बॉम्बे वेल्वेट - आपलापण कश्यपशी काडीमोड

आपलं कश्यपवरचं प्रेम जगजाहीर आहे. त्यामुळे काल संध्याकाळी कुठेतरी ढणकायला जायचा प्रोग्रॅम पिसणं चालू होतं, तेव्हा मला कुणी विचारलंही नाही. "ती चालली असेल ना ’बॉम्बे वेल्वेट’ला?" असं बरळून माझ्याकडे दुर्लक्ष. आता कश्यप कुणाला आवडत नाही? ’जाम व्हायलन्स रे... अंगावर येतो’ असं म्हणत म्हणत हेच लोक तीनतीनदा वास्सेपूर बघून आलेले. पण म्हटलं मरू देत.

तर ’बॉम्बे वेल्वेट’. पहिलेछूट सांगतेय, नंतर लफडं नको. तुम्हांला कश्यपबद्दल प्रेम असेल, तर माझ्यावरून शहाणे व्हा. पहिला अर्धा सिनेमा कश्यपचा आहे, पुढचा अर्धा मनमोहन देसाई, करण जोहर आणि यश चोप्रा. चालणार असेल तर यन्जॉय. नसेल तर - आधीच लांब र्‍हा. पुढे वाचणार असाल, तर आधीच सांगतेय. पुढे मी गोष्टीची आयमाय काढलीय.

तर - भव्यदिव्य गोष्टींबद्दल आहे प्रेम कश्यपला. आमची काय हरकत आहे का? जोवर पडद्यावर दिसणारी गोष्ट पुरेशी दिलखेचक आणी गुंतागुंतीची आहे, तोवर भव्यदिव्य असू दे नायतर सूक्ष्मबिक्ष्म असू दे. कश्यपच्या आईची ज्जय. प्रयोग कर. नो प्रॉब्लेम. फार तर काय, फसेल. कर यार तू. परदेशी लोकांची नक्कल करतो कश्यप, असं म्हणतात लोक? गेले टिनपाटात. कशाची नक्कल करायची नि कशाचा प्रभाव मिरवायचा हे कळतं म्हणून करतो म्हणावं नक्कल. कर बिंधास. वास्सेपूरसारखी खणखणीत भारतीय गोष्ट दाखवतो आहेस, तोवर प्रॉब्लेम इल्ले. कश्यपच्या आईची ज्जय. पण प्रेडिक्टेबिलिटी? बाकी काही असलं, तर कश्यप प्रेडिक्टेबल नव्हता. ’बॉम्बे वेल्वेट’च्या पहिल्या काही मिंटात रणबीर कपूर हॉलिवुडी पडद्यावर ’ही वॉज अ बिग शॉट’ ऐकताना बघून भारलेला दिसला आणि सिनेमाच्या शेवटाचा अंदाज आला - वहीच थोडा डाउट किया. पण ठीक. 

सुरुवातीपासून मी इतका काही धीर सोडला नव्हता. मस्त सेपिया टोनचा आभास कायम राहावा अशा टोनमधे चितारलेली जुनी मुंबई. नुकतंच स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे दिवस. मुंबईला अजून तिची आजची शान मिळायची बाकी होती, तेव्हाचे दिवस. बालपणी मारलेलं पाकीट नायक हवेत भिरकावतो ही नि ते खाली येईस्तोवर मोठा झालेला असतो, हा खास मनमोहनी शैलीतली वळसा बघून अजूनच खूश व्हायला झालं. ट्राम्स थो‍ऽड्या गंडलेल्या होत्या, नाही असं नाही. पण एकूण वातावरणनिर्मिती झकास होती. वर्तमानपत्रांचे मथळे, त्यातून पुरवलेली अस्थिर आंतरराष्ट्रीय राजकारणाची फ्रेम, जिनांसारख्या संदर्भातून तेव्हाच्या राजकीय घडामोडी सूचित करणं - टिपिकल कश्यपच्या सिनेमातलं. व्यक्तिगत आयुष्य आणि राजकीय संदर्भ वेगळे काढता येत नाहीत, याचं पक्कं भान असलेलं. मी सरसावून बसले. जॉनी बलराज रस्त्यावरचा टपोरी नायक. मोठं होण्याची स्वप्नं बघणारा. समोर मुंबईचा कोरा कॅनव्हास. ’विकासा’साठी मांडून ठेवलेला. पानवलकरांच्या कथांची आठवण व्हावी असले स्मगलिंगचे सीन्स. गिरणी कामगारांचा संप... अमित त्रिवेदीचं ढिण्च्यॅक्‌ म्युझिक आणि अमिताभ भट्टाचार्यचे वायझेड शब्द. 

