कुरकुरीत, तरतरीत! (अमर फोटो स्टुडिओ - २०१६)

’अमर फोटो स्टुडिओ’ रॉक्स. गरमागरम, कुरकुरीत, तरतरीत नाटक.

 

(होय. ‘तरुण नाटक’ असं लिहिणं मोठ्या मुश्किलीनं टाळलं आहे. त्याचं असं आहे, काही शब्द इतके घास-घास-घासलेले असतात, की ते ऐकून मूळ अर्थ आठवायच्या ऐवजी मूळ शब्दाबद्दल चिडचिड होते. नाही? ऐकून बघा - तरुणांचे विचार. तरुणाईची अभिव्यक्ती. फ्रेश ताजंतवानं नाटक. कसं वाटतं? वाटतं का फ्रेश? की फेकून मारावंसं वाटतं काहीतरी? हं, तर असले शब्द वापरून या नाटकाला गालबोट लागू नये, म्हणून ते टाळले आहेत.)

 

अडीच तासाचं नाटक आहे. पण एक सेकंदही बोअर होत नाही. कसं होईल? ओढून-ताणून व्हॉट्सॅपचे नि फेसबुकचे अडाणी उल्लेख केलेले नाहीत. बेडरूम वा दिवाणखान्याचं नेपथ्य नाही. तेच ते उगाळून गुळगुळीत केलेले विषय नाहीत.

 

आहे एक तुमच्या-आमच्यासारखं गोंधळलेलं जोडपं. मोबाईलचं व्यसन आणि कामाचे तास आणि ईएमाय आणि इंटरनेटच्या धमाक्यात आपले गोंधळ घेऊन जगणारं.

 

आहे एक हुषार नाटककार - आणीबाणीच्या आणि स्वातंत्र्यलढ्याच्या काळाला - आजचा काळ आणि आजचे पेच हे असे बोलता बोलता आणून भिडवणारी.  

 

आणि चार खणखणीत नट - कमालीची एनर्जी घेऊन आलेले, इमेज-बिमेजला न भिणारे, म०व०म०म०व० (अर्थात मध्यम-वयीन-मराठी-मध्यम-वर्गीय) संकोच न बाळगता रंगमंचावर एक मनमोकळं चुंबनही रंगवायला न लाजणारे.

 

काय आहे काय असं नाटकाच्या गोष्टीत?

 

’इट्स कॉम्प्लिकेटेड्‍’ असं रिलेशनशिप स्टेटस असलेलं एक तरुण जोडपं. तनू (सखी गोखले) आणि अपू (सुव्रत जोशी). आपापसांत सतत भांडणारं. पोचतं योगायोगानं ’अमर फोटो स्टुडिओ’ नामक विचित्र जागेत पासपोर्टचे फोटो काढायला. तिथे त्यांना भेटतो तिथला क्रीपी-कालातीत फोटोग्राफर (अमेय वाघ). त्यानं दोघांवर मारलेल्या एका फ्लॅशमध्ये त्यांची रवानगी होते निरनिराळ्या काळांमध्ये. तनू जाते सत्तरीच्या दशकात. अपू जातो थेट बेचाळीसमध्ये. तिथून आज-आत्तामध्ये परत येता-येता त्या दोघांचं (आणि त्यांच्या कॉम्प्लिकेटेड नात्याचं) जे काही होतं, ते म्हणजे ’अमर फोटो स्टुडिओ’.

 

अजून गोष्टीबद्दल काही सांगण्यात हशील नाही. ते ज्यानं-त्यानं आपलं आपण अनुभवावं.

 

बेचाळीस सालातल्या नटीला अनुक्रमे मोबाईल, ’ऍंग्री बर्ड्स’ हा गेम, आणि मग क्लाउड टेक्नॉलॉजी समजावून सांगताना अपूचं - आणि बघताना आपलं - जे काही होतं, ते. आणीबाणीच्या काळातल्या एका हिप्पी गर्दुल्ल्याला आजकालच्या पोरांची मटिरिअलिस्टिक आणि आयडियॉलॉजिकल गोची एका दमात सांगून तनू झापते, तेव्हाचं आपलं हबकलेपण. लोभस इंग्रजी वापरून बायकोला ’क्यूटी पाय’ म्हणणारा तो वेडसर फोटोग्राफर ’एरियात असलेला पिकाचू’ पकडणार असल्याचं सांगतो, तेव्हाची आपली भंजाळावस्था आणि नंतरचा हास्यकल्लोळ. ’असहिष्णुता’ आणि ’शिस्त’ हे एकाच हुकूमशाहीचे दोन अवतार एकमेकांशेजारी सहज आणून ठेवणारं - किंवा मग “पत्रकार? नाही हो. नॉर्मल आहे मी!” असा भीमटोला हाणणारं - लेखन.

 

हे अनुभवा. हैदोस नाचणारी सखी गोखले बघा. सुव्रतच्या लीलया रंगवलेल्या दुहेरी भूमिका बघा. सुव्रत आणि पूजाचा बहारदार जोडनाच बघा. इमेजची आणि लोकप्रियतेची झूल भिरकावून देत धाडसी प्रयोग करणारा अमेय वाघ बघा.

 

मग सुनील बर्वे यांच्या ’सुबक’ निर्मितीचं खरंखुरं अभिनंदन करा. नव्या बाटलीतून जुनीच दारू आणणार्‍या ’हर्बेरियम’पेक्षाही मोलाचं काम केल्याबद्दल.

अमर फोटो स्टुडिओ - चित्रपटाची /नाटकाची माहिती

Image NA
  • Official Sites:

  • दिग्दर्शक: निपुण धर्माधिकारी
  • कलाकार: अमेय वाघ, पूजा ठोंबरे, सखी गोखले, सिद्धेश पूरकर, सुव्रत जोशी
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१६
  • निर्माता देश: भारत