लोकमान्य शेट्टींना आवरा!

अहो! असे छमत्खारिख नझरेनं खा भघथाय माझ्याखढे? नि थो रुमाल खाय म्हणून धरलाथ थोंडाव्हर? आं? ऐखा खी! ख्खाय? थुंखी? ओह... थुंखी उढत्ये? ओह्ह्ह.... ओखे.. ओके.

सॉरी, सॉरी हां. आता? आता ठीक आहे?

हां. तर मी सांगत काय होते... कुणाला सांगणार तर नाही ना तुम्ही? नाही, काये, तुम्ही सहज म्हणून बोलून जाल, नि माझा मधल्यामधे गेम होईल. मला सिनेमातली थोडीफार अक्कल आहे, असं वाटतं हो माझ्या ग्रुपमधल्या पोरांना. मी असलं काहीतरी बघायला - माझ्या रोज दहा तास हाडं उगाळून मिळवलेल्या पगाराच्या पैशातून - गेले होते, याची भनक जरी त्यांना लागली, तरी माझी पत खलास होईल हो. भोसडीचे नाक्यावर फ्लेक्स लावतील. म्हणून - प्लीज. बोलू नका कुठे. पण थांबा हो. ऐका. आता नाही ना थुंकी उडत? हां. मलाही बोलून मोकळं व्हायचं आहे...

मी गेले होते ’लोकमान्य’ बघायला काल. होय होय, तोच. सुबोध भावेनी टिळकांचं काम केलंय ना, तोच. छे छे! एकदा बेनेगलांनी बोसांच्या नावावर जे काही केलंवतं, ते याचि देही याचि डोळा सोसल्यावर मी जाईन का स्वत:हून चरित्रपट बघायला? पण सिचुएशन हो, सिचुएशन. माझा भाचा आहे ८ वर्षांचा. होय होय! आता लवकरच थाटामाटात मुंजबिंज करण्याच्या वयातला नि आर्थिक-जातीय गटातला. तर ’फ्रायडे नाईट सिनेमा’का सिनेमा, हातासरशी त्याच्यावर थोडे ’संस्कार’ असा दुहेरी डाव होता भावाचा. तो झोपला तर काय घ्या? तो म्हणजे भाचा. भाऊ कसा झोपेल? उगाच आपलं.... तर तो झोपला, तर उचलाबिचलायला मदत... म्हणून आमची वर्णी लागली.

मल्टिप्लेक्सातला थाट काय सांगू! हे‌ऽऽऽ मराठी लोक लोटलेले. उत्सवी वातावरण. आमचा भाऊपण धोरणी. एखादा टोकन सार्वजनिक गणपती बसवून घेतलाय का स्क्रीन ४ च्या शेजारच्या कोपर्‍यात वातावरणनिर्मितीसाठी, ते त्यानं पटकन बघून घेतलं. नाही, एक संस्कारवर्ग झाला असता ना हातासरशी. पण नव्हता. तर सांगत काय होते, असाच उत्साह बालगंधर्वांच्या नाटकांच्या वेळी असे म्हणे. त्यातही सुबोध भावेच होता नाई? गो‌‍ऽड दिसलावता ना? असो. भरकटलो आपण.

तर मला मुख्य इंट्रेष्ट होता खलाधिग्धर्शनात. अर्रं... सॉरी हां. कलादिग्दर्शनात. वातावरणनिर्मिती जाम महत्त्वाची असते ना अशा पिरियड सिनेमात. त्या काळचे कपडे. रस्त्यांवरून दिसणारी दृश्यं. चालीरीती. उजेडाचं टेक्स्चर आणि सोर्सेस. वर्तमानपत्रं. हजार झेंगटं. म्हणून मी मारे सरसावून बसले. पण आता काय बोलायचं, आपल्याच मराठी सिनेमाबद्दल चारचौघात? किती नाही म्हटलं, तरी लाज येते हो. लोकांचे जमाव? मास पीटीच्या तासाला नाई का आपल्याला मैदानावर उभं करत? एका हाताचं अंतर सोडून? तशी एका हाताच्या अंतरावर शिस्तीत उभ्या केलेल्या लोकांची ’गर्दी’. त्यांच्या हातात शिस्तीत जळणारे पलिते. कोर्टातल्या सीनमध्ये काय लोडशेडिंग होतं का काय देव जाणे. असेल म्हणा. रिसर्च केल्याची पाटी होती क्रेडिट्समध्ये, तर असतील तेव्हा कोर्टातले लाईट गेलेले. पण तिथेही हीऽऽऽ दिवाळी. ठरावीक अंतरावर शिस्तीत जळणारे दिवे कोर्टभर. ज्वलनाला ऑक्सिजनची गरज असते हे सिद्ध करायला स्पिरिट लॅम्प्स नसायचे का केमिस्ट्री लॅबमधे? तसले, मोठ्या आकाराचे दिवे. रांगेनी लावलेले. नि जज्ज कोकणस्थी मराठीत बोलतायेत त्या दिव्यांच्या दिव्य सोनेरी प्रकाशात. टिळक? टिळक आपले १२ महिने २४ तास पर्मनंट स्फुरण चढलेल्या अवस्थेत मिशा फुरफुरवत महाप्राणांची नि थुंकीची आतिषबाजी करत मारतायत डॉयलॉकवर डॉयलॉक. आगरकरांसकट सगळे आपले ’काय बाब्या बोलतोय आपला!’छाप नजरा घेऊन पंचारती ओवाळण्याच्या तयारीत. च्यायला. ते मरो. परत भरकटले मी. तर आपण बोलत कशाबद्दल होतो? कलादिग्दर्शन. मधे एकदा विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या माडीवरल्या माजघरात टिळक नि आगरकर जातात तो सीन आला. काय दिवेलागणी! मधे एखाद्या महाराजासारखे झोपाळ्यावर तुस्तपणे बसून झुलणारे विष्णूशास्त्री. त्यांच्या मागे कुठल्याश्या तेज:पुंज दिव्याची आभा फाकलेली. दोन्ही बाजूंनी ओळीनं मानकर्‍यांसाठी खुर्च्या. खांबांवर तेच ते - सिमिट्रिकल स्पिरिट लॅम्प उजळलेले. मधेच कुठूनशी सुरेखा पुणेकर येऊन बैठकीत नाचायला लागेल, असा भास होऊन मी हळूच भाच्याकडे बघितलं. तो भलताच खुशीत येऊन बघत होता. म्हटलं, असो.

