डॉली की डोली - नव्या बाटलीत नजाकतीनं पेश केलेली जुनीच दारू!!

सगळयाच चित्रपटांनी काही खूप बोध द्यावा अशी अपेक्षा नसते. एखाद्या संध्याकाळी डोक्याला काही ताप न करणारे सिनेमे पाहावेसे वाटतात. सध्याचा’ डॉली की डोली’ही जास्त विचार करायला न लावणारा, डोकं अगदीच बाजूला काढून ठेवायला न लावणारा आणि अर्थातच थेटरातून बाहेर पडलो की बर्‍यापैकी विसरही पडेल असा सिनेमा आहे. साहजिकच अरबाझ खानच्या सिनेमाकडून काही वेगळी आशा नसते. फक्त त्याच्या आधीच्या चित्रपटांच्या दबंग मालिकांच्या तुलनेत अचाटपणा आणि अतर्क्यता कमी आहे.

 

टीप:- इथून पुढे सिनेमाच्या कथेचे तपशील आहेत.

सिनेमाचं कथाबीज नवीन नाही. आपल्या संदीप कुलकर्णीच्या 'गैर' सिनेमाची थोडी डागडुजी करून अधिक चांगल्या प्रकारे सादर केला आहे इतकंच. त्यामुळं कथेबद्दल लिहिण्यासारखं अधिक काही नाही.’ गैर’ सारखेच डॉली (सोनम कपूर), तिचे आई-बाबा (मनोज जोशी), भाऊ आणि आजी हे कुटुंब उपवधू नवर्‍या मुलांना फसवून त्यांची संपत्ती लुटून पळून जात असतात. बर्‍याच लोकांना गुंगारा देऊन झाल्यानंतर पुढची कहाणी मात्र ’गैर’ पेक्षा वेगळया वळणाने जाते.

 

अभिनयाच्या बाबतीत एक राजकुमार राव सोडला तर कुणाबद्दल काही विशेष म्हणता यायचं नाही. सोनम कपूरच्या अभिनयात मला कधी चढ-उतार दिसत नाहीत. इथेही ती नेहमीप्रमाणे छान दिसलीय आणि अधिक कॉन्फिडन्ट वाटलीय. मनोज जोशी कर्नलच्या पहिल्या रोलमध्ये आपली छाप पाडतात पण नंतर मात्र ठीकठाक म्हणावासा अभिनय करतात. राजकुमार राव याने त्याला मिळालेल्या फुटेजमध्ये प्रेमात पागल झालेला, वाग्दत्त वधूच्या आगेमागे करणारा आणि नंतरही तिच्यावरती राग न धरता तिला समजून घेणारा प्रियकर अशा सार्‍या भूमिका उत्तम रंगवल्या आहेत. जेव्हा तो मनोज जोशीकडे सोनमचा हात मागायला येतो तेव्हा सगळ्यांची जी भट्टी जमली आहे तिला तोड नाही. ’फुकरे’मधली पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा ही जोडगोळी पुन्हा इथे आहे. वरुण शर्मा पुन्हा एकदा 'चूचे' प्रकाराच्या  रोलमध्ये दिसतो. त्याच्या चेहरेपट्टीला आणि देहबोलीला हे जमतंसुद्धा छान. फक्त त्याचा साचेबद्धपणा होऊ नये म्हणजे झालं. बिनामिशीचा पुलकित सोनमसमोर खूपच लहान वाटतो, आदरवाईज तोपण ठीक-ठीकच. सैफ अली दोन मिनिटे येऊन दिलेलं काम चोख बजावून जातो. अर्चना पूरणसिंगनेही खाष्ट पंजाबी सासूच्या रोलमध्ये छान रंगत आणली आहे.

