आँखो देखी(२०१४) - बारकाव्यांनी नटलेला निखळ विनोद

डोळा आणि कान यांच्यामध्ये चार बोटांचं अंतर असतं असं म्हणतात. हे चार बोटांचं अंतर कधीकधी अर्थाचा अनर्थ करून जातं. त्यामुळं प्रत्येक वेळी जे ऐकू येईल ते खरं असेलच याची शाश्वती नसते. जे दुसर्‍याने सांगितलं आहे ते सत्य आहे असं डोळे झाकून तर कधीच मानू नये. प्रत्यक्ष अनुभवाशिवाय बोलणं व्यर्थ आहे, असंच काहीसं या 'आंखो देखी' मधून म्हणायचं आहे.

अचानकपणे घडलेल्या एका प्रसंगात बाबूजींना आपण जे ऐकलं ते आणि प्रत्यक्षात जे आहे ते यात जमीन-अस्मानाची तफावत आढळते आणि ते फक्त 'आँखो देखी' वर विश्वास ठेवयाचं ठरवतात. अगदी आंघोळीचं पाणी गरम आहे म्हटल्यावर त्यात बोट बूडवून खात्री करण्यापासून ते ट्रॅव्हल एजंटच्या नोकरीमध्ये जिथे गेलो नाही तिथली माहिती द्यायची नाही इथपर्यंत 'आँखो देखी'चं वेड पसरत जातं. आणि बाबूजींच्याच नाही तर सगळ्यांच्याच रोजच्या जगण्यामध्ये प्रचंड उलथापालथ होते. ही पाहण्याची मजा म्हणजेच 'आँखो देखी'.

दिल्लीतलं बैठं घर, भाषेचा लहेजा, स्वेटर घातलेली पात्रं ही सगळी प्रेक्षकाला दिल्लीत घेऊन जातात. मालिकांमधून चाळीत राहणारं कुटुंबही हजार चौरस फुटाच्या खोलीत राहताना दाखवतात. इथे मात्र एका पलंगात संपलेली खोली, छोट्याशा जागेत थोडं अंगण असलेलं विना प्लॅनिंगने बांधलेलं घर अधिक वास्तववादी वाटतं. लहानशा घरात राहणारं एकत्र कुटुंब आणि त्यांची अंतर्गत धुसफुस, तरीही असलेलं प्रेम हे अगदी साटल्याने दिसून येतं. थोडंसं महत्त्व मिळवण्याची प्रत्येकाला असलेली असोशी आणि नात्यांची गुंतागुंत अतिशय बारकाईनं टिपली गेलीय. कोणत्याही प्रसंगाचं ढोबळ चित्रण न करता त्यात घडणार्‍या लहानसहान गोष्टींमुळं रंगत वाढत जाते. उदाहरणार्थ, घरातली कर्ती स्त्री मुलीच्या लग्नात विधींसाठी बसलीय आणि लहान सहान घोळ घडत असतात तेव्हा काय करावं हे न सुचून तिची मुलं तिलाच विचारायला येतात. हे कोणत्याही ठिकाणी घडणारं प्रातिनिधिक दृश्य इथं सुंदरपणे सामोरं येतं.

कलाकारांमध्ये बरेच नवीन चेहरे दिसतात. काही परिचयाचे चेहरे आहेत, पण त्यांची नावं प्रेक्षकांना माहीत असण्याची सुतराम शक्यता नसते, अशा चेहर्‍यांना मुख्य भूमिकेमध्ये आणण्याचं धाडस रजत कपूरने दाखवलंय. बाबूजींच्या भूमिकेमध्ये संजय मिश्रा निरागसपणे प्रश्न विचारून आणि पाहिल्याशिवाय कसं काही पटावं अशी हतबलता दाखवण्यात पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. पंडितजींनी बाबूजींना प्रसाद देणं आणि त्यावर त्यांनी 'कलाकंद था, अच्छा था, स्वादिष्ट था' असा प्रतिसाद देणं आणि असेच काही प्रसंग सिनेमाची खुमारी वाढवतात. त्यांची बायको-अम्मा- हिच्या भूमिकेत सीमा पाहावा यांनी घरातली सगळ्यांच्या मागे लागणारी, आणि प्रसंगी कजाग आणि तरीही प्रेमळ अशी एकहाती कारभार चालवणारी स्त्री सुंदरपणे वठवली आहे. एकत्र कुटुंबांत धाकट्यांची साधारणपणे कुचंबणा होते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही हे दाखवण्यात आणि एकदा निर्णय घेतला की तो अंमलात आणण्यात रजत कपूर आणि त्याची बायको झालल्या तरणजीत कौरने अगदी योग्य ती सहजता दाखवलीय. नमित दास हा तसा जाहिराती आणि इतर चित्रपटांमुळे ओळखीचा असलेला चेहरा. सर्वच भूमिका नॉनग्लॅमरस सदरात मोडणार्‍या असल्याने आणि सर्वांच्या सहज अभिनय व इतर बारकाव्यांमुळे हा चित्रपट न वाटता आपल्याच गल्लीत जणू घडणारं कथानक आपण येता जाता पाहात असल्यासारखं वाटतं, आणि हेच माझ्या मते चित्रपटाचं यश आहे.

सिनेमात गाणी खूप जास्त नाहीत. ऐकताना छान वाटतात पण नंतर लक्षात राहत नाहीत. 'आज लागी लागी नई धूप' या बाबूजींच्या बदलेल्या आयुष्याला अधोरेखित करणार्‍या गाण्यापेक्षा 'हक्का बक्का' त्यातल्या ठेक्यामुळं जास्त लक्षात राहातं. पार्श्वसंगीताचा टाळलेला अनावश्यक वापर ही अगदी आवर्जून नमूद करावी अशी गोष्ट.

अतिशयोक्तीमधून विनोद किंवा रूढार्थानं ज्याला प्रहसन म्हणतात तो प्रकार मराठीला फारसा नवीन नाही. पटकन आठवणारं उदाहरण  द्यायचंच  झालं तर अत्र्यांच्या 'साष्टांग नमस्कार' या नाटकाचं देता येईल. किंबहुना रजत कपूरचे यापूर्वीचे चित्रपट याच सदरात मोडणारे होते. हा चित्रपट त्याच मालिकेतलं पुढचं उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटाला ’फिल्मफेअर’चे तीन पुरस्कार मिळाले आहेत- उत्कृष्ट समीक्षक पुरस्कार, संजय मिश्रांना उत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) पुरस्कार व रजत कपूर यांना उत्कृष्ट कथा (समीक्षक) पुरस्कार. तसेच ’स्क्रीन अ‍ॅवार्ड्”मध्ये रजत कपूर यांना उत्कृष्ट कथा (समीक्षक) पुरस्कार व सीमा पाहावा यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री पुरस्कार तब्बुसोबत (हैदर) विभागून मिळाला आहे. ही या चित्रपटाला मिळालेली दादच म्हणायला हवी.

आँखो देखी (२०१४) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

आँखो देखी (२०१४)
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: रजत कपूर
  • कलाकार: संजय मिश्रा, सीमा पाहावा, तरणजीत कौर, रजत कपूर, नमित दास
  • चित्रपटाचा वेळ: १०७ मिनिटे
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१४
  • निर्माता देश: भारत