इतिहास घडवणाऱ्या माघारीची गोष्ट - डंकर्क
“A story should have a beginning, a middle and an end, but not necessarily in that order.” याला गोष्ट सांगण्याची नॉन लिनियर पद्धत म्हणतात. क्रिस्तोफर नोलनच्या जवळ जवळ सगळ्याच चित्रपटांमध्ये ही पद्धत दिसून येते. त्याची ही आवडती पद्धत डंकर्कमध्ये सुद्धा आहे. आता ही पद्धत काहींना किचकट वाटू शकते, पण नोलनची गोष्ट सांगण्याची हातोटी आणि कथेवरची जबरदस्त पकड प्रेक्षकांना कुठेच भरकटायला जागा ठेवत नाही.
दुसऱ्या महायुद्धला तोंड् फुटल्यानंतरची एक महत्वपूर्ण घटना म्हणजे डंकर्कची यशस्वी माघार. महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलं होतं आणि त्यांचा तळ फ्रान्समधल्या डंकर्क भागात होता. यावेळी जर्मनी सर्व शक्तीनिशी फ्रान्स गिळत असताना जवळजवळ ७२% ब्रिटीश सैन्य डंकर्कमध्ये अडकून होतं. जर त्यावेळी हे एवढं मोठं सैन्य जर्मनांच्या हाती लागलं असतं तर सैनिकांची कत्तल तर झालीच असती, पण आज आपला इतिहास काही वेगळाच असता. अशावेळी सैनिकांना वाचवण्यासाठी अगदी लहान लहान बोटी, नौकांचा वापर करण्यात आला आणि सैनिकांना सहीसलामत मायदेशी आणण्यात आलं. या सर्व परिस्थितीवर बेतलेला सिनेमा म्हणजे ‘डंकर्क’!!
डंकर्क सुरु होतो फ्रान्सच्या गल्लीबोळातून. ब्रिटिश सैनिक डंकर्कमधल्या ओसाड पडलेल्या घरांतून खायला काही मिळतंय का किंवा निदान पाण्याचा एक थेंब तरी सापडतोय का याच्या शोधात असताना आकाशातून पत्रकांचा पाऊस पडू लागतो. ही पत्रकं म्हणजे ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिकांची मृत्यूपत्रकं असतात. चारी बाजूंनी जर्मन फौजांनी घेरलं असल्याचं त्या पत्रकात दाखवलेलं असतं. गंमत म्हणजे ही पत्रकं जर्मन फौजांनीच वाटलेली असतात, जेणेकरून ब्रिटिशांनी एक तर मरण तरी पत्करावं किंवा शरण तरी यावं.
जर्मन फौजांनी ब्रिटिश सैनिकांना अगदी खिंडीत गाठलंय आणि मागून मृत्युघंटा वाजतेय या प्रसंगापासून कथेला सुरुवात होते. जमिनीवरून, आकाशातून आणि समुद्रावरून सिनेमाची कथा पुढे सरकते. या कथेत कोणतंही मध्यवर्ती पात्र नाही आणि संवाद पण मोजकेच आहेत. त्यामुळे काहींना हा सिनेमा बघायला अवघड जाईल. पण नोलनने म्हटल्याप्रमाणे त्याला संवाद किंवा पात्र यातून गोष्ट सांगायची नाहीत, तर ‘त्या’ परिस्थितीवर भाष्य करायचं आहे. त्या तशा भयानक प्रसंगी ते लोक कसे बाहेर पडतील यावर त्याने जास्त भर दिला असल्याचं लक्षात येतं.
