प्राइड अँड प्रीज्युडिस: (१९९५ मिनी BBC सिरिज) एक दीर्घ रसग्रहण
'प्राइड अँड प्रीज्युडिस'बद्दल बहुसंख्यांनी किमान ऐकलेले जरूर असेल. ही इंग्रजी 'क्लासिक्स'पैकी एक अजरामर कादंबरी. जेन ऑस्टिनच्या कादंबर्यांपैकी माझी स्वतःची सर्वाधिक आवडती. मात्र इथे आपण त्या कादंबरीबद्दल नाही, तर त्यावर आधारित एका ’मिनी-सिरीज’बद्दल बोलणार आहोत. 'प्राइड अँड प्रीज्युडिस' असे नाव काढले रे काढले की लगेच "अरेरे! तो ऐश्वर्या रॉयचा भिकार सिनेमा का? " अशी विचारणा काही भारतीय प्रेक्षकांकडून होते. मग "नाही तो नाही, त्याचं नाव 'ब्राइड अँड प्रीज्युडिस' असं होतं. मूळ कथा ’प्राइड अँड प्रीज्युडिस’वरून स्फुरली असली तरी त्याचे पूर्णपणे रूपांतर (आणि बट्ट्याबोळ) केला होता." असे स्पष्टीकरण लगेच द्यावे लागते. खरेतर या कादंबरीवर जगभरात अनेक (२० च्याही वर) चित्रपट बनवले गेलेत. विविध प्रकारच्या सादरीकरणाची किंवा रूपांतरांची शक्यता या कथेत सामावलेली आहे हे खरे असले, तरी मी मात्र या लेखात सायमन लँग्टन यांनी दिग्दर्शित केलेल्या ’बी.बी.सी.’वरील ’मिनी सिरीज’बद्दल लिहिणार आहे.
मुळात ही कादंबरी इतकी रोचक आहे की त्यातील एकही प्रसंग हा अनावश्यक किंवा कथाबाह्य नाही. एखाद्या तलम वस्त्राची वीण जशी अलगद एकमेकांत गुंफलेली असते, तशी काहीशी मूळ कथेची वीण आहे. कथेला एक हीरो व हिरॉइन असले तरी इतर भारंभार पात्रे आणि तरीही प्रत्येकाचे स्वभावविशेष यांनादेखील खूप महत्त्व आहे. त्यामुळे या कथेवर आधारित जितके प्रयोग झाले - मग ते नाटकांचे असोत की चित्रपटांचे असोत - त्यांत कथा ठरावीक वेळेत सादर करण्याच्या कसरतीपायी कितीतरी महत्त्वाच्या प्रसंगांना काट द्यावी लागली आहे. मुळातच कथा बांधीव आणि सुंदर आकारात असल्याने ही काटछाट बहुतेक वेळा विद्रूपीकरण सोडल्यास इतर काही साधत नाही. या पार्श्वभूमीवर ही ’बी.बी.सी.’ची ’मिनी सिरीज’ पाच तासांचा पसरट ऐवज (५० मिनिटांचे ६ एपिसोड्स) घेऊन येते आणि त्या वेळेचा असा काही सदुपयोग करते की मूळ कादंबरी आणि ही ‘सिरीज’ यात काय अधिक उजवे आहे, असा प्रश्न वाचक-प्रेक्षकाला पडावा.
पहिल्याप्रथम या ’सिरीज’चे रूपांतरकार व पटकथालेखक असलेल्या अँड्रयु डेव्हिस या प्रसिद्ध लेखक-पटकथाकाराला सलाम करायला हवा. कारण मूळ कादंबरीतील प्रत्येक भाग जरी या ‘सिरीज’मध्ये नसला (आणि ’सिरीज’मधील प्रत्येक घटना पुस्तकात नसली) तरी नक्की काय छाटल्याने, वाढवल्याने या कथावस्तूच्या ढंगाला धक्का बसणार नाही, उलट प्रसंगी ती अधिकच खुलेल हे त्यांना नेमके गवसले आहे. खरेतर अँड्र्यु डेव्हिस हे एकूणच ‘टीव्ही सिरीज’च्या लेखकांमधील एक अतिशय प्रसिद्ध नाव. ‘बाफ्ता’ची फेलोशिप मिळवलेला हा लेखक नि सायमनसारखा दिग्दर्शक हे जेव्हा एकत्र येताततेव्हा अशी उत्तम कलाकृती घडते असे म्हणायला हवे.
आपण दिग्दर्शनाकडे नंतर येऊच, पण त्याआधी इतर महत्त्वाच्या अंगांची चर्चा करणे अत्यंत अगत्याचे आहे.
