चि. व. चि‌.सौ.कां. (२०१७): एक फार्सिकल नाटकासारखा सिनेमा

बऱ्याच दिवसांनी सिनेमाला गेलो, त्यामुळे असेल किंवा थिएटर चांगल्या क्वालिटीचं होतं त्यामुळे असेल किंवा सोबत चांगली होती म्हणून असेल किंवा सध्या सुट्टीवर असल्याने असेल पण मला 'चि. व चि. सौ. कां.' हा सिनेमा आवडला. हा असा सिनेमा आहे जो तुम्हाला खळखळवून हसवतो, खुमासदार संवादांनी मजा आणतो, अनोख्या अँगल्सने केलेल्या चित्रीकरणाने वेगळा अनुभव देतो, एकापेक्षा एक सरस अभिनयाद्वारे पात्रं रसरशीत जिवंत उभी करतो तरी "सिनेमा का आवडला? " या प्रश्नाचं उत्तर देताना अडखळायलाच होतं.

ही गोष्ट आहे दोन टोकाच्या तत्त्ववादी तरुणांची - सत्या (ललित प्रभाकर) आणि सावी (मृण्मयी गोडबोले) यांची. सत्या पर्यावरणप्रेमी आणि विज्ञाननिष्ठ. सोलर पॅनलबनवण्यापासून ते टँकर रिपेरिंगपर्यंत सगळं करून पाणी, ऊर्जा बचतीच्या मागे असणारा. दुसरीकडे सावी टोकाची प्राणी प्रेमी. इतकी की अन्नात मांसाहाराचा समावेश असला तर त्या रिक्षावाल्याच्या रिक्षांतही पाय न ठेवणारी. यांना लग्नासाठी एकमेकांना 'दाखवलं जातं ' आणि ते एक आगळावेगळा निर्णय घेतात. तो ते कसा निभावतात आणि शेवटी एकत्र येतात की नाही वगैरे 'सिनेमॅटिक सस्पेन्स' राखलाच पाहिजे इतकाही महत्त्वाचा नसला, तरी मी काही फोडणार नाहीये.

आधी म्हटल्याप्रमाणे कलाकारांची भट्टी मस्त जुळून आलीये. खरोखर कुटुंबीय वाटावेत अश्या प्रकारचे वातावरण त्यांच्या अभिनयातून उभे राहते.अनेक हिंदी- मराठी सिनेमांमध्ये आई-वडील, आई-मुलगा/मुलगी, वडील-मुलगा/मुलगी वगैरे संबंध दाखवताना जो एक संतापजनक अवघडलेपण असतं ते या सिनेमात कुठेही नाही. मात्र मध्यमवर्गीय बुळेपणा सहीसही उतरला आहे. पिढ्यांमधील अंतर आचार व विचारांतही असते तसेच ते नैतिकतेतही असते. हे अंतर सिनेमात सहज उतरते. आपल्याकडे कित्येक नाती इतकी तुपट्ट चित्रित होतात की बघून डोळेही ओशट होतात. या सिनेमात त्या ओशटपणाचा अंशही कुठे जाणवत नाही. अभिनयाइतकंच दुसरं महत्त्वाचं अंग आहे संवाद लेखन. खुमासदार संवाद अनेक प्रसंगांना कमालीचे खुलवतात.

दिग्दर्शन व पटकथेबद्दल मात्र मी दुविधेत आहे. एकीकडे अनेक प्रसंगांत वापरलेले परिस्थितीजन्य विनोद दाखवायला वापरलेल्या क्लृप्त्या असोत वा कोकणाचे एका नव्या कोनातून होणारे चित्रीकरण असो किंवा घरातील रचना दाखवताना फिरणारा कॅमेरा असो साचेबद्ध मराठी सिनेमा मागे सोडत मोकाशी आपली झलक दाखवून देतात. पण मी दुविधेत आहे ते या सिनेमाच्या घडणीबद्दल. फार्सिकल कॉमेडी नाटकासारखा या सिनेमाचा घाट आहे. मग फार्सिकल नाटकांचे बहुतांश गुणदोष या सिनेमातही आपोआप उतरले आहेत. जसे काही विनोदांच्या वेळी भडक वाचिक आणि कायिक अभिनय (जोडप्यांच्या भांडणाच्या वेळी) करताना जी ऊर्जा लागते ती स्टेजवर इतकी भडक दिसली नसती मात्र सिनेमात तसा अभिनय बघायची सवय मराठी प्रेक्षकाला नाही. व्यक्तिशः मला भांडणाचे प्रसंग आवडले. मुक्तकंठाने केलेली ती भांडणे बघताना मी हसलो. दोघेजण एकदा कुंफू खेळत दिवाणखान्यात उड्या मारतात तेव्हा तर मी अक्षरशः फुटलो. पण हा प्रयोग मराठीत रुळेल का याबद्दल शंका आहे.

तिच गोष्ट सुत्रधाराची. नाटकात सुत्रधारांवर अनेक जबाबदाऱ्या असतात. नाटकाचा पोत, न बोलता येणारे संदर्भ, नाटकाला वाहवत जाऊ न देणे वगैरे आघाड्यांवर हा सूत्रधार वावरत असतो. पण इथे भारत गणेशपूरे यांचे पात्र असा कोणताही आयाम देताना दिसत नाही. मग या पात्राचे नक्की प्रयोजन काय? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

कथानकातील नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न न केल्याने सिनेमा व्हेज विरुद्ध नॉनव्हेज अश्या लढाईला तोंड न फोडण्याचा सुज्ञपणा दाखवतो व त्यामुळे सिनेमा फक्त त्या विवक्षित व्यक्तीच्या मतांपुरता उरतो. हीरो-हीरॉइनच्या तत्त्वज्ञानाला वैश्विक वगैरे करण्यात आपली ऊर्जा व वेळ घालवलेला नाही ही घडामोड स्तुत्य आहे. संगीत, ध्वनी, प्रकाश वगैरे तांत्रिक अंगे पूरक आहेत. टायटल साँग बराच वेळ डोक्यात रुंजी घालणाऱ्या चालीत बांधलेले आहे. उपकथानके ही गंमत म्हणून घेतलेली आहेत व त्यांना थोडक्यात सावरले आहे. त्यामुळे हा सिनेमा कुठेही कंटाळवाणा होत नाही. चित्रपट सुरू झाल्यापासून निखळ हसवत वेळेत संपतो इतकं हा सिनेमा बघाच सांगायला पुरेसं ठरावं. पण मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी या जोडगोळीकडून अधिक गोळीबंद करमणूकीची अपेक्षा होती हे ही खरेच!

चि. व चि. सौ. कां. - चित्रपटाची /नाटकाची माहिती

चि. व चि. सौ. कां.
  • Official Sites:

    imdb
  • दिग्दर्शक: परेश मोकाशी
  • कलाकार: मृण्मयी गोडबोले , ललित प्रभाकर
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१७
  • निर्माता देश: भारत