राजवाडे अॅण्ड सन्स (२०१५): डोळ्यात बोट-डोक्याला शॉट
सिनेमाचं परीक्षणबिरीक्षण म्हटलं की एका ठरावीक आकाराचा, ठरावीक लांबीच्या मिशा असलेला एक प्राणी असा समोर येतो. ते आत्यंतिक बोअरच. कुंडलकरच्या सिनेमाबद्दल लिहिताना तरी तसले प्राणी आसपास न फिरकलेलेच बरे. तर त्या माणसाळून बोअर झालेल्या प्राण्याला हाकलत हाकलत बोलायचा प्रयत्न. तरी कधीकधी तो जवळपास घुटमळेलच, तर घुटमळो. आपला नाईलाज आहे.
तर - राजवाडे ऍण्ड सन्स.
"सिनेमा आवडला की नाही? एका शब्दात ’हो की नाही’ ते सांगा." असा प्रश्न विचारणारे काही नातेवाईकछाप लोक असतात. तर त्यांच्यासारख्या लोकांसाठी म्हणून माझं उत्तर तयार आहे. नि ते खोटंही नाहीय. पण त्याचे अर्थ लावावे तसे लागत जातील; भंजाळणारे लोक भंजाळून बसतील आणि खिदळणारे मनापासून खिदळतील. तर मला सिनेमा कसा वाटला त्याचं उत्तर आहे - ’डोळ्यात बोट-डोक्याला शॉट’. आता याचं स्पष्टीकरण वगैरे थोऽड्या कमी दिलखेचक गोष्टी पाठोपाठ येणारच. त्यात सिनेमाची गोष्ट वगैरे कळणार. परीक्षणसदृश चर्चेचे थोडे शिंतोडे वगैरे उडणार.
तर होऊन जाऊ द्या.
मराठी मध्यमवर्गीय चाकोरीबद्ध कुटुंबसंस्था हा कुंडलकराचा लाडका विषय आहे. अगदी गे-बी मुलाची गोष्टबिष्ट म्हणून गाजलेल्याबिजलेल्या ’कोबाल्ट ब्लू’मधेही तीच हातपाय पसरून बसलेली होती. ’अय्या’मधेही रीतसर साग्रसंगीत गजरे आणि उदबत्त्यांसकट ती होतीच. तशीच ’गंध’मधे आणि ’हॅप्पी जर्नी’मधेही होती. आता तुम्ही म्हणाल, ’कुटुंब या गोष्टीत नवीन काय आहे? नाडकर्णी प्रकारचे कम्पल्सरी आनंदी वगैरे लोक ’घरोघरी’सारख्या तद्दन म.म.व. गोष्टीत तिचंच उदात्तीकरण करतात, टीव्हीवरच्या एखाद्या लग्नाच्या तेराव्या-चौदाव्या गोष्टीमध्येही तीच देव्हार्यात माजवलेली असते आणि हिटोहिट्ट पंजाबट्ट गोडमिट्ट मराठी सिनेमातही तिच्याच मायेफियेची पारंब्यांसकट झाडं फोफावलेली असतात. मग कुंडलकरचं काय बॉ कौतुक लावलंय?’ तर त्याच्या गोष्टींमध्ये ती बरोबर ’खाली डोकं वर पाय’ अशी बसवून ठेवलेली असते. तिच्या अंगावर रीतसर येवल्याहून आणलेली पैठणी, नाकात आजीपासून चालत आलेली पुरातन-घराणेदार नथ आणि हातात मात्र लेटेष्ट स्मार्टफोन असतो. आणि वर तिनं केलेलं असतं शीर्षासन.
हे बघताना जी काय मेजर करमणूक होते, ती होते!
