनिटं अाम्हांला खूप अावडली. यापुढील कहाणी ही अाम्ही उर्वरित दीड-एकशे मिनिटं तग धरून कसे बसलो त्याची अाहे.
या सिनेमाचा थोडक्यात गोषवारा असा - गेल्या पाच-सात वर्षांतले रणबीरचे सिनेमे एका मिक्सरमध्ये टाका, चवीला थोडा नवीन गाण्यांचा मसाला, लंडन-पॅरीसचं चित्रण हेही टाका. पुढे रेटण्यासारखं कथानकच नसल्यामुळे नायकनायिकांची ८०च्या दशकातल्या गाण्यासिनेमांची संदर्भहीन हौस कोंबलेली पटकथा कच्चीच टाका. अाणि मग करण जोहरच्या जुन्या सिनेमांच्या गाण्याप्रसंगांच्या रॅंडम पार्श्वभूमीचं पाणी हळूहळू घालून चांऽऽगलं वाटून घ्या. हे मिश्रण एकजीव होणार नाही. तरी जे तयार होतील ते सपक तुटक संवाद सांप्रतकाळाचे म्हणून स्वीकारा - झाला सिनेमा तयार. यात मधूनच एखाद घास बरा लागेल, तो म्हणजे सिनेमात पहिल्यांदा 'चन्ना मेरीया' हे अवीट गोडीचं गाणं वाजतं ती तीन मिनिटं. प्रेमाचे चिरपरिचित त्रिकोण अाणि दर्दे दिल ओतप्रोत भरलेले हे क्षण पाहताना तुम्ही खुर्चीत शांत स्थिरावत जाल. “चला, अाता हा सिनेमा अापण शेवटपर्यंत पाहू शकतो.” असा दिलासा स्वत:ला द्याल.
पण - तुमची निराशा नाही झाली, तर पैसे परत. (खरं तर हे स्पॉयलरसकटचं एक चित्रमय इंग्रजी परीक्षण पाहा आणि मगच काय ते ठरवा असा अावर्जून सल्ला देण्याचं मनात होतं. पण ’वेगळा अाहे हं, करण जोहरचा सिनेमा परिपक्व झाला अाहे, खूप वास्तवाला धरून अाहे’ असा काही लोकांचा सूर ऐकला नि अामच्याही परीने थोडी भर टाकणं क्रमप्राप्त होऊन बसलं. म्हणून - फक्त म्हणून) सिनेमातले काही क्षण अधोरेखित करून अाम्ही अामचे विचार सोदाहरण पटवून देण्याचा प्रयत्न करत अाहोत.
तर होतं असं, की पहिली अनेक मिनिटं काहीच होत नाही. म्हणजे लोक एकामागोमाग एक ट्वीट केल्यासारखे असंबद्ध क्षण जगत असतात. अर्थात, अापण कॅप्टिव ऑडिअन्स असल्याने अापल्याला वाटत असतं की, काही संबंध असेल; पण तो नसतोच. अाधी अापल्याला वाटतं की 'तमाशा पार्ट २' चालू झालाय. मग अापल्याला वाटतं, की 'नाही, हा तर 'रॉकस्टार' वाटतोय.' मग अापण स्वत:ला विचारतो, की हा इम्तियाज़ अलीचा सिनेमा अाहे की करण जोहरचा? मग अापल्याला कळतं; की 'अरेच्चा! हा रणबीर तर अजून 'वेक अप सिड'मधल्या सिडच्या मानसिक वयाचाच अाहे.' मग अापण निव्वळ नगास नग तरुणाईचे असलेले, पण अजिबात ताजे टवटवीत नसलेले, अतिशय पकाऊ संवाद न कंटाळता ऐकायचा प्रयत्न करत राहतो.
वानगीदाखल हा संवाद पाहा -
“तू फ्री है क्या शाम को?”
“नहीं यार, मेरे मीटींग्स, अपॉइंटमेंट्स...”
“जा बे फ्री है तू”
“हाहाहां!”
