कट्यार: आयपीएलची एक गेम!
‘रॅटाटुई’ या डिस्नेपटात शेवटी एक सीन आहे. त्या खडूस फूड क्रिटिकच्या तोंडात याच नावाच्या पदार्थाचा पहिला घास जातो, आणि एका क्षणात त्याला त्याचे लहानपण, त्या वेळेस खाल्लेला तो पदार्थ व त्या वेळच्या सगळ्या आठवणी येतात. त्यानंतर इतका वेळ खत्रूडपणे वागणारा तो एकदम खूश होउन बोलू लागतो. ’कट्यार’मध्ये पहिल्या पाच मिनिटांत सुरू होणार्या 'सूर निरागस हो...'ने आपले हेच होते. डोक्यात कोठेतरी लहानपणापासून ऐकलेले नाट्यसंगीत, त्या ठरावीक वाद्यांचे ते ठरावीक स्वर... हे कानावर पडते आणि चित्रपट आपल्याला अशा ठिकाणी घेउन जातो की तेथून आपण समोर दिसणारे प्रसंग आपोआप आपुलकीने, आवडीने पाहू लागतो.
वास्तविक "काय ते वसंतरावांच्या वेळचे रात्र रात्र चालणारे ’कट्यार’चे प्रयोग...!" या कॅटेगरीत मी अजिबात येत नाही. सवाई गंधर्व महोत्सव वगैरेही फक्त त्याबद्दल वाचण्यापुरते व मित्रमंडळींच्या त्याबद्दलच्या कथा ऐकण्यापुरतेच आहेत. कारण शास्त्रीय संगीत व त्यावर बेतलेले नाट्यसंगीत हे तासनतास ऐकण्याएवढा पेशन्स नाही, तेवढी आवड निर्माणही झाली नाही. मात्र घरी वा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मागे चालू असेल, तर ते ऐकायला छान वाटते. या 'ढ'पणात बहुधा माझ्यासारखेच असंख्य आहेत. असे रसिक आळवून आळवून म्हटलेली गाणी असलेल्या व तासनतास चालणार्या मैफिलींना शक्यतो आवर्जून जाणार नाहीत; पण त्या गाण्यांच्या चालींमधे, स्वरांमधे जे आवडण्यासारखे आहे ते फास्ट फूडसारखे ३-४ मिनिटांत 'बसवून' दिले, तर ते त्यांना नक्कीच आवडेल.
’कट्यार’ने हेच केले आहे. मूळची गाणी ’डंब डाऊन’ करून कोणालाही आवडतील अशी बनवली आहेत. 'तेजोनिधी लोहगोल'चे तर एकच कडवे सुरुवातीला ठेवले आहे. 'सूर निरागस हो...' लोकांना आवडणारे वातावरण सुरुवातीला निर्माण करते, पण त्याचे नाट्यसंगीत होण्याआधी लगेच 'मोरया मोरया' हे सोप्या चालीत समोर येते. पुन्हा थोड्या वेळात सचिनने प्रचंड ऊर्जेने सादर केलेले 'दिल की तपिश...', ज्याचे सादरीकरणही गाण्याइतकेच उत्तम आहे.
दिग्दर्शकाने तोपर्यंत माझ्यासारख्या पब्लिकला खिशात टाकलेले असते.
अनेक वर्षांत मराठी चित्रपटाबद्दल न पाहिलेली एक 'फ्रेन्झी' ’कट्यार’बद्दल गेले काही आठवडे दिसून येत आहे. “तो पाहा” असे लोक एकमेकांना सांगत आहेत, तो पाहून आलेले लोक “तो पाहिला” हेही आवर्जून सांगत आहेत. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट फारसे न पाहणारी जुनी पिढीसुद्धा सध्या घोळक्यांनी जाऊन थिएटरमध्ये ’कट्यार’ बघत आहे. अमेरिकेतसुद्धा जवळजवळ प्रत्येक मोठ्या शहरात याचे शोज होऊन गेले आहेत व बहुतेक हाउसफुल्लही झाले आहेत. तेथेही दर वीकेण्डला कोणाच्यातरी फेसबुक वॉलवर या पिक्चरला गेल्याची माहिती, थोडेफार परीक्षण व एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला गेल्यासारखे तेथील फोटो हेही दिसत आहे.
हा चित्रपट रिलीज व्हायच्या अनेक दिवस आधीपासून ’झी’ने याची जाहिरात दाखवणे सुरू केले होते. त्यातील देखणेपणा पाहूनच याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. पण निर्मात्यांची सर्वात मोठी डेअरिंग म्हणजे भर दिवाळीत सिनेमा रिलीज करणे. कारण दिवाळी वगैरे सण हिन्दीतील ’बिग बॅनर’च्या रिलीजसाठी असतात. तेव्हा चित्रपटगृहेही मिळणे अवघड असते, व प्रेक्षकवर्गही. पण यांनी या चित्रपटाच्या फॅन बेसवर भरवसा ठेवला आणि लोकांनीही तो सार्थ केला. असे ऐकले की दुसर्या आठवड्यात अनेक ठिकाणी याचे शोज वाढवण्यात आले.
