तमाशा : आपण प्रेमात पडलो आऽऽहोत की ना‌ऽऽऽही?

प्रत्येक कलावंत आपली एकच गोष्ट पुन्हापुन्हा निरनिराळ्या प्रकारे सांगत असतो हे वाक्य आम्हांला ऐकून माहीत आहे. पण त्याचा अर्थ इम्तियाझ अलीने इतका मनावर घेतला असेल असं वाटलं नव्हतं. शिवाय 'पटकथेला उगाच शिस्त लावण्याचे चाळे म्हणजे पाश्चात्त्य खुळं आहेत. तिला मनमुराद आणि मोकळेपणाने वाढू द्यावे' हा त्याचा पवित्रा इतका विकोपाला गेला असेल, अशीही कल्पना नव्हती. परिणामी आमचा अंमळ घात झाला. 

हा लेख लिहिता लिहिताच नेहमीप्रमाणे (हॅहॅहॅ) फेसबुकावर एक वारी घडली आणि त्यात एक कोट - बोले तो, उद्धृत - सामोरं आलं. ते खालीलप्रमाणे : 'अलीसाहेबांचा फॉर्म्युला : मुलगा व मुलगी भेटतात आणि मज्जा मज्जा करतात. मग जुदा होतात. आणि मग विचार करीत बसतात, आपण प्रेमात पडलो आऽऽहोत की ना‌ऽऽऽही? आऽऽहोत की ना‌ऽऽऽही?? आऽऽहोत की ना‌ऽऽऽही???' 

चित्रपटवर्णनाचं इतकं चपखल कोट पाहून हा लेख लिहिण्याचा उत्साह मावळला होता. पण शेवटी दीपिकाच्या आणि रणबीरच्या विविधांगी सुरेख उन्हाळी चित्रीकरणाचं आणि उटपटांग पण सुंदर हिंदी भाषेच्या वापराचं श्रेय देण्याचं, नि निरर्थक रटाळ मूर्ख पटकथेचं अपश्रेय पदरात घालण्याचं, पुण्यकर्म आमच्याखेरीज कोण करील, अशा कर्तव्यनिष्ठ इ. इ. विचारानं.... 

यू गेट दी आयडिया, राइट?

असो. मुद्द्यावर येऊ या - गोष्टीत का-ही-ही नवीन नाही. 

एक हीरो. एक हिरवीण. (अर्थात - रूपसुंदर!) प्रेम होणार. प्रेम 'झालंय' की नाही असला गोंधळही होणार (आय नो, आय नो! हे 'शि-शु'वर्गातल्या काही विशिष्ट गोष्टीशी साधर्म्य सांगणारं क्रियापद आहे. पण नाईलाज. हिंदी सिनेमांनीच शिकवलंय - प्यार 'हो' जाता है. आता 'हो' जाता है, तर हो बाबा). शेवटी प्रेम 'झालंय' असा साक्षात्कार होणार. सिंपल. आहे काय नि नाही काय. सिनेमाची सुरुवात बघूनच त्याचा अंदाज तत्काळ येतो. पण होतं काय, सिनेमाच्या पहिल्या अर्ध्या भागात ही गोष्ट बरीच फ्रेश प्रकारे हाताळलेली असल्यामुळे आपण बेसावध होऊन बसतो. निवांत होऊन खुशालतो. समोरच्या देखण्या दृश्यांमध्ये गुंगतो. 


युरोपातलं कुठलंस उन्हाळी बेट, निळेशार समुद्र, उंचच उंच सुळकेदार डोंगर, कॅलेंडरी सौंदर्याच्या नमुनेदारपणात भन्साळीपटाला मागे टाकतील अशी देखणी दृश्यं. दगडी घडीव पायर्‍यांच्या गल्ल्या. 'रॉकस्टार'च्या 'हव्वा हव्वा'मधून उठून आल्यासारखे दिसणारे नि नाचणारे स्त्रीपुरुष. सोनेरी पोताची सहल उलगडल्यासारखा देखणेपणा. त्यात देखणेपणा डोळ्यात जाऊन डोळे दिपावेत, इतकी लोभस दिसणारी ती हरीणाक्षी कमनीय दीपिका. आणि जिभेवर लीलया भाषा खेळवणारा रणबीर. हिंदी फिल्मी ड्वायलॉकांचा चुरचुरीत वापर. अगदीच नव्या धाटणीचे जिवंत क्लोजप्स.

