ट्रॉय - वुल्फगॅंग पीटर्सन - २००४

 

थोडक्यात:

एखाद्या महाकाव्यावर आधारित चित्रपटाचं आव्हान तसं कठीणच. कथानकाची भव्यता आणि तिच्या गाभ्यातला मानवी हळुवारपणा यांचा तोल भल्याभल्यांना साधता येत नाही. एक हाती आला, तर दुसरा अलगद निसटून जातो. वुल्फगॅंग पीटर्सननं ’ट्रॉय’मध्ये हे आव्हान सुरेख निभावलं आहे.

पुढे:

’इलियड’ या होमरच्या महाकाव्यावर आधारलेला हा चित्रपट. महाभारतातल्या सत्तासंघर्षाला जशी द्रौपदी कारणीभूत ठरली, तशीच ’इलियड’मध्ये स्पार्टा राज्याची सौंदर्यवती राणी हेलन. अगमेनॉन (ब्रायन कॉक्स) हा स्पार्टाचा महत्त्वाकांक्षी राजा. हेलन (डायना क्रूगर) त्याच्या भावाची पत्नी. ट्रॉय ही तटबंदीमुळे अजिंक्य असलेली नगरी. ट्रॉय आणि स्पार्टामध्ये शांततेचा करार करण्यासाठी आलेला ट्रॉयचा राजपुत्र पॅरीस (ऑरलॅंडो ब्लूम) हेलनकडे आकर्षित होतो आणि तिला पळवून आणतो, तेव्हाच युद्धाची नांदी होते. ट्रॉयचा दुसरा जाणता-कर्ता राजपुत्र हेक्टर (एरिक बाना) या विध्वंसाचा आवाका पाहू शकणारा. पण राज्यरक्षणासाठी भावाला पाठीशी घालण्यावाचून त्याच्याकडे तरणोपाय नाही. त्याचं युद्धप्राविण्य आणि ट्रॉयची अभेद्य तटबंदी एका बाजूला. आणि ट्रॉय घशात घालायला उत्सुक असलेला अगमेनॉन आणि त्याला मिळालेलं आयतं अपमानास्पद निमित्त एका बाजूला. तरीही पारडं ट्रॉयचंच जड. तेव्हा अगमेनॉन अकिलीसला (ब्रॅड पीट) साकडं घालतो. अकीलीस हा अजिंक्य योद्धा. पण राजनिष्ठेचे बंध न मानणारा. इतर कसल्याही निष्ठा न मानणार्‍या पराक्रमी अकिलीसला त्याच्या कोवळ्या चुलतभावाच्या - पेट्रोक्लसच्या - वधाचा घाव सहन होत नाही. त्या सुडापोटी अहंकार बाजूला ठेवून अगमेनॉनसोबत युद्धात उतरतो आणि हेक्टरला युद्धाचं आव्हान देतो.

हे द्वंद्व चित्रपटातल्या महत्त्वाच्या क्षणचित्रांपैकी एक मानलं पाहिजे. ’ट्रॉय’ हे महाकाव्य अनेक कथानकं आणि उपकथानकं असलेलं. अनेक बाबतीत संदिग्धता बाळगून असलेलं. (अकिलीस आणि पेट्रोक्लस यांच्यातलं नातं केवळ भावांचं की प्रेमिकांचं, याबाबत अजूनही संदेह आहे.) इतिहास आणि पुराकथा यांच्या सीमेवरचं. अशा महाकाव्यावर एक पावणेतीन तासांची बांधीव पटकथा तयार करणं, ती दुर्बोध न होऊ देणं आणि तिच्यातली भव्यता आणि मानवी शोकांतिका टिपणं - हे आव्हान फार मोठं होतं. डेविड बेन्यॉफ यांनी पटकथा अशा नेटकेपणानं रचली आहे - की कथानकांमधले सगळे सुटे सुटे धागे या द्वंद्वदृश्यापाशी येऊन अचूक सांधले जातात.

