पी के (२०१४): विस्कळीत तरीही मनोरंजक

एखादी फर्मास कल्पना, त्यावर काम करून कथा, पटकथा, संवाद वगैरे प्रवास, कधी मूळ सूत्राला अधिक टोकदार करतो; तर कधी त्यातील मजा बोथट करून टाकतो. देव आहे की नाही, असला तर त्याचे स्वरूप आणि सध्या त्याच्या नावाने चालू असलेला बाजार हा विषय भारतील कलाजगताला आता काही नवा उरलेला नाही. काही एकांकिका, काही लेख यांचसोबत वेगवेगळ्या भाषांत आलेली दोन अंकी नाटके, 'ओह माय गॉड'सारखे चित्रपट याच विषयावर बेतलेले आहेत. अशा वेळी कथेचे पटकथेत केलेले रूपांतर, सादरीकरण, दिग्दर्शन व अन्य तांत्रिक अंगे कशी आहेत, त्यावर 'पीके'ला जोखणे क्रमप्राप्त ठरते

या चित्रपटाची थोडक्यात गोष्ट सांगायची तर पीके (आमिर खान) हा परग्रहावरून थरच्या वाळवंटात उतरतो या प्रसंगातून चित्रपटाला सुरुवात होते. पूर्ण नग्नावस्थेत असणार्‍या आमिरच्या गळ्यात एक छान चमकणारी स्क्रीनसदृश्य वस्तू अडकवलेले एक लॉकेट असते. आणि त्याची पहिलीच भेट होते एक रेडियो व कॅसेट प्लेअर घेऊन चाललेल्या एका चोराशी. तो चोर त्या जिवाच्या गळ्यातील ते अतिशय वेधक लॉकेट खेचतो आणि पसार होतो. दरम्यान बेल्जियमच्या सुंदर पार्श्वभूमीवर एक दुसरी प्रेमकथा जन्माला येत असते. जगत्जननी अर्थात जग्गू(अनुष्का शर्मा) ही भारतातील कर्मठ वडिलांची मुलगी बेल्जियमला शिकायला आलेल्या सर्फराज (सुशांत सिंग रजपूत) या पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडते. वडिलांच्या (परीक्षित सहानी) व त्यांचे गुरुदेव तपस्वी महाराज (सौरभ शुक्ला) यांच्या विरोधाला न जुमानता ती त्याच्याशी लग्न करण्याचे ठरवते, मात्र काही घटनाच अशा घडतात की ते लग्न