अवताराची गोष्ट (२०१४): नवी वाट नवखे दिग्दर्शन
"काय रे कुठून येताय? या एक-एक कटिंग मारू"
"आलो थांब"
"या! कुठून येताय?"
"पिच्चरला गेलो होतो दोघे"
"कुठल्या?"
"अवताराची गोष्ट"
"आयला! तू पण धार्मिक पिच्चर बघू लागलास ना! लग्नानंतर माणूस काय काय करू लागेल नेम नाही."
"अबे! हा पिच्चर धार्मिक नाहीये! आणि तुला कधीपासून धार्मिक पिच्चरचं वावडं सुरू झालं?"
"मला?"
"हो मग! तू इतके 'भक्त प्रल्हाद' बघितलेस ते! हॅ हॅ हॅ"
"हॅ हॅ हॅ! ए वैणी! हॅ हॅ हॅ आता तुला काय मी नवा नैये की तुझा नवरा पण माझी जराही ठेवायची नाही असं ठरवलंय त्याने म्हटल्यावर. असो असो. आता लग्न झालंय तुमचं नी आमचंही. पण तरीही धार्मिक चित्रपट! तेही जोडीने?"
"नाही अरे सांगितलं ना! हा धार्मिक नाहीये."
"हो का? मग?"
"याची कंसेप्ट इंटरेस्टिंग आहे म्हणून तर जायला तयार झालो. यात एक लहान मुलगा स्वतःला कल्की अवतार समजत असतो. त्याची गोष्टंय"
"कल्की?"
"अरे विष्णूचा दहावा अवतार! "
"ओह हा!... हा घ्या चहा आला!... कोण कोण आहे यात? काये प्लॉट?"
"यात हिचा आवडता आदिनाथ कोठारे आहे."
"ए माझा आवडता वगैरे नाही हं.. पण छाने! फ्रेश लुक असलेला आणि फुकटच फार जाणता नट वगैरे असल्याचा आव न आणणारा असल्याने जरा बरा वाटतो इतकंच. आणि अरे, त्याच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका आहे. अर्थात तो यात हीरो असावा असे पोस्टर बघून वाटले होते खरे. पण प्रत्यक्षात त्याचा रोल महत्त्वाचा असला तरी कथानकाच्या केंद्रस्थानी कौस्तुभ नावाचे पात्र आहे."
"अरेरे अगं मग आदिनाथ हीरो नाही तर तुझा भ्रमनिरास झाला असेल"
"तसंच काही नाही."
"अगं ए, आधी प्लॉट सांग"
"हां, तर कौस्तुभ एक ८ वर्षांचा चुणचुणीत मुलगा. मिहिरेन जोशी नावाच्या मुलाने त्याचं काम केलंय. स्वभावाने बर्यापैकी भित्रा असला तरी अचाट कल्पनाशक्तीचा. शाळेतला त्याचा जिगरी दोस्त मंग्या. ते काम यश कुलकर्णी नावाच्या बालकलाकाराने केलंय. त्या दोघांची खात्री असते की कौस्तुभ हाच विष्णूचा कलियुगातील अवतार - अर्थात कल्की आहे. कौस्तुभ लहानपणापासूनच आजीकडून या विष्णूच्या वेगवेगळ्या अवताराच्या गोष्टी ऐकत मोठा झाला असतो. घरी आजीव्यतिरिक्त मोठी बहीण, वडील आणि आई. घरचे सगळे देव देव करणारे नसले तरी पापभीरू आणि श्रद्धावंत असतात. घरचं वातावरणही तसं श्रद्धाळू. अपवाद त्यांच्याकडील भाडेकरूचा - आमोदचा."
"आणि तुला कळलंच असेल आमोद चं काम कोणी केलंय ते! हा हा हा"
"अर्थातच"
"अरे टाळ्या काय देताय दोघे. असो. ते काम आदिनाथने केलंय. तो जाहीर नास्तिक असतो. मग कौस्तुभचा स्वतःबद्दलचा हा गैरसमज वेगवेगळ्या प्रसंगातून वाढत जाते. आणि काय रे! तुला सुरवातीला कळलं होतं का? की तो खरंच अवतार आहे की नाही ते?
"नाही ना गं, काही घटना अशा घडतात की त्यास योगायोग म्हणावे का असा प्रश्न मला पडला होत त्यामुळे एकुणच कुतुहल वाढले होते. मात्र थोडावेळाने तेच ते बघून मला तर कंटाळा येऊ लागला. पुढे मध्यांतराच्या आधी कौस्तुभचे स्वतःबद्दलच्या समजाचे रूपांतर खात्रीत आणि शेवटी भ्रमनिरासात होते. पुढे काय होते ते नाही सांगत, पण थोडक्यात सांगायचं तर, मुलांच्या मनातील कल्पनेला सुरुंग लागल्यावर काय होते? त्यांची भक्ती कमी होते का? अवतार नक्की कशाला म्हणायचे? खरंच अवतार होते का? अशा प्रश्नांचे उत्तर शोधायचा तो लहानगा आमोदच्या मदतीने प्रयत्न करतो."
"इंटरेस्टिंग आहे रे. बघू काय?"
"टीव्हीवर येईल तेव्हा चुकवू नकोस. थिएटरला जाऊन बघ असं नाही सांगणार. तुझं काय मत?"
"हे बघ, तुझ्या बायकोला किंवा तुला आदिनाथ आवडत असेल तर याचं न ऐकता जा. आदिनाथचा वावर अगदीच सहज आहे. "
"हो रे, जोक्स अपार्ट, मलाही त्याचं यातलं काम त्याच्या आधीच्या भडक भूमिकांपेक्षा आवडलं. आजवर त्याचा अभिनय एक प्रकारे ठरवून केलेला वाटे. यात अभिनय फार भारी करायचा नसला, तरी वावर सहज आहे जे आश्वासक आहे. हसतेस काय गालात! आहे ते आहे."