तर दिव्यांचं एक ते तसं. होतं असं. म्हणून मी भाव्याकडे लक्ष वळवलं. तसा तो चांगला नट आहे. कधीकधी दिसतोपण माल. काय सांगता, ’हापूस’ बघितला नाही तुम्ही? ’लग्नबंबाळ’ तरी? तरीच! मान्य आहे, अगदी गोराघारा वरणभात टाईप आहे. पण अपील आहे, कमॉन. हां, तर भावे. पण काय त्याला कुणी सांगितलं टिळकांच्या नजरेबद्दल, सारखी आपली नजर भेदक. बरं, एकही मृदू वर्ण उच्चारायला तयार नाही. जिकडे तिकडे महाप्राण. ख. ठ. भ. थ. फ. ध. ढ.... त्याच्या तोंडातून उडणारी थुंकी आवरायला फिल्टर म्हणून ती मिशी दिल्ये का काय, असं वाटावं एखाद्याला. पण नाही. ती सोय खुद्द टिळकांनीच करून ठेवल्ये, म्हणून बरं. हीच भाव्यांची तेज:पुंज ऍक्टिंग. नि बॅकग्राउण्डला मिळमिळीत आगरकर. कनवाळू फुले आजोबा. तुंदिलतनू विष्णूशास्त्री. की पुढे टिळक उठून दिसलेच्च पायजेत.

टिळकांची पत्नी? तिची महती काय वर्णावी! टिळकांसारख्या सनातनी गृहस्थानं कधी स्वप्नातही पत्नीला बुकं दाखवण्याचा विचार केला नसेल. भावेमहाशय रानड्यांच्या थाटात तिला बुकं वाचायला टेबलाशी बसवत होते, ते बघूनच डॉले पानावले. बरं म्हटलं, ठीके यार! पण टिळक नि आगरकर जोडीनं तुरुंगात गेले, तेव्हा ही माउली भन्साळीच्या सिनेमातल्या पारोची आजी असल्यासारखी वाड्यातून तीरासारखी धावत की हो आली! तश्शीच वाड्याच्या उंबर्‍यात पिसाळलेलं कुत्रं बांधलेलं असल्यासारखी चौकटीला ओठंगली. वर टिळक बग्गीतून जाता जाता वाकून तिला बायबाय करतायत. एकदा वाटलं, आता फ्लाइंग किसपण देतात का काय... हसता काय? असले एकेक शॉट.

तरी आम्ही धीर धरला बरं का. असते, सिनेमॅटिक लिबर्टी असते. आम्हांलापण कळतं. पण अहो, संमतिवयाच्या कायद्यासाठी आगरकरांनी घेतलेली सभा टिळकांनी उधळली त्या सीनमध्ये हद्द झाली. रोहित शेट्टीनं चिरंजीव राउतांकडून धडे घ्यावेत असला प्रसंग. एक्झॅक्टली शेट्टी छापाच्या मारामार्‍या. लुंग्यांच्या ऐवजी कोरीकरकरीत धोतरं होती नि गाड्या वजा होत्या, इतकाच काय तो फरक. मागे टिळकांच्या बॅकग्राउंडला हताश आगरकर मध्यभागी. नि दोहो बाजूंस सिमिट्रिकल मारामार्‍या. नि टिळक? ते एखाद्या व्हीलनसारखे तिरकी भिवई करून, स्फुरण+छाती+भेदक नजर या कॉम्बिनेशनसकट चालतायत विजयी मुद्रेनं. वर ’हिंदूंच्या धर्मात इंग्रजांनी हात घालण्याचे कारण नाही आणि दुतोंडी सुधारकांनी बोलायचे काम नाही’ या भगव्या वळश्याचं आयमॅक्सी उदात्तीकरण आहेच.

आपला तर बा पेशन्स खलास झाला. भाच्यालाही मजा यायला लागलीवती एव्हाना. दरेक हाणामारीला या टाळ्या पठ्ठ्याकडून! म्हणजे झोपला नसताच तो. त्याच बेसिसवर मी सुमडीत कलटी मारली. फक्त एक प्रॉब्लेम झाला. काय म्हणजे काय? हेच, बोलताना सारखे तोंडात महाप्राण नि समोरच्या बिचार्‍यावर स्प्रेपेंटिंग.

पण आता बोलून बरं वाटतंय. थॅंक्यू बरं का. लक्षात आहे ना? बोलू नका हां कुठे.

अर्धाच ’लोकमान्य’ बघितलाय मी.​

 

लोकमान्य एक युगपुरुष - चित्रपटाची /नाटकाची माहिती

लोकमान्य एक युगपुरुष
  • Official Sites:

    imdb
  • दिग्दर्शक: ओम राऊत
  • कलाकार: सुबोध भावे, अंगद म्हैसकर, चिन्मय मांडलेकर, समीर विद्वांस, प्रिया बापट
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: http://www.justmarathi.com/lokmanya-ek-yugpurush-first-day-box-office-collection/
  • प्रदर्शन वर्ष: २०१५
  • निर्माता देश: -