पण - बाहुबलीको कट्टाप्पाने क्यों मारा?
शोनन मॅंगा कॉमिक्सबद्दल ऐकलंय तुम्ही काही? नाही?
त्यात सहसा हीरोची गोष्ट असते, हिरॉईनची नाही. पोरवयातून मोठा होत जाणारा हीरो. कर्तव्य करायला-त्याग करायला शिकणारा, मोठं होताना अंगावर कोसळणार्या अडचणींचा सामना करणारा, युद्ध नाहीतर मैदानी खेळांसारख्या टिपिकल मर्दानी गोष्टींमध्ये कर्तबगारी गाजवणारा. त्याच्या गोष्टीत बायका असतात, नाही असं नाही. पण कशा? शेजेला रंगेल साथ करणार्या नि मग बॅकग्राउंडला गुपचूप उभ्या राहणार्या शोभेच्या प्रेमिका. कर्तबगार वगैरे असल्याच, तर मग आई. ताई. फार तर वहिनी. जोरदार, रक्तरंजित, शैलीदार हाणामार्या. क्रौर्याचं चित्रण. कॉमिक्स म्हटल्यावर, या गोष्टींमधली चित्रं महत्त्वाची, ठो़कळेबाज आणि ठसठशीत असतात हे सांगायला नकोच. नि 'शोनन मॅंगा'चा अक्षरशः अर्थ 'पोराची गोष्ट' असा होत असला तरी समाजाच्या सगळ्या वयोगटांमधून ही कॉमिक्स भरपूर गर्दी खेचत असतात.
आता? नाही! हिंदी सिनेमाबद्दल नाही बोलत अहो! जपानी शोनन मॅंगा कॉमिक्स बद्दल बोलतेय. तुमचा गोंधळ होणं साहजिक आहे. आपला कोट्यानुकोटींचा गल्ला खेचणारा 'बाहुबली'सुद्धा सहीसही 'शोनन मॅंगा' प्रकारचा सिनेमा आहे.
या सिनेमाबद्दल अनेकांनी "काहीही दाखवलंय! असं कुठे असतं का?" किंवा "तद्दन सौंदिंडियन. बटबटीत." असे आक्षेप नोंदवले. पण मला असं अजिबात वाटलं नाही. एकदा सिनेमाच्या या ठसठशीत-बाळबोध-देखण्या चित्रचौकटींना आपण सरावून बसलो, की तो सूर किती चढा आहे हा मुद्दा उरत नाही. तो सूर सिनेमाच्या गोष्टीला साजेसा आहे की नाही, गोष्ट रंजक आहे की नाही, गोष्ट आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवते की नाही, आपल्याला त्यातून काय नवं मिळतं... असे निराळे प्रश्न कळीचे होतात.
'बाहुबली' रंजकपणाच्या कसोटीवर १०० टक्के पास आहे. माझे आक्षेप आहेत ते निराळ्याच गोष्टींना. पण थांबा. अशी घाई नको. नीट बयाजवार सांगते.
गोष्टीला काळात मागेपुढे उड्या मारणारे दोन पंख आहेत.
एक शिवा नामक आदिवासी पोरगं. त्याच्या आईला ओढ्यात सापडलेलं. एका प्रचंड पर्वतप्राय धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या वाडीत राहणारं. शिवा मोठो होतो तो जलपर्वत चढून वर जाण्याचा ध्यास घेऊनच. एक दिवस पाण्यासोबत वरून एका युवतीचा मुखवटा येतो आणि सगळं कौशल्य पणाला लावून शिवा पर्वत चढून जातो...
दुसरा पंख माहिष्मती या काल्पनिक नगरीचा. बुलंद नगरी, पित्यासमान राजा, सुखानं नांदणारी प्रजा वगैरे वगैरे. पण राजाचा काळ होतो आणि पाठोपाठ बाळाला जन्म देऊन राणीचाही. मागे राजाचा कुटिल, मद्यधुंद, अधू भाऊ आणि त्याची कर्तव्यनिष्ठ-करारी पत्नी शिवगामी. तिलाही नुकतंच बाळ झालेलं. तिच्या दिमतीला आयुष्य राजघराण्याला वाहिलेला थोर लढवय्या कट्टप्पा नामक गुलाम.
