बाजीराव मस्तानी (२०१५): ठरकी बाजीराव नि वसूल मस्तानी!
"अरे! काय सांगू राव तो सीन... हा अस्सा अतिशय देखणा आरसेमहाल तुमच्या समोर आहे आणि संपूर्ण दरबार मनोरंजनासाठी तयार आहे. च्यामारी, त्या शन्वार वाड्यातला तो महाल ऐकला होता. पण लय भारी सेट उभारलाय. त्यात आरसेमहालामुळे एकूणच फ्रेममध्ये 'इस्टमन' छटा व्यापून उरली आहे. पेशवे अतिशय रुबाबदार हिरवागार शेला पांघरून सिंहासनावर आरूढ आहेत आणि समोर मस्तानी अवतरते. मायला! आमचा ‘आ’ वासलेला! तिचा शांत आणि हसरा चेहरा बाजीरावावर रोखलेला आहे. चकाकती गर्द सोनेरी चुनरी आणि हलक्या हिरवट अशा निव्वळ देखण्या पोशाखात ती समोर आलीय. अतिशय उंची लेसचं कापड, त्यावर नाजूक कलाकुसर, डोक्यावर अतिशय नेटकी बांधलेली बुंदेली पगडी, त्यावर जडलेली रत्नं आणि हातात चक्क मेंडलीन - या तिच्या अस्मानी सुंदरतेकडे बाजीराव आणि सभाच काय, अख्खं थिएटरच, मंत्रमुग्ध की काय म्हणतात ते होऊन बघतंय. च्यामारी, तो बाजीराव काय माणूसच ए ना! असं कोणी, इतकं सुंदर... समोर येऊन म्हणू लागलं, की, "अरे, ये ये, माझं गाणं ऐक, मला बघ, मला भोग. तुझ्यासाठी कायपन!" तर काय, समोरची व्यक्ती पेशवा असली तरी काय झालं? क्लीन बोल्ड होणारच ना! त्या गाण्यातही एकेका फ्रेमचा किती विचार केलेलाय! सगळीच रंगसंगती परस्परपूरक, नि तरीही त्या त्या व्यक्तींचं महत्त्व दाखवून देणारी. त्यानंतरच्या ‘दिवानी मस्तानी’ या गाण्यात आख्खं थिएटर बुडून जातं, नुसतं गाणं ऐकण्यातच नव्हे, तर ते 'बघण्यात'ही! "बघा बघा ही आली मस्तानी. नाचवा तिला कथ्थक! नैतर द्या तिला आच्रट कठीण स्टेप्स - नि बघा ती कित्ती कित्ती छान नाचायची!" असला पोरकट अट्टहास नसलेलं या चित्रपटातलं आणखी एक गाणं. आरशांच्या ट्रिकमुळे थेट ‘मुगल-ए-आजम’ची आठवण यावी असा हा प्रसंग. म्हटलं तर सारखा, म्हटलं तर बराच वेगळा. साल्या, दीपिका त्यात जी दिसलीय, त्यावर बाजीराव फिदा झाला नसता, तर मला तो मेलेला, षंढ किंवा गे वाटला असता!"
"बास बास! मी आहे हं इथे! माझं नाही केलंस ते इतकं कौतुक कधी!"
"हॅ! तू काय लग्नाची बायको आहेस! ;) मी काशीबाईबद्दल नाही बोलत ए, मस्तानीबद्दल बोलतोय!"
"हा हा हा! तू काही बोलू नकोस गं. तुझा नवरा मस्तानीमागे पुरता गेलेला बाजीराव झालाय!"
"माहितीय मला. कालपासून मला तो काशीबाई म्हणतोय. हे बघ, तुला काय मस्तानी शोधायचीय ती बिनधास्त शोध, घरी घेऊन ये आली तर. मात्र तुझा रोजचा डबा, स्वयंपाक, मुलं जन्माला घालून पोसणं नि त्यांना सांभाळणं हेही तिलाच करायला सांग. नुसती झोपायला ती नि रांधायला मी नाही हं चालणार! तिलाच भोग नि तिलाच कामं करायला लाव. मी नुसता माझा आणि तो नाही पुरला तर तुझाही पगार उडवीन!"
"काय रे बाजीराव! आता का गप्प?"