"आणि डिरेक्शन वगैरे? नाही नीतिन दिक्षितचा आहे म्हणून जरा उत्सुकता आहे."
"हो ना! नीतिन दीक्षित याच्याकडून दिग्दर्शक म्हणून आम्हा दोघांनाही काही अपेक्षा होत्या. एक लेखक म्हणून त्याचं काम आपण पाहिलंय. पण, एक चांगला लेखक आपल्याकडील कंसेप्ट पडद्यावरही तितक्याच समर्थपणे उतरवेल असं नाही ना! त्याचा हा पहिला चित्रपट बर्याच अंगाने कमी पडतो. बहुतांश मराठी चित्रपटांसारखे इथेही पटकथेवर फारसे काम झालेले दिसत नाही. बर्यापैकी ढिसाळ हाताळणी, काही बाबतीत आळस!"
"आळस? कुठे"
"अगं कौस्तुभची सर्वात मोठी भिती एका खड्ड्यात उतरणे, उडी मारणे असते की नाही. पण तो "खड्डा" नीट दिसतच नाही. तो किती खोल आहे, त्यात त्याला का उतरायचे आहे, काहीच नीटसे स्पष्ट होत नाही. खड्ड्यात उडी मारायचा शॉट तर निव्वळ आळस आहे. त्याने उडी मारलेली दिसतही नाही."
"हो, मलाही तो भाग आवडला नाही. पण नक्की काय आवडले नाही तेच कळत नव्हते. तू म्हणतोस ते बरोबरे. एकूणच पिच्चरमध्ये तोच मथितार्थ मांडणारे प्रसंगही आहेत. नी आदिनाथच्या भूमिकेचा नीट वापर करून घेण्यात आलेले अपयश आहेच."
"हा हा हा! म्हणून इतका राग आहे तर!"
"हा हा. अरे तर आहेच. शिवाय हा चित्रपट नक्की कशासाठी आहे हेच मुळात दिग्दर्शक विसरला आहे किंवा त्याचा असमंजस आहे"
"म्हणजे गं?"
"म्हणजे असे की चित्रपट सुरू होतो तेव्हा तो मोठ्यांच्या नजरेतून लहानग्यांच्या विश्वाची गंमत असा सुरू होतो. तोवर सुलभा देशपांडे, लीना भागवत वगैरेंच्या हुकमी अभिनयामुळे रंग चढू लागतो ना लागतो तोच मध्येच तो वाट सोडून त्रयस्थाच्या नजरेतून गोष्ट सांगू लागतो. शेवटी तर लहानग्यांना समजावे म्हणून बाळबोध भाषेतील निरूपण आहे. जर लहानग्यांसाठी चित्रपट आहे तर वेग, रंजनमुल्य, संवाद व विनोद मुलांच्या डोक्यावरून जाणारेत. जर मोठ्यांसाठी आहे तर चित्रपटात मांडलेला तर्क अधिक गोळीबंद हवा होता. शिवाय कितीतरी प्रसंग वेगळे असे काही देतही नाहीत किंवा कथाही पुढे नेत नाहीत. त्यामुळे चित्रपट दरम्यान कंटाळवाणा होऊ लागतो."
"अर्र!! अगदीच बेकार दिसतोय."
"नाही रे. ही जरा कठोर बोलतेय पण म्हणजे अगदीच बेकार नाहीये. हल्लीच्या भडक सादरीकरणाच्या जमान्यात मला हा पोत सुखावह वाटतो. पण अशी रंगसंगती किंवा लुक कंटाळवाणा होऊ न देण्यासाठी कथानकाला आवश्यक तो वेग असतो ना, नेमका तिथे चित्रपट कमी पडतो. बालकलाकारांत मला मुख्य कौस्तुभपेक्षा त्याचा दोस्त मंग्याच अधिक लक्षात राहिलाय. संगीत, प्रकाशयोजना, संकलन किंवा रंगभूषा याबद्दल न बोललेलंच बरं. शेवटी चित्रपट संपल्यावर काही शास्त्रज्ञांचे फोटो व एकोळी माहिती येते. मराठी चित्रपटाच्या शेवटी ही माहिती इंग्रजीत बघून खटकलेच!"
"आणि सेट्स?"
"तिथे मात्र सुखद बदल आहे. सेट्स असे नाहिच्चेत. पार्श्वभूमी नेहमी समकालीन आणि रिअल आहे. हल्लीचं गाव आहे, गाड्या आहेत, पोखरलेले डोंगर आहेत, गल्ल्या आहेत, कचरा आहे, पिंकांसहित आणि पोस्टर्सच्या कागदांसहित पानपट्ट्या आहेत, रिक्षा स्टँडही आहे. कथा एखाद्या परग्रहावर न घडता इथे आपल्या मातीत घडतेय हे मात्र दाखवण्यात चित्रपट यशस्वी होतो. अॅनिमेशनही काही मराठी चित्रपटांच्या मानाने बरंच चांगलं आहे. ध्वनी, संवाद यातही नावं ठेवण्यासारखं काही नाही."
"हं बहुतेक मी बघेन मग हिला घेऊन. हिला आदिनाथ काही तुझ्याइतका आवडत नाही. पण बघेन बहुदा."
"बघ ठरव, सहज शक्य झालं तरच जा, थेटरात नाही बघितलास तरी फारसं काही बिघडणार नाही."
अवताराची गोष्ट (२०१४) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
