AIB नॉकआउट व रोस्टिंगः भारतासाठी नवा विधा व नव्या माध्यमाचा उदय
भारतासाठी ’रोस्टिंग’ हा विनोदप्रकार नवा आहे. तेव्हा त्यावर आधारित असलेल्या या कार्यक्रमाला जोखण्याआधी या प्रकाराची थोडक्यात ओळख करून देतो. या प्रकाराची सुरुवात न्यू यॉर्क इथे ’फ्रायर्स क्लब’मध्ये १९२० साली सुरू झाली असे म्हटले जाते. पाश्चात्त्य जगात एखाद्या आनंददायक प्रसंगी मुख्य व्यक्तीला (जसे की लग्नप्रसंगी वधूला किंवा/आणि वराला) ’टोस्ट’ देण्याची पद्धत बहुमान्य आहे. लग्नात वा एखाद्या समारंभात दिले जाणारे टोस्ट हे सहसा चांगल्या शब्दांनी ओथंबलेले, समोरच्याबद्दल गोग्गोड बोलणारे वगैरे असतात. 'रोस्टिंग' ही पद्धत अशा 'टोस्टिंग'ची खिल्ली उडवण्यासाठी जन्माला आली आहे.
रोस्टिंगला ’इन्सल्ट कॉमेडी’ किंवा अपमानजनक विनोद म्हणता यावे - म्हटले जाते. यात एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध बाबींबद्दल तिला अत्यंत मार्मिक शब्दांत शालजोडीतले हाणले जातात, नुसते एवढेच नाही, तर अत्यंत अपमानजनक पद्धतीने आणि उघडपणे मर्मावर घाव घातला जातो. आणि गंमत म्हणजे हे अत्यंत खेळीमेळीत चालते. या प्रकारात १९२०पासून बदल होत होता. २००० साली अमेरिकेत कॉमेडी सेंट्रलने याला अधिक मोठे स्वरूप दिल्यानंतर हा एका प्रकार ठरावीक फॉर्मॅटमध्ये सादर होऊ लागला.
रोस्टिंग हा प्रकार एखाद्या किंवा दोघा पाहुण्यांबद्दल विनोद करण्यासाठी आयोजित केला जातो. या विनोदसोहळ्यात साधारणतः त्या पाहुण्याचे मित्र-सुहृद भाग घेतात आणि तो प्रेक्षकांपुढे जाहीरपणे होतो. इथे विनोदाची जातकुळी ही पारंपरिक सार्वजनिक विनोदापेक्षा बरीच वेगळी असते. ज्यावर विनोद होतो त्याच्या कोणत्याही नाजूक बाबींबद्दल इथे कोणताही मुलाहिजा बाळगला जात नाही. पाहुण्याबद्दल कोणत्याही पातळीवर जाऊन व कोणतेही शब्द वापरून विनोद केला जातो. पाहुण्याला रोस्ट करायला जमलेल्यांना ’रोस्टर्स’ म्हटले जाते, तर कार्यक्रमाच्या आयोजकाला/होस्टला ’रोस्टमास्टर’ म्हटले जाते. साधारणतः हा कार्यक्रम ज्या स्टेजवर होतो, तिथे पाहुणे व रोस्टर्स यांच्यामध्ये माइक अशी रचना असते. सुरुवातीला रोस्टमास्टर त्याला हव्या त्या ढंगात, हव्या त्या पातळीवर जाऊन व हव्या त्या शब्दांत प्रत्येक रोस्टरची आणि पाहुण्यांची ओळख करून देतो. त्यानंतर प्रत्येक रोस्टर माइकसमोर येतो व व्यासपीठावरील प्रत्येकाची तुफान खिल्ली उडवणारे विनोद पेश करतो. त्यातही जे पाहुणे आहेत त्यांची विशेष अपमानजनक खिल्ली उडवली जाते. साधारणतः हे ओळखीच्या लोकांमध्ये व मित्रांमध्ये चाललेले असल्याने एरवी अत्यंत हीन समजला जाऊ शकेल असा विनोद इथे हास्याची कारंजी उडवतो. शेवटी रोस्टी (पाहुणा) आपल्यावर झालेल्या रोस्टिंगचा सव्याज बदला घेतो आणि उपस्थित प्रत्येकावर तितकेच नामी वार करतो आणि कार्यक्रम संपतो. अशा प्रकारच्या विनोदामध्ये रंग, धर्म, वय, रंग, जाडी वगैरेंसोबत सेक्स, लिंगवाचक शब्द, विविध अवयव, कृती, लैंगिक ओरिएंटेशन वगैरे कोणताही विषय वर्ज्य नसतो हे लक्षात घेणे जरुरीचे आहे. आणि हे सगळे असलेला एखादा रोस्टिंग शो भारतात होणे हीच एक महत्त्वाची घटना ’एआयबी नॉकआउट’च्या निमित्ताने भारतीय मनोरंजन इंडस्ट्रीत घडली आहे.