"गप्प नाही रे! ही असं बोलू लागली की मला हिच्यातच मस्तानी दिसू लागते. ते काही असो यार, पण काय एण्ट्री आहे यार तिची! त्यात ती जेव्हा बाजीरावासोबत युद्ध करते, त्या वेळी कातिल दिसतेच; पण त्यानंतर एका खोलीत एकटीच बसलेली असते - फुल्ल विस्कटलेली - त्या वेळी तर घायाळच करून टाकते. आतमध्ये काहीतरी सैलसर घातलेलं नि बाहेर लेसचा, लखनवी हॅण्ड-एम्बॉयडरी केलेला अतिशय तलम पुलओव्हर, सभोवती प्रसन्न खोली, दासींना बाहेर कटवून फुल्ल माहौल तयार केलेला आणि मग बाजीरावासोबत माफक रोम्यान्स. साला भन्साळीला कळतं नक्की कशा नि कोणत्या कोनातून असा रोम्यान्स चित्रित करावा. नंतरच्या बुंदेलखंड राजाच्या राजवाड्याला ब्याकग्राउंडला ठेवून केलेला उद्यानातील डान्सही सुंदर!"
"हो पण बाजीराव? कसा होता तो! ई ई ई..."
"हो, अगं तुझ्यासाठी मला वाईटच वाटलं! आम्हांला दीपिकाची आयकँडी, त्यात प्रियांकाचा डबलस्कूप आणि तुला रणवीरने उभा केलेला ठरकी बाजीराव! अरारारा!"
"हो ना रे! अर्थात मिलिंद सोमण असल्याने त्या रणवीरकडे फार बघावं लागलं नाही. पण शी! रणवीरने काय घाण केलीय... बाजीराव असा टपोरी भाषा बोलणारा, बालीश हावभाव करणारा आणि एक खांदा वाकडा करून चालणारा असेल तर -आणि तरच!- त्याचा अभिनय थोर म्हणावा लागेल. अनेक प्रसंगात छाती दिसेल अशा बेताने सतत एक बटण उघडं, नाहीतर एखाद्या फटीतून त्याची ती कमावलेली छाती बाहेर पडायला तट्ट होऊन वाट पाहत असायची. 'बघा बघा माझं शरीर! आहे की नै सेक्सी! आहे की नाही सेक्सी?' असा आविर्भाव, देहबोली सतत! त्याचा कंटाळा आला. अरे पोरकट मुला, तू बाजीराव (झाला) आहेस, राजघराण्यातला आहेस. काही अदब, काही घरंदाजपणा दाखवशील का नाही? फक्त गळ्यात हिरवा-लाल रुमाल घालून 'ए क्या बोलती तू' करणं बाकी होती. तरी ‘वाट लावली’ वगैरे म्हणून शिपायांबरोबर नाचून झालंच! बाजीरावाकडे माणसांची इतकी चणचण असेल, की मस्तानीची डिलीवरी त्याला स्वतःच्या हाताने करावी लागावी? हे काही पटत नाही!"
"अगं हो हो! कळू शकतं तुझं दु:ख! तुझा नवरा एकीकडे लाळ गाळत दीपिका-प्रियांकाचं वर्णन करतोय आणि वर तुझ्या त्या जखमेवर रणवीर मीठ चोळतोय! माझीही झाली असती चिडचिड!"
"नाहीतर काय अरे! तरी बरं, मिलिंद सोमण होता. अजिबात देहप्रदर्शन न करता त्याचा घरंदाज वावर, शांत चेहरा, योग्य पट्टीतली आणि वेगातली संवादफेक, नेमकी वेशभूषा या सगळ्यांसहित तो अधिकच राजबिंडा वाटत होता. या रणवीरच्या बालीश अभिनयाचे चाळे अजून काही वेळ सहन केल्यावर तर मस्तानी आणि काशीबाई दोघीही त्या मिलिंदबरोबर पळून जाऊ देत अशी प्रार्थनाच मी करायला लागले! त्या दोघी तरी सुखात राहतील, मग इतिहासबितिहास जाऊ दे बोंबलत कुठे जायचा तो!"
"अगं हो हो हो! तशीही इतिहासाची वाटच लावलीय म्हणे..."
