मुरांबा (२०१७): मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांसाठी बनलेला देखणा सिनेमा

'मुरांबा'बद्दल अनेकांकडून चांगलं ऐकल्यावर हा सिनेमा पाहायचा योग आला. तोवर सिनेमाकडून बऱ्यापैकी अपेक्षा उंचावल्या होत्या. अमेय वाघ  आणि चिन्मयी सुमित या दोघांसाठी हा सिनेमा बघायचा होताच. प्रत्यक्ष सिनेमा आवडला खरा पण.. त्या 'पण' बद्दलच तपशीलवार लिहितो.

आधी म्हटलं तसं अमेय वाघ आणि चिन्मयी सुमित हे दोघेही कमाल कामं करतात.  इथेही त्यांचं काम चोख आहे. आपापल्या पिढीची, पार्श्वभूमीची आणि भवतालाची जाणीव सतत सांभाळत अगदी नैसर्गिक वावर आहे असे पटवणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये हे दोघेही येतात. सचिन खेडेकरांबद्दल मी कधीच एक असं ठाम मत बनवू शकणार नाही बहुतेक . पण या सिनेमात त्यांनी भूमिकेत जीव ओतलाय. त्यांची भूमिका लिहिलीसुद्धा कमाल आहे!

एकतर या सिनेमाचं लेखन खूप सरळ आणि लोभस आहे. पटकथा अतिशय कष्टपूर्वक लिहिली आहे आणि ती लिहितानाच दृश्यभान आहे हे जाणवतं. कित्येक संवाद अतिशय साध्या पण प्रभावी शब्दांत येतात की आपण साधेपणाच्या शक्तीने चकीत होतो. (सिनेमाच्या सुरुवातीला साध्या शब्दांवरील एक ओळ झळकते त्यामुळे संवादांकडे त्या दृष्टीनेही पाहत होतो) लेखन दिग्दर्शन एकाच व्यक्तीचं असण्याचे स्वाभाविक फायदे असतात ते इथे प्रकर्षाने जाणवतात. मराठी सिनेमांत नाती चितारण्याची मोठी परंपरा आहे. हा सिनेमाही आई-वडील-मुलगा या त्रिकोणाच्या परस्परसंबंधांबर उभा आहे. यातील मुलगा आलोक (अमेय वाघ)  आपल्या बालमैत्रिणीच्या गेली काही वर्षे प्रेमात असतो आणि सिनेमा सुरू होतो तो त्याच्या ब्रेक अपपासून. ही त्याची प्रेयसी - इंदू (मिथिला पालकर) घरीही ओळखीची-सवयीची. असा ब्रेकअप होण्याने या तिघांचं विश्व ढवळून निघतं. यातून केवळ आलोक-इंदूचं नातच नाही तर प्रत्येकालाच आपापल्यातील हरेक नात्याला तावून घ्यायची संधी मिळते. या घुसळणीतून काय बाहेर पडतं ते दाखवणारा हा सिनेमा.

अभिनयापासून ध्वनी व संगीतापर्यंत आणि अतिशय देखण्या चित्रचौकटींपासून ते चुरचुरीत संवादांपर्यंत हा सिनेमा फ्रेश आहे. मात्र उत्तरार्धात बऱ्यापैकी प्रिचिंग असल्याने किंचित कंटाळवाणा होण्याचा धोका आहे हे ही खरंच.

प्रश्न असा उभा राहतो की ही कथा ज्या कुटुंबात घडते व घडू शकते तो उच्च मध्यमवर्ग व/वा श्रीमंत वर्ग आहे. हा एक असा वर्ग आहे त्यातील एक पिढी चाळींतून फ्लॅट आणि पुढे बंगल्यात आली. त्या पिढीने खूप कष्टाने एका सामाजिक वर्गात प्रवेश मिळवला. मात्र त्यापुढील पिढीला -त्यातही 'नव्वदोत्तरी' काळात- संघर्ष करण्याची परिस्थिती उरलेली नाही.  मात्र तरीही त्या वर्गाचे - मॉस्लोच्या पिरॅमिडच्या वरच्या घरातील लोकांचे - आपले असे प्रश्न व गरजा आहेत. हा सिनेमा कितीही खुसखुशीत बनला असला तरी ही कथा 'अशांचे' प्रश्न म्हणून सामान्यांनी झुगारणं सहजशक्य आहे.

खरंतर मानसिक तिढे आणि त्यावेळी एका समुपदेशकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि त्याची गरज सर्व वर्गातील लोकांना भेडसावते. पण हा सिनेमा - त्यातील कथा अशी सगळ्यांना आपली वाटेल अशी होत नाही. त्यातील पात्रे कितीही सहज वाटली तरी ते कौतुक अभिनयाचं होतं. मुळात असे 'सुलझे हुए' वडील/समुपदेशक मिळणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्षात क्वचित असतात कारण त्या व्यक्तीच्या स्वतःच्या अशा गाठी वा विवंचना असतात. सिनेमातील बाबा सर्वगुणसंपन्न दिसतात आणि तिथेच सिनेमा खोटा वाटू लागतो. अर्थात 'मग काय या वर्गातील कथा दाखवूच नयेत का?' अशा प्रश्नाला उत्तर हेच की जरूर दाखवाव्या पण त्यात सामान्यांना स्वतःत डोकावायला लागावं किमान इतकी तरी सर्वसमावेशकता हवी.

थोडक्यात - मराठी महानगरी मल्टिप्लेक्स प्रेक्षकांनी आवर्जून बघावा असा हा सिनेमा आहे. सिंगल स्क्रीन थिएटरवाल्यांना किंवा निमशहरी / ग्रामीण प्रेक्षकांना इतका भावेलच असं नाही.

मुरांबा (२०१७) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

मुरांबा (२०१७)
  • Official Sites:

    imdb
  • दिग्दर्शक: व‌रुण‌ नार्वेक‌र‌
  • कलाकार: अमेय वाघ, चिन्म‌यी सुमीत‌, मिथिला पाल‌क‌र‌, सचिन खेडेकर
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१७
  • निर्माता देश: भारत