"देखो पहलू से उठकर है जाना बुरा, जाता कहॉं है सनम, बाकी के सारे फॅंसानें, झूटे हैं तेरी कसम - कुछ तेरे दिल में फेफी, कुछ मेरे दिल में फेफी-" 

अरे, कसलं फेफी? काय अर्थ तरी आहे का? पण अनुष्का शर्माचं गुलछबू शरीर, सुमन श्रीधरचा मादक - नखरेल आवाज आणि बांधून ठेवणारे, मांजरासारखे लाडिकपणे पायापायात घोटाळणारे शब्द. सो कॉल्ड विकासाच्या संधी भरभरून देऊ करणार्‍या मुंबईनं मोठं होऊन बघणार्‍या कुणाही जिगरबाज माणसाला कसं फशी पाडलं असेल, त्याचं हे सहीसही दर्शन होतं. एका बाजूला कम्युनिस्ट बाजूला असलेला, वर्तमानपत्र चालवणारा मिस्त्रीसारखा गर्भश्रीमंत संपादक. एका बाजूला अमेरिकन भांडवलशाही आपली म्हणणारा खंबाटासारखा उद्योजक. तिसरा कोन मेयर आणि पोलिसांनी बनलेला - भ्रष्ट व्यवस्थेचा. चौथ्या कोनात जन्ता! त्यातच कॉम्रेड देशपांडेसारखा कामगार नेता, त्यातच वाट्टेल ते किंमत मोजून मोठा व्हायला धडपडणारं जॉनीसारखं सडकछाप पब्लिक आणि मुंबईतले चाकरमान्ये. या चार कोनांमधली रस्सीखेच कश्यपला मस्त जमलीय. अगदी त्याला हव्या तशा फिल्मी ष्टाईलमध्ये, गुंतागुंतीच्या राजकारणाचे संदर्भ देत, त्याच्या लाडक्या फिल्म न्वारच्या काळ्या-पांढर्‍या-राखाडी रंगांच्या शेड्समध्ये आणि हीरोला व्य-व-स्थि-त फूटेज देत. अगदी संथपणे, पण बघणार्‍यावरची पकड जराही सैल होऊ न देता. रीतसर.

इंटर्वलच्या आधी या या रस्सीखेचीतला एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आला आणि मग इंटर्वल. मी फुकट मनातल्या मनात मांडे खाल्ले. पॉपकॉर्न घ्यायला बाहेर जायलाही विसरून मनोराज्य रंगवत बसले - इथवरच एवढा भारी केलाय, मग शेवट काय अस्सेल? सुरुवातीच्या ’बिग शॉट’च्या वेळी मनात चुकचुकलेली पाल मी बेरडपणे गप बसवलेली. 

पुढचा अर्धा भाग बघून मी खुर्चीतल्या खुर्चीतच खचत गेले. 

