नील बटे सन्नाटा (२०१६): अनंत आशेला कवटाळू पाहणारा सान्त सिनेमा
भारतीय तत्त्वज्ञानात शून्याला खूप महत्त्व आहे. एक आकडा म्हणून नव्हे तर एक अमूर्त तत्त्व म्हणून. आयुष्यात शून्य असणे हे आर्थिक स्थितीपासून मानसिक स्थितीपर्यंत अनेक बाबी दाखवते. भारतात (खरंतर कुठेही) गरिबांचं आयुष्य एक मोठं शून्यच असतं. त्यात एखादी बाई घरकामं करून एकटी आपल्या मुलीला वाढवत असेल तर या शून्याला इतरही काही शून्य येऊन चिकटतात, छेद देतात - भागतात. पण या शून्याला छेद देऊन काही उरत असेल तर ती असते "आशा" आणि ती अनंत असली तर शुन्यातूनही काही जन्म घेऊ शकतं. याच आशेच्या खेळावर प्रेक्षकांना झुलवणारा चित्रपट म्हणजे 'नील बटे सन्नाटा'
काही चित्रपट असे असतात की त्याबद्दल लिहायचं बरंच काही असतं पण लिहायला बसलं की नेमकी सुरुवात कुठून करावी हे समजत नाही, हा चित्रपट त्यापैकीच एक. अश्विनी तिवारी या नव्या दिग्दर्शिकेचा हा पहिलाच चित्रपट. दिग्दर्शनात स्त्रिया आजवर नेहमीच काहीतरी वेगळं घेऊन येतात, आणि हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. सर्वात आधी चित्रपटाचं ढोबळ कथासुत्र सांगतो. अप्पु (रिया शुक्ला) हिच्या दहावीचं वर्ष सुरू होण्यापासून चित्रपटाला सुरुवात होते. पहिल्या काही मिनिटांतच, तिच्या घरची गरिबी, आईचं (स्वरा भास्कर) कामा साठी घराबाहेर पडणं, तिची शाळा, तिचे तिच्याइतकेच अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारे मित्र, आपल्या शाळांची आठवण व्हावी असे नग शिक्षक आदी पार्श्वभूमी एकदम सज्ज होते. अप्पु जाणून असते आपली आई एक मोलकरीण आहे आणि आपल्याला अधिक शिकवणं काही तिला झेपणारं नाही. मात्र तिची आई मात्र आशावादी आहे. आपली मुलगी हे गरिबीचे दुष्टचक्र भेदेल ही तिची आशा चिवट आहे. आणि त्यासाठी पडतील ते कष्ट करायची तिची तयारी आहे. मात्र दहावीचं वर्ष सुरू झाल्याच्या पहिल्या काही दिवसांतच तिला समजून चुकते की आपल्या मुलीने आयुष्याकडून कोणतीही आशा ठेवलेली नाही. आपल्या परिस्थितीमुळे आपण शिकू शकणार नाही तर कष्ट घ्याच का? तसंही आपल्याला मोलकरीणच व्हायचं आहे असं तिने मनाला पुरेपूर पढवलंय. ते ऐकून आई सुन्न झाली तरी ती हार मानत नाही. जी ज्या डॉक्टरीणबाईंकडे काम करत असते त्या डॉ. दिवाण (रत्ना शहा) त्यांच्या सल्ल्याने आणि पाठिंब्याने ती थेट अप्पुच्या वर्गातच प्रवेश मिळवते. मग सुरू होतो एक मोठा गमतीशीर प्रवास. आई आणि मुलगी एकाच वर्गात शिकू लागतात. हा प्रवास अप्पुला जसा बदलतो, तिच्या वर्गातील मित्रांना बदलतो तसाच तो अप्पुच्या आईवरही परिणाम करत असतो. या एकूणच प्रवासाची कहाणी त्या दोघींना कुठे घेऊन जाते हे हलक्या फुलक्या ढंगात प्रेक्षकांपुढे मांडणारा चित्रपट म्हणजे 'नील बटे सन्नाटा'