"हो, ती लावलीच आहे. पण ते सिनेमाला जायच्या आधीच माहिती होतं. पायाने किंचित अधू असलेली काशीबाई नाचणार आहे, काशीबाई नि मस्तानी लो वेस्ट नऊवार्या घालून दिसणार आहेत,वगैरे गोष्टी मिडियात आधीच चवीने नाही का चावून चोथा झाल्या? त्यात मी काही इतिहासाची भक्त नाही नि इतिहास म्हणजे माझं दैवत नाही. त्यातही गल्लाभरू मेनस्ट्रिम सिनेमा हे काही माझं इतिहास शिकायचं साधन नाही. त्यामुळे मला त्याने काही घंटा फरक पडत नाही. मला जर इतिहास माहीत करून घ्यावासा वाटलाच, तर मी हा सिनेमा नक्कीच पाहणार नाही. तितकं डोकं मला आहे. ज्यांना नाही, त्यांच्याबद्दल मला कणव आहे. जसं ‘राऊ’, ‘मृत्युंजय’ किंवा ‘छावा’ वाचून हाच इतिहास अशी समजूत मी करून घेतली नाही, तशीच या सिनेमामुळेही नाही. तेवढी सुज्ञ मी आहे आणि त्यामुळे मला या सिनेमात किती सुयोग्य इतिहास दाखवलाय याच्याशी फारसं देणंघेणं नाही. पण मला काळ कसा दाखवलाय याच्यात मात्र भयंकर इंट्रेस्ट होती. अर्थात हा 'पिरीएड ड्रामा' आहे. यात ‘ड्रामा’इतकंच महत्त्व तो काळ कसा उभा केलाय यालाही आहे."
"हो! हिचं पहिल्याच सीनपासून सुरू झालेलं. अरे, बॅकग्राउंडला आणि सगळीकडे अख्खा सिनेमाभर आधुनिक देवनागरी! खलिते, भित्तिचित्रं... सगळीकडे तीच! जे काही जुजबी ज्ञान आहे मला, त्याप्रमाणे त्या वेळी मोडी वापरायचे लोक. बाकी काही नाही, तरी 'ल', 'ख' वगैरे अक्षरं तरी जुन्या वळणाची दाखवायची. पण त्याबाबतीत आनंदच होता. एका प्रसंगात तर बाजीरावाच्या मागे नकाशा आणि त्याच्या खाली ‘अखंड भारत’ लिहिलेलं! मला वाटलं आता भारतमातेचंही चित्र आणि सावरकरांच्या तसबिरीलाही बाजीराव प्रणाम करताना दाखवतात की काय! मात्र काही बाबतीत काळ छान उभा केला आह. विशेषतः मराठी-ब्राह्मणी वातावरण इतक्या भव्य स्वरूपात पहिल्यांदाच बघितलं. एक मस्तानी आणि काशी सोडली, तर इतर बायकांच्या अंगावर भरमसाठ दागिने नाहीत, चमकीच्या साड्या नाहीत की करकरीत उपरणी नाहीत. अनेकदा इरकली लुगडी, खोपे, पुरुषांच्या अंगात तत्कालीन वस्त्रं, मावळ्यांच्या पगडीवर कान झाकायचा लाल पट्टा वगैरे… अगदी नेमकं! अनेक प्रसंग पुण्यातले वाटावेत किंवा पेशवाईतले वाटावेत अशा वाड्यांत नाहीतर तत्सम सेटवर केलेले. म्हणजे लाकडी खांब, तत्कालीन महिरपी, मुसलमान 'कॅलिग्राफी'चा नक्षीवर असलेला प्रभाव, बुद्ध धर्मातून वाहत येऊन आपल्यात स्थिरावलेल्या महिरपी आणि कमानी वगैरे… एकूणच छान सेट्स आहेत. अगदी राहवत नाही, म्हणून तुलनाच करायची, तर त्या 'कट्यार'मध्ये कसे मशीन एम्ब्रॉयडरी केलेले कपडे, सेंट्रल मॉलमधून आणून ठेवलेल्या उशांचे अभ्रे होते? तसे इथे नव्हते. बहुतेक प्रसंगांमध्ये कटाक्षाने हॅण्ड एम्ब्रॉयडरी भासावी, निदान त्या त्या प्रांताचा भास व्हावा असे सेट्स, वेशभूषा, दागिने आणि केशभूषा होती. अर्थात पुण्यातल्या घरातच धबधबा वगैरे 'सिनेम्याटिक लिबर्टी' होतीच!"
"हो, ते अपेक्षितच म्हणा. भन्साळीचं पाण्याबद्दलच प्रेम... छे! प्रेम कसलं, 'फेटिश'च ते! ते जगप्रसिद्धच आहे. 'देवदास'मध्येही नाही का - पारो, चंद्रमुखी, देवदास सगळ्यांचा पाण्याशी एकदा तरी शरीरसंबंध येतोच येतो! इथेही तसंच आहे का?"