"असेना का गोष्ट घिसीपिटी? काय फरक पडतो राव?" असं म्हणून आपण रममाण. पूर्वार्धाच्या अलीकडे हीरोहिरविणीत पहिला बेबनाव होतो आणि अगदी समेवर इंटर्वल.

हिरविणीचं इंटर्वलपूर्व वाक्य आहे : "मेस हो गया. पर क्या करे? अब हो गया..." 

हे वाक्य पुढे उत्तरार्धभर आपल्याला आठवत राहणार आहे, छळत राहणार आहे, याची आपल्याला सुतराम कल्पना नसते. आपण मारे पॉपकॉर्न खातो. तिथेच सगळा लोचा होतो.

इंटर्वल खतम, सिनेमा सुरू. भंजाळावस्था म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण हवं असेल, तर काय करावं हे शिकवायचा विडा उचलल्यासारखा सिनेमा सुरू. म्हणजे मान्य आहे, गोंधळ होतो. होतो यार, होतो. पण इथे किती गोंधळ असावेत? आपल्याला आयुष्यात काय करायचंय? नाटक की कथाकथन की आयटीत नोकरी? आपल्याला हिरवीण आवडते की नाही? आपण तिच्या नकारामुळे दुखावले गेलेलो आहोत की नाही? आपल्याला चिडल्याचा अभिनय करायचाय की गोंधळल्याचा? आपल्याला शहाण्यासारखं वागायचंय की वेड्यासारखं? आपण.... असले काहीही वायझेड प्रश्न पाडून घेऊन रणबीरचं क्यारेक्टर भरकटत राहतं. मागे दीपिका फरफटते. मागोमाग हताश होऊन आपण.

सिनेमाच्या अगदी सुरुवातीला कधीतरी दिसलेला गोष्टी सांगणारा म्हातारा पुन्हा एकदा आणतात (पियूष मिश्रा बाय दी वे. त्याच्या त्या जाणत्या मिश्कील बेरकी आवाजातल्या लोकभाषेत नुसत्या गोष्टी सांगून घ्यायच्या की राव सिनेमाभर. तरी ही फरफट टळली असती, अशी चरफड चरफड होते. असो. असो.), तेव्हा शेवट क्षितिजावर दिसायला लागतो आणि आपण सुटकेचा नि:श्वास सोडतो. 

एवढ्याने संपत नाही. तो म्हातारा भडकून हीरोला त्याच्या बेअकलीपणाबद्दल बदडायला निघतो, तेव्हा आपल्या भावना फार निराळ्या नसतात. पण तरी हीरोला शहाणपण येऊन पुरतं कुठे? आधी हीरो - मग हीरोची आजी - मग हीरोचा बाप - मग हिरवीण. असं करत करत, मजल-दरमजल करत एकदाचा सिनेमा संपतो आणि दोघं रेहमानच्या एका भाऽरी गाण्यावर नाचायला लागतात. 

तेव्हा आपल्याला पुन्हा प्रश्न पडतो - ही खतरनाक मस्त (शब्द आणि संगीत दोन्ही अर्थांनी) गाणी, पियूष मिश्राच्या रसाळ भाषेतल्या गोष्टी आणि त्यांना साथ द्यायला स्वस्त रहस्यकथांची आठवण करून देणारी रंगीन दृश्यं - इतक्याच गोष्टींना घेऊन कुणी नवा सिनेमा काढील काय?

तमाशा - चित्रपटाची /नाटकाची माहिती

तमाशा
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: इम्तियाज अली
  • कलाकार: दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, पीयूष मिश्रा
  • चित्रपटाचा वेळ: २ तास १९ मिनिटे / १३९ मिनिटे
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१५
  • निर्माता देश: भारत