फास्टर फेणे (२०१७): फाफेचं 'य' भारी रुपांतर, तितकीच बाळबोध पटकथा!

कोणत्याही शहरी, मध्यमवर्गीय मुलाप्रमाणे मीही भागवतांच्या फास्टर फेणेला मनापासून वाचलं आहे. मला ते लेखन लहानपणी खूप आवडल्याचंही आठवतं. टॉक वगैरे आवाज देण्याची खास स्टाइल, आपणही करू शकू बहुधा अशी शंका ठेवून का होईना वाटायला लावणारी साहसे नि त्या वयातही शहरी मुलांना कळतील झेपतील इतपत रहस्ये या वैशिष्ट्यांसह असलेल्या त्याच्या खास मराठमोळ्या साहसकथा आम्हाला न गुंगवतील तरच नवल. जेव्हा दोनेक वर्षांपूर्वी फाफेवर सिनेमा येतोय ऐकलं तेव्हा पहिली प्रतिक्रिया होती "अरे बापरे!" कारण इतके वाचक असलेल्या या सिनेमावर अपेक्षांचं ओझं असणार आणि त्या पात्राचं आपलं एक चित्र डोक्यात असणार त्यापुढे सिनेमा तितक्या ताकदीचा बनणं खूप कठीण गोष्ट होती.

मग हा सिनेमा कसाय? याचं साधं उत्तर "फेणेचं रूपांतर भारिये, लोकांचा अभिनय झकास ए पण एकुणात सिनेमा म्हणून मात्र मला अजिबात आवडला नाही."

 

फाफेकडून लोकांच्या प्रतिमेवर मात करण्यासाठी त्याचे आधुनिक रूपांतर कळण्याची आयडिया मस्त पण ती काहीशी अपरिहार्य आणि म्हणूनच अपेक्षितही होती. अर्थात हे रूपांतर वठणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि या सिनेमात ते बऱ्यापैकी यशस्वी झालंय. मोबाईल आणि गॅजेट्स वापरून अनेक गोष्टींचा, व्यक्तींचा किंवा जागांचा ठावठिकाणा शोधण्याची आयडिया बीबीसीच्या नव्या शेरलॉककडून उसनी घेतली असावी अशी शंका आली खरी. पण हे लेखन करताना लेखकानेच तंत्रज्ञानाचा अभ्यास फारसा केलेला नसावा, त्यामुळे जुजबी माहितीवर आधारित दिसणारा हा तंत्रज्ञानाचा वापर शेरलॉकच्या पासंगालाही पुरत नाही. 

'अमेय वाघ' हा मोठा झालेला बनेश फेणे वाटावा इतकं त्याचं रुपडं पर्फेक्ट वाटलं. त्याच्या लकबी, संवादफेक वगैरे हुकमी गोष्टी तो लीलया पार पाडतो. मात्र सिनेमाचा खरा स्टार 'गिरीश कुलकर्णी' ठरतो. त्याचा अभिनय, बोलण्याची लकब फारच कमाल वठलीये. सिनेमा बघायला कारणच शोधत असाल तर त्याच्यासाठी सिनेमा नक्की बघा.

बाकी, मुळात फाफे हा काही फार फार भारी उकल करणारा कधीच नव्हता मात्र त्याचं शेरलॉकीकरण करण्याच्या नादात पटकथेकडे साफ दुर्लक्ष झालंय. अतिशय ढिसाळ पटकथा एकूणच सिनेमा न आवडण्याचं प्रमुख कारण आहे. कितीतरी क्लू फाफेसमोर प्रदर्शनात मांडल्यासारखे मांडलेले असतात. बनेशलाच काय आपल्यालाही सिनेमात पुढे काय होणार याचा सहज अंदाज येतो. प्रेक्षकाला कुठेही धक्का बसत नाही. या सगळ्या गोष्टी एकूणच कथेला बाळबोध आणि म्हणूनच कंटाळवाणं करतात. सबंध कथा एकरेषीय आहे. सगळीच पात्रं ढोबळ आणि काळी किंवा पांढरी अशी विभागली आहेत. माणसाच्या स्वभावाची गुंतागुंत, ज्या अवकाशात हा सिनेमा घडतोय त्यात इतर लोकांचं असलेलं अस्तित्व वगैरे औषधालाही दिसत नाही. मंडई असो वा चाळी  वा हॉस्पिटल- भवताल कसाही असला तरी सभोवतीची माणसंही सिनेमा बघितल्यासारखं जी काय मारामारी, धमकावणे वगैरे चालू असेल ते मुकाट्याने बघत असतात. एकूणच प्रसंग एकापुढे एक ठेवल्याने सिनेमा अगदीच सरधोपट होतो.


(स्रोतः आंतरजाल)

इतकं असूनही तुमच्या घरी ५ ते १०-१२ वर्षांचे मूल असेल तर मात्र त्या मुलांना (विशेषतः मुलग्यांना) हा सिनेमा आवडायची शक्यता आहे.कारण,  अनेक दर्जेदार रहस्यकथा आणि सकस लेखन तसेच तसे सिनेमे बघून पोसलेल्या मोठ्यांच्या मेंदूला हा खुराक अजिबातच पुरेसा नसला तरी अशा धर्तीचा प्रयोग लहानांसाठी मराठीत नवा असल्याने त्यांना एकवार दाखवायला हरकत नाही.  हल्ली लहान मुलेही हॅरी पॉटरसारखी अनेक स्वतंत्र उभारलेली, करड्या रंगांतील पात्रे, अनेक पातळ्यांवर घडणारी बहुआयामी कथानके बघून तयार झालेली दिसतात. तसे असेल तर तुलनेने अगदीच सरधोपट नि ढोबळ कथानक त्यांनाही किती आवडेल शंकाच आहे. (मूळ फास्टर फेणे पुस्तकाप्रमाणे ही कथाही अगदीच पुरुषप्रधान आहे हे ही जाता जाता नोंदवायला हवे - काळासोबत इथे मात्र काहीही बदल झालेले दिसत नाहीत)  

तेव्हा  कोणत्याही कारणाने हा सिनेमा बघायचा हट्टच नसेल तर टीव्हीवर तो येईस्तोवर वाट बघायला हरकत नाही!

फास्टर फेणे (२०१७) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

फास्टर फेणे (२०१७)
  • Official Sites:

    imdb
  • दिग्दर्शक: आदित्य सरपोतदार
  • कलाकार: -
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१७
  • निर्माता देश: भारत