युवा वर्गाला आकर्षित करणारी वेबसिरीज पर्मनंट रुममेट्स

आपली मेनस्ट्रीम टीव्ही इंडस्ट्री साचेबंद होत असताना इंटरनेटच्या  माध्यमातून लोकांसमोर कला मांडण्याचे अनेक प्रयोग सध्या आपल्यासमोर होत आहेत. ’एआयबी रोस्ट’वरून झालेल्या गदारोळात युट्यूबवर चालणार्‍या प्रयोगांबद्द्ल बरीच बरीवाईट चर्चा घडून आली. त्या निमित्ताने या चळवळीचे अनेक चेहरे आपल्या समोर आले. ’प्रिटेन्शियस रिव्ह्यूज’सारखं बॉलीवूड सिनेमाची उत्तम चिरफाड करणारं चॅनल असो किंवा पाककृती, गॅजेट्स यांचे रिव्ह्यूज देणारं चॅनल असो. असे अनेक प्रकार आहेत. त्यातला सगळ्यात लोकप्रिय प्रकार म्हणजे ’स्केच कॉमेडी’ या सदरात मोडणारे विनोदी व्हिडिओज तयार करणारे चॅनल्स. यांतले एक चॅनल म्हणजे ’द व्हायरल फीवर’ (टीव्हीएफ). या ’टीव्हीएफ’ने ’क्युटियापा’ या नावाने तयार केलेल्या त्यांच्या कॉमेडी स्केचेसना आजवर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आलेला आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये”टीव्हीएफ’ने एक प्रयोग केला आणि ’पर्मनंट रुममेट्स’ या नावाने पाच भागांची ड्रामा (नाट्य) या सदरात मोडणारी एक मालिका लोकांसमोर आणली.

मालिकेची सुरुवात होते ती मिकेश चौधरी या हिरोच्या एंट्रीने. मिकेश आणि त्याची गर्लफ्रेंड तानिया साधारण तीन वर्षं लॉंग डिस्ट्न्स रिलेशनशिपमध्ये  आहेत. हा मिकेश पूर्वकल्पना न देता तानियाला भेटायला अमेरिकेतून भारतात परत येतो. रिलेशनशिपचं पुढचं पाऊल म्हणून तानियाला लग्नासाठी विचारायचा त्याचा प्लॅन आहे. त्याच तयारीत तो तिच्या बिल्डिंगमध्ये येऊन तिच्या फ्लॅटच्या दारात गुडघ्यावर बसून हातात अंगठी घेऊन बेल वाजवतो.  आता तानियाचं उत्तर काय असेल हे जाणून घ्यायला आपली उत्सुकता ताणली गेली असताना दारात एक आजोबा हातात दुधाचे भांडे घेऊन उभे ठाकतात! रिलेशनशिपमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर असलेल्या मिकेश आणि तानियाची  या आणि अशाच नर्मविनोदी प्रसंगातून उभी  राहिलेली कथा म्हणजेच ’पर्मनंट रुममेट्स’.

दिवसभर टीव्हीवर चालणार्‍या ’सास-बहू और साजिश’ टाईपच्या सिरियल्सना कंटाळलेला,  इंटरनेटसारख्या दुसर्‍या माध्यमाशी चोवीसतास जोडला गेलेला तरुण वर्ग हा या सिरियलचा टार्गेट ग्रुप. हा आपला टार्गेट ग्रुप मालिकेच्या लेखकाला नि दिग्दर्शकाला चांगलाच कळला आहे. साधारणतः अशा चॅनेल्सच्या रिसर्च टीम्स आणि मार्केटिंग टीम्स या परस्परांपासून भिन्न आणि प्रचंड ताकदीच्या असतात. त्यातून ’टीव्हीएफ’च्या संभाव्य प्रेक्षकांच्या अव्यक्त मागणीचा आणि विचारसरणीचा चांगलाच अभ्यास केलेला दिसतो. त्यामुळेच प्रेक्षकांना या कथानकाशी रिलेट करणे सोपे गेले असावे.  

जरी ’टीव्हीएफ’ने या मालिकेचे वर्गीकरण ड्रामा या सदरात केलेले असलेले  तरी प्रसंगानिष्ठ विनोद (Situational Comedy) या सिरियलमध्ये ठासून भरलेले आहेत. एका प्रसंगात हिरो मिकेश घर शोधायला गेलेला असताना तिथे त्याला लग्नाच्या वरातीला तयार झालेला एक नवरदेव भेटतो. तो नेमका त्याच्या जुन्या ओळखीचा निघतो. त्या वेळी तो आपली ओळख ”अरे मी तोच, ज्याने बेबी ओव्हरमध्ये २७ रन्स दिल्या होत्या” अशी करून देतो. या प्रसंगाचे टायमिंग आणि तिथे यानंतर जे काही घडते ते एकदम अफलातून आहे. मालिकेतला विनोद खदाखदा हसायला लावण्याच्या प्रकृतीतला नाही. तो  शारीर पातळीवर न उतरणारा, पण गालातल्या गालात हसवणारा, मध्येच दाद घेऊन जाणारा, अशा पठडीतला आहे.