हा संवाद सिनेमात रॅन्डमली इतक्या वेळा येतो की “राज, नाम तो सुना होगा!”पण फिका वाटावा. अाता काय थोर अाहे या संवादात? इतका सपक संवाद इतक्या स-त-त येतो; की अापल्याला वाटतं, अापण 'चष्मेबद्दूर' किंवा ८०च्या दशकातला तत्सम कौटुंबिक हास्यपट पाहतो अाहोत. सिनेमा सुरू झाल्यापासून साधारण आठ-दहा मिनिटांनी अापण हात टेकतो अाणि पहिल्यांदा घड्याळाकडे पाहतो. (इथेच खरंतर या सिनेमाचा एक तारा गळायला हवा, पण एवढ्यात नको. नाही तर गळायला तारे उरायचे नाहीत.)
तर या सुरुवातीच्या काळात अापल्याला असं कळतं की करण जोहर अाता ’डिटेलिंग’ करतो अाहे. त्याला मुख्य पात्रांची वर्गीय पृष्ठभूमी अगदी वास्तविक पातळीवर दाखवायची अाहे. नायक श्रीमंत अाहे हे अाता पुरेसं नाही; नायिकेला हे जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं की नायक फर्स्ट क्लास श्रीमंत अाहे की प्रायवेट जेट श्रीमंत? अापण 'खाउजा'च्या पंचविसाव्या वर्षात अाहोत. अाहात कुठे? तर अनुष्का उर्फ अलिझे रणबीर उर्फ अयानकडून ही माहिती काढून घेते, की तो प्रायवेट जेट श्रीमंत अाहे. मात्र स्वत:बाबत तिचं मत असं अाहे की, “माझा बाप अमीर अाहे. मी रईस अाहे. दोहोंत फरक अाहे.” संघाचं स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान अाहे, असं कुणी म्हटलं की जो प्रश्न अापल्या मनात पहिला येतो तोच इथे अापल्याला नि अयानला एकदम पडतो - “अां? काय?” अाणि अयान चक्क तोच प्रश्न विचारतो. पाहा, कळतंय का? इथे फोर्थ वॉल उलटीकडून फोडायचा दिग्दर्शकाचा प्रयत्न अाहे, म्हणजे अापला नि नायकाचा थेट 'मन की बात मन में' असा डायरेक्ट संवाद इथे साधण्यात अालाय. असं नंतरही होतं, पण थांबा; ते तिथे पोचलो की मग सांगू. तूर्तास या प्रश्नाचं काही धड उत्तर कुणी देत नाही. (संघाबाबत नव्हे, नायिकेबाबत!) पण (बहुधा) पुढचा संदर्भ असा असावा, की लंडन ते पॅरीस या पुढच्या एका ट्रिपमध्ये अयानकडे प्रवासखर्चाची जबाबदारी अाहे, पण अलिझेकडे राहण्याजेवणाची. त्यामुळे, लंडनहून प्रायवेट जेटने पॅरीसला जाऊन तिथे मात्र ते दोघेही अलिशान, पंचतारांकित, फायरप्लेस वगैरे असलेल्या एकाच अाटोपशीर खोलीत राहतात. (शूSS! राहतात म्हटलंय. झोपतात का कसं ते तुम्ही सिनेमात पाहा! [पाहा टीप ०१].)
***
टीप ०१
अलिझे अयानला (धगीशी एकाच चादरीत अंग शेकताना): प्यार में जुनून है, दोस्ती में सुकून है! (ऑSSS)
ती म्हणतेय अंगाशी लगट करू नकोस, तर वेळीच हिला फेसबुकवर ठेवून व्हॉट्सॅपवर म्यूट कर. तिचं अजूनही तिच्या माजी सख्यावर प्रेम अाहे. तिला तुझं शरीर त्याच्याइतकं ’होत’ नाहीय, पण तू मित्र म्हणून ठीक अाहेस, तर हात खिशात ठेव. तुझी पाईपलाईनमध्ये राहण्याची निकड अाम्ही समजू शकतो, पण तूर्तास बॅक ऑफ!
