'मनमर्ज़ियाँ' आणि 'हम दिल दे चुके सनम' : तुलना नकोच
पाहुणा लेखक: संदेश कुडतरकर.
'मनमर्ज़ियाँ'चा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हाच त्याची 'हम दिल दे चुके सनम'बरोबर तुलना करायला लोकांनी सुरुवात केली होती. प्रेमत्रिकोण म्हटलं की अशी तुलना टाळताही येत नाही. पण एखाद्या धावण्याच्या शर्यतीत ज्याप्रमाणे अंतिम रेषा कोण पहिल्यांदा पार करतो, यावर विजेता ठरतो, तसं कलेच्या प्रांतात करता येत नाही. इथले निकष वेगळे असतात. त्यांच्यावर दोन कलाकृतींना जोखूनही एक कलाकृती दुसऱ्या कलाकृतीपेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ, असा निर्वाळा देऊन मोकळं होता येत नाही.
या दोन चित्रपटांच्या बाबतीतही नेमकी हीच समस्या आहे. संजय लीला भन्साळी हा माझा आवडता दिग्दर्शक नसला तरी त्याचे काही चित्रपट, जसे 'खामोशी : द म्युझिकल', 'हम दिल दे चुके सनम', 'ब्लॅक' माझ्या पसंतीस उतरले आहेत. 'हम दिल दे चुके सनम' तर सर्वांत आवडता. कितीतरी वेळा पारायणं केलेला. हा चित्रपट आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे या चित्रपटातील सलमान-ऐश्वर्याची केमिस्ट्री. एवढ्या भल्यामोठ्या कुटुंबातही चोरीछुपे त्यांची रंगणारी प्रेमकथा. कथा, पटकथा, गाणी, अभिनय या सर्वच गोष्टी या चित्रपटात जमून आल्या होत्या.
पण म्हणून त्याची 'मनमर्ज़ियाँ'बरोबर तुलना करणं योग्य नाही. हे म्हणजे एकाच प्रश्नाचं दोन विद्यार्थ्यांनी लिहिलेलं उत्तर तपासून गुण देण्यासारखं आहे. पण अनुराग कश्यपसारखा हुशार विद्यार्थी जेव्हा कनिका ढिल्लोने लिहिलेली प्रेमकथा पडद्यावर साकारायचं ठरवतो, तेव्हा पात्रांना सरळसोट काळ्यापांढऱ्या रंगांत रंगवून तो मोकळा होत नाही. 'ग्रे वाला शेड' या गाण्यातूनच चित्रपटात पुढे काय वाढून ठेवलंय, ते स्पष्ट दिसतं. इथे कुणीही नायक नाही. कुणीही खलनायक नाही. प्रत्येकाच्या वागण्यात, निर्णयात चांगल्या-वाईटाचा कमीअधिक भरणा आहे. परफेक्शनिस्ट असं कुणीच नाही.
दोन्ही चित्रपटांची कथा साधारणपणे सारखीच वळणं घेत जात असली, तरी दोन्ही प्रेमकथांमध्ये बराच फरक आहे. 'हम दिल दे चुके सनम'ला गुजराती-राजस्थानी संस्कृतीची पार्श्वभूमी आहे, तर 'मनमर्ज़ियाँ' पंजाबमधला. नंदिनी गायिका आहे, तर रूमी हॉकीपटू. हे वरवरचे तपशिलातले फरक सोडल्यासही दोन्ही चित्रपट फार वेगळे आहेत. १९९९ साली 'हम दिल दे चुके सनम' प्रदर्शित झाला होता. 'मनमर्ज़ियाँ' २०१८ला प्रदर्शित झालाय. त्या काळात ज्या प्रश्नांची उत्तरं सहजसोपी वाटत होती, ते प्रश्नच आता मुळात जटिल झालेत. या १९ वर्षांत तंत्रज्ञानाने घेतलेली झेप, बदललेली सामाजिक परिस्थिती आणि त्यातूनच प्रेमाच्या प्रकटीकरणाचं, त्यातल्या हळुवारपणाचं, गुंत्याचं बदललेलं स्वरूप याचाही विचार करायला हवा.
वनराजला जशी खोटेपणाची चीड आहे, तशीच ती रूमीच्या पतीला - रॉबीलाही आहे. मात्र वनराजने जेवढ्या सहजपणे नंदिनीची भेट तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराशी - समीरशी - घालून द्यायचं ठरवलंय, तितका साधा रॉबी नाही. त्याच्या वागण्यातून रूमीबद्दलचा पझेसिव्हनेस जाणवतो. विकीकडे परतण्याचं स्वातंत्र्य त्याने रूमीला दिलं असलं, तरी तो विकीकडे आपला प्रतिस्पर्धी म्हणूनच पाहतो. त्यामुळे रॉबी जास्त वास्तववादी वाटतो. हिरो बनण्याच्या नादात माणूस म्हणून असलेले त्याचे अवगुण लपत नाहीत आणि त्यामुळेच वनराजपेक्षा रॉबी जास्त भिडतो.