आता पुढची गोष्ट सांगायला हवी का?!
बरं! तर शिवगामीचा लेक भल्लाद आणि पुतण्या अमरेंद्र बाहुबली दोघं जोडीनंच वाढतात. कट्टप्पा आणि शिवगामीच्या दक्ष, न्यायी, कठोर नजरेखाली अस्त्र-शस्त्र-कला-शास्त्र यांचं शिक्षण घेतात. वयात येतात. राजा कोण होणार? ते ठरण्यापूर्वीच राज्यावर कालकेय नामक कराल शत्रूचं परचक्र येतं...
या दोन गोष्टी एकमेकींत गुंफत 'बाहुबली'ची गोष्ट चढत्या क्रमानं रंगत जाते. शशी भागवतांच्या कादंबरीच्या पानांतून फडफडत आलेली एखादी सुरस आणि चमत्कारिक गोष्ट असावी; घनदाट जंगलं-रत्नखचित राजवाडे-लावण्यखनी स्त्रिया-युद्ध खेळणारे जिगरबाज पुरुष यांनी आपल्याला निराळ्याच विश्वात खेचून न्यावं आणि 'मेक बिलिव्ह'ची रंगीन भूल पडावी तसं होतं. सिनेमाचा शेवटही तसाच दिलखेचक. गोष्ट सांगणार्या माणसाचं मिश्किल कौशल्य दाखवणारा आणि 'बाहुबली'च्या पुढच्या भागांची तिकीटविक्री आत्ताच वसूल करून देणारा. त्यांतला दृश्य भाग अशा गोष्टीला जसा असावा, तसाच आहे. डोळ्यांवर ठसणारी एकेक चौकट. भाषा कळली न कळली, तरी गोष्ट कळावी अशी काहीशी बाळबोध - पण ठसठशीत, देखणी चित्रभाषा असलेला. त्यांतली विराट धबधब्याची दृश्यं, युद्ध चित्रित करणारी दृश्यं, भल्लादाचा पुतळा उभारला जात असतानाची दृश्यं, महालांची माहिष्मती नगरी दाखवणारी विहंगम दृश्यं अतिशय वेधक आहेत. "काय हे स्पेशल इफेक्ट्स का काय म्हणायचे? लाज येते राव! आपल्याच लोकांनी केलंय म्हणून पाहायचं झालं... नाहीतर हॉलिवूड!" हे जे लटकं स्पष्टीकरण देण्याची वेळ आपल्यावर येते; त्या स्पष्टीकरणाला पार बाहेरची वाट दाखवणारी ही दृश्यं आहेत.
तसंच एम. एम. क्रीमचं संगीत. युद्धाचे पडघम, एखाद्या मोहक आणि तेज-तर्रार-तिखट युवतीसोबत नायकाचा शृंगार रंगत असताना उमटणारे हळुवार सूर, अनोख्या प्रदेशांचं आकर्षण खुणावत असताना ऐकू येणारे गूढ सूर आणि शिवलिंग लीलया खांद्यावर घेऊन जाणारा बुलंद नायक दिसत असताना मागे शिवतांडवस्तोत्राचा घनगंभीर घोष. गोष्टीच्या हातात हात घालून येणारं संगीत आणि पार्श्वसंगीतही.
शोनन मॅंगा छापाची गोष्ट म्हणून 'बाहुबली' परिपूर्णच आहे. किंबहुना भारतीय पुराणकथांच्या सावलीत हा प्रकार विलक्षण खुलला आहे. अगदी कालकेयांच्या 'ह्हा! च्यॅक च्यॅक!' करणार्या भाषेपर्यंत.