मुळात टीव्हीएफ हा एक ’आयआयटीयन्स’चा कंपू आहे आणि साधारण २०१० पासून यांचे व्हिडिओज यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहेत. त्यातून प्रत्येक कलाकाराची स्वत:ची वेगळी ओळख तयार झाली आहे.  या मालिकेचे लेखन केले आहे ते ’टीव्हीएफ’च्या प्रेक्षकांमध्ये ’अर्णब’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या आणि अर्णब गोस्वामीची भन्नाट मिमिक्री करणार्‍या बिस्वपती सरकार याने. मिकेश आणि तानिया या भूमिकांत पहिल्यांदाच ’टीव्हीएफ’वर आलेल्या सुमित व्यास आणि निधी सिंग या दोन नवख्या चेहर्‍यांना बघायला फ्रेश वाटते. बाकीच्या नेहमीच्या यशस्वी कलाकारांचे कामही नेहमीसारखेच उत्तम. पण या सिरियलमध्ये आवर्जून उल्लेख करावा तो पुरुषोत्तम या बिहारी इस्टेट ब्रोकरचं काम करणार्‍या दीपक कुमार मिश्राचा. त्याचं कॉमेडीचं टायमिंग जबरदस्त आहे. “मुंबईमध्ये एकही फ्लॅट रिकामा नाही, तुम्ही पुण्यात फ्लॅट घ्या,” असे सांगणारा किंवा “आज जर हे रजिस्ट्रेशन नाही झाले तर मला पोस्टात चिकटावे लागेल” सांगणारा पुरुषोत्तम त्याने मस्त रंगवला आहे. त्याचा हजरजबाबीपणा, देहबोली आणि एकूणातच विनोदाची जाण धमाल आणते. याशिवाय तानियाच्या रुममेटच्या भूमिकेत निधी सिंगचा अभिनय उल्लेखनीय आहे.

आकडेवारीच पाहायची झाली तर या सिरियलच्या पहिल्या भागाचे युट्यूबवरती तेरा लाख व्ह्यूज झाले आहेत. पाच भाग मिळून हा आकडा पन्नास लाखाच्या पुढे जातो. एकदा व्हिडिओ एडिटिंगमध्ये झालेल्या विलंबामुळे या मालिकेचा एक भाग वेळेत प्रकाशित होऊ शकला नाही, तर या सिरियलच्या फॅन्सनी ’टीव्हिएफ’च्या सोशल मिडिया पेजेसवर प्रचंड  गोंधळ घातला होता.  या मालिकेने एक प्रकारे आंतरजालीय मालिकांसाठी बेंचमार्कच सेट केलेला आहे. अर्थात असा प्रयोग करण्यासाठी पैसा उभा करणे हे तसे अवघड काम आहे. ’टीव्हीएफ’ला या प्रयोगासाठी कॉमनफ्लोर.कॉमने (commanfloor.com) मदत केली आहे. याचा मोबदला म्हणून कथानकामधे प्रॉडक्ट प्लेसमेंट करण्यात आलीय. कधी कधी ती अतिरेकी वाटू शकते, किंबहुना ’टीव्हीएफ’च्याच एका व्हिडिओमध्ये ड्युरासेलच्या प्रॉडक्ट प्लेसमेंटचा भाग बर्‍यापैकी फसला होता. पण असे प्रयोग यशस्वी होण्यासाठी असे वेगळे मार्ग चोखाळायची गरजही आहे. तसं पाहता या सिरियलचा हा पहिला सिझन आहे, आणि ’टीव्हीएफ’ने याचा दुसरा सिझन येणार असे अजून जाहीर केलेले नाही. पण तो यावा असे नक्की वाटते.  असे प्रयोग यशस्वी होण्यात माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाचा अधिकच फायदा आहे. कदाचित यामुळे तरी मुख्य धारेतल्या टीव्ही वाहिन्या काही चांगले कंटेट टिव्हीवर उपलब्ध करून देतील. तोवर यु-ट्यूब जिंदाबाद!

 

पर्मनंट रुममेट्स - चित्रपटाची /नाटकाची माहिती

पर्मनंट रुममेट्स
  • Official Sites:

    imdb
  • दिग्दर्शक: समीर सक्सेना
  • कलाकार: सुमीत व्यास, नीधी सिंग, नीधी बिश्त, दीपक कुमार मिश्रा
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: 2014
  • निर्माता देश: भारत