पुरुषांबरोबर रणरणत्या उन्हात लगोरी खेळत एन्ट्री घेणाऱ्या नंदिनीसारखा अवखळपणा रूमीमध्येही आहे. पण आपल्या प्रियकरासाठी नस वगैरे कापून घेणाऱ्या नंदिनीसारखी रूमी आततायीपणा करणारी नाही. तरीही हनीमूनला गेल्यावर प्रियकराच्या आठवणीने एकांतात रडण्याइतकी ती हळवी नक्कीच आहे. समीर इटलीला असल्यामुळे नंदिनी पत्रव्यवहाराद्वारे त्याच्याशी संपर्कात होती. तिला जर संधी मिळाली असती, तर लग्नानंतरही तिने समीरशी प्रेमसंबंध ठेवले असते का? शक्यता जास्त आहे, कारण करवाँ चौथच्या व्रताच्या वेळीही तिला वनराज समोर असूनही समीरचीच आठवण येत आहे.
पण तरीही रूमीच्या व्यक्तिरेखेला जितका वास्तववादाचा स्पर्श आहे, तितका नंदिनीच्या व्यक्तिरेखेला नाही. समीरबरोबर खोटीनाटी सप्तपदी चालतानाचे नंदिनी आणि समीरचे संवाद "मौत आएगी, तो मैं तुमसे आगे निकल जाऊँगा" वगैरे म्हणजे इमोशनल ड्रामाचा कळस आहेत. याउलट विकी आणि रूमीची प्रेमकथा. अर्थात पळून जाणं वगैरे त्यातही असलं, तरी 'पुढे काय करायचं' या प्रश्नावर 'तू हॉकी स्टिक्स बेचेगी, मैं गाने बजाऊँगा' वगैरे उत्तर विकीच्या तोंडून ऐकल्यानंतर रूमी गुपचूप घरी परतते. वारंवार संधी देऊनही विकी आयुष्याबद्दल गंभीर नाही, हे कळल्यावर त्याचा नाद सोडण्याचा पटणारा निर्णय घेते. पण म्हणून त्याच्या आठवणींना ती नाकारत नाही. अशा अनेक गोष्टींमुळे 'मनमर्ज़ियाँ' निश्चितच उजवा ठरतो.
'हम दिल दे चुके सनम'साठी मेहबूबने लिहिलेली गाणी उत्तम होती, याबाबत दुमत नाही. पण शेलीच्या शब्दांमधून प्रेमभंग आणि नंतर नव्याने फुलणारं प्रेम ज्या उत्कटतेने व्यक्त होतं, त्याला तोड नाही. 'सड्डी सच्ची मोहोब्बत कच्ची रह गयी' हे दर्दभरं गाणं तर आहेच. पण 'दरिया' गाण्यामध्ये तो 'बह गया हंजुआ दा दरिया' असं म्हणतो. डोळ्यांतून फक्त अश्रू वाहिले नाहीत, अश्रूंचे पाट वाहिले नाहीत, तर अश्रूंची नदी वाहून गेलीय... हे लिहिणं सोपं नाही. प्रेमासारख्या अॅबस्ट्रॅक्ट संकल्पनेच्या जवळच जाता येतं प्रत्येकाला, ते शब्दांत पकडणं महाकठीण काम. पण असे शब्द ऐकले की, उद्ध्वस्त करणारं प्रेम हे असंच भव्यदिव्य असतं, हे मनोमन पटू लागतं. 'चोंच लड़ियां' या गाण्यात रूमी आणि रॉबीमधलं हळुवार फुलणारं प्रेम उलगडताना शेलीने 'अमरितसर और जलंधर नाचे', 'अप्रैल-मई विच दिसम्बर नाचे', 'सतलज में इक समंदर नाचे', 'पोरस दे विच सिकंदर नाचे' अशी सुंदर रुपकं वापरली आहेत. हे ऐकताना हटकून 'बर्फी'मधल्या 'फिर ले आया दिल' गाण्यातल्या
'दिल कह रहा उसे मुकम्मल कर भी आओ
वो जो अधूरी सी बात बाकी है
वो जो अधूरी सी याद बाकी है'
किंवा
'उसे मयस्सर कर भी आओ
वो जो दबी सी आस बाकी है
वो जो दबी सी आंच बाकी है'
या ओळींतल्या नादमाधुर्याची हटकून आठवण येते. संगीताच्या बाबतीतही अर्थातच अमित त्रिवेदीचं पारडं इस्माईल दरबारपेक्षा जड आहे.
नंदिनी जर आजच्या काळात असती, तर नवऱ्यापासून लपवत फोनवर तिने समीरशी संपर्क ठेवलाही असता. किंवा रूमी जर वीस वर्षांपूर्वी प्रेमात पडली असती, तर कदाचित एकटीनेच इटलीला जाऊन तिने विकीचा शोध घेतला असता. त्यामुळे प्रेमकहाण्यांचे संदर्भ काळानुसार बदलतात, हे मान्य करायला हवं आणि तरीही शाश्वत प्रेमाची मूल्यं मात्र काळानुसार रूप बदलत नाहीत, हेही.
प्रतिमांचा स्रोत: क्विंट, टाईम्स नाउ व अन्य संकेतस्थळावरील प्रतिमा
पाहुणा लेखक: संदेश कुडतरकर.
एकापेक्षा अधिक कलाकृती - चित्रपटाची /नाटकाची माहिती

Official Sites:
- दिग्दर्शक: .
- कलाकार: -
- चित्रपटाचा वेळ: -
- भाषा: -
- बॉक्स ऑफिसचे आकडे: -
- प्रदर्शन वर्ष: -
- निर्माता देश: -