सली (२०१६): एका सिनेमाचं कमाल लँण्डिग!

माझ्या एका मैत्रिणीला सध्या सर्वाधिक भिती कसली असेल तर विमानात बसण्याची. तिच्या सोबत विमानात जायचं म्हणजे एखाद्या कम्युनिस्टासोबत साक्षात शंकराचार्यांच्या दर्शनाला गेल्यासारखं असतं. तिला तिथे यायला ना नसते, पण तिथल्या प्रत्येक टप्प्यावर तिचं मन भयशंकेने ग्रस्त असतं. एकदा का चेकइन-बोर्डिंग पास-एम्बार्केशन वगैरे क्रियाकर्म आटोपली आणि ती त्या उडत्या गृहात शिरली की पहिल्या पावलासोबत हिचं बिपी दुप्पट होतं. समोर कितीही देखणा अटेंडंट असला तरी एखाद्या बद्धकोष्ठ झालेल्या पेशंटसारखा भयंकर चेहरा करून ती त्या अटेंडंटच "वेलकम" स्वीकारते. त्यांनंतर अचानक तिला आपण राजस्थानी कारागीर असल्यासारखे वाटू लागते आणि तिच्या हातातल्या बोर्डिंगपासच्या कोपर्‍यांना नखांनी कुरतडत ती आपली कुसर दाखवू लागते. 'पास'चे सगळे कोपरे नक्षीदार झाले की मग ती एकलव्य होते आणि (बरोब्बर समोर आलेल्या उंच माणसामुळे) काहीही न दिसूनही निव्वळ आवाजाचा वेध घेत हवाईसुंदरींनी दिलेल्या सुरक्षेच्या नियमांना ती समजून घेते. त्यानंतर विमान टेकऑफ घेण्यासाठी वेग वाढवू लागलं की तर तिला आपण नृसिंहावतार असल्याचं वाटू लागतं आणि शेजारची व्यक्ती हिरण्यकश्यपू. शेजारच्याच्या सुदैवाने "जमीन नाही नि हवाही नाही" असा नियत टेक-ऑफचा-क्षण फार काळ टिकत नाही आणि तिची बोटं शेजारच्या हिरण्यकश्यपूचा कोथळा काढायच्या आत विमान आणि ती दोघेही हवेत स्थिरावतात. 

या मैत्रीणीला आम्ही यथेच्छ हसत असलो, तरी विमानाची भिती हे काही दुर्मिळ नाही. विमानप्रवास आणि आमची ही मैत्रीण आठवायचं कारण म्हणजे आम्ही नुकताच 'सली' बघितला. ती मैत्रिण गर टेकऑफला जितकी भितीवाटते ती आम्ही पुर्ण दीड तास अनुभवली पण त्याहूनही अधिक काही समजावून गेली. कोणालाही अश्या प्रकारच्या संकटात अडकायचं नसलं तरी भयपटांप्रमाणे विमान दुर्घटना किंवा हायजॅकपट हा एक स्वतंत्र विधा असावा इतका स्थिरावलेला प्रकार आहे. एखाद्या प्रकारच्या चित्रपटाच्या पटकथेत म्हणा, किंवा तसे चित्रपट परिणामकारक होण्यासाठी म्हणा काही ठराविक 'ट्रिक्स' असतात. पण त्या ट्रिक्सच्या अतिवापराने त्याचा प्रेडिक्टेबल साचा कधी होतो आणि त्या साच्यातच सिनेमा कधी-कसा अडकतो हे भल्याभल्यांना कळत नाही. मात्र 'क्लिंट इस्टवूड'ने अतिशय नजाकतीने बांधलेला सिनेमा म्हणजे 'सली'!

१५ जानेवारी २००९ ला न्युयॉर्कमध्ये एका विमानाला हडसन नदीत आपात्कालीन लँडिग करावं लागल्याची बातमी तुम्हाला आठवतेय का? तर, 'त्या घटनेवर हा सिनेमा आधारीत आहे' - असं कोरडं वाक्य खूपच अन्यायकारक ठरेल. हा सिनेमा त्या घटनेभोवती फिरतो, घटनेचं एकेक अंग मोठ्या तपशिलांत उलगडून दाखवतोच पण त्याचबरोबर तो बरंच काही सांगणारा सिनेमा आहे. तो जितका या प्रसंगाबद्दल आहे तितकाच तो न्यूयॉर्कबद्दल आहे, तेथील लोकाबद्दल आहे, मानवी जिद्दीबद्दल आहे. जितका हा सिनेमा परस्पर सहकार्याबद्दल आहे तितकाच तो व्यवस्थेच्या उपलब्धतेबद्दल आहे त्याच्या उपयुक्ततेबद्दल आहे. यात माणसाच्या मनातील विविध भावभावनांचा कोलाजही आहे, तर दुसरीकडे दोन व्यक्तींमधील वेगवेगळ्या प्रसंगी खुलून येणारी हरतर्‍हेची नातीही आहेत. त्याही पलीकडे जाऊन त्या प्रसंगाशी निगडित असलेल्यांनाच नव्हे तर प्रत्येक प्रेक्षकालाही माणूस असल्याबद्दल अभिमान वाटायला लावणारा अतिशय खास अभिनिवेशरहित प्रांजळपणा त्या सिनेमात आहे!

