नीरजा (२०१६): रडत रहा रडत पहा!

कधी कधी काय होतं ना, एक सत्यच मुळात इतकं ठाव घेणारं असतं की त्या सत्याचे कथेत रूपांतरण असो वा त्या कथेचे सिनेमारुपात सादरीकरण असो - त्यात असलेल्या भरभक्कम त्रुटी लक्षात येऊनही तो सिनेमा बघा असे सांगावेसे वाटते. "नीरजा" हा त्यापैकीच एक चित्रपट. 'नीरजा भानोत' ही १९८६मध्ये 'मुंबई ते न्यूयॉर्क वाया कराची, फ्रँकफर्ट' या 'पॅन अ‍मेरिकन' कंपनीच्या विमानाची 'हेड पर्सर' असताना हे विमान हायजॅक होते. त्या हायजॅक झालेल्या विमानातील ते १५-१६ तास किंवा एकूणच, २३ वर्षाच्या नीरजाला तिच्या असामान्य शौर्याबद्दल 'अशोक चक्र' मिळवून देणारा, तिच्या आयुष्यातील सर्वात नाट्यपूर्ण दिवस या सिनेमात दाखवला आहे. एकूण सिनेमा कसाय? असे विचाराल तर मी सांगेन डोक्यावर बंदूक ठेवून "रड, रड! रड की मेल्या. नाही रडत? थांब तुला अजून एक सीनच पाजतो!" असे धमकावणारा हा सिनेमा आहे. तत्कालीन राजकीय/सामाजिक वास्तवाचा बर्‍यापैकी दाखवलेला गंध/जाणीव आणि शबाना आझमी या(च) दोन गोष्टी काय त्या मनात रुतून रहातील अशा! बाकी, बेतास बात सोनम कपूर, टिपीकल हायजॅकिंग सिनेमॅटिक फॉर्म्युला, लांब(व)लेली नि अत्यंत प्रेडिक्टेबल हाताळणी असलेली पटकथा आहेच!

'नीरजा' सुरू होतो तो तिच्या सोसायटीतल्या एका फंक्शनने. नीरजा बघा कित्ती कित्ती मनस्वी, दिलेर, सगळ्या सगळ्यांची आवडती मुलगी आहे, कसं तिच्यावर यच्चतयावत जग प्रेम करतंय, अख्ख्या सोसायटीत तिच्याइतकं पॉप्युलर कुण्णी कुण्णी नाही आणि तिचा एकेक डायलॉग झेलायला लोकं वाट बघताहेत वगैरे तिचा स्वभाव नी कॅरेक्टर प्रस्थापित करायला कंटाळा येऊ लागेल इतकी अख्खी १५-२० मिनिटे वाया घालवल्यावर एकदाची नीरजा आणि ते आतंकवादी दोघेही एकदाचे मूळ कथेसाठी सज्ज होतात.(#मनस्वी_नायिका) आता सांगा एखादे प्लेन हायजॅक होणार म्हणजे त्यात कोण कोण हवे? काही गोजिरवाणी वगैरे मुले मस्ट, त्याच बरोबर एक तरी प्रेग्नंट बाई, टिपीकल गोग्गोड आजीबाई, एक आगाऊ माणूस वगैरे हवेत की नाही?(#बिच्चारे_पॅसेंजर) आणि हो हायजॅकर्स मध्ये अंतर्गत ताण हवाच (#'त्यांच्या'तही_काही_बरे_असतात_बै). येणारा प्रत्येक प्रसंग इतका डोळ्यात बोट घालत येतो की त्या धाग्याचं चित्रपटाच्या शेवटी काय होणार हे कोणीही सांगू शकेल. बरं इतक्यावर हा चित्रपट ठेवला तर काय मजा? त्या नीरजाचा एक भूतकाळ दाखवायला हवा.(#बिच्चारी_नीरजा). त्यात तिचा एक्स-नवरा इतका व्हिलन दाखवलाय की नंतर येणारे आतंकवादीही त्यापुढे स्त्रीदाक्षिण्य वगैरे दाखवणारे सज्जन वाटू लागतात(#वैट्ट_वैट्ट_पुरुषजात). याव्यतिरिक्त #प्रोत्साहन_देणारा_बाप #हतबल_प्रेमळ_आई आणि मुळातच शांत डोक्याने काम करू शकणारी नीरजा (#फिअरलेस_वूमन) असे सगळे साहित्य वापरून नीरजा नावाचा पदार्थ दिग्दर्शक तयार करतो. या चित्रपटाची लांबी ठरवून दिलेली आहे आणि आता "इतक्या लांबीचा तरी सिनेमा हवाच हं!" अशी तंबी दिल्यासारखा सिनेमा घोळवून सादर होतो (#रटाळ!)

