नदी वाहते (२०१७): विचारप्रवृत्त करत समर्थपणे वाहणारा सिनेमा
"अंती सदतीस गावांतून वाहते आणि समुद्राला मिळते. आपलं तरी काय म्हणायचं?" नदी वाहते असे मूलभूत प्रश्न विचारतो आणि अनेक आपल्या मनात तयार करतो. उत्तरं कशाचीच देत नाही. अनेकांचा असं प्रश्न विचारून अधांतरी सोडून देण्याला आक्षेप असू शकतो पण उत्तरं अशी रेडीमेड कधीच मिळत नाहीत आणि सिनेमात तर त्याहून नाही.
कोकणातली एक छोटीशी नदी 'अंती', तिच्या काठची छोटी छोटी गावं, वाड्या, वस्त्या त्यातली एकाच वेळेस साधी आणि तरीही बेरकी अशी कोकणी लोकं, आणि अंतीवर गुपचूप जमीन संपादित करून उभा राहत असलेला एक मोठा धरण प्रकल्प असा काहीसा नदी वाहतेचा विषय आहे. गुपचुपपणे जमिनी संपादित केल्या जाऊन गावकऱ्यांना नळपाणी योजनेचं आमिष दाखवून आणला जात असलेला एक प्रकल्प म्हणून त्याकडे संशयाने पाहिलं जातं पण निव्वळ तेवढ्यासाठी धरण प्रकल्पाला आणि त्याला जोडून उभं राहणाऱ्या रिसॉर्टला नदी वाहते चूक ठरवत नाही.
ह्या जोडीनं गावचा विकास, रोजगाराच्या संधी आणि स्वयंपूर्णता अशा बाबतीत चर्चा घडवून आणतो. भाषणबाजी किंवा सतत बडबड ह्यात कोणीच करत नाही. नदी वाहते जरी वाढती पाण्याची गरज, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरणाला हानी न पोचवता करता येऊ शकणारा विकास अशा प्रचंड मोठ्या अवकाशाला स्पर्शून जातानाही कथानक सोडत नाही. नदी वाहतेला कथानक जरी असलं तरी रूढ पद्धतीनुसार हीरो हिरॉईन व्हिलन वगैरे कुणीच नाही. आहेत ती लोकं जी आपण रोज पाहत असतो. त्यामुळे character establishment वगैरे प्रकारात वेळ अनाठायी न दवडता सरळ विषयाला हात घालता येतो. नदी वाहतेचा उद्देश प्रश्न पाडणे आणि त्यावर मिळू शकणाऱ्या उत्तरांची दिशा दाखवणे इतकाच आहे. त्यामुळे Low aim is crime असा आक्षेप नदी वाहतेवर घेतला जाऊ शकतो. मला त्याची गरज वाटत नाही. कोणी काय लक्ष्य ठेवावं हा त्यांचा वैयक्तिक/ क्रिएटिव्ह निर्णय आहे.
नदी वाहतेतील पात्रांची भाषा/ हेल खोटा वाटत नाही. ते पीक अंतीच्याच मातीतलं वाटतं. नदी वाहतेचं चित्रण अफाट आहे. उथळ खळाळत वाहणारी अंती नदी, भातशेती, काठावरचं जंगल, दूरवर दिसणारे सह्यकडे ह्यातून कोकणाचा एक अतिशय नितांतसुंदर अनुभव डोळ्यांना देण्यात संजय मेमाणे यशस्वी ठरतात. कलाकार आणि गावकरी ह्यांची सरमिसळ इतकी उत्तम जमून आली आहे की कलाकार वेगळे दिसून येतच नाहीत.
नदी वाहते नदी वाहण्यासंबंधित मुद्दा समर्थपणे मांडतो आणि त्यावर विचारप्रवृत्त करतो हेच नदी वाहतेचं यश. संदीप सावंतांचा हा फक्त दुसरा सिनेमा. त्यांना अजून सिनेमे करायला योग्य ते पाठबळ लाभो हीच सदिच्छा.
नदी वाहते (२०१७) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
