व्हेंटिलेटर (२०१६): एक चांगला व्यावसायिक सिनेमा
‘व्हेंटिलेटर’ हा एक चांगला व्यावसायिक सिनेमा आहे - अ गुड कमर्शियल फिल्म! हा सिनेमा तिकीटबारीवर यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या सर्व कसोट्या पार करतो. त्यात पुरेसा मसाला आहे, प्रेक्षकांच्या ओळखीचे चेहरे आहेत, प्रियांका चोप्रासारख्या बॉलीवूड अभिनेत्रीची धावती भेट आहे, नाट्य आहे, मोठे कुटुंब आहे, छोटे-मोठे प्रवास आहेत, विनोद आहे, सामाजिक संदेश आहे, कारुण्य आहे, वास्तवाशी नाते आहे आणि मुख्य म्हणजे हॅपी एण्डिंग आहे! पण इतकं सगळं असूनही, अनेक बाबींमध्ये काही वेधक आणि वेगळे प्रयोग करणारा हा सिनेमा आहे आणि म्हणूनच त्याबद्दल लिहिणे अगत्याचे ठरते.
याची कथा सांगायची तर अगदी सोपी आहे. गजानन कामेरकर उर्फ गजाकाका हा सद्गृहस्थ एके दिवशी आजारी पडल्याची वार्ता सगळीकडे पसरते. लहान मेंदूला धक्का लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले आहे, ही बातमी वार्यासारखी पसरते. गजाकाकांचा मुलगा प्रसन्ना (जितेंद्र जोशी), बायको (सुलभा आर्या) आणि मुलगी सारिका (सुकन्या मोने) या जवळच्या लोकांनाच नव्हे; तर गजाकाकांची भावंडे व त्यांची मुले, नातू, सुना वगैरे मोठा गोतावळा, शिवाय शेजारी-पाजारी, चाळीतील मंडळी वगैरे मिळून एक मोठा कबिला हादरतो. प्रत्येकाच्या काळजीची कारणे वेगळी आहेत. काहींच्या आठवणी गजाकाकाशी निगडित आहेत, काहींचा स्वार्थ, काहींसाठी ती रीत आहे, तर राजा - आर के - या गजाकाकांच्या पुतण्यासाठी (आशुतोष गोवारीकर) एक कृतज्ञतेची भावना! आपल्या काकांना अचानक आलेलं हे आजारपण त्याला दु:खदायक आहे. मात्र त्याचं त्याच्या वडिलांशी (सतीश आळेकर) असलेलं नातं मात्र काळजी आणि प्रेमाच्या विचित्र गोफामुळे ओढगस्तीला आलं आहे. त्यात गणपती तोंडावर आहे त्यामुळे अनेकांना सुतकाची किंवा मंगल कार्यात विघ्नाची भीती आहे, तर काहींसाठी गजाकाकांनी जमीन गोतावळ्यात देऊन टाकण्याचं सूतोवाच केल्याने त्यावर डोळा आहे. अश्या सगळ्या गोंधळात गजाकाकांना व्हेंटिलेटरवर किती दिवस ठेवायचं याचा निर्णय कुटुंबीयांना - मुख्यतः प्रसन्नाला - घ्यायचा आहे. तो त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवतो की नाही याची कहाणी म्हणजे हा सिनेमा!
काही महिन्यांपूर्वी पुण्यात गिरीश कर्नाडांचं (मोहित टाकळकर दिग्दर्शित) 'उणे पुरे शहर एक' नावाचं एक नाटक पाहिलं होतं. त्यात एका शहराचा उभा काप तुमच्यासमोर धरला होता. त्याला एक मुख्य कथा होती, पण त्याहून मजा एका शहराचा तुकडा डोळ्यासमोर बघण्यात आणि त्या तुकड्याच्या सोबतीने ती कथा फुलताना बघण्यात होती. त्या नाटकात २०-२५ पात्रंच होती. काही मुख्य पात्रं सोडल्यास इतर पात्रे स्टेजवर फार कमी काळ असत. पण तितक्या काळातही त्यातील प्रत्येक पात्र मोठ्या ताकदीने उभं राहिलं होतं. या शहराच्या भासमान पार्श्वभूमीने त्यातील मुख्य कथेला उठाव आला होता. तसाच काहीसा प्रयोग इथे 'व्हेंटिलेटर'मध्ये केलाय. इथेही खूप पात्रं आहेत. प्रत्येक पात्राचा एक स्वभाव आहे आणि त्या नात्यांच्या मॅट्रीक्समध्ये प्रत्येकाचं एक स्थान आहे आणि ते वैविध्य मोठ्या नजाकतीने आणि प्रभावीपणे सिनेमात उभं राहतं. (अर्थात, 'उणे पुरे'मधे कितीतरी अधिक ताकदीने उभं राहिलंय.) प्रत्येक पात्राचं वैशिष्ट्य