सर्वांनाच हा चित्रपट आवडला असे नाही. मूळ नाटक पाहिलेल्यांना, किंवा या संगीताची आवड आणि माहिती असलेल्यांना हे सुलभीकरण आवडले नाही. मूळ नाटकात असलेले नाट्यही यात कमी झाले आहे असेही अनेकांना वाटते - आणि तेही बहुधा खरे आहे. इतर काही जण, विशेषतः नंतर पाहणारे लोक, त्यांच्या अपेक्षा अतिशय उंचावल्या गेल्याने मग सिनेमा पाहिल्यावर तो 'इतका भारी वाटला नाही' असेही झाले आहे. पण न आवडणार्यांपेक्षा आवडणारे अनेक पटींनी जास्त आहेत, आणि हे दोन्ही गट हा चित्रपट तुडुंब गाजवत आहेत.
मुळात मला चित्रपट कसा वाटला?
मी नाटक पाहिलेले नाही. कथा इंटरेस्टिंग आहे. ती पाहताना काही प्रश्न उभे राहतात. पण ते आदर्शवादी प्रसंग, संवाद वगैरे अशा जुन्या कथांमधे नेहमीच असत, आणि आपण जुनी कथा पाहत आहोत हे माहीत असल्याने आपणही ते चालवून घेतो. कलाकाराचा अहंकार वगैरे नाटकात जास्त चांगले दाखवले आहे व तितके इथे दिसत नाही असे वाचलेले आहे. स्वतंत्रपणे पाहतानाही जाणवले की हे जरा वरवर दाखवले जात आहे. पण हे विचार डोक्यात येइपर्यंत एखादे सुंदर गाणे, एखादा चांगला प्रसंग यात आपण रमून जातो. ते सादरही सुंदर केलेले आहे. नेपथ्य, कॉस्च्युम्स वगैरेमध्ये कोठेही काटकसर केलेली नाही. समोर दिसते ते एकदम देखणे आहे.
बाकी त्या कट्यारीचे स्वगत काही खास वाटले नाही. एक मिनीटभर तर हा ’लॉर्ड ऑफ द कट्यारः फेलोशिप ऑफ द कट्यार’ तर होणार नाही ना अशीही शंका आली. पण त्यानंतर दिसणारी ती रेखाचित्रे सुंदर आहेत. गावाचा तो नदीच्या पात्राचा शॉट छान दिसतो, पण नदीपलीकडचे गाव त्यात धूसर दिसते. खिद्रापूरच्या मंदिरातील गाणे - 'भोला भंडारी' श्रवणीय आहेच, पण खिद्रापूरच्या देवळाचे सौंदर्य व तेथील आजूबाजूचा निसर्ग यांचा वापर करून त्याचे चित्रीकरण आणखी खुलवता आले असते असे वाटले.
कलाकारांमधे सचिनची निवड खूप आवडली. गेली काही वर्षे त्याच्या 'महागुरू'पणा बद्दल बरेच टीकात्मक ऐकले आहे. मात्र एक अभिनेता म्हणून तो नेहमीच चांगला होता - म्हणजे जे काही रोल्स त्याच्या वाट्याला आले, ते पाहताना तो कधी कमी पडलाय असे वाटले नाही. त्यामुळे तो येथे लोकांना सरप्राइज देणार याची खात्रीच होती. त्याचे गातानाचे हावभाव वगैरे अस्सल वाटत नाहीत असे अनेकांकडून ऐकले, ते खरेही असेल. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेला ते जाणवत नाही. त्याचे उर्दू बोलणेही इतर लोकांच्या भाषेशी, प्रसंगांशी विसंगत वाटले तरी दिग्दर्शकाने त्याच्या आग्रा घराण्याचा संदर्भ देऊन त्याचे स्पष्टीकरण अप्रत्यक्षपणे दिलेले आहे. मला सर्वांत आवडले ते पहिल्यांदा त्याने दरबारात सादर केलेले गाणे. त्या गाण्याचा वेग व सचिनचे सादरीकरण हे दोन्ही एकमेकांना चपखल बसले आहे.
पहिल्या प्रयत्नाच्या मानाने त्याच्यासाठी लिहिलेल्या भूमिकेत शंकर महादेवन कमी पडलेला नाही. मात्र त्याची व्यक्तिरेखा कमालीची एकसुरी आहे. कदाचित त्याला सहज करता यावी, म्हणून ती तशी लिहिली असेल. पण त्याच्या तुलनेत आलोक नाथसुद्धा गुलशन ग्रोव्हर वाटेल, इतका तो संस्कारी दाखवला आहे. मृण्मयी देशपांडे व अमृता खानविलकर दोघींची कामे छान. तसा त्यांना वाव कमी आहे, पण आहेत त्या दोनतीन प्रसंगांमध्ये त्या उठून दिसल्या आहेत - विशेषतः अमृता खानविलकर. पुष्कर श्रोत्रीचे एक स्वगत - त्यातील तपकिरीचा उल्लेख सोडला तर - चांगले आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवरून ते लोकांना आवडले हे दिसते. भावनिक मजकूर असलेल्या पोस्ट्स रोज सोशल नेटवर्कवरून आदळत असल्यामुळे अनेकांचा अशा पद्धतीच्या वाक्यांबद्दल ("विद्या व कला! विद्या ही...., तर कला ही.....!!!") एक सिनीकल व्ह्यू असतो. माझाही आहे. पण येथे ते जमून गेले आहे. तसेच त्याचा एक सुरुवातीचा सीन आहे, तोही चांगला आहे. स्वतः दिग्दर्शक असूनही सुबोध भावेने आपल्याकडे भावखाऊ रोल घेतलेला नाही याबद्दल त्याला दाद द्यायला हवी. त्याचे काम नेहमीसारखेच सहज आहे.