हे असलंच शीर्षासन ’राजवाडे ऍन्ड सन्स’मधे आहे. पुण्यासारख्या, इतिहासपूर्ण, नाकाखाली जुन्या पेठांची पारंबी लोंबवत आणि आयटीच्या श्रीमंती गृहसंकुलात एक पाय ठेवत जगणार्या, शहरातलं एक यशस्वी श्रीमंत सराफी घराणं. हिटलर धंदेवाईक बाप. बापाला दबकून जगणारी आणि धडामदिशी नव्वदोत्तरी जगात येऊन आदळत-भांबावत जगणारी श्रीमंत-यशस्वी वगैरे पोरं. आणि पोरांची पोरं. गॅजेट्स-बाजारपेठ-इंटरनेट आणि पहाटेचं पुणं हे दोन्ही एकाच अखंड भवतालात उपभोगणारी आणि एकत्र कुटुंब, प्रेम, नाती, वळण, निष्ठा, नथ-पुरणपोळी, नैवेद्याचं पान असल्या सगळ्या ओशट-चिकट गोष्टींनी घुसमटलेली. वाडा पाडायचं ठरलंय. पण घर बदललं असलं तूर्तास, तरी बापाच्या बापाचा होल्ड तसाच पोलादी आहे. कुटुंब. पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय. सगळ्यांनी त्यातच काम करण्याची परंपरा. घराण्याची अब्रू-स्टेटस-इमेज इत्यादी यथासांग. पोरं टोटल कन्फ्यूज्ड. कशी वाट काढायची? कुंडलकर त्यातून अगदीच फिल्मी पद्धतीत मार्ग काढतो. लहानपणी घरातून भांडूनबिंडून, चोरी करून पळून गेलेला एक सुरस काका सोईस्करपणे परत आणतो आणि मग त्याच्या टिपिकल ’थ्रीइडियट’छाप तत्त्वज्ञानानं घरभर बदलाचे मोकळे वारे सुटतात. कुटुंब नामक तुरुंगातल्या फटी पुढे येतात, पोरं मोकळेपणी आणि थोबाड वर करून स्पष्टस्वच्छ बोलतात, स्वतःला हवं ते करतात आणि शेवट गोड होतो.
ऍटिट्यूड बेष्टच आहे. आहेच कुटुंबव्यवस्था हिंस्रपणे जमेल तितका ताबा ताब्यात ठेवणारी. तिच्यात मायेबियेचे धागे गुंतलेले असतात आणि ते तोडताना जाम, कचकचून दुखतं; कितीही प्रॅक्टिकल शहाणपणानं तोडलं तरी नंतर दुखतंच राहतं आणि चक्क नॉस्टाल्जिक वगैरे व्हावं अशा काही आठवणीही तिच्यात गुंतून असतात हेही खरंच आहे. या दोन्हीसह वाट काढताना जे काही विनोदी प्रकरण होतं त्याची गोष्ट सांगण्याचा ’राजवाडे ऍण्ड सन्स’चा प्रयत्न आहे. वेगळा आहे, आता उच्चीकडे चाललेल्या म.म.व. वर्तुळात अत्यावश्यक आहे, मान्य आहे.
