प्राइड अँड प्रीज्युडिस: (१९९५ मिनी BBC सिरिज) एक दीर्घ रसग्रहण - भाग ३
फिल्मिंग व सेट्सबद्दल विचार केला किंवा या सिरीजमधील वेगवेगळ्या स्थानांची आठवण जरी निघाली, तरी सर्वात पहिला आणि साहजिक विचार येतो तो डार्सीच्या डार्बीशायरमधल्या ’पेंबर्ली’ या ’इस्टेट’चा. फक्त या चित्रपटातच नाही,तर एकूणच या कथानकात, पेंबर्लीला एक महत्त्वाचे स्थान आहे. या जागेचे वर्णन लिझी "This is the most happily situated place I have ever seen," असे करते. इतकेच नव्हे, तर लिझीची पेंबर्ली भेट हा डार्सी-लिझी यांच्या नात्यातील मुख्य टर्निंग पॉइंट आहे. असे म्हटले जाते की जेन ऑस्टिनने जेव्हा ही कादंबरी लिहिली, तेव्हा तिच्या डोळ्यांसमोर डार्बीशायरमधील चॅट्सवर्थ हाउस (Chatsworth House) नावाची अतिशय देखणी इमारत होती. पुढे २००५ मध्ये ’बीबीसी’ने जी ’सिरीज’ काढली त्यात हेच घर वापरले गेले आहे. मात्र या लेखातील - १९९५ मधील - सिरीजमध्ये वापरले गेलेले घर मात्र चेशायरमधील लायम पार्क (Lyme Park) होते. ही इमारतसुद्धा अतिशय देखणी आहेच, शिवाय या चित्रपटातल्या प्रसंगांत ती अश्या नेमक्या कोनातून आणि इतकी छान चित्रित झाली आहे, की त्या इमारतीच्या बाबतीत 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' असे झाले आहे.
या ’सिरीज’च्या आधीच्या पुस्तकाचे माध्यमांतर करण्याच्या प्रयोगांमध्ये 'पेंबर्ली'ला महत्त्व दिले असले, तरी या चित्रपटाने पेंबर्ली अतिशय सुंदर असणे अनिवार्य करून टाकले. आताही तुम्ही पेंबर्ली या नावाने जालावर शोधलेत, तर सर्वप्रथम व मोठ्या प्रमाणात लायम पार्कचे फोटो / चित्रे / रेखाटने दिसतात. या ’सिरीज’नंतर लायम पार्क हे चेशायरमधील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्रच होऊन बसले होते. अर्थात या इमारतीचे चित्रीकरण याला जितके कारणीभूत होते, तितकाच ’सीरीज’मधला एक सीनही या प्रसिद्धीला कारणीभूत ठरला. एलिझाबेथ आणि तिचे मामा-मामी जेव्हा पेंबर्ली बघायला जातात, तेव्हा डार्सी घरी नाही याची खात्री एलिझाबेथने करून घेतलेली असते. मात्र ते तिघे तिथे असतानाच, आधी दुसर्या दिवशी येणार असलेला डार्सी, अचानक तिथे येतो असे ते कथानक आहे. मात्र या ’सिरीज’मध्ये पटकथाकाराने म्हणा किंवा दिग्दर्शकाने म्हणा, एक सीन वाढवला. डार्सी जेव्हा घरी येतो, तेव्हा थेट घरी न जाता त्याच्या मनातील दु:ख शांत करायला घरामागच्या तलावात एक डुबकी मारून येतो. घरी परत जायला निघालेल्या लिझीसमोर अचानक ओव्हरकोट, बूट वगैरे हातात वागवत ओलेता डार्सी येतो. लिझी व डार्सी दोघेही चकित होतात. जुजबी बोलून डार्सी कपडे बदलायला घरी जातो. हा इतकाच सीन. पण तत्कालीन प्रेक्षकांनी या सीनला डोक्यावर घेतले. हा ’ओलेता-डार्सी-सीन’ इतका प्रसिद्ध झाला की त्या फ्रेमला, सीनला व ’सिरीज’मधील त्या क्षणाला अजूनही ब्रिटीश टीव्हीच्या इतिहासातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक मानले जाते. या सीनची अजून एक गंमत अशी, की डार्सी कोणतेही कपडे न घालता पाण्यात उडी मारतो आणि दुसर्या टोकाला बाहेर निघतो तर समोर एलिझाबेथ उभी असते असा प्रसंग दिग्दर्शकाच्या डोक्यात होता. मात्र कॉलिन फर्थने (डार्सी) आधी हा सीन करायला नकार दिला. शेवटी शर्ट व ट्राउझरसकट हा सीन शूट झाला नि इतिहासात अजरामर ठरला.
या ’सिरीज’बद्द्ल अजून एक गमतीशीर बाब अशी, की आधी कॉलिन फर्थने ही भूमिका करायला नकार दिला होता. ज्या भूमिकेनंतर त्याला ’युनिवर्सली अक्लेम्ड हंक’ म्हटले जाऊ लागले, ती भूमिका आपल्याला शोभणार नाही, असेच त्याला मनोमन वाटत होते. मात्र या ’सिरीज’च्या दिग्दर्शकाला - सायमनला - मात्र या भूमिकेसाठी कॉलिनशिवाय अन्य चेहरा चालणारच नव्हता. शेवटी कॉलिनच्या अनेक विनवण्या केल्यानंतर तो त्याच्या करियरमधील टर्निंग पॉइंट ठरलेली भूमिका करायला तयार झाला.