काही लगेच गाजणारी, तर काही ऐकून हळूहळू आवडू लागणारी गाणी एकत्र असणे हा कोणत्याही कलाकृतीसाठी किलर फॉर्म्युला आहे. यात काही गाणी मूळ नाटकातली, तर काही नव्याने तयार केलेली आहेत; आणि जवळजवळ सगळीच सहज आवडण्यासारखी आहेत. ’तेजोनिधी लोहगोल’, ’घेई छंद मकरंद’ वगैरे तर लोकांना माहीत आहेतच; पण ’दिल की तपिश’ वगैरे नवीसुद्धा सुंदर आहेत. ’मनमंदिरा’ हे गाणे 'ग्रोज ऑन यू'चे उत्तम उदाहरण. मात्र गाण्यांचे चित्रीकरण पाहताना संगीताचे काही तुकडे, काही नृत्यप्रकार / स्टेप्स जरा उपरे वाटतात. पण यात इतिहासाचा संदर्भ नाही व कोणत्या काळातील वातावरणाचे अचूक चित्रीकरण हाही प्रमुख हेतू नाही, त्यामुळे त्यात काही चुकीचे नाही. समोर दिसणारे विविध सेट्स, अशा वातावरणाला आवश्यक असलेले कपड्यांचे व नेपथ्यातल्या गोष्टींचे झगमगीत रंग या चित्रपटातून त्या जुन्या काळाच्या वैभवाच्या आठवणी रोमॅण्टिसाईज करतात. त्यात वापरलेल्या केशरी, लाल, निळ्या, हिरव्या रंगांच्या लख्ख शेड्स एकदम उठून दिसतात.
खिद्रापूरला पंडितजी दर वर्षी येतात हे जर उमेला माहीत होते, तर सदाशिव येण्याआधी इतकी वर्षे कोणी त्यांना भेटायचा प्रयत्न का केला नाही? दरबारात जिंकलेल्याला मोठी हवेली, पण हरलेल्या व तरीही तुल्यबळ असलेल्या गायकाला एकदम हलाखीत का राहावे लागते? खान साहेबांचा राग जिंकल्यावर कमी होण्याऐवजी आणखी का वाढतो? असे अनेक प्रश्न चित्रपट पाहताना किंवा लगेच नंतर आपल्याला पडतात. तसेच ते एक ’अमुक अमुक की जय हो!’, ’अमुक अमुकचा विजय असो’ या कमालीच्या कृत्रिम वाटणार्या घोषणा सीन्समधे उपस्थित असलेल्या लोकांना मराठी दिग्दर्शक का द्यायला लावतात ते कळत नाही. वासुदेव बळवंत फडके, टिळक व इथे पंडितजी - सर्वांकरता ते सीन्स वापरले आहेत. मी सेन्सॉरमध्ये गेलो, तर ते पहिले बंद करेन.
पण हे सगळे एकत्र केले, तर काही उणिवा धरूनसुद्धा एक जबरदस्त देखणा, प्रेक्षणीय, श्रवणीय चित्रपट तयार झाला आहे. शेवटाच्या थोडा आधीचा भाग सोडला, तर बघताना कंटाळा येत नाही. आणि मुख्य म्हणजे व्यावसायिक यशाकरता अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट त्यात आहे. ते म्हणजे, समोर जे चालले आहे ते कोणालाही सहज समजेल असे आहे. समोर जे चालले आहे ते इतर कशाचेतरी प्रतीक आहे, तो सामाजिक संदर्भ माहीत करून घेतलात तरच समोरचा क्लिष्ट प्रसंग झेपेल... असला काही प्रकार यात नाही. एका अर्थाने मूळ नाटक जर कसोटी सामना असेल, तर ही आयपीएलची एक गेम आहे. गायकांच्या सामन्यामधे नक्की कोण सरस ठरला हे अस्सल प्रकारे दाखवणे हे अत्यंत अवघड काम असणार हे जाणवते. ते येथे सोपे करून दाखवलेले आहे. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य रसिकांना इतपत केलेले सुलभीकरणच आकर्षित करते. कदाचित त्यामुळेच ’कट्यार’ जोरदार चालत आहे.
कट्यार काळजात घुसली - चित्रपटाची /नाटकाची माहिती