सर्वात आधी कास्टिंगच्या महत्त्वाच्या अंगाला स्पर्श करणे अनिवार्य आहे. ही ’सिरीज’ बघितल्यानंतर ’मि. डार्सी’च्या भूमिकेत कॉलिन फर्थ व ’एलिझाबेथ’ - अर्थात ’लिझी ’ म्हणून जेनिफर एले सोडल्यास इतर कोणताही चेहरा कधीच डोळ्यांपुढे येऊ नये आणि त्या कलाकारांहून अधिक कोणीही आवडू नये याची तजवीज पुरती केली गेली आहे. मुळातच डार्सी गर्विष्ठ नाही. तरी आपल्या घराण्याचा, संपत्तीचा आणि एकूणच समाजातील आपल्या हुद्द्याचा अतिशय अभिमान - प्रसंगी दर्प - असलेला आहे. मात्र समोरच्याशी वागतेवेळी तो तुसडा नाही - तो अदबशीर आहे. त्याची अभिरुची उच्च दर्जाची आहे, त्याच वेळी तो बर्यापैकी माणूसघाणा आहे. कॉलिन फर्थ ही गुंतागुंतीची भूमिका ज्या ताकदीने पेलतो तिला तोड नाही. भोवतीच्या जनतेला वैतागलेली त्याची गंभीर मुद्रा असो, की तो प्रसन्न असतानाचा स्मितहास्याचा नमुना असो. शांत, स्थितप्रज्ञ नि स्वभावात हळूहळू बदल होत गेलेला डार्सी त्याने जिवंत केला आहे. त्याचबरोबर पुस्तकातील लिझीसुद्धा प्रसन्न निबापाची सर्वात लाडकी आहेच, शिवाय भावनाप्रधान, पटकन निर्णयाला पोचणारी आणि प्रत्येक बाबतीत काही ठाम मते असणारी मुलगी आहे. तिच्याहून सुंदर असलेल्या मोठ्या बहिणीवर खूप प्रेम करणारी, त्याचबरोबर इतर बहिणींच्या वागण्याकडे निरपेक्षतेने बघणारी अशी ती मनस्वी व सुंदर मुलगी आहे. अशी ही लिझी, जेनिफर एलेशिवाय दुसरे कोणी असे उभे करू शकेल हे हा चित्रपट पाहिल्यावर पटतच नाही. केट विन्स्लेटने लिझीला उभे करायचा त्यातल्या त्यात चांगला प्रयत्न केला होता. मात्र मुळातच चित्रपटाच्या लांबीमुळे असेल किंवा त्यांच्या स्वतःच्या अभिनयाच्या वा दिग्दर्शकाच्या मर्यादेमुळे असेल, जेनिफरच्या अदाकारीपुढे इतरांचे सादरीकरण कितीतरी अंगांनी फिके पडते. (जाताजाता हेही सांगायला हवे की गेल्या ६०-७० वर्षात २२ जणांनी एलिझाबेथची भूमिका करायचा प्रयत्न केला आहे). अर्थात या दोन पात्रांसोबत कास्टिंगची कमाल संपत नाही. लिझीचे वडील असोत की आई असो, पळून जाणारी धाकटी बहीण लिडीया असो की डार्सीच्या १८० अंश विरुद्ध स्वभाव असलेला त्याचा जिगरी दोस्त मिस्टर बिंग्ले असो, लेडी कॅथरीन-डा-बर्गची तुफान फटकळ श्रीमंत बाईची भूमिका असो किंवा धांदरट, कपटी - तरीही भोळसट - कॉलिन्स असो, किंवा अगदी व्हिकमच्या रूपात उभा राहिलेला रूपवान व्हिलन असो - असे बहुधा एकही पात्र या ’सिरीज’मध्ये नाही, ज्याचे काम दुसर्या कुणीतरी करायला हवे होते असे प्रेक्षकाला वाटावे.