चित्रीकरणाकडे पाहिले तर इतर बाबी ’फाईन’ आहेतच. पण अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कथेतील ऋतूबदल हे चित्रीकरणात कृत्रिमरीत्या भासवलेले नसून शूटिंग खरोखरच त्या त्या ऋतूमध्ये केले आहे. कथेत एलिझाबेथ व घरातील अन्य सदस्यांचे मूड्स आणि ऋतू यांची घातलेली सांगड प्रत्यक्षात पडद्यावरही तशीच उतरताना पाहून कथा अधिकच वास्तववादीवाटू लागते. या ’सिरीज’चे शूटिंग सुरू होण्याच्या आधी दोन आठवडे बहुतांश क्रूचे सदस्य जमले होते. त्यांनी तालीम तर केलीच, त्याचसोबत घोडेस्वारी, विविध नृत्यप्रकार इत्यादींचेही शिक्षण घेतले. त्यामुळे जवळजवळ शतकभरानंतर पुनरुज्जीवित झालेले नृत्यप्रकारही ते अजूनही रोज नाचत असल्यासारखे सहज आले आहेत. याव्यतिरिक्त प्रमुख घरांमध्ये एलिझाबेथचे माहेर म्हणून विल्टशायरमधील लुकिंग्टन कोर्ट दिसते, तर कॅथरीन-डा-बर्गची आलिशान, रुबाबदार, तरीही काहीशी रुक्ष घराची इमारत म्हणून लिंकनशायरमधील बेल्टन हाउसचा वापर केला गेला आहे. वर म्हटल्याप्रमाणे या ’सिरीज’नंतर याही घरांना पर्यटकांची पायधूळ पुन्हा लागायला लागली.
इतके सगळे लिहिल्यावर दिग्दर्शनाबद्दल वेगळे असे काही लिहायची गरज खरेतर नाही, कारण एकुणातच कलाकृती ही दिग्दर्शकाची असते. पण तरीही सायमनने असे काही विशेष निर्णय घेतले, की त्या निर्णयांमुळे ही ’सिरीज’ अनेक दृष्टींनी वेगळी ठरली. सर्वांत मुख्य म्हणजे ’नरेशन’ उर्फ निवेदन. एखाद्या पुस्तकावर, त्यातही अशा अतिशय गाजलेल्या पुस्तकावर, आधारित ’सिरीज’ बनवताना अनेक गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निवेदनाचा आधार घेतला जातो / घेतला आहे. पण ’नरेशनशिवाय कशा पोचणार?’ असे ज्यांच्याबद्दल एरवी म्हटले जाते, अश्या कित्येक गोष्टी या ’सिरीज’मधल्या वैशिष्ट्यपूर्ण नेपथ्यातून जशाच्या तशा पोचल्या आहेत. त्याचमुळे जेन ऑस्टिनच्या कलाकृतीशी सर्वात प्रामाणिक असलेले रूपांतर असे जिला म्हटले जाते, अशा या ’सिरीज’मध्ये मूळ कथानकात नसणार्या कित्येक बाबी वाढल्या आहेत, तर कित्येकींवर काट मारली गेली आहे. तरीही कथानकाचा जो भावनिक आणि सामाजिक दृश्यगाभा, आहे त्या गाभ्याला मात्र दिग्दर्शकाने सफाईने "अस्पर्श्य" ठेवले आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कथेतील निसर्गाचा सहभाग. प्रत्येक वेळी निसर्गाशी जवळीक साधू पाहणारी लिझी असो, डार्बीशायर असो वा जंगले, बागा, तलाव असोत... या कथेचा एक अविभाज्य भाग म्हणूनच ती समोर येतात. मागे छान छान चित्रे टांगून पुढ्यात होणार्या नाटकांसारखा तो निसर्ग केवळ सुंदर दिसण्यापुरता सीमित राहत नाही. आधी म्हटले, तसे केवळ ऋतूच नव्हेत, तर पाणी, बागा, फुले, गावातील जीवनशैली, मुलींच्या टोपीवरील पानाफुलांची सजावट, विविध प्रकारच्या फुलदाण्या व त्यातील वैविध्यपूर्ण फुलांची सजावट, वाहती नदी, जाता-येता गंमत म्हणून नदीतडोकावून बघणार्या बहिणी इत्यादी गोष्टींमुळे हा निसर्ग घडणार्या कथानकाची तटस्थ पार्श्वभूमी म्हणून न उरता कथानकाचा अविभाज्य भागच बनला आहे. त्यामुळे नुसते कथानकच नाही, तर पात्रांचे स्वभावही उभे राहायला मोठीच मदत झाली आहे.
यावर अजूनही लिहिता येईल, पण महत्त्वाचे सारे लिहून झाले आहे. ब्रिजेट जोन्सपासून (तिच्या डायरीतही तिने या ’सिरीज’ची तारीफ केली आहे!) जगभरातील माझ्यासारख्या अनेक सर्वसामान्य चाहत्यांच्या मनावर या ’सिरीज’ने असामान्य गारूड केले आहे. या 'सिरीज'चा दरारा इतका की, ही ’सिरीज’ आल्यानंतर पुढले दशकभर या कादंबरीवर एकही मोठी ’सिरीज’ वा चित्रपट निघाला नाही. अजूनही, साहित्यकृतीच्या माध्यमांतरांतील एक मैलाचा दगड म्हणूनच या कलाकृतीकडे बघितले जाते.
(समाप्त)
प्राईड अॅण्ड प्रेज्युडिस (१९९५ टिव्ही सिरीज) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