सहसा आपण सिनेमा म्हटलं की दिग्दर्शनावर बोलतो. पण आज सर्वात आधी फिल्मच्या म्युझिकवर बोलूया. चित्रपटाच्या दिग्दर्शनाने जी पातळी गाठलेली अस,ते त्यावर कळस चढवण्याचं काम म्युझिक डायरेक्टर ‘हान्स झिमर’ यांनी केलंय. एका एका फ्रेमगणिक वाजणारं पार्श्वसंगीत अप्रतिमरीत्या आपल्याला युद्धभूमीच्या अगदी मधोमध नेऊन सोडतं. त्यावेळची युद्धजन्य परिस्थिती, घिरट्या घालणारी जर्मन विमाने आणि चारीबाजूने घेरल्या गेल्याची कल्पना, मृत्युच्या अगदी तोंडाशी असतानाचं हे भयाण दृश्य समोर उभं राहताना पार्श्वसंगीत फार महत्वाची भूमिका पार पाडतं. एक व्हायोलिन काय कमाल करू शकते, हे हान्स झिमरने या सिनेमातून दाखवून दिलंय. त्याचा तो कर्कश आवाज सतत आपल्याला पुढे काहीतरी भयाण वाढून ठेवलंय याची कल्पना देत राहतो आणि एक सेकंदसुद्धा जागेवरून हलू देत नाही. सिनेमात एका पॉइंटपासून हळुवार घड्याळाची टिकटिक ऐकू येऊ लागते. ती टिकटिक म्हणजे विमानातील संपत जाणाऱ्या फ्युलटँकची चाहूल. हे विमान शेवटी काय कमाल करतं ते तुम्ही स्वतःच बघितलं तर ते जास्त अंगावर येईल. म्युझिकमुळे संपूर्ण सिनेमात एक प्रकारे अस्वस्थता भरून आहे आणि ती गरजेची देखील आहे. नोलनबरोबर झिमर ‘डार्क नाईट ट्रायोलॉजी’ पासून असल्याने त्याला बरोबर ठाऊक आहे की कोणत्या सीनमध्ये दिग्दर्शकाला किती प्रमाणात म्युझिकचा डोस द्यायचा आहे.
आता वळूयात दिग्दर्शनाकडे... सरळ मुद्द्याला हात कसा घालावा हे बघायचं असल्यास डंकर्क हे उत्तम उदाहरण ठरेल. युद्धजन्य चित्रपट म्हटलं की सैनिकांचं आयुष्य दाखवलं जातं, युद्धापासून दूरदूर असलेले राजकारणी किंवा तथाकथित उच्चाधिकारी दाखवले जातात, पण इथे नोलन आपल्याला सरळ सरळ लाखो सैनिकांमध्ये एकटं सोडून देतो आणि आपण कोणत्याही एका व्यक्तीची फिल्म बघत नसून संपूर्ण फौजेबरोबर वावरतोय असा फील येऊ लागतो. पात्र, संवाद, यांचा भडिमार नसूनही सिनेमा एक डॉक्युमेंट्री झालेला नाही हे विशेष.
डंकर्कशी संबंधित विन्स्टन चर्चिल किंवा हिटलर हे तर लांबच, पण प्रत्यक्ष युद्धात सामील असलेले जर्मन सैनिकसुद्धा या चित्रपटात दिसत नाहीत. मग चित्रपटात काय आहे? तर मृत्यू आणि त्यातून सुखरूप बाहेर निघणारी लाखो माणसं. या माणसांना चेहरे नाहीत, नाव नाही. नोलनला जे दाखवायचं आहे ते हेच आहे. त्याच्या आधीच्या चित्रपटातील पात्रांना खेळवण्याची प्रथा इथे संपूर्णपणे त्याने मोडून काढली आहे. तरी डंकर्क नोलनचा आणखी एक ‘मास्टरपीस ठरतो. स्पीलबर्गच्या ‘सेविंग प्रायवेट रायन आणि डंकर्कची तुलना होऊ शकते, पण दोन्हीही आपल्या जागी श्रेष्ठच आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही.
चित्रपटाचा शेवट देखील तितकाच महत्वाचा केलाय. चर्चिल यांच्या भाषणाने सिनेमा संपतो तेव्हा त्या लाखो सैनिकांप्रमाणे आपल्याही मनात सुखरूप परतल्याची भावना असते.
लेखक- सिद्धार्थ गायकवाड
डंकर्क - चित्रपटाची /नाटकाची माहिती