***
तर एव्हाना अयान, अलिझे अापापल्या अनुक्रमे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड यांना सोडून पॅरीसला गेले अाहेत. इथे अलिझेचा माजी प्रियकरही (अर्थात अली उर्फ फवाद खान) अनायसा पॅरीसमध्येच अाहे. अनेक बाष्कळ प्रसंगांनंतर सरतेशेवटी अलिझे अयानला घरी पाठवते अाणि स्वत: पूर्वप्रियकर अलिशी लखनौत विवाहबद्ध होऊ घालण्यापर्यंत मजल मारते. लखनौतच का? तर तसं अापल्याला सांगण्यात अालंय म्हणून. करण जोहरला पंजाबी येतं, म्हणून लखनौतले लोक दरम्यान एका पंजाबी गाण्यावर होळी खेळून घेतात. नि अापण हरिवंशरायांना एकदा "सॉरी हं, त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो,” असं म्हणून घेतो. (ही अापली शेवटची वेळ नाही 'सॉरी'ची. पुढे चला, सांगतो.) साहजिकच अयान लग्नाला मुलीकडच्या वऱ्हाडातून (जड अंत:करणाने) जातो. अाईबाप विचारत नाहीत नि जिला तिचं 'कुण्णीकुण्णी नाही' तिच्या लग्नात वऱ्हाडी मात्र जोरात! पण फार तपशील नाहीत. ‘बाकी लोक नाही दाखवले यंदा. मग ना ते फार होतं अहो. थोडक्यात उरकायचा निकाह, असं ठरवलं म्हणून.’ अापल्याला इथवर सगळं इतकं अॅबसर्ड वाटायला लागलेलं असतं, की अापल्याला भास होत असतो - अाता या लग्नात अयानला दीपिका दिसणार नि मागे गाणं लागणार – कैसी तेरी ख़ुदगर्ज़ी ना धूप चुने ना छांव... परंतु याच बाक्या प्रसंगी अयानच्या दिलाच्या चक्काचुरीकरणाची प्रक्रिया पूर्ण होते. हातावरची काळीकुट्ट मेंदी त्याला इतकी चढते, की तो एकतर्फी प्रेमाने मानसिक संतुलन ढळल्यामुळे अत्याचारी झालेल्या पुरुषासारखे हातवारे करतो नि एकदाचं ते खर्रं अातल्या अावाजातलं गाणं गातो [पाहा टीप ०२]. हीच ती पहिल्या 'चन्ना मेरीया'ची तीन मिनिटं.
***
टीप ०२
अलिझे अयानला (भर रस्त्यात): जेव्हा दिलाचा पूर्ण चक्काचूर होईल तेव्हाच तुझ्या मनाची वेदना तुझ्या अावाजात उतरून तू खर्रं गाणं गाऊ लागशील. होय, मात्र तू मोहम्मद रफी होऊ नयेस, तो केवळ रडत असे गाताना.
म्हणजे दिलाचा चक्काचूर, त्यातून वेदना, त्यातून गाणं, गाण्यात वेदना, पण रडगाणं नको. बॅलन्स इज इम्पॉर्टंट अाफ्टर ऑल. एक मिनिट, पण हे झालंय ना एकदा ’रॉकस्टार’मध्ये करून याच अभिनेत्यासोबत, नि पुन्हा ’तमाशा’त?
‘शूSSS! गप्प बसा. हे नवीन ए अामचं. एका पातळीवर हे जुन्या रणबीरला ट्रिब्यूट अाणि त्याचं स्पूफ, झालीच तर तुमची उजळणी पुन्हा एकदा. ऑल इन वन!’
***
इथे खरंतर अापल्याला वाटतं, की सिनेमात काहीतरी झालं. अाता पुढे अाशा अाहे. काही नाही तर सालं फवाद खान, अनुष्काचा सीन तरी असेल. पण अंहं! त्याला फक्त मनसेसाठी घेतलाय. याचे सीन वाढले की त्यांचा पगार वाढतो, त्यामुळे त्याला चारच संवाद मोजून. अापला सिनेमात अचानक वाढलेला उत्साह पुढच्याच सीनमध्ये पुन्हा तोंडावर अापटतो.
अयानला एक उर्दू शायरा (उ.शा.) (जी की ऐश्वर्या राय) भेटते लखनौच्या विमानतळावर. इथे सिनेमा एकदम रूळ बदलतो. ती विएन्नाला जात असते, तो काही कामानिमित्त फ्रॅंकफर्टला चालला अाहे लग्नातून थेट (हाहा, फसलात ना! सिरिअसली, काम, हुह? लखनौ-दुबई अाता थेट फ्लाईट अाहे, त्यामुळे युरोप, अमेरिका दुबईद्वारे एका हॉपमध्ये. बरोबर.) अाता पुढील सिनेमा ही सिनेमाकारांच्या काल्पनिक क्लासिक मुस्लीम सोशलची पोस्टमॉडर्न अावृत्ती अाहे.
