वजनदार (२०१६): वेगळेपणाला प्रोत्साहान देण्यासाठी बघा हवं तर!
पाहुणा लेखकः घनु
माझ्या कॉलेजमधे एक मुलगा टेबलटेनिस फार उत्तम खेळायचा. कॉलेजच्या फायनल इनडोअर गेम्समधे त्याचा टेबलटेनिस चा सामना पहाणे म्हणजे पर्वणीच. पण ह्या दिवशी ज्यांना टीटी मधलं ओ की ठो कळत नसे, तेही जमायचे आणि त्या़ंचीही तितकीच करमणूक व्हायची. ह्या इतरांची करमणूक असायची ती त्या जाड मासाच्या गोळ्याला टेबलटेनिस खेळताना पहायची. हो, तो माझा मित्र अशक्य जाड होता, अदनान, सुमो, लड्डु, लोदू अशी एक ना अनेक त्याला विशेषणं होती पण दुर्दैवाने त्याच्या टेबलटेनिसच्या कौशल्यावरुन त्याला एकहि विशेषण नव्हतं, नि आजही नाही. 'जाडेपणा' माझ्यामते हा एकमात्र असा विषय आहे, जो जितका गंभीर आहे, तितकाच विनोदाचाही (की चेष्टेचा?) आहे.
'वजनदार' हा सिनेमा थोडंफार त्यावरच भाष्य करतो. सर्वप्रथम दिग्दर्शकाचे विशेष आभार अशी वेगळी पटकथा मांडल्याबद्दल, त्यातही मुख्य पात्र ही स्त्रीपात्रं आहेत - शिवाय दोन- हे ही कौतुकास्पद. कथा फोडण्यासारखी नसली, तरी थोडक्यात सांगायचं झालं तर, दोन 'जाड' मैत्रिणी पांचगणी सारख्या गावात रहात असतात. त्यातली एक विवाहित (कावेरी-सई), खानदानि कुटूंबातली. दुसरी उच्चमध्यम वर्गातली, सुशिक्षीत (पुजा-प्रिया). ह्या दोघी मैत्रिणी एकदा पबमधे नाचायला म्हणून जातात. नाचताना जोशात येऊन त्या टेबलावर चढतात आणि नाचता नाचता टेबलतोडून खाली पडता. बघण्यार्याकडून ह्याचा विडीओ घेतला जातो आणि त्यातलाच एक हा 'युट्युब'वर 'अपलोड' करतो. हा 'विनोदी' विडिओ व्हायरल होतो आणि ह्या दोन मैत्रिणिंना लोकांच्या चेष्टेला सामोरं जावं लागतं. पुढे ह्यातून कसं बाहेर यायचं, आपलं हे चित्र कसं बदलायचं आणि त्यासाठी वजन कमी करणं हा एकच मार्ग आहे का? वगैरे गोष्टी चित्रपटात पुढे घडतात.
सिनेमाचा विषय वेगळा असला तरिही तो तितक्या प्रभावीपणे पुढे येत नाही. शेवटी मुळ कथेलाही प्रेम, प्रेमभंगं, स्त्रीने मर्जी सांभाळणं मग परंपरा मोडणं आणि नेहमीप्रमाणे गोडगोड शेवट असल्या कुबड्या घेऊनच चालावं लागतं त्यामूळे मुळ विषय बाजुला रहातो म्हणण्यापेक्षा त्याचा प्रभाव रहात नाही. खरंतर, सई ताम्हणकर म्हणावी तशी जाड वाटत नाही आणि प्रिया चित्रपटासाठी जाड झाली असूनही चित्रपटात आपण जाड आहोत अशी सतत अॅक्टींग करत वावरते. तिचं चालणं, उगाच दम घेत उठणं, लाडंलाडं बोलणं, धावणं हे ज्या पद्धतीने साकारलं आहे, ते तिनेच केलेल्या शारिरीक मेहनतीवर पाणी ओततं. उत्तरार्धातली प्रिया जास्त अभिनयाच्या बाबतीत जास्त भावते. प्रिया आणि सईमध्ये कम्पॅरिझन करणं योग्य नाही, पण तरीही सईचा अभिनय संपुर्ण चित्रपटात जास्त नैसर्गिक वाटतो. सईचं अभिनय कौशल्य मुरल्यासारखं प्रभावीपणे समोर येतं.
पुरुषपात्रांबद्दल बोलायचं झालं तर, सिद्धार्थ चांदेकरचा अभिनय उजवा आहेच आणि दिसलाही मस्त आहे सिनेमात. चिराग पाटील, सध्या अभिनयतला 'अ' गिरवतोय. मुळात त्याच्या पात्राला फार वावही नाही, ते बरंच म्हणा. समिर धर्माधिकारीला साजेसा रोल आहे पण तो आणि चेतन चिटनिस हे नाममात्र आणि लक्षात न रहाण्यासारखे म्हणावे लागतील. कुंडलकरांच्या सिनेमात पुरुषाला अधिक मादक दाखण्यात येतं किंवा असं निदान एक तरी पात्र असतंच, ते ह्या सिनेमातही आहेच. पण अर्थात ती सिनेमाची उजवी बाजू नाही, सिनेमा जो काही पेलला आहे तो मात्र ह्या दोन स्त्रीपात्रांनीच. सिनेमाचा नेमका उद्देश काय, शेवटी त्यातून प्रेक्षकाने नेमकं घ्यायचं काय हे फार गोंधळलेलं आहे. वजन हा विषय आहे? की त्यावरून झालेल्या चेष्टेतून हाती गवसलेलं यश आहे? की अजुन काही? हे नीट गवसत नाही. त्यामुळे सिनेमा 'वजनदार' नक्कीच जाणवत नाही.
जमेच्या बाजू म्हणयाचं झालं तर, पांचगणी सारखं सुंदर गाव असल्यामूळे तिथली घरं, आजूबाजूची चित्रं कॅमेरात सुरेख उतरवली आहेत. चित्रपट फार न लांबवता वेळेत उरकला आहे. कावेरी आणि पुजा ह्यांच्या गोष्टी दाखवताना कुठेही एकच बाजू उजवी होतेय असं जाणवत नाही. दोघींची पात्र तितकीच ठऴक आहेत. गाणि लक्षात रहाण्यासारखी नसली तरी ती उगाच व्यत्यय आणत नाहित म्हणुन त्यालाही जमेची बाजूच म्हाणावी लागेल. कुंडलकरांच्या सिनेमातल्या फ्रेम्स ह्या नक्कीच इतर मराठी सिनेमांपेक्षा (अगदी बिग बेजेट मराठी चित्रपट) वेगळ्या आणि प्रभावी असतात हे मानयलाच हवं. त्यांच्या स्वप्नाळू जगातलं चित्रं प्रत्यक्ष उतरवायचा ते अत्यंत कसोशिने प्रयत्न करतात हे जाणवतं, पण त्याची दखल घेणारे प्रेक्षक अजून म्हणावे तसे नाही हे खेदाने म्हणावं वाटतं.
सिनेमा नक्की बघाच असं म्हणणार नाही पण वेगळे विषय आणि त्यात मुख्य स्त्रीपात्रअसलेले सिनेमे फार बनत नाहीत आपल्याकडे, त्यामूळे ह्या वेगळेपणाला प्रोत्साहान देण्यासाठी तरी हा सिनेमा बघाच असं मात्र जरूर म्हणेन.
-घनु
वजनदार (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
