फिल्म इन्स्टिट्यूट, संप आणि ’होली’

फिल्म इन्स्टिट्यूटमधल्या विद्यार्थ्यांच्या संपाला आज एक महिना झाला. अनुपम खेर, ऋषी कपूर यांच्यासारखे बॉलिवुडी दिग्गज, योगेंद्र यादवांसारखी राजकीय व्यक्तिमत्त्व आणि ज्यांना बाय डिफॉल्ट डावंच मानलं जातं असे समांतर सिनेमावाले - असा तिहेरी पाठिंबा विद्यार्थ्यांना मिळाला आहे. माध्यमांमधून गजेंद्रसाहेबांची उत्तरं देताना तारांबळ उडते आहे. तरीही परिस्थिती ’जैसे थे’च आहे.

या पार्श्वभूमीवर केतन मेहताच्या ’होली’ची आठवण काढण्याला पर्याय नाही.

आपल्यापैकी अनेकांना ’होली’ ठाऊक असतो तो आमीर खानचा पहिला सिनेमा म्हणून. महेश एलकुंचवारांच्या एका एकांकिकेवर आधारित असलेला सिनेमा ही मराठीपणाला चुचकारणारी आणि एक ओळख. आता मान्यवर होऊन बसलेले किती ओळखीचे चेहरे सिनेमात आणि श्रेयनामावलीत दिसतात ते बघणारी ’आईबापाच्या लग्नाचे अल्बम पाहा’-मानसिकता घेऊनच आपण सिनेमा बघायला घेतो. त्या बाबतीत ’होली’ अजिबात निराशा करत नाही. आमीर खान. किट्टू गिडवानी. आशुतोष गोवारीकर. राहुल रानडे. अमोल गुप्ते. मोहन गोखले. राज झुत्शी. नीरज व्होरा. यतीन कार्येकर. परेश रावल. दीपा मेहता. नसरुद्दिन शहा. श्रीराम लागू.... एकाहून एक दिग्गज नावं. सुरुवातीचा काही वेळ तरी ’हा बघ कोण आहे!’ ’हो की. बघ ना कसा दिसतोय!’ असले चाळे करण्यात जातात. पण हळूहळू आपण गोष्टीच्या परीघाकडे निश्चितपणे आणि तीव्रतेने खेचले जायला लागतो.

होस्टेलमधला एक दिवस. कुठल्याही होस्टेलासारखे एक होस्टेल. पाणी नसण्यापासून पोरांच्या कायमस्वरूपी कडकीपर्यंत सगळीकडे दिसणारे अराजक आणि अभाव. काही शामळू पोरं. काही गुणी. काही साधी. काही गुंड. काही क्रूर. नेहमीचंच सगळं. दिवस होळीचा आहे. पण कॉलेजला सुट्टी नाही. विश्वस्तांपैकी कोणत्याश्या बड्या धेंडाचं - संस्थेच्या अध्यक्षांचं - व्याख्यान ऐकायला जाणं कंपल्सरी आहे. परीक्षा सतत पुढे ढकलल्या जाताहेत. प्रोफेश्वरांच्यात शिक्षण सोडून पेग्रेड आणि तत्सम चिंता आहे. क्लेरिकल स्टाफ संपात मग्न आहे. प्रिन्सिपल विश्वस्तांची मर्जी राखण्याच्या तजविजीत. पोरं मोकाट. कॅण्टीनमध्ये चिडवाचिडवी चालते. छेडाछेडी चालते. बारीक चोर्‍यामार्‍या, पोरी पटवणं, नव्या शिक्षकांची रेवडी उडवणं... सगळं यथासांग चालू आहे. पोरं, त्यांच्या मागण्या आणि त्यांच्या शिक्षणाची चिंता हे घटक सोडून. ते कमालीचे क्षुद्र आणि दुर्लक्षित. वरवर सगळे मस्करीत दंग. पण वातावरणात कोणत्याही अभावाला वा दबावाला न जुमानणारी एक धुमसती ऊर्जा. चढत्या दिवसासरशी तिचा वाढत जाणारा ताण.