या पार्श्वभूमीनंतर ’एआयबी नॉकआउट’कडे वळूयात. ’एआयबी नॉकआउट’च्या या पहिल्या प्रयोगात अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग या दोन पाहुण्यांचे रोस्टिंग करण्यासाठी आठ रोस्टर्स आले होते. एआयबी हे ’ऑल इंडिया बकचोद’ या ग्रुपचे प्रसिद्ध लघुरूप. गेल्या वर्षी आलीया भटला साथीला घेऊन तिच्याच प्रसिद्ध मूर्ख उत्तराचे भांडवल करणारा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाल्यानंतर, ही एआयबी गँग हा नवा प्रयोग घेऊन आली आहे. यात टीव्हीवर चित्रपटांचे रिव्ह्यू करणारे राजीव मसंद, ’रोडीज’ फेम रघू राम वगैरेंच्या जोडीला ’एआयबी’चे चार शिलेदारही आहेत. तन्मय भट, गुरसिमरन खंबा, रोहन जोशी आणि आशिष शाक्य हे ते पॅनलिस्ट. या रोस्टिंगचा रोस्टमास्टर आहे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर.
अर्थातच सुरुवातीपासून यात विविध प्रकारचे विनोद आहेत. आल्या आल्या रणवीर सिंगने करण जोहरचे घेतलेले संभाव्य चुंबन असो की उत्तरार्धात करण जोहरपुढे "कुत्र्यासारखे" बसल्यावर त्याने "रणवीर, दॅट इज माय पोझिशन" असे बोलणे असो. करण जोहर समलैंगिक असण्याच्या शक्यतेचे/प्रतिमेचे भांडवल करून निर्माण केलेल्या विनोदांनी जी पातळी गाठली, ती समलैंगिकांना कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट न देता तितकेच रोस्ट करणारी ठरल्याने समलैंगिकता अधिकच "सामान्य" वा “नॉर्मल” असल्याचेच दाखवून देणारी ठरली. रणवीर सिंगची प्रकरणे व अनेक अॅक्ट्रेसेसबरोबर ठेवलेल्या संबंधाच्या अफवा, अर्जुन कपूरचे बारावी नापास असणे हेसुद्धा तितक्याच तीव्रतेने व अनेकदा वापरले गेले. यातील प्रत्येक मिनिट नवा विनोद घेऊन येणारे असल्याने त्यावर अधिक लिहिण्यापेक्षा ते बघणेच उत्तम.
आता जगात जे रोस्टिंगचे प्रयोग चालतात त्या तुलनेत हे कसे होते? तर हा प्रयोग सर्वोत्तम वा उत्तम रोस्टिंगचा प्रयोग नक्कीच नव्हता, तरी एक नवा फ्रेश प्रयोग होता. काही विनोद हे अनावश्यकरीत्या बीभत्स होते तर क्वचित हास्यास्पदही. ते सहज टाळता येण्यासारखे होते. करण जोहर इंग्रजीत बोलताना त्याचे टायमिंग, संवादफेक, एक्सप्रेशन्स जितकी नेमकी वाटतात, तितकेच त्याने हिंदी गावरान बोलणे, शिव्या देणे, लं* वगैरे शब्द वापरणे ठरवून केल्यासारखे व अनैसर्गिक वाटले. त्याउलट अर्जुन कपूरचे इंग्रजी तितकेच अनैसर्गिक वाटले. या सगळ्यांपैकी राजीव मसंद, मला अधिक अवघडल्यासारखा वाटला. बाकी मंडळी मात्र अतिशय सराईतासारखी वावरली आहेत. त्यातही रोस्टीज (अर्जुन आणि रणवीर) यांनी आपल्या प्रत्युत्तरात रघू राम याच्या अव्याहत शिव्या देण्यावर जे काही तोंडसुख घेतले आणि ज्या पद्धतीने त्याची टर उडवली आहे तो प्रकार जाहिर कार्यक्रमात याआधी झाला असेल का? यापुढे होऊ शकेल का? मला शंका आहे. प्रेक्षकात दीपिका पदुकोण, करणची आई हिरू जोहर वगैरे अनेक सेलेब्रिटीसुद्धा उपस्थित होत्या. आपल्या घरच्या व्यक्तींसमोर, फॅन्ससमोर या थराला जाणारी शिवीगाळ सहन करणे व स्वतः तसेच वागणे आणि असे असुनही बीभत्सतेपेक्षाही निखळ मजा येतेय हा भाव ठेवणे हा प्रकार दिसतो तितका सोपा नसावा.