'अाम्हांला की नई ’पाकीज़ा’, ’मुघले अाज़म’छाप भारी भक्कम उर्दू संवाद घालायचेत, पण ते अमीर उमराव अय्याश नवाब नि त्या कोठ्या नि त्या उमराव जान अदा... आर टू ओल्ड स्कूल. इट माइट हॅव वर्क्ड इन द पास्ट अॅज मुस्लीम सोशल. इट जस्ट डजन्ट फिट इनटू माय ट्वीटर नॅरेटिव. म्हणून त्या बाईला अाता अाम्ही उ.शा. केलीय. म्हणजे तिची शायरी शाबूत ठेवून तिचं नाचकाम काढून घेतलंय. अाणि बाईनं काय लिहावं असं पुरुषांना वाटतं याची हौस उर्दूतून भागवून घेतलीय.'
या बाईचा एकच उद्योग – जाता-येता अगम्य शायरी फेकून मारणे. बरं, अाता उर्दूत शायर बायांना भलताच मान असल्याने हिला विएन्नात राहणं परवडतंय. (इथे मुशायऱ्यांमध्ये बायका किती यावर उर्दू कवयित्री कितीही अावाज उठवोत; तिकडे या बाईंची रॉयल्टी युरोत! पण प्लीज, प्रश्न नकोत. हेच मुस्लीम सोशल ए की नई अामचं? ठरलं तर मग.) तर अाता ही युरोपात एकट्यानं राहणारी घटस्फोटित बाई, तिच्या कवितेत काही किमान आधुनिक, आधुनिकोत्तर मूल्यं, स्त्रीवादी भाषा, एक वेगळी दृष्टी, काही उदारमतवाद, अायुष्याच्या फाजील प्रश्नांपुढली काही मतं, निदान अाजच्या काळातली भाषा... असं असेल ना? - 'शूSS! अाम्हांला जे हवंय त्यासाठी हे पात्र सूट होतंय. दॅट्स इट!' अाता हिचा जुना नवरा बडा कलाकार. ऑर रादर बडं प्रस्थ – हू इज डिवोर्स्ड बट स्टिल लव्ज हर अगदी बेइन्तेहा! (कळतंय ना तुम्हांला सटल कनेक्शन जुन्या मुस्लीम सोशलांशी असलेलं?). त्याच्या प्रदर्शनाला (चित्रांच्या!) अयान व उ.शा. भेट देतात (दे अार काईंड ऑफ टुगेदर बाय नाऊ.). इथे या पूर्वीच्या नवराबायकोंचे गझलेच्या वजनातले भिकार संवाद चालूच.
इथेच पुन्हा अयान अापल्या मनातला प्रश्न करतो - “ये सब अाप रट के अाते हो क्या?” नि अापण सुखावतो. मग अनंत काळानंतर शेवटी हा प्रौढ गृहस्थ या बच्चू अयानला सल्ला देतो इश्काच्या बाजीबद्दल नि इथे अापला संयम सुटतो [पाहा टीप ०३].
***
टीप ०३
उ.शा.चा नवरा अयानला: गर बाज़ी इश्क की बाज़ी है जो चाहो लगा दो डर कैसा? गर जीत गये तो क्या कहना, हारे भी तो बाज़ी मात नहीं
अयानला हेच अायुष्याचं सूत्र वाटतंय, असं तो त्याच्या मुलाखतीत सांगतोय. लेका, तुझं काम किती? तुझी बहुदा पहिलीच मुलाखत अायुष्यातली नि तू किती जीवनाबाबत इत्यादि बोलतो अाहेस? मुळात हा शेर फ़ैज़चा अाहे. तो ढापून वर अर्थ काय लावला अाहे अाम्ही? - एकतर्फी प्रेम ग्रेट असतं. एकदा हे कळलं की ते तुमच्या नैराश्याचं कारण न ठरता, सर्जनाचं बीज ठरतं अाणि एका भव्य कलाकृतीला जन्म देतं. म्हणजे उ.शा.च्या नवऱ्याचं उ.शा.वर एकतर्फी प्रेम अाहे तुडुंब, घटस्फोटानंतरही. त्यामुळे त्याची कला जोरात अाहे. उ.शा.साठी तो मात्र मित्र अाहे. तिच्या शायरीतून तिला विएन्नामध्ये अलिशान घर परवडतं, पण लखनौ, दिल्लीच्या वर्तुळांत तिला मान नाही. अाता ती अयानच्या प्रेमात अाहे, पण तिला हे कळलंय की, 'छे! ते एकतर्फीच. त्याचं खरं प्रेम अलिझेच.' तर मे बी, तिच्याकडे एकच पर्याय अाहे - याला सोडून द्यायचं नि मग एकतर्फी प्रेमातून काही शायरी घडते का ते पाहायचं. अाता हे अयानलाही कळलंय की, अलिझेचं प्रेम अलीवरच अाहे. त्यामुळे, त्याला सर्जनसूत्र सापडलंय, तो गायक झालाय. अलीचं अलिझेवर जितकं प्रेम अाहे, तितक्या प्रमाणात तोही यशस्वी डीजे अाहे. पण, अलिझेचं काय? एक मिनिट. तिला मुदलात काहीच करीअर वा अाकांक्षा नसल्यामुळे तिला हा नियम लागू पडत नाही. त्यामुळे ती कथेत जशी गरज पडेल तशी प्रेमाची व्याख्या करत लेखकाची मानसिकता व्यक्त करायला सिनेमात अवेलेबल अाहे.