 

 

योनिशुचिता हा आपल्याकडे मोठा टॅबू आहे हे खरंच. पण चुंबनदृश्याच्या वेळेस दोन फुलं एकमेकावर आपटण्याचा आणि सुहागरातीला एखादं सांकेतिक शिल्प दाखवण्याचा जमानाही राहिला नाही. सोनम सगळ्यांशी लग्न करते पण कुणाला साधा किस देत नाही हे दाखवण्याचा आटापिटा अगदी हास्यास्पद. मग ती शेवटच्या लग्नात नवर्‍याला गुंगीचं औषध देत नाही आणि जवळ न येण्यासाठी काही कारणही सांगत नाही याचा काय तो अर्थ घ्या असं दिग्दर्शकाचं म्हणणं असावं काय असाही प्रश्न पडतो.

 

या सिनेमात चांगलं काय आहे, तर उत्तर भारत आणि उत्तर भारतीय लोक. हरयाणा, पंजाब, दिल्ली ही ठिकाणं आणि तिथली माणसं सौदिंडियन सिनेमाछाप अतिशयोक्तही वाटत नाहीत आणि करण जोहरछाप चकचकीतही वाटत नाहीत. त्यांची घरे, उच्चारांचे लहजे, इतर लहानसहान बारकावे हे सारं उत्तमरीत्या पकडलं गेलं आहे. एका प्रसंगात वरुण शर्मा अगदी सहज 'मेरे कझिन अंकल एसीपी है' म्हणून जातो, आपल्या कानांना कझिन सिस्टर्/ब्रदरपर्यतचीच सवय आहे पण कझिन अंकल हे खास दिल्लीकडचं वाटतं. मराठी 'गैर'मध्ये संदीप कुलकर्णीला हिरो म्हणून सहन करणे, त्यात त्याचा अमृता खानविलकरसोबतचा रोमान्स-कम-नाच हे म्हणजे अतीच झालं होतं. त्या मानाने इथे सगळेच तरुण असल्याने थोडं नेत्रसुसह्य आहे इतकंच. चित्रपटाचा वेगही कुठे संथ- कंटाळवाणा न राहता सतत काहीतरी घडत राहतं.

 

पार्श्वसंगीत सतत न वाजत राहता हवं तिथंच वाजतं हीसुद्धा एक जमेची बाजू. बाकी चित्रपटाच्या संगीतानं बर्‍यापैकी माती खाल्ली आहे. ’ डॉली की डोली’ हे शीर्षकगीत सोडता एकही गाणं धड लक्षात राहात नाही. मलाईका अरोराचं आयटम साँग वाद्यांच्या कल्लोळात हरवलंय आणि त्याच्या  डान्स स्टेप्सपण’ मुन्नी’मधल्यासारख्याच वाटतात. त्यामुळे तसंही आयटम साँगमध्ये नवीन काही नसतं आणि इथं असंही मग नवीन काही केलं नाहीय. उलट हे गाणं अनाठायी वाटतं. ’बाबाजीका ठुल्लू’ (बरेचदा इथं ते टुल्लू ऐकू येतं) पार्टीसाँग म्हणूनच कुठेतरी वाजलं तर वाजेल. 'फटे तक नचना' टिपिकल पंजाबी छापाचं गाणं आहे, पण तो आवाज सोनमला जराही सूट होत नाही आणि गायिकेचा आवाज उपरा वाटत राहतो. 'मेरे नैना काफिर हो गये' हे तर थेट 'मेरे नैना बडे कातिल मार ही डालेंगे' ची आठवण करून देतं.

 

थोडक्यात, सिनेमा पाहिला तरी चिडचिड होणार नाही. १०० मिनिटं आणि पैसे वाया गेल्याचं दु:खही होणार नाही. पाहिला नाही तरी काहीही हुकणार नाही. कधीतरी टीव्हीवर येईलच. तेव्हा येता जाता पाहायला हरकत नाही.

डॉली की डोली - चित्रपटाची /नाटकाची माहिती

डॉली की डोली
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: अभिषेक डोगरा
  • कलाकार: बोमन इराणी, सोनम कपूर, पुलकित सम्राट, राजकुमार राव
  • चित्रपटाचा वेळ: १ तास ३६ मिनिटे
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: 2015
  • निर्माता देश: भारत