वेषभूषा व नेपथ्य हा या ’सिरीज’चा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की मूळ कथा १८१३ मध्ये लिहिलेली आहे. त्यात तत्कालीन पुस्तकांनी यातील काही पात्रांची कल्पनाचित्रेही काढून ठेवली आहेत. मात्र या ’सिरीज’पर्यंत इतर बहुतांश चित्रपटांत ही एक महत्त्वाची बाब तितक्या गांभीर्याने घेतलेली नाही. या चित्रपटांत वापरलेले स्त्रियांचे गाउन्स आणि पुरुषाचे विविध पेहराव बेमालूम आहेतच, पण सर्व पात्रे ज्या सहजतेने त्यात वावरतात, नाचतात, बोलतात ते बघून चित्रातला वेष बोजड किंवा गैरसोईचा असेल का, अशी पुस्तक वाचते वेळी येणारी शंका पूर्णतः नाहीशी होते. घरी ब्रेकफास्ट घेताना किंवा घराबाहेरच्याच बागेत वावरताना काही घरगुती कपडे, चर्चला जायचे कपडे, बॉलरूममधील फॅशन्स, इतकेच काय समाजातील विविध स्तरांतील लोकांच्या कपड्यांतील फरक, ब्रिटनमधील विविध भागांतील लोक एकत्र आल्यावर दिसून येणारे कपड्यांतले फरक, उदाहरणार्थ उत्तरेकडील बायकांच्या कोपरापर्यंत असलेल्या बाह्या, तर दक्षिणेत तत्कालीन फॅशननुसार कमी झालेली लांबी (नि त्यावर झालेली बायकांची कुजबुज), हॅट्सवरील नक्षीकाम, तत्कालीन कपड्यांची दुकाने आणि शोकेसेस्, पुरुषांचे विविध लेअर्सचे कपडे, बुटांचे प्रकार, घोडेस्वारीच्या वेळी घातले जाणारे कपडे इत्यादी अनेक बारकावे टिपण्यासाठी मी ही ’सिरीज’ अनेकदा बघतो. मात्र पहिल्यांदाच चित्रपट बघणार्यावरही या सगळ्याचा एकत्रित परिणाम फारच नेमका होतो.
पुस्तकाचे दृश्यात रूपांतर करताना वेषभूषेव्यतिरिक्त अन्यही अनेक बाबी असतात, ज्याने तो काळ समोर येत असतो. या ’सिरीज’मध्ये कित्येक प्रसंगांमध्ये पार्श्वभूमीवर या बाबी अतिशय साटल्याने दाखवल्या आहेत. उदाहरणे द्यावीत तितकी कमीच आहेत. मोठमोठ्या महालांमध्ये संध्याकाळी सर्वत्र मेणबत्त्या लावल्याची पद्धत असो की धनिकांच्या घरी खास तांब्याच्या बाथटबमध्ये स्टुअर्टच्या साहाय्याने अंघोळ करण्याची पद्धत असो; आरशांची नि पलंगांची नक्षी व ठेवण असो की वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचे टांगे, घोडे, नोकर यांच्या प्रतीत आणि संख्येत असणारे फरक असोत; फावल्या वेळात लिझीच्या घरी खेळले जाणारे खेळ असोत किंवा लिझी व तिच्या बहिणी / आई जी फुले / हर्ब्ज गोळा करत आहेत त्यांद्वारे कथानकातले स्थान व ऋतू दर्शवणे असो; वेगवेगळ्या स्तरांतील लोकांचे लेखनासाठी वापरायचे वेगवगळे कागद, पेन / निब्ज / टाक / क्वेल्स असोत की घराची रचना असो... अशा अनेक लहान बाबींकडे अगदी तपशीलवार लक्ष दिल्याने चित्रपटाची मजा कितीतरी पटींनी वाढली आहे. पुस्तकात ’त्यांनी एकमेकांना ग्रीट केले’ इतकाच उल्लेख असताना प्रत्यक्षात समाजात वेगवेगळ्या स्तरांवरील व्यक्ती एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्यामधील ग्रीटिंग्जचा ओलावा, पद्धत, जवळीक आणि स्वभाव हे सगळे लक्षात घेऊन प्रेक्षकांपुढे तो प्रसंग सादर केल्यामुळे, तो काळ आणि त्याहून मुख्य तत्कालीन समाज आपल्यापुढे उभा राहत असतो. एखादा काळ उभा करणे म्हणजे फक्त माणसे, रस्ते, वाहने नि वास्तू हुबेहूब रंगवणे इतकेच नसते. माणसांचे मॅनर्स, अभिनिवेश, राजकीय / सामाजिक पार्श्वभूमी, समाजातील स्तर, लोक एकत्र आल्यावर व घरात असताना वागण्याच्या तत्कालीन समाजाच्या रिती, घरात बोलणे, मित्रांत बोलणे, तिर्हाईतांशी बोलणे या वेळी शब्दात, उच्चारात व संबोधनांत केला जाणारा फरक वगैरे अनेक लहानसहान बाबींमधून काळ उभा राहत असतो हे असा चित्रपट बघून प्रकर्षाने जाणवते.
(क्रमशः)
प्राईड अॅण्ड प्रेज्युडिस (१९९५ टिव्ही सिरीज) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