***
अरे नालायकांनो, अापलेच असल्यासारखे फैज अहमद फैजचे शेर बिनदिक्कत वापरता, लाजा कशा नाही वाटत? तुमची लायकी ए का? ओह! डिड अाय टेल यू? या लोकांनी 'अाज जाने की ज़िद ना करो'चं पण डिस्को वर्जन केलंय. येस, तेच फ़रीदा ख़ानुमचं. अापण फक्त रावसाहेबांसारखं हेल काढत चिरडीला येऊन मनात विचारायचं - बदला की हो चाल, ते दीनानाथ मंगेशकर बदललं नव्हतं का चाल? पण अामच्या बापाची टाप होती काय त्यास विचारायची की का बदललं चाल म्हणूनं? उगीच अापलं उठलं नि म्हटलं उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घेऊ. अहो, चाल बदलायची म्हणजे अधिकार नको?
अाणि हे कमी की काय, म्हणून - अापला कडेलोट होण्यासाठीच केवळ - हा पुढला प्रसंग घडतो.
अयान व त्याच्या उ.शा. सखीने अलिझेला जेवायला बोलावलं अाहे. अयानचा हेतू अलिझेला जळवणे इतका पाकसाफ अाहे. तर खालचे दोन संवाद पाहा. एक मूळ चित्रपटातला अाहे नि दुसरा चित्रपटातला नाही, पण दोन्ही ऐकून तुमची प्रतिक्रिया समान असेल हा सांगण्याचा मुद्दा:
अ.
अलिझे: अाता गरीबाला नूरजहानचा फोटो दाखवला तर थोडं तरी वाईट वाटेलच ना?
उ.शा.: नूरजहानचा विषय निघाला नि पाहा, नूरजहानचं गाणं लागलंय, 'मुझसे पहली सी मुहब्बत मेरे महबूब ना मांग...'
ब.
मोठी ती: अगं, अाज खीरपुरी केलीय. पुऱ्या म्हणजे श्रीचा अगदी वीक पॉईंट.
छोटी ती: अय्या, त्यावरून अाठवलं, तुम्ही किशोरीताईंचा पूरिया धनश्री ऐकलाय का हो?
होय लोकहो, होय! हे ऐकताना तुम्ही खुर्चीत चुळबुळत लाजेने चूरचूर होऊन अाक्रसत जाता की नाही? अगदी तस्संच या सिनेमात स-त-त होत राहतं. करण जोहरचं प्रेम, मैत्री अादीचं रोम्यांटिक अाकर्षण ठीक अाहे, पण अाम्हांला का त्रास असंबद्ध कवितांचा?
पण एकूणच पटकथेचा अावाका हा केवळ एक ते दीड मिनिटांच्या सीनचा. म्हणजे वर्गात प्रत्येकाला एकेक सीन द्यावा लिहायला नि ते एकापुढे एक ठेवून म्हणावं, झाला सिनेमा, तसं काहीतरी. अापल्याला दर बावीस सीनपैकी पाव सीनमध्ये माफक हसायला येतं. उरलेले पावणेबावीस सीन अापण "अं? पण, का? अरे, पण. अगं! ए! अावरा" इतकंच स्वत:शी करत राहतो.