पण च्यायला काय सटल्टी वगैरे नामक प्रकरण असतं का नाही? हिटलर वृत्तीचा थंड क्रूर यशस्वी सराफ बाप आणायचा आणि मग त्याच्या तोंडी पुलंची स्तुती घालायची. ’हा बघा हिटलर आणि हे बघा त्याचं पुलंप्रेम. ढॅण!’ फेसबुकवर तो कुठलासा गुप्तहेरछाप गेम असायचा ना मध्यंतरी, त्यात एक क्राइम सीन असायचा आणि मग क्लू मागितला की त्यात विवक्षित ठिकाणी उघडमीट करणारे-बटबटीत लाल बाण दाखवले जायचे, की बॉ, ’इथे बघा, इथे आहे दडलेलं खुनाचं हत्यार! ढॅण!’ तसा लाल बाण दाखवल्याचा भास व्हावा, इतक्या कमी - म्हणजे शून्य, खरंतर निगेटिव - साटल्यानं हे कुटुंबसंस्था-उपरोधबाण प्रकरण सिनेमाभर चालतं. ’कसा कळत नाही तुम्हांला उपरोध, ऑं, कसा कळत नाही? हा घ्या - हा घ्या! ढॅण!’ असं डोळ्यात बोट घालत घालत. शुभंकर काकाची मैत्रीण कम सेक्रेटरीण त्याला भेटायला येते तेव्हा त्याच्या भिंतीवर लटकलेला मारुतीराया दाखवणं काय, किंवा तीन मजल्यांवरच्या तीन आलिशान बाल्कन्यांमधून एकमेकांशी करुण संवाद ओरडणारे कुटुंबीय दाखवणं काय... याला उद्देशून ’डोळ्यात बोट’ इतकंच मनाशी येणं शक्य आहे, कितीही पटणेबल आशय असला तरीही. त्यात आणि रंग. ठीक आहे, निरोगी, शरीरकेंद्री, उपभोगप्रधान, तंत्रज्ञानशरण लाइफस्टाइलबद्दल आपल्याला प्रेम आहे. कुटुंबसंस्थेला लागूनच येणार्या ’धट्टीकट्टी गरिबी-लुळीपांगळी श्रीमंती-साधी राहणी-उच्च विचारसरणी’छाप करुण तत्त्वज्ञानाला आपण फाट्यावर मारतो. पण हे दाखवताना किती ब्रॅण्ड्सची लालेलाल करावी, अं? निर्लेपपासून ते फॅब इंडियापर्यंत अनेक ब्रॅण्ड्स आणि पाठोपाठ ’तुम्हांला रंग आवडत नाहीत? तुम्हांला आयुष्य म्हणजे काय ते कळलेलंच नाही!’ अशा आवेशात उधळले जाणारे भरमसाठ ब्राइट रंग. शेवटी शेवटी तर ’यात काय सौंदर्य आहे अहो? मला आता इतके ढळढळीत रंग डोळ्यात शिरशिरून ढवळायला लागलंय. जरा कॉण्ट्रास्ट कमी करता का प्लीज?’ असं खच्चून ओरडावंसं वाटायला लागलं होतं. वर ती एकमेकांच्या पाठीमागे स्लोमोशनमध्ये पळून, एकमेकांना रोमॅंटिकली पकडणारी आणि त्यातूनच मुक्त प्रेम उधळणारी लोकं. ’वेगळं करियर’ म्हणजे ’मॉडेलिंग’ नाहीतर ’हॅकिंग’ आणि बंडखोरीची परिसीमा म्हणजे मॉडेलिंग करायला घराबाहेर पडणं. स्टिरिओटाइप्सना शिव्या घालणारी गोष्ट स्टिरिओटाइप्समधे अडकावी, म्हणजे कसलं करुण वाटतं सालं! असो.
तर असं सगळं आहे. आणि तरीपण ’राजवाडे ऍण्ड सन्स’ महत्त्वाचाच आहे. कारण ’व्यवसाय वाढवायला मनुष्यबळ हवं म्हणून यांनी माझ्याकरवी मुलं जन्माला घालून घेतली’ असा भेदक संवाद त्यात भेटतो, दोन विचारसरणींच्या मधे कुतरओढ झालेल्या पिढीचं प्रामाणिक-उदासवाणं-खरं चित्र नेमक्याच फटकार्यांसह रेखाटणारी गोष्ट दिसते, खणखणीत बंद्या रुपयासारखं चोख काम करणारे कलाकार भेटतात आणि सगळ्या दोषांसकट राजवाडे डोक्याला अमुक इतका शॉट लावून जातात, म्हणून.
डोळ्यात बोट घालतात कुंडलकर, पण ठीकाय. आपल्याला तरी तो बोअर कंटाळवाणा मिशाळ प्राणी पुरता हाकलणं कुठे जमलंय मगापासून?
राजवाडे अॅण्ड सन्स (२०१५) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