एक गोष्ट मात्र खटकली हा शो म्हणे "चॅरिटी"साठी केला होता. त्यात जमलेले ५० लाख टाटा फाउंडेशन व बीइंग ह्युमनला दिले जाणार आहेत. टाटा काय किंवा सलमानची संस्था काय यांना खरोखरच पैशाची चणचण आहे का? त्यापेक्षा अधिक गरजु संस्थांना ही मदत पोचली असती तर अधिक आवडले असते. दुसरे न आवडलेले म्हणजे काही वेळा येणार्या - विशेषतः अर्जुन व रणवीरने दिलेल्या - शिव्या या अगदीच अनावश्यक होत्या - अगदीच ठरवून दिल्यासारख्या. तो भाग रेवडी उडवण्यापेक्षा, विनोदापेक्षा, एखाद्या प्यायलेल्या व्यक्तीने उगाचच समोर येईल त्याला शिव्या द्याव्यात अश्या प्रकारची शिव्याबाजी वाटु लागला होता. (मला तरी). पुढिल प्रयोगात (झाला तर) यावर काम करणे गरजेचे आहे
भारतात सार्वजनिक वर्तन कसे असावे याचे सारे संकेत धुडकावून, जिथे हरेक गोष्टीने कोणा ना कोणाच्या भावनांची नाजूक गळवे फुटत असतात अशा ठिकाणी, या प्रकारचे कार्यक्रम सादर व्हावेत हेच महत्त्वाचे आहे. त्याहून रोचक असे की त्यांच्या या प्रयोगाला अतिशय मोठा रिस्पॉन्सही लाभला आहे. हा शो यूट्यूबवर प्रकाशित झाल्यापासून दोन दिवसांत १८ लाखांहून अधिकांनी तो बघितला. या निमित्ताने रोस्टिंग हा प्रकार भारतात सुरू झाल्याचे अप्रूपच नाही, तर इंंटरनेट हे माध्यम अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी एक महत्त्वाची भूमिका निभावू लागल्याचेही सिद्ध झाले आहे. एकीकडे सेन्सॉर बोर्ड आणि इतर अनेक बंधनांमध्ये काही प्रकारची अभिव्यक्ती दडपली जात असताना या मार्गाने लोकांना आपली भूमिका, कला लोकांसमोर सहज आणि सोप्या पद्धतीने बिनबोभाट(?) सादर करायला मिळतेय आणि प्रेक्षकही ती अभिव्यक्ती स्वीकारताहेत हे सत्य लक्षात घेणे गरजेचे आहे. मराठी प्रेक्षक आपल्या कौटुंबिक सिरीयल्सच्या त्याच त्या डबक्यात सुखैनेव पोहतो आहे असा भास करून दिला जातो. तो किती खरा हे ज्याने त्याने ठरवावे. त्याचसोबत या समकालीन जाणीवा व मुल्यांसह आलेल्या दृकश्राव्य अभिव्यक्तीकडे आणि इंटरनेट/युट्यूब माध्यमाकडे तितक्याच सिरीयसली लक्ष दिले, तर फार बरे होईल.
अर्थातच या प्रकारच्या मनोरंजनाला जगात इतरत्र व भारतातही सगळेजण स्वीकारतील असे नाहीच. अशा प्रकारच्या विनोदाला अनेकदा हीन पातळीचा, पाषाणहृदयी किंवा क्रूर विनोद म्हटले जाते; तर काही जण टीका करताना या प्रकाराची आवड असण्याला विकृती म्हणतात. मात्र ते प्रत्येकाच्या खुलेपणावर आणि एकुणच अशी टिका कोण करतेय त्यावर अवलंबून आहे असे मला वाटते. कमजोर हृदयाच्या लोकांनी, किंवा शिव्या, लैंगिक अवयवांवरून केलेले उघड विनोद वगैरेंमुळे अवघडणार्यांनी, किंवा अशा गोष्टींमुळे भावना दुखावणार्यांनी यापासून लांबच राहावे हे खरेच. हे त्यांच्या पेल्यातले पेय नाही. ’एआयबी नॉकआउट’चा हा प्रहिला प्रयत्न, हा काही प्रचंड भारी जमलेला शो आहे असे म्हणणार नाही, मात्र तो महत्त्वाचा नक्कीच आहे. कोणी कितीही नाके मुरडोत किंवा नावे ठेवोत, यात काय योग्य काय अयोग्य, हे आवडणे आरोग्यदायी आहे का रोगट आहे वगैरे चर्चेत न पडता, इतके नक्की म्हणता यावे की दोन दिवसांत १८ लाख हिट्स मिळवू शकणार्या या कलाप्रकाराने भारतातल्या दृकश्राव्य कलाप्रकारांत एका नव्या इतिहासाची सुरुवात करून दिली आहे.
केवळ विधाच नाही तर प्रकाशनतंत्र, माध्यम या सार्या अंगांनी जेव्हा भारतीय मनोरंजन व्यवसाय अशी कूस बदलतो आहे, तेव्हा किमान एक प्रेक्षक म्हणून तरी त्यात सहभागी न होणे करंटेपणाचे ठरावे.
AIB नॉकआउट - चित्रपटाची /नाटकाची माहिती