"हा हा! अर्थातच! इथेही जे पात्र येतं, ते पाण्यात उतरतं. नुसतं समोरच्या पात्रापर्यंत जायचं असलं, तरी पाण्यात उतरतं. इतकंच काय, बाजीराव नाक्यावरच्या भाईच्या थाटात 'मांडवली' करायला निजामाकडे जातो, तर निजामालाही आलिंगन द्यायला पाण्यातूनच जातो. अरे, क्काय! प्रत्येक पात्र थोडं तरी ओलेतं केल्याशिवाय भन्साळीला पवित्र वाटत नाही की काय कोण जाणे! सिनेमाला एकमेव इंटेन्स प्रणयप्रसंग - अर्थात आपल्या सेन्सॉरला झेपेल इतकाच - आहे तोही न्हाणीघरात काशीबाईला ओलेती केल्यावरच. इतकंच काय, बाजीरावाचा नि मस्तानीचा मृत्यूही पाऊस आल्याशिवाय होत नाही!"
"अर्र... म्हणजे विचित्रच दिसतंय प्रकरण. म्हणजे तुम्हां दोघांनाही चित्रपट आवडलेला दिसत नाहीय तर! नकोच बघू ना मग?"
"येडाय का तू? बघच. प्रियांका आणि त्याहून मुख्य दीपिकाला बघण्यासाठी तरी जाच... कसल्या माल दिसल्यात दोघी म्हणून सांगू!"
"माझ्या नवर्याची सुई तिथेच अडकलीय. पण सिनेमाआवडला नाही असं अजिबात नाही. एकुणात आवडलाच. जराही कंटाळा आला नाही. त्यात मला सर्वाधिक काय आवडलं माहितीय? तर तत्कालीन ब्राह्मण समाजाचं हुबेहूब चित्रण. अर्थात ते किती हुबेहूब आहे ते तज्ज्ञ सांगतीलच, पण त्या वेळी ब्राह्मणांचे आखाडे, तालमी होत्या इतकी माहिती आहे. कुस्त्या-दंगे वगैरे म्हणजे तर पुण्यात सामान्य बाब होती. एकुणातच या समाजात 'टगे' ब्राह्मण होते आणि त्यांचा तो माज इथे नेमका उतरला आहे. एकूणच समाजाचा, कर्मकांडांचा, ब्राह्मण्याचा प्रभाव आणि शक्ती इतकी वाढली होती की पेशवाईलाही त्याचं भय वाटावं नि बाजीरावानेही त्यांच्यासमोर गुडघे टेकावेत. आजही एका दिग्दर्शकाच्या केवळ कल्पनेत पेशवीण मस्तानीच्या सोबत नाचली, तर अनेकांच्या शेंड्यांना धक्का बसतो. मग त्या काळी कोणत्याही अधिकृत विवाहाशिवाय मस्तानीला पत्नीचा दर्जा देणार्या - देऊ पाहणार्या - बाजीरावाला काय सोसावं लागलं असेल याची कल्पना सहज करता यावी! शिवाय हा सिनेमा बघावा तो मस्तानीच्या पात्र उभारणीसाठी. गेल्या अनेक 'गल्लाभरू' सिनेमांत नायक महत्त्वाचा असतानाही नायिकेचं पात्र इतक्या ताकदीने उभं राहिलेलं आठवत नाही. तिचं शूर असणं, मनस्वी असणं, नाजूक प्रेमविव्हल प्रेयसी असणं, वेळ पडल्यास खंबीर लढवय्यी आई असणं आणि एक विरहिणी असणं... अशा अनेक छटा नीट उभ्या राहिल्यात. अर्थात रणवीरने उभ्या केलेल्या ‘ठरकी’ बाजीरावाच्या पार्श्वभूमीवर तिचं अस्तित्व अधिक खुलतं हे मान्य आहेच! तर बाजीराव किंवा पेशवाईला बाजूला सारून मस्तानीला केंद्रस्थानी आणणारा हा चित्रपट माझ्या स्त्रीवादी भूमिकेला नक्कीच सुखावून गेला. पण त्याव्यतिरिक्तही - भव्य सेट्स, उत्तम मनोरंजन आणि छान नृत्यं यांसाठी तरी ‘बाजीराव मस्तानी’ बघच! न चुकता!"
बाजीराव मस्तानी (२०१५) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