काय ते फिल्मी योगायोग. काय ते हीरोसाठी जिवाची बाजी लावणारे मित्र. काय ती आचरट फिल्मी अदलाबदली. जुळ्या भावंडांची नौटंकी. काय ते स्वामिनिष्ठ नोकर. काय ते हीरोबद्दल सॉफ्ट कॉर्नर बाळगून असणारे पोलीस... अरारारारा! पुरत्या सेकंड हाफमध्ये ज्याकडे बघून काळ कंठावा, असा फक्त मुख्य व्हीलनचं काम करणारा करण जोहर काय तो होता, यात काय ते समजून घ्या. नाही नाही, करण जोहरला सस्त्यात काढायचा इरादा नाही माझा. झ-का-स काम केलंय त्यानं. थंड खुनशी नजरेनं तो हीरोकडे बघतो, सूक्ष्म तुच्छतेनं हसणं दाबतो आणि नजर वळता वळता त्याच्या डोळ्यात जॉनीच्या रूपाबद्दल हावरट लालसा चमकून जाते - केवळ खलास. अंगावर काटा येतो. 

अरे पण म्हणून काय? स्क्रिप्टचं काय बघाल की नाही? की फक्त करण जोहरला क्लॉजेटमधून बाहेर आल्यासारखा रोल दणक्यात करायचावता म्हणून केलास पुढचा अर्धा सिनेमा? शेवटच्या सीनमधे करण जोहरचा खंबाटा जॉनीला म्हणाला, "ऐसा क्या देखा तुमने रोझीमें, जो मुझमें नही देखा?" तोवर मी सिनेमावर एवढी उखडलेवते, की मला एकदम वाटलं, आता रणबीर कपूर म्हणेल याला भडकून, "अरे तू कधी काय दाखवलंस भाड्या? दाखवलं असतंस तर बघितलं असतं ना मी? ही काय चीटिंग?" 

असो. भंकस करतेय मी. पण माझा अपेक्षाभंगानं झालेला संताप समजून घ्या तुम्ही, प्लीज. 

आधीच्या अर्ध्या भागात ज्या मिस्त्रीमुळे गोष्टीचा तोल सावरलेला होता, तो मिस्त्री नंतर गायब? त्याला काय कंटाळा आला म्हणून? मग मुंबईच्या रेड लाईट एरियाचं कितीही आकर्षक ऍंगल्समधून चित्रण केलंत, कितीही ’वास्तववादी’ तपशील दाखवलेत, कितीही फिल्मी भव्यदिव्य संवाद लिहिलेत, तरी स्क्रिप्टचा ढिसाळपणा असा लपतो का? कश्यपची लांबण इतकी असह्य झाली, की शेवटी पब्लिकनं सिनेमा संपायच्या आधीच थेटरातून काढता पाय घ्यायला सुरुवात केलेली. लाज लाज आली. पण सांगता कुणाला? मी निर्लज्जपणे नेट धरून बसलेवते. एकदा तर मनाशी आलं, अरे, त्याला कुशीत घेऊन ’कोई बिग शॉट था’ इतकंच ना म्हणायचं आहे? मी म्हणते. पण आता आवरायचं बघा दादा. हवं तर कुशीत घेते, पण बास करा. जाऊ द्या.

शेवटी एकदाचे कश्यपचे सोसासोसानं घेतलेले मशिनगन्सचे ष्टायलिश गोळीबाराचे सीन आटोपले. ढणढणाटी म्युझिकनं आयमाय काढून झाली. हीरो खपला. हिरॉईननं एकदाचं त्याला ’बिग शॉट था’ म्हटलं नि झेंगट आवरलं. नाही म्हणायला शेवटी झळकलेले मुंबईच्या ’आज’बद्दलचे तपशील वाचताना पहिल्या अर्ध्या भागाची पुन्हा आठवण झाली. हा सिनेमा काय होता होता गळपटला, ते बघून हळहळ वाटली. ठीक, कल्कीबाई, कश्यपशी आपलापण काडीमोड. 

बॉम्बे वेल्वेट - चित्रपटाची /नाटकाची माहिती

बॉम्बे वेल्वेट
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: अनुराग कश्यप
  • कलाकार: अनुष्का शर्मा, के के मेनन, रणबीर कपूर, करण जोहर
  • चित्रपटाचा वेळ: २ तास २९ मिनिटे / १४९ मिनिटे
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१५
  • निर्माता देश: भारत