ऑस्कर नॉमिनेशन्स २०१५:द थिअरी ऑफ एव्हरीथिंग - हॉकिंगची मानवी बाजु दाखवणारा चित्रपट

स्टीफन हॉकिंगच्या जीवनावर बायोपिक येणार हे जेव्हा पहिल्यांदा कळले तेव्हा खरे तर पोटात थोडी भीती निर्माण झाली.  एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा चरित्रपट कसा असू नये  याची अनेक उदाहरणे अलीकडच्या काळात सापडतात. मराठीतला ’बालगंधर्व’, हिंदीतला ’भाग मिल्खा भाग’ आणि इंग्रजीतला स्टीव्ह जॉब्सच्या जीवनावरचा ’जॉब्स’ ही पटकन आठवणारी तीन वेगवेगळ्या भाषांतली, वेगवेगळ्या लेव्हलची उदाहरणे. थिअरीच्या ट्रेलरमुळे उत्सुकता अधिकच ताणली गेलेली. या शुक्रवारी कोणता चित्रपट पाह्यचा या चर्चेत जेव्हा एका मित्राने “स्टीफन हॉकिंग म्हणजे तो बिग बँग थिअरी सिरिअलमध्ये व्हिलचेअरवर असतो, तो ना ?” असे विचारून माझी विकेटच घेतली.

स्टीफन हॉकिंगबद्दल बरेच काही ऐकले-वाचले होते. ’अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम’चा लेखक,  त्याला असलेला ’एएलएस’ - म्हणजे ’अमायलो ट्रॉपिक लॅटरल स्क्लेरॉस्ड’ - ज्यामुळे त्याची दोन बोटेच हालचाल करू शकतात, त्याची खास व्हिलचेअर, अशा अनेक गोष्टी आधीच माहीत होत्या. पण या चित्रपटाने त्याची एका वेगळीच बाजू आपल्यासमोर मांडली आहे. स्टीफन हॉकिंग हा जगप्रसिद्ध, जबरदस्त इच्छाशक्ती असलेल्या एका वैज्ञानिक, इतकीच ओळख निर्माण न करता एक जबरदस्त इच्छाशक्ती असणारा माणूस अशीही त्याची ओळख करून दिली आहे. त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात येणार्‍या बर्‍याची आणि वाइटाचीही गोष्ट, म्हणजेच हा चित्रपट.

चित्रपटाची सुरुवात होते केंब्रिज युनिवर्सिटीमध्ये स्टीफन हॉकिंग पीएचडी करत असताना. एका पार्टीमध्ये साहित्यावर पीएचडी करणार्‍या जेनशी त्याची भेट होते. दोघांची ओळख वाढत जाते आणि तिचे रूपांतर प्रेमामध्ये होते. आपल्या प्राध्यापकांसोबत ब्लॅक होलवरील व्याख्यानाला गेला असताना आपल्याला चालता येत नसल्याची जाणीव स्टीफनला पहिल्यांदा होते. पण स्टीफन ब्लॅक होलवरील आपले संशोधन पुढे चालू ठेवतो आणि दरम्यान हळूहळू त्याची स्नायूंवरील पकड कमी होऊ लागते. डॉक्टर याचे निदान ’एअलएस’ असे करतात आणि फक्त दोन वर्षांचे आयुष्य बाकी असल्याचे भाकीत करतात. यापुढचा स्टीफनचा जीवनप्रवास या चित्रपटातच पाहावा.

मुळात या चित्रपटाचा स्ट्रॉंग पॉईण्ट आहे तो एडी रेडमिन् आणि फेलिसिटी जोन्स यांचा अभिनय. स्टीफन हॉकिंगचे चित्र एडी हुबेहूब वठवतो. छोट्या छोट्या प्रसंगातून त्याने हॉकिंग मस्त उभा केला आहे. या चित्रपटातले काही सीन हे खूप छान जमून आलेले आहेत. असाच एक प्रसंग म्हणजे अमेरिकेत भाषणासाठी स्टीफन स्टेजसमोर व्हीलचेअरवर बसलेले असतात तो. समोरच्या रांगेतल्या एका मुलीच्या हातातले पेन खाली पडते, तेव्हा स्टीफनच्या मनात काय चालले असेल, ते त्यांच्या चेहर्‍यावरचे हावभाग अगदी सहज सांगून जातात.  अशाच एका प्रसंगात स्टीफन जेव्हा डॉक्टरांकडे जातो, तेव्हा डॉक्टर त्याला सांगतात, "तुझे स्नायू एक-एक करून निकामी होत जातील." तेव्हा “व्हॉट अबाउट माय ब्रेन?” या त्याच्या प्रश्नावर डॉक्टरांचे उत्तर असते, "मेंदूला काहीही होणार नाही". या उत्तरावरत्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक जाणवते.

दि्ग्दर्शक जेम्स मार्शने अतितांत्रिकक आणि किचकट वैज्ञानिक संज्ञांचा वापर टाळला आहे. कदाचित यामुळे चित्रपट हा सर्वसामान्य प्रेक्षकांनासुद्धा आवडून जाईल. हा चित्रपट स्टीफन हॉकिंग ह्या असामान्य माणसाने दिलेल्या एका लढ्याचे चित्रण आहे, तशीच ही त्यांच्या प्रवासात त्यांना साथ देणार्‍या पत्नीचीही कथा आहे. अर्थात थोड्याफार प्रमाणात हा प्रवास ओव्हर सिंप्लिफाय करून दाखवला आहे. त्यामुळे कदाचित आयुष्यात येणार्‍या अनेक अडचणीच्या प्रसंगास स्टीफन खूप शांतपणे सामोरे जातात असे वाटू शकते. पण प्रत्यक्ष आयुष्यात हे असेच घडले असेल असे नाही. शेवटी हा चित्रपट आहे आणि एवढी सिनेमॅटिक लिबर्टी घेण्याचा अधिकार दिग्दर्शकास नक्कीच आहे.  एकूणच स्टीफन हॉकिंग म्हणजे फक्त ’बिग बॅंग थिअरी’मधला व्हीलचेअरमधला वैज्ञानिक ही प्रतिमा मोडून प्रतिकूल परिस्थितीशी लढून झुंज देणारा एक मनुष्य, एक वैज्ञानिक  म्हणून ओळख उभी करण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे.

या चित्रपटासाठी  एडी रेडमिन् यास सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवला आहे आणि ऑस्कर पुरस्कारासाठी पाच नामांकने मिळाली आहेत.  

द थिअरी ऑफ एव्हरीथिंग - चित्रपटाची /नाटकाची माहिती

द थिअरी ऑफ एव्हरीथिंग
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: जेम्स मार्श
  • कलाकार: एडी रेडमिन्, फेलिसिटी जोन्स, चार्ली कॉक्स, एमिली वॅटसन
  • चित्रपटाचा वेळ: १२३ मिनिटे
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१४
  • निर्माता देश: भारत