हा चित्रपट कसाय विचाराल तर 'छान आहे' इतकं उत्तर देता येईल. यात काही वाईट किंवा खटकणारं नाही. साधी सरळ कथा तितक्याच साधेपणाने आणि प्रामाणिकपणे उभी राहते. या प्रामाणिक चित्रणामुळे आणि बर्यापैकी छान संवादांमुळे चित्रपट बघणे अजिबातच कंटाळवाणे होत नाही. मात्र हा चित्रपट "थोर" नाही. पटकथा आणि दिग्दर्शन या दोन्ही बाबतीत काम करायची गरज आहे. साधी हाताळणी असली तरी ती अनेकदा सरधोपट होते. गोग्गोड शेवट करायचाच किंवा या दोघींपेक्षा इतरही पात्रांचा प्रवास येऊ द्यायचा या अट्टहासापायी काही भाग प्रक्षिप्त भासावा इतकी चित्रपटाची लय बिघडवतो. अप्पुच्या मित्रांचं डबिंग तर काही वेळेला मजा घालवावं इतकं कृत्रिम आहे. मात्र एकूण अनुभव तुम्हाला भावभावनांच्या रोलरकोस्टरमध्ये बसल्याचा आनंद देतो हे नक्की. त्यात स्वरा भास्करचा अभिनय आईने शाळेत बसणं, तिथे पोरांत पोर बनणं आणि एरवी एक खस्ता खाणारी आई असणं फारच ताकदीने वठवलं आहे. कुठेही अति गोग्गोड किंवा अति रुक्ष किंवा अति पोरकट न होण्याचं मोठंच आव्हान तिच्यापुढे होतं आणि ते तिने झक्क पेललंय
या सिनेमातले आग्रा ही आणखी एक जिवंत गोष्ट आहे. दिसलं आग्रा की सारखं दाखव ताजमहाल हा खुळचटपणा इथे टाळला आहे. झोपडपट्टीत रहणार्या मुलीला व तिच्या मैतरांना वा तिच्या आईला रोजच्या आयुष्यात जे आग्रा दिसेल तेच आपल्या समोर येत राहतं. पात्रांची वेषभूषा/केशभूषा, भाषा, वावर अतिशय सच्चा आहे. (नंतर कळले की यासाठी जवळजवळ ४५ विद्यार्थी आग्र्यातूनच घेतले होते). त्यामुळे कथा ही दोघींची जितकी असते तितकीच तिला वास्तवाची, भवतालाची पार्श्वभूमी मिळते. कुठेतरी घडणारी ती गोष्ट न राहता, तुमच्या-माझ्यासारख्यांमध्ये वावरणार्या, आपल्याला सतत दिसणार्या लोकांची ती गोष्ट होते आणि म्हणूनच ती खरी वाटते. अर्थात सिनेमाच्या शेवटी नेमकं हेच कमी पडतं आणि "क्यू की मै बाई नही बनना चाहती" या एका डायलॉगसाठी एका सुपरफिशियल नी प्रेडिक्टेबल शेवटाकडे सिनेमा वाहतो.
थोडक्यात काय तर दोन तास निखळ मनोरंजन, साधी सरळ कथा, तितकंच वास्तवदर्शी चित्रण आणि छान गाणी व अभिनय यांची सजलेला हा चित्रपट छान आहे. गणितात शुन्यात काहीही मिळवलं किंवा कशातूनही शुन्य वजा केलं तरी काही फरक पडत नाही. शुन्याशी गुणाकार केला तर आहे त्याचंही शुन्य होतं. पण शुन्य भागिले शुन्य केल्यावर मात्र त्याच उत्तर 'अनंत' (इन्फिनिटी) येतं. इंग्रजी 'नील' (Nil) याला आयुष्यातील सन्नाट्याने भागल्यावर समोर उभ्या ठाकणार्या अनंत आशेला कवटाळू पाहणारा ही सिनेमा सान्त ठरत असला तरी एकदा नक्कीच बघावा असा आहे!
नील बटे सन्नाटा (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