उभं करायला पटकथाकार फार वेळ घेत नाही, किंबहुना त्याला फार वेळ मिळत नाही. नेमक्या व थोडक्या प्रसंगांमधून, संवादांमधून किंवा नुसत्याच दृश्य झलकीतून त्या पात्राबद्दल बरंच काही बोलून जातो. अर्थात या गोतावळ्याच्या रेखाटनात प्रत्येक अभिनेत्याचा चोख अभिनय नेमके रंग भरतो. पात्रांचा 'स्क्रीन टाईम' लहान असल्याने, घ्या-कोणीही-नवखे-कलाकार असा कद्रूपणा न केल्याने लहान-लहान प्रसंगांना, पात्रांना कमालीचा उठाव आला आहे. या सगळ्या पात्रांच्या भक्कम उभारणीच्या बळावर लेखक-दिग्दर्शक प्रसंगी भयप्रद, प्रसंगी त्रासदायक, प्रसंगी सुरक्षा देणारा, प्रसंगी भांडकुदळ तर प्रसंगी लोभस भासणारा एक कुटुंब नावाचा विरोधाभास आणि विसंगतीने भरलेला अस्ताव्यस्त पसरलेला प्राणी प्रभावीपणे उभा करतो. एकदा हा प्राणी समर्थपणे उभा राहिला, की मूळ कथा फुलवणं, तिला नेमक्या नाट्यपूर्णतेच्या टोकाच्या क्षणी नेणं वगैरे गोष्टी ओघाने होतात. सिनेमा प्रेक्षकाला हवं ते, त्याला त्याचाच आरसा दाखवत पण दिग्दर्शकाच्या म्हणण्यासह पोचवतो!
अभिनयाच्या बाबतीत सगळ्यात विरस कोणी केला असेल तर आशुतोष गोवारीकर. अत्यंत एकसुरी बोलणं, वावर, आवाजाची सपाट पट्टी! त्यात त्याला आळेकर, जितेंद्र, सुकन्या अशा अनेक मातब्बर कलाकारांसमोर उभं केल्यावर तर तो अधिकच खुजा दिसू लागतो. त्याचं डबिंग, मराठी शब्दोच्चार यातही तो तोकडा पडतो. प्रियांकासुद्धा एकवेळ भाव खाऊन जाते, पण स्क्रीनला गोंदासारखा चिकटलेला 'राजा' गरजेपेक्षा अधिक वेळ दिसत राहतो नि त्याचा कंटाळा येऊ लागतो.
या सिनेमात बर्याच 'हमखास यशस्वी' गोष्टी आहेत, मालमसाला आहे. पण त्याचबरोबर 'गणपती डॅन्स'च्या नावाखाली एखादे आयटम किंवा रिमिक्स गाणे घालून एकूण मुडचा विचका करणे टाळले आहे. लौकिकार्थाने सिनेमाला हिरॉईन नाही. ’लय भारी’ लोकेशन्सचा बडेजाव नाही. खूप पात्रे असूनही गोंधळ नाही. शेवटी सगळ्या पात्रांना एकत्र आणून सगळं कसं आलबेल आणि आदर्श आहे, असंही दाखवायचा अट्टहास नाही. एकूण नात्यांची गुंतागुंत दाखवताना गोग्गोड राजश्री प्रोडक्शन्सछाप तुपट्ट कुटुंबाऐवजी ’हे असले डिसिजन्स त्याच्या मुलानेच घ्यावेत, मुलीने नव्हेत. आमच्या परंपरेत हे असे डिसिजन्स मुलगेच घेतात’ असे वास्तवदर्शी डायलॉग्ज मारणारे हाडामांसाचे काके-मामे कुटुंबात रंगवले आहेत. शिवाय सतीश-आशुतोषमधील एक फारच गोड असा बसमधील सीन आहे. (हा सीन काही फार सटल वगैरे नाही. पण तरी आपलं काम तो चोख करतो)
व्हेंटिलेटर हे तर मानवी आशेचे मूर्तिमंत प्रतीक. हे केवळ माणूस जगवण्या-टिकवण्यापुरते मर्यादित नाही. माणसाचे अस्तित्त्व हे त्याच्या सभोवतालातील घटकांशी असलेल्या त्याच्या नात्यावर तोललेले असते. कित्येकदा जिवंतपणीसुद्धा नाते तुटायला येईपर्यंत ताणले गेले, तरी १% रिकव्हरीच्या आशेमुळे ते तोडून टाकलेले नसते. माणूस आपल्या आयुष्यात नाते टिकवण्याची आशा सोडतो, तेव्हाही ते नाते व्हेंटिलेटरवर ठेवणे योग्य असते. नाते तोडून टाकण्यापेक्षा त्या नात्यात पुन्हा धुगधुगी येईस्तोवर त्याला व्हेंटिलेटरचा - कृत्रिम पण जिवंत ठेवणारा - श्वास मिळत राहणे गरजेचे असते, इतकं तरी हा सिनेमा नक्कीच अधोरेखित करून जातो. सिनेमा एकदा तरी नक्की बघा अशी शिफारस!
व्हेंटिलेटर (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