मग माशी शिंकते कुठे म्हणायची?
तर आता शोनन मॅंगा प्रकारही तितका चौकटबद्ध उरलेला नाही. त्यात केवळ नायक असण्याचा जमाना गेला. ताकदीच्या, सशक्त स्त्री व्यक्तिरेखा असलेली शोनन मॅंगा कॉमिक्स आता बाजारात नुसतीच अवतरलेली नाहीत, तर स्थिरावलेलीही आहेत. 'बाहुबली'ला हे करायला काहीच हरकत नव्हती. बोलून चालून ती एक गोष्ट आहे. पुराणातली व्यक्तिरेखा नव्हे, वा ऐतिहासिक वास्तव वा मिथकही नव्हे. त्यात या प्रकारच्या स्वातंत्र्याला पुरेपूर वाव आहे. 'नीच जाती'च्या गुलाम कट्टप्पाला आपलंसं करणारा नायक दाखवून 'बाहुबली' हे स्वातंत्र्य घेतोही. मग स्त्री व्यक्तिरेखांच्या बाबतीत हा असा मेल शॉवनिस्ट गल्लाभरू धंदेवाईक दृष्टिकोन का म्हणून?
त्यातली अवंतिका ही लढवय्यी स्त्री शिवाच्या प्रेमात पडल्यावरचा संवाद मासलेवाईक आहे!
"तू आता 'माझी' आहेस. आता तुझं कर्तव्य ते माझं कर्तव्य. तुझी इच्छा ती माझी इच्छा."
असं म्हणत म्हणत शिवा अवंतिकेच्या हातातला ताईत हिसकावून घेतो. राणी महादेवसेनेला सोडवण्याचं तिचं मिशन सुमडीत बळकावतो. तत्पूर्वी तिची लढवय्यी 'पुरुषी' वस्त्रं फेडून, मारामार्या करत तिच्या ओठांना लाली आणि कपाळी आपल्या रक्ताचा टिका लावून, हातासरशी तिला धबधब्याखाली ओलेती करून तिची घायाळ, नाजूक हरिणी करण्याचं कर्तव्य पार पाडलेलं असतंच. ही अवंतिका काय, किंवा दोन स्तनांशी लुचणारी दोन अर्भकं एखाद्या मातृदेवतेप्रमाणे सांभाळणारी, क्षमता असूनही राजसिंहासनाच्या पायांशी बसण्यात धन्यता मानणारी महाराणी शिवगामी काय... 'बाहुबली' तिथे माती खातो.
असल्या अनावश्यक सनातनी चुका टाळून गोष्टीचा टाका सद्यकालीन संदर्भांसोबत आणून भिडवला, तर बघता बघता 'हॅरी पॉटर'सारखी फॅण्टसीही जिवंत होते, वास्तवातल्या बिनजादूच्या संदर्भांतही परिणामकारक ठरते. पण हा सिनेमा मात्र एखाद्या झळाळीदार, रंगीत - पण द्विमित चित्रासारखा उरतो, तो त्याला दिलेल्या तद्दन भारतीय-पुरुषी वळशामुळेच. हा एक मोठ्ठा 'पण' सोडला; तर कट्टपानं गोष्टीचा शेवट अशा काही वळणावर आणून ठेवलाय, की पुढच्या वर्षी 'बाहुबली'चा सीक्वेल तर आपण बघूच; वाटल्यास याच 'बाहुबली'ची थ्रीडी आवृत्ती निघेल (निघणारच. चाणाक्ष प्रेक्षकाला चित्रचौकटीत त्याची चाहूल वारंवार लागते!) तीही पैसे खर्चून पाहू.
पण - पण "बाहुबलीको कट्टापाने क्यों मारा?" या व्हायरल झालेल्या प्रश्नासारखाच हा 'पण' छळत राहील.
बाहुबली - दी बिगिनिंग - चित्रपटाची /नाटकाची माहिती