हा अयान प्रसिद्धीच्या शिखरावर पोचतो, तेव्हा सिनेमा संपेल असंही तुम्हांला वाटेल. इथे हा सिनेमा इतर सर्व सिनेमांपासून वेगळा होतो (येस, अाफ्टर वेट ऑफ अबाऊट टू अवर्स ऑर सो!), म्हणजे तसं तुम्हांला वाटतं. अाता इथून पुढचे अत्यंत हिडीस व असंवेदनशील संवाद नि प्रसंग सोडून द्या, पण कथानक काही वेगळं? हेक नो! अयान अजून झुरतोच अाहे - त्याला अद्याप हा भ्रम की कधीतरी वेळ येईल नि अलिझे कुठूनतरी याच्याकडे पलटेल, म्हणून हा 'पलट, पलट' मोडमध्ये ताटकळत उभा. त्यात ती अाजारी, नवऱ्याविना एकटी (तिने नवऱ्याला टाकलंय, त्याने तिला नाही, बट हू केअर्स?), सो ऑफ कोर्स ही इज देअर टू प्रोटेक्ट हर. का? अय्या! मनू म्हणून गेलाय तसं! अाणि तिने त्याला हाकलण्याचा हा भव्य सीन घडतो [पाहा टीप ०४]. इथे सिनेमा संपतो का? हड! मग अाता पुढे काय अाणिक? असो, तुम्हीच पाहा. पण एवढं मात्र सांगतो की सरतेशेवटी तुम्ही विचाराल, “का केलं हे अापण? काय होतं त्या सिनेमात? फक्त पहिल्या 'चन्ना मेरीया'ची तीन मिनिटं?”
***
टीप ०४
अलिझे अयानला निक्षून: अरे शारीर नसलं तरी हे प्रेमच अाहे, हे प्रेम माझी ताकद अाहे. शारीर प्रेमानं मला बरबाद केलं, तो माझा वीकनेस अाहे, तुला हे कसं सांगू समजावून. तुला खरचं कळत नसेल, तर चालता हो.
"वास्तविक तू एक अत्यंत हलकट, नीच पुरुष अाहेस. मला तुझ्यात शारीर रस नाही हे तुला दहादा सांगूनही मेल्या, तुझ्यात त्याच्यापुढे जायची कुवत नाही. वर माझ्या अाजारपणाचा फायदा घेऊन पुन्हा माझ्यावर हात टाकतोस तुझा हक्क असल्यासारखा. अंगाला हात तर लाव, तंगडं तोडीन. हो चालता इथून." हे सगळं नायिकेला म्हणायचं अाहे, पण म्हणायची चोरी. कारण ज्या उदात्त, वैश्विक मैत्रीच्या नात्यांभोवती करण जोहर अापल्या सिनेमांचं कथासूत्र गोवतो, त्या नात्यात उत्तरअाधुनिक स्त्रीनेदेखील सगळं सोसून मैत्रीसाठी पुरुषाचा छळवाद सहन करणं अनुस्यूत अाहे.
***
ता. क.:
१) करण जोहरला एक वेळ नसेल अक्कल, पण लेका तुझी अक्कल कुठे सांडली होती? हा प्रश्न रणबीरपर्यंत कुणीतरी पोचवा.
२) अनुष्काचा अभिनय छान अाहे. अहो, पण मग काय करू अाम्ही? मनमोहन सिंग यांचीदेखील स्वत:ची प्रतिमा स्वच्छ होती.
३) हा सिनेमा कसा फालतू अाहे याबाबत काही व्हॉट्सॅप मेसेज अाले, त्यात अकारण करण जोहरच्या तथाकथित गे असण्याबाबत अनुदार उल्लेख होते. त्याचा अाम्ही निषेध करतो. त्याच्या फालतू चित्रपटांचा नि तो गे असण्यानसाण्याचा काय संबंध? नि बाकी लोक काय म्हणून फालतू सिनेमे काढतात? पण मुद्दा असा की निर्माता, दिग्दर्शक, कथाकार, पटकथाकार, संवादलेखक हे सगळे लोक, गे असोत वा स्ट्रेट, खूप पुरुष अाहेत. अगदी दिसामाजी स्खलणारे पुरुष!
-पाहुणा लेखकः 'अ सेन मॅन'
ए दिल है मुश्कील (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