निमित्त कसल्याश्या क्षुल्लक हाणामारीचं होतं आणि प्रिन्सिपल त्याच्या भाच्याला झोडणार्‍या मुलाला रस्टिकेट करतात. पोरं बिथरतात. अध्यक्षांची सभा उधळली जाते. मुलांची नस जाणून असणारे प्रोफेसर सिंगही हतबल होतात. पण प्रिन्सिपल शांत थोडेच बसणार? ते एका फितूर पोराकरवी होस्टेलच्या पोरांची नावे काढून घेतात आणि त्या मुलांनाही रस्टिकेट केलं जातं. इथवर दिवस उतरणीला लागला आहे. पण नाट्याला आता कुठे सुरुवात होते आहे...

त्या पोराचं नाव लपत नाही. पोरं संतापानं बेभान होतात.

झुंडीत दबला गेलेला शहाणपणाचा सूर. त्या पोराचे झुंडीनं केलेले हाल. क्रौर्य, हिंसा, निरनिराळे रंग घेऊन येणारी लैंगिकता - सगळ्याचा धुमसता उद्रेक.

पहाट होते ती पोलिसांपुढे भेदरून जबानी देणार्‍या पोरांच्या लायनीत. आपल्याकडून काय घडून गेलं या जाणिवेनं भेदरलेले चेहरे. बाहेर फटफटणारी पहाट.

चोवीस तास, बस.

दुर्दैवी आहे खरं. पण हे सगळं आजही तितकंच समकालीन आहे. पण तसे तर जगातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न कायमच असतातच. मग आज ’होली’ची मुद्दामहून आठवण काढण्याचं कारण? कारण दोन. एक म्हणजे या सिनेमाचं शूटिंग फिल्म इन्स्टिट्यूटच्या आवारात, परिसरात, इमारतीत झालं आहे. ती वास्तू म्हणजे सिनेमातलं नुसतं नेपथ्य नव्हे. ती सिनेमातलं एक पात्रच आहे, इतकी ती जिवंत आहे. त्यातले व्हरांडे, वर्गखोल्या, होस्टेलमधल्या खोल्या, गच्ची.. हे सगळंच दरेक चौकटीतून काहीतरी बोलत असतं. त्यातला भगभगीतपणा आणि ऊर्जा पोरांच्या कथानकाला विलक्षण चपखल ठरेल असा कॅनव्हास पुरवतात. एका प्रसंगात छपरावर चढून खाली बघणारी दोन पोरं दिसतात. "काय आठवतं सांग बघू?" "गुलाम तयार करण्याचा कारखाना आठवतो. नाहीतर मग तुरुंग." हा त्यांच्यातला अल्पाक्षरी, मासलेवाईक संवाद.

सिनेमात आपल्याला एक पडका वृक्ष दिसतो. वृक्ष कसला. ते वृक्षाचं कलेवर आहे. त्यावर काही पोरं खेळताहेत. जीवन सुरू आहे. राहतंच. पण व्यवस्था पोखरली जातेय? सडतेय? कोसळतेय? त्या प्रतिमांकडे बघताना आपण आतून किडत गेलेल्या व्यवस्थेचा साक्षात्कार होऊन अंतर्मुख होत जातो.

दुसरं कारण म्हणजे या चित्रपटातली दिग्गज नावं. तेव्हाही यशस्वी असलेले अनेक चमकते चेहरे त्यात होतेच. पण तेव्हा कुणीच नसलेले अनेक नवोदित, उमेदवार चेहरे ’होली’मुळे प्रकाशात आले. पुढे अपरिमित यशस्वी झाले. निरनिराळ्या वाटांनी त्यांनी सिनेमाला नवीन दिशा दिल्या. त्यांच्यापैकी अनेक जण फिल्म इन्स्टिट्यूटमधून आलेले होते.

आज त्यांच्यापैकी किती जणांनी फिल्म इन्स्टिट्यूटमधल्या विद्यार्थ्यांच्या संपाबद्दल काहीएक भूमिका घेतली आहे?

दुसरा ’होली’ बनण्याची वेळ आलीय का?

कुठे?

होली - चित्रपटाची /नाटकाची माहिती

होली
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: केतन मेहता
  • कलाकार: आमीर खान, किट्टू गिडवानी, अमोल गुप्ते, आशुतोष गोवारीकर, मोहन गोखले, परेश रावल, नीरज व्होरा, नसीरुद्दिन शाह, दीप्ती नवल, श्रीराम लागू
  • चित्रपटाचा वेळ: २ तास / १२० मिनिटे
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: १९८५
  • निर्माता देश: -