त्या विमानाला 'त्या' दिवशी पक्षी 'आडवे गेले' आणि त्यात त्याची दोन्ही इंजिने - टर्बाईन्स बंद पडली . त्यावेळी विमान होतं अवघ्या ८५०मीटर उंचीवर! अशावेळी ५८ वर्षांच्या  रिटायर्डमेंटकडे डोळे लावलेल्या कॅप्टन सली (टॉम हॅन्क्स) यांनी आपला आजवरचा अनुभव पणाला लावत कंप्युटर जनरेटेड सजेशन्सना डावलून काही निर्णय घेतले आणि विमानात असलेल्या सर्वच्या सर्व १५५ जणांचे प्राण वाचवले. एका क्षणात सली हा अमेरिकेचा खराखुरा हीरो ठरला. मात्र त्याचा निर्णय अचूक होता का? या बद्दल शंका उत्पन्न झाल्या. दोन्ही इंजिनं खरंच बंद पडली होती का इथपासून ते तो लाग्वार्डीया किंवा नेवार्क किंवा इतर एखाद्या विमानतळावर सहज पोचू शकत होता असे कंप्युटरचे म्हणणे होते. अशावेळी तो हे आरोप कसे झेललो आणि त्या कोर्ट कज्ज्यातून काय सिद्ध होते ही या चित्रपटाची लौकिकार्थाने कथा आहे.

प्रत्यक्ष चित्रपट मात्र या कथेबरोबरच बरंच काही बोलतो. माणूस हा मोठा अजब प्राणी आहे. तो सतत एकमेकांशी भांडतो, प्रत्येक छोट्या गोष्टीत स्वार्थ जोपासतो, आपण- आपलं कुटुंब याच्यापलीकडे विचार करतोच असे नाही. मात्र अचानक काही क्षण असे येतात की आजवर जोपासलेल्या, खोल खोल रुजवलेल्या-रुजलेल्या जन्मदत्त ओळखीच्या भिंती एका क्षणात गळून पडतात आणि केवळ माणूस म्हणून तो प्राणी वागू लागतो. हा सिनेमा माणसाचे असे नागडे माणूसपण साजरा करणारा आहे. 

या सिनेमाचा थरारही वेगळ्या जातकुळीचा आहे. साधारणतः थरारपटांमध्ये एकदा थरार सुरू झाला की अंग शहारते, तुम्ही खुर्चीत रुतता आणि काही मिनिटांचा अखंड सीन तुम्ही पापणी न लवता बघता. इथे तितकेच प्रभावशाली कित्येक सीन्स लाटांमागून लाटा याव्यात अश्या नियमित वेगाने येत जातात. काही वेळा मला खरोखर इतके शहारे येत होते की शेवटी मला हात एकमेकांवर घासावे लागले. त्यातील प्रत्येक शहारा हा भितीपायी नव्हता - कधी दु:ख, कधी भिती, कधी आश्चर्य तर कधी आनंद अश्या भावनांच्या रोलरकोस्टर राईडद्वारा प्रेक्षकांना फिरवण्याचे अनोखे कसब इस्टवूडने साधले आहे.

सर्वच तांत्रिक बाबींत हा सिनेमा छान आहेच. टॉम हॅन्क्सनेही सली रंगवताना ज्या काही करामती केल्यात त्याला तोड नाही. अतिशय प्रांजळ आणि माणसासारखा माणूस असलेला सली मनात खोल रुतून राहतो. आपल्या कामाबद्दल विलक्षण अभिमान असूनही आपली पेन्शन हे रोखतील का अशी फारच खरी शंका त्याला वाटते, आपल्याच संभाषणाचे नंतर रेकॉर्डिंग ऐकल्यावर त्याला स्वतःबद्दलच प्रचंड अभिमान वाटतो, जगासाठी हीरो झालेल्या त्याला बाहेर आल्यावर आधी फोन करून मी सुखरूप आहे असे याबद्दल काहीच माहिती नसलेल्या आपल्या घरी कळवावंसं वाटतं, १५५ जगल्याचे कळल्यावर अतिशय गोड हसतो तर पहिल्यांना पूर्णं तिर्‍हाईत मुलीने मारलेल्या मिठीने काहीसा सलज्जही होतो! त्याने एकेक सीन जीव ओतून केलाय आणि तो तितक्याच जोरकसपणे माझ्या मनात रुतून बसलाय. या व्यतिरिक्त या सिनेमातलं न्यूयॉर्क हे आणखी एक पात्र आहे हे कितीही घासून गुळगुळीत झालेलं वाक्य असलं तरी खरं आहे. त्याच्या एकूणच उत्तररंगात हे अलिप्त पण आपलंसं वाटायला लावणारं न्यूयॉर्क सिनेमात सहीसही उतरलं आहे. 

हा सिनेमा खर्‍या सली यांच्या 'हायेस्ट ड्युटी' या आत्मचरित्रावर आधारीत आहे. हा प्रसंग काय आहे हे सली यांच्याच शब्दांत सांगायचं तर "that sense of our common humanity" as a recurring theme, noting that the events depicted in the film took place shortly after 2008's Great Recession. People were wondering if everything was about self-interest and greed. They were doubting human nature. Then all these people acted together, selflessly, to get something really important done. In a way, I think it gave everyone a chance to have hope, at a time when we all needed it."

प्रत्यक्षात हे असं सगळं सलीच्या मनात असणं आणि ते कागदावर उतरवणं वेगळं आणि ते असं काहीही न बोलता-सांगता निव्वळ काही मिनिटांत प्रेक्षकांच्या मनात आपोआप उमटवणं वेगळं. आणि नेमकी हीच करामत इस्टवूड-हॅन्क्स करतात! अन् आपण एक अतिशय वेगळा अनुभव घेऊन थिएटरबाहेर पडतो! 

सली (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

सली (२०१६)
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: क्लिंट इस्टवूड
  • कलाकार: टॉम हॅन्क्स
  • चित्रपटाचा वेळ: ९६ मिनिटे
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१६
  • निर्माता देश: भारत