इतकं सगळं असूनही हा चित्रपट एकदातरी बघा असे सांगेन! याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शबाना! सोनम कपूरच्या एकसुरी अभिनयाने शिणलेल्या आपल्या डोळ्यांवर एकटी शबानाच काय ती मायेने फुंकर घालते. तिने साकारलेली आई अगदी खरी मानवी आई वाटावी अशी आई आहे. आधी मुलीची एकाचवेळी वाटणारी काळजी व प्रेम, तिच्या जॉबबद्दल वाटणारा अभिमान आणि त्याचवेळी उफाळून येणारी टिपीकल मध्यमवर्गीय अल्पसंतुष्टता, आपला जीव आपण वाचवावा फार हीरोगिरी करू नये अशीच शिकवण देणं, तिची घालमेल नि तिचा उसना खंबीरपणा, तिचे कोसळणे आणि सावरणे सगळेच इतके बोलके आहे की बाकी सगळे एका बाजूला आणि शबाना एका बाजूला असे या सिनेमात होते.

त्याव्यतिरिक्त तत्कालीन सामाजिक-राजकीय भान या सिनेमात चांगले पाळले आहे. मुळात हे आतंकवादी पाकिस्तानी नाहीत (ते लिबियन आहेत) हे व्यवस्थित एस्टॅब्लिश होते. दुसरे दिसला पाकिस्तानी की रंगवा त्याला काळ्या/करड्या रंगात असा आचरटपणा इथे नाही. शिवाय १९८६ म्हणजे तीस वर्षे जुना काळ आहे. तेव्हा एकूणच आतंकवादाचा राक्षस फोफावलेला नाही. जसे पोलिस आणि सुरक्षा व्यवस्था सुस्त होते तसेच आतंकवादीही प्राथमिक स्तरावर होते - अननुभवी होते. हे या चित्रपटात छान एस्टॅब्लिश होतं. याव्यतिरिक्त तत्कालीन भारत पाकिस्तान संबंध फार रोडावलेले नव्हते. लोकांचे एकमेकांशी संबंध होते - हळूच का होईना चित्रपटांचे आदानप्रदान चालू असे. दोन्हीकडे 'व्यावसायिकतेचा' अभाव होता. संपर्काची साधने मोजकी होती. भारतीय आणि पाकिस्तानी वृत्तपत्रांचा सतत असणारा संपर्क वगैरे अनेक लहान गोष्टी त्या काळातले वातावरण छान उभे करते. आणखी एक दिग्दर्शकाने दाखवलेलं स्मार्टपण म्हणजे जे रस्त्यावरचे सीन्स आहेत ते रात्रीच्या रिकाम्या रस्त्यावर आहेत. भोवतालची मुंबई झोपलेली व अंधारात आहे, त्यामुळे जुना काळ दाखवताना जाणवणार्‍या अनेक त्रुटी इथे येतच नाहीत. दिवसाचेही प्रसंगही चार भिंतीतच किंवा विमानातच असल्याने दिग्दर्शकाची काळावरची पकड जराही सैल होत नाही.

आणखी एक नोटिसेबल गोष्ट म्हणजे ध्वनी. विमानाचे आवाज असोत, जुन्या फोन्सचे आवाज असोत किंवा तत्कालीन रेडियोचे आवाज असोत ते अत्यंत खरे वाटतात. शेवटी शबानाचे भाषण चालू असतानाही बाहेरच्या गाड्यांचे आवाज उगाच बंद केलेले नाहीत. कथानक ज्या सभोवतालात घडते तिथे संगीतापेक्षा वेगवेगळे ध्वनीचे अस्तित्व हे प्रकाश, पात्र आणि वस्तूंइतकेच खरे आणि आवश्यक गोष्ट असते आणि इथे ते भान पाळले आहे.

अर्थात या चित्रपटात सगळ्यात कंटाळवाणे काही असेल तर तोचतोपणा. साटल्य वगैरे औषधालाही नाही. 'बघा बघा स्त्री काय काय करू शकते' हा भाव प्रत्येक क्षणी. 'मी बघा एकटी या सिनेमाला गाजवते की नाही' अश्या आविर्भावात उतरून प्रत्येक प्रसंगात अधिकाधिक तोकडी भासलेली सोनम! (अर्थात तिच्या आजवरच्या भूमिकेत ही तिची सर्वोत्कृष्ट भूमिका आहे हे मान्यच!) प्रत्येक प्रेक्षकाने र-ड-लं-च पाहिजे असा बांधलेला चंग!

खरंतर कथा, सक्षम स्त्री कलाकार आणि डायलॉग याच्या जोरावर "काय भारी सिनेमा आहे" असं म्हणायची पद्धत आहे. त्यात खर्‍या नीरजा भानोतने त्यावेळी दाखवलेले धैर्य आणि केलेले बलिदान हे खरोखरच असामान्य आहेच आणि त्याबद्दल नीरजा भानोतला सलाम! पण कितीही प्रयत्न केला तरी या चित्रपटाला मात्र "हं बराय!" याच्या पलीकडे काही म्हणणे मला शक्य नाही!

नीरजा (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

नीरजा (२०१६)
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: राम माधवानी
  • कलाकार: शबाना आझमी, सोनम कपूर
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: हिंदी, अरेबिक
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१६
  • निर्माता देश: भारत