पॉन सॅक्रीफाइस(२०१४): एक राजा जेव्हा प्यादे बनतो

एम. एफ. हुसेन त्याच्या प्रिय मातृभूमीपासून दूर लंडनमध्ये वारला. चार्ली चॅप्लिनला आक्रमक उजव्या राष्ट्रवादी लोकांनी 'कम्युनिस्ट' ठरवलं होतं. तस्लिमा नसरीनची मातृभूमीची परतीची वाट कायमची बंद झाली आहे. आयुष्यात काहीही चमकदार न केलेली माणसं आणि 'आम्ही कर भरतो' ही देशभक्तीची व्याख्या असणारे लोक आपल्या जातीची, धर्माची, राष्ट्रवादाची 'कलेक्टिव' जबाबदारी एखादा कलाकार, साहित्यिक किंवा खेळाडूच्या खांद्यावर का टाकत असावेत, हा प्रश्न मला कायमच पडत आला आहे. नव्याने हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे हुसेनच्या वाढदिवसाच्या दिवशी गूगलने केलेल्या डूडलवरून झालेला वाद आणि बॉबी फिशर या महान बुद्धिबळपटूवर बनलेला 'पॉन सॅक्रीफाइस' हा चित्रपट.

बॉबी फिशर हा जितका जिनियस खेळाडू होता तितकाच विक्षिप्त माणूस होता. लहरी आणि तापट असलेला फिशर, बुद्धिबळातली अभेद्य रशियन मक्तेदारी मोडून काढणारा फिशर, शीतयुद्धाच्या काळात अमेरिकन राष्ट्रवादाचं प्रतीक बनलेला फिशर, मोठ्या सामन्यांना उशिरा येणारा फिशर, सामना संपल्यावर बोरीस स्पास्कीला घड्याळ भेट देणारा फिशर, स्वतःच्या देशातून हद्दपार झालेला फिशर, अमेरिकन भूमीवरील ९/११च्या हल्ल्याचं समर्थन करणारा फिशर... अशा असंख्य वेगवेगळ्या छटा फिशर या नावाच्या विक्षिप्त अवलियाच्या व्यक्तिमत्त्वाला होत्या. यापूर्वीपण बॉबी फिशरवर काही चित्रपट बनले आहेत. पण 'पॉन सॅक्रीफाइस' ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये निर्विवादपणे उजवा आहे. ह्याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शक एडवर्ड झ्विकचं आणि मुख्य भूमिकेत असणाऱ्या टोबी मॅग्वायर या कलाकाराचं.

दिग्दर्शक एडवर्ड झ्विक एका मुलाखतीत म्हणाला की, ”इतिहासाच्या एका टप्प्यावर बॉबी फिशर हा पृथ्वीतलावरचा सर्वाधिक लोकप्रिय मनुष्य होता. फिशर हा जीनियसपणा आणि वेडेपणा यांच्या दरम्यानच्या कुठल्यातरी टप्प्यावर रेंगाळत राहिला.”  दुसऱ्या वाक्यात झ्विकने फिशरचे विश्लेषण जे केले आहे त्याभोवती चित्रपट फिरतो.

बॉबी फिशरचे (टोबी मॅग्वायर) बालपण, त्याच्या आईसोबत (लिली राबे ) असणारं प्रेम आणि राग या परस्परविरोधी छटांचं नातं, फिशरच्या बालपणापासून सुरू झालेली त्याची बुद्धिबळामधली हेवा वाटण्यासारखी कारकीर्द, त्याचं भीती आणि संशयानं भरलेलं उत्तरायुष्य अशा अनेक महत्त्वाच्या टप्प्यांना चित्रपट स्पर्श करतो. पण चित्रपटाचा हायलाईट आहे तो 'फाईट ऑफ द सेन्चुरी' म्हणून ज्या लढतीची इतिहासात नोंद झाली, ती बॉबी फिशर - बोरीस स्पास्की यांच्यातली आईसलँडमध्ये जगतज्जेतेपदासाठी झालेली लढत. जेव्हा ही लढत सुरू होणार होती, तेव्हा सोविएत युनियन आणि अमेरिका यांच्यादरम्यान शीतयुद्ध ऐन भरात होतं. बुद्धिबळामधलं विश्वविजेतेपद ही रशियन खेळाडूंची मक्तेदारी समजली जात होती. जेव्हा बॉबी फिशरने बोरीस स्पास्कीला लढतीसाठी आव्हान दिलं, तेव्हा ह्या लढतीला या दोन महासत्तांमधल्या आणि दोन विचारसरणींमधल्या लढाईचं स्वरूप प्राप्त झालं. अवघ्या जगाचे डोळे या लढतीवर खिळले होते. ह्या लढतीअगोदर आणि लढतीदरम्यान झालेल्या पडद्याआडच्या हालचाली चित्रपटात मोठ्या प्रभावीपणे दाखवल्या आहेत. फिशरला आक्रमक राष्ट्रवादी यंत्रणा कशी राष्ट्रवादाच्या घोड्यावर बसवते, यादरम्यानची फिशरची अस्थिर आणि दोलायमान मनःस्थिती, खेळाच्या स्पर्धेत राजसत्तेचा होणारा हस्तक्षेप या गोष्टी अप्रतिमपणे दाखवल्या आहेत. वास्तविक हा जितका चित्रपट जितका टोबी मॅग्वायरचा आहे, तितकाच बोरीस स्पास्कीच्या भूमिकेमधल्या लिव श्रायबर या अफलातून अभिनेत्याचापण आहे. निव्वळ प्रतिस्पर्धी गोटातला असल्यामुळे बोरीस स्पास्कीला खलनायक बनवण्याचं दिग्दर्शकाने आणि पटकथाकारांनी कटाक्षाने टाळ्लं आहे. आपण इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेचं चित्रीकरण करत आहोत आणि ते अस्सल असणं ही आपली जबाबदारी आहे याची दिग्दर्शकाला असणारी जाणीव ठायी-ठायी दिसते. अतिशय कमी संवाद असूनही आपल्या देहबोलीतून आणि नजरफेकीतून लिव श्रायबरने ज्या नजाकतीने थंडगार व्यवसायिक खेळाडू साकारला आहे त्याला तोड नाही.