अकिलीस आणि हेक्टर या दोघांचीही व्यक्तिमत्त्वं तोवर आपल्यासमोर स्पष्ट रेखीव होत गेलेली असतात. निर्दयी, बेबंद, पण पेट्रोक्लसच्या मरणामुळे वेडापिसा झालेला अकिलीस एखाद्या झंझावातासारखा. तर हेक्टर द्रष्टा, आपल्या मर्यादा ओळखून असलेला, कोवळ्या पेट्रोक्लसच्या मरणामुळे झालेला पश्चात्ताप वागवणारा अनुभवी वीर. आपल्या यशापयशाशी बांधलं गेलेलं ट्रॉयचं भविष्य ओळखून निधड्या छातीनं लढायला सिद्ध झालेला.

द्वंद्वाचा निकाल लागतो, पण युद्ध मात्र अनिर्णितच राहतं, तेव्हाच लाकडी घोड्याच्या पोटातून सैन्य आत घुसवण्याची ती प्रसिद्ध कल्पना सुचते आणि ट्रॉयमध्ये स्पार्टाचं सैन्य घुसतं.

हे महाकाव्य अकिलीसच्या तुफानी उद्रेकाचं आहे. प्रगल्भपणे परिस्थिती स्वीकारणार्‍या हेक्टरच्या शोकांतिकेचं आहे. आंधळ्या श्रद्धा कवटाळून युद्धाला आमंत्रण देणार्‍या ट्रॉयच्या राज्यकर्त्यांचं आहे. मरणाला घाबरणार्‍या, पण हेलनवर अतोनात प्रेम करणार्‍या पॅरीसचं आहे. अकिलीसमधलं माणूसपण जिवंत ठेवणार्‍या पेट्रोक्लसचं आणि प्रिसीसचं आहे. आपल्या प्राप्तीसाठी होणारा संहार पाहताना हादरलेल्या हेलनचं आहे. पुत्रासाठी व्याकुळ होणार्‍या ट्रॉयच्या वृद्ध राजाचं आहे आणि ट्रॉय जिंकू पाहणार्‍या लोभी अगमेनॉनचंही आहे. इतके पदर असणारी गोष्ट, हास्यास्पद वा कंटाळवाणी न होऊ देता, उत्कटपणे पडद्यावर रेखाटायची म्हणजे सोपं काम नव्हे महाराजा. त्यासाठी त्या काळातली शस्त्रास्त्रं, त्यांची युद्धतंत्रं, तत्कालीन वास्तुशास्त्र, चालीरीती आणि द्वंद्वपद्धती अचूकपणे रेखाटण्याचं आणि त्यातली भव्यता ठसवण्याचं तपशीलप्रधान गद्य काम एका बाजूला. तर दुसर्‍या बाजूला त्यातल्या व्यक्तिरेखांच्या मानवी भावना जिवंत करण्याचं आव्हान.


आर्त आवाजातल्या पार्श्वगायनानं आणि अभिनेत्यांच्या जिवंत कारागिरीनं या महाकाव्याची मानवी बाजू देखण्या प्रकारे सांभाळलीय. बाहेर पडतो तेव्हा पडद्यावरची सोनेरी भव्यता आपल्या ध्यानीमनीही नसते. आपल्या लक्षात राहतो तो हेक्टरचा शोकान्त. आणि ’देवांनाही माणसांचा हेवा वाटतो, कारण माणसाला मरणाचं वरदान आहे’ असं म्हणत अपोलोच्या मूर्तीचं मस्तक धडावेगळं करणारा वादळी अकिलीस.

ट्रॉय - चित्रपटाची /नाटकाची माहिती

ट्रॉय
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: वुल्फगॅंग पीटर्सन
  • कलाकार: ब्रॅड पीट, एरिक बाना, ऑरलॅण्डो ब्लूम, डायना क्रूगर, ब्रायन कॉक्स, सीन बीन, ब्रेण्डन ग्लीसन, पीटर ओ’टूल
  • चित्रपटाचा वेळ: १६३ मिनिटे / २ तास ४३ मिनिटे
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: http://www.boxofficemojo.com/movies/?id=troy.htm
  • प्रदर्शन वर्ष: २००४
  • निर्माता देश: अमेरिका