हिंदी मिडीयम (२०१७): आहे रंजक तरी...

"मी 'हिंदी मिडीयम पाहिला , मला तो आवडला... पण ...." असं मोठमोठ्याने म्हणतच मी काल कट्ट्यावरच्या घोळक्यात शिरलो. मला 'पण' नंतर काय म्हणायचंय हे कोणी फारसं ऐकून घेतलंच नाही. हे अनेकदा असंच होतं!

"हा सिनेमा तू अज्जून पाहिला नाहीस? एरवी मारे दर शुक्रवारी नवस असल्यासारखा थेटरात दिसतोस आणि तू हा सिनेमा बघितला नाहीस म्हंजे कम्माले" वगैरे छापाची वाक्ये मी गेला आठवडाभराहून अधिक ऐकत होतोच. त्याहीपेक्षा "बघ तू, नक्की आवडेल तुला सिनेमा. अगदी तुझ्या टाईपचा आहे" वगैरे परस्पर निर्णय देऊन मला एका 'टाईप'मध्ये अडकवणारी संतापजनक वाक्ये ऐकून तर माझं "नाही बघणार ज्जा" अशी प्रतिक्रिया यायला लागली होती.अशी   लोकांकडून   जोरदार   शिफारस   होऊ   लागली   की   माझ्या   ' काळजात   कट्यार   घुसते. पुढे  काही  (मला)  शहाणी  ( वाटणारी ) लोकं  हा  आग्रह  करायला  लागल्यावर मात्र,  भीत  भीत  का  होईना , सिनेमा  बघितला नि मला तो एकुणात आवडला!  

आता तो सिनेमा का व किती आवडला हे सांगणार आहे. "सिनेमा कसाय? " याला "छाने, नक्की बघ" इतका गोळाबेरीज करून आलेला अभिप्राय पुरतो त्यांनी पुढे वाचण्यात हशील नाही. मात्र माझ्यासारख्या नक्की काय आवडलं आणि त्यात काय आवडलं नाही या दोन्हीत 'विंटरेस्ट' असणाऱ्यांनी 'कंटुनी' करावे!

हा सिनेमा आहे एका श्रीमंत जोडप्याने आपल्या पाल्याला सर्वोत्तम शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी केलेल्या खटपटींवर. त्यासाठी 'जे पडेल ते' करायची तयारी व जिद्द असणाऱ्या लोकांचा हा प्रातिनिधिक चित्रपट आहे म्हणे. मला सर्वाधिक आवडला अर्थातच इरफान खान! काय बेट्याचा स्क्रीन प्रेझेंन्स असतो - इथेही कमालीचं काम केलंय त्याने. त्याची भूमिका प्रेमळ नवऱ्याची आहे. त्याच्यातल्या बापावर सतत त्याच्यातलं हे प्रेम मात करत असतं. अतिशय सामान्य पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आल्याने, त्याला एकूणच इंग्रजी माध्यमांतल्या ऍडमिशनसाठी संपुर्ण सिनेमाभर चाललेला प्रकार आणि त्या सगळ्यातला फोलपणा जाणवत असतो. तरीही काळ आणि आपल्या पत्नीवरील प्रेम व विश्वासाला हवाला ठेवून असणाऱ्या एका हतबल बापाची भूमिका त्याने रंगवलीये ती दीर्घकाळ स्मरणात राहील.

'साबा कमर' हीदेखील माझ्यासाठी एक प्रॉमिसिंग चेहरा ठरली. सुप्रसिद्ध 'प्राइड अँड प्रेज्युडीस'मधील पाच मुलींची आई आठवतेय? अतिशय विक्षिप्त, मुलींच्या लग्नासाठी कोणतेही टोक गाठायला तयार असणारी. प्रेक्षकाला वाटावं मुलींचं लग्न इतकंच तिचं आयुष्य आहे की काय? पण त्याकडे दुर्लक्ष करून किंबहुना खरोखरच ते आपलं आयुष्य मानून मुलींसाठी झोकून देणारी आई. इतकं विचित्र वागूनही तिचा राग येत नाही. या सिनेमातही साबा कमरने उभी केलेली आई तितक्याच नाजूक सीमारेषेवरुन सिनेमाभर आपली भूमिका वठवते. ती मुलीच्या एका ऍडमिशनसाठी जे जे करते आणि नवऱ्याला जे करायला लावते त्याबद्दल वाईट वाटतं, हसू येतं, कीव वाटते पण तिचा राग येत नाही. अर्थात यात तिच्या अभिनयाइतकाच वाटा तिच्या संवादांनाही आहे.

सिनेमात या दोघांचं काम, क्वचित दिसणारी दिल्ली आणि चुरचुरीत संवाद या तीन गोष्टी वगळल्या तर मात्र सिनेमातील इतर काही गोष्टी फारश्या काही आवडल्या नाहीत. सर्वात मुख्य म्हणजे पटकथेतील ढिसाळपणा, अभ्यासाची कमतरता आणि बाळबोध ठोकळेबाज दिग्दर्शन! तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणणं केवळ थोर असू शकत नाही; तर ते कसं म्हटलंय ते नजाकतभरंही असावं लागतं. या सिनेमाचं पटकथा लेखन 'धसमुसळं' आहेच; त्याहून अधिक ते 'सरसकटीकरण' करणारं आहे. "गरीब कसे सच्चे आणि श्रीमंत कसे लुच्चे" हा लोकांचा लाडका सिद्धांत इथे मनसोक्तपणे वापरला गेला आहे. "बघा बघा श्रीमंत कसे गरिबांच्या सीट्स खातात" यापलिकडे आरटीईच्या गैरवापराबद्दल, त्याने उद्भवणाऱ्या समस्येबद्दल व त्याचा मुलांवर होणाऱ्या परिणामांबद्दल या सिनेमात सघन असं फार काही मांडलं जात नाही. मोठमोठ्या शाळांमध्ये आरटीईच्या विद्यार्थ्यांना मिळणारी अस्पृश्यतेच्या तोडीस तोड - क्रूर म्हणता येईल अशी - वागणूक असो किंवा अश्या मुलांना शाळेत घेताच येऊ नये यासाठी शाळा लढवत असलेल्या कॢप्त्या असोत, यासारख्या अनेक बाबतीत सिनेमा पूर्ण मौन बाळगणे पसंत करतो.

त्याच बरोबर एकूणच सरसकटीकरण व चित्रीकरण तर कंटाळवाणे इतके होईल इतके ठोकळेबाज आहे. मोठमोठ्या शाळांना एकजात वैट्ट रंगात तर जि. प‌. शाळा म्हणजे 'बिच्चाऱ्या वंचितांचे थोर प्रतिनिधी' अशी सोपी वाटणी करणे असो किंवा वर म्हटलं तसं 'गरीब लै भारी नि श्रीमंत लुच्चे' असा अविर्भाव असो. एकूणच सिनेमा सफेद आणि काळा या दोनच रंगांत रंगवला आहे. एक  यशस्वी व्यावसायिक सिनेमा  काढायचा  तर  अगदी  सगळा  वर्णपट  दाखवणं  शक्य  नाही हे मान्य, पण  किमान अभ्यासाचीही वानवा सिनेमात सतत जाणवते.

हा विषय महत्त्वाचा आहे नि यावर या सिनेमातून चर्चा सुरू करणं स्त्युत्य आहे; पण सिनेमात ती चर्चा फारच वरवरची आहे. मात्र तरीही, एक व्यावसायिक करमणूकप्रधान सिनेमा म्हणून इतर अनेक व्यावसायिक सिनेमांच्या तुलनेत हा सिनेमा विषय, संवाद आणि मुख्यतः अभिनय यांच्या जोरावर अधिक भाव खाऊन जातो हे मात्र मान्य करायला हवेच!

हिंदी मिडीयम (२०१७) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

हिंदी मिडीयम (२०१७)
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: साकेत चौधरी
  • कलाकार: इरफान खान, साबा कमर
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१७
  • निर्माता देश: भारत