स्पास्कीविरुद्ध लढत जिंकणं हे फिशरच्या आयुष्यातलं शिखर असेल, तर फिशरचं पुढचं सगळं आयुष्य म्हणजे न संपणारा उतार आहे. काही कारणांमुळे तो अमेरिकाविरोधी बनत गेला. सरकारनेपण त्याच्याविरुद्ध नख्या काढल्या. जे प्राक्तन हुसेन, तस्लिमा नसरीनच्या नशिबी आलं; तेच फिशरच्यापण वाट्यालापण आलं. आपल्यावर हेरगिरी केली जातआहे या भीतीने तो पछाडला गेला. फिशरच्या आयुष्यातला हा काळाकुट्ट कालखंड पडद्यावर बघताना प्रेक्षक अस्वस्थ होतात. काही भूमिकांवर नटाचा ठसा उमटतो, तर काही नटांवरच त्यांच्या एका भूमिकेचा ठसा उमटून राहतो. टोबी मॅग्वायर हा गुणी अभिनेता दुसऱ्या प्रकारात मोडतो. स्पायडरमॅनच्या भूमिकेचा ठसा या गुणवान नटाला अंगावर वागवावा लागणार असं वाटत होतं, पण त्याने साकारलेल्या बॉबी फिशरच्या अप्रतिम भूमिकेने त्याच्या टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे .

हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हांला बुद्धिबळाचं तांत्रिक ज्ञान असण्याची काहीही गरज नाही ही अजून एक महत्त्वाची बाब. दिग्दर्शक एडवर्ड झ्विकने यापूर्वी 'द लास्ट सामुराई ', 'डिफायंस' यांसारखे काही चांगले चित्रपट दिले आहेत. अप्रतिम चित्रित केलेले युद्धप्रसंग हे त्याच्या चित्रपटाचं वैशिष्ट्य. पण ६४ घरांच्या युद्धाचे प्रसंगपण चांगले चित्रित करून, त्याने आपण किती प्रतिभावान दिग्दर्शक आहोत हेच सिद्ध केलं आहे. एकूणच 'पॉन सॅक्रीफाइस' हा आदर्श असा चरित्रपट आहे. मुळीच चुकवू नये असा.

जाता-जाता आपल्याकडे बनणाऱ्या चरित्रपटांची तुलना हॉलीवूडमध्ये बनणाऱ्या चरित्रपटांशी करण्याचा मोह आवरत नाही. आपल्याकडचे चरित्रपट (’मेरी कोम’, ’भाग मिल्खा भाग’) हे चरित्रनायक किंवा चरित्रनायिकेचं प्रमाणाबाहेर उदात्तीकरण करण्यात धन्यता मानतात. मुख्य पात्रांच्या सम्यक चित्रीकरणात आपल्या दिग्दर्शकांना फारसा रस नसतो. पण त्यामुळे हे चरित्रपट कमी आणि ’प्रपोगंडा-पट’ जास्त बनतात. व्यक्तिपूजा हा ज्या देशाचा स्थायीभाव आहे, तिथे काही वेगळं घडण्याची अपेक्षापण देशातल्या सुजाण प्रेक्षकांनी ठेवू नये का, हा प्रश्न 'पॉन सॅक्रीफाइस' पाहिल्यानंतर पडायला लागतो .

(’मी मराठी लाईव्ह’मध्ये पूर्वप्रकाशित)

 

पॉन सॅक्रीफाइस - चित्रपटाची /नाटकाची माहिती

पॉन सॅक्रीफाइस
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: एडवर्ड झ्विक
  • कलाकार: टोबी मॅग्वायर, लिली राबे, लिव श्रायबर
  • चित्रपटाचा वेळ: ११५ मिनिटे
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१४
  • निर्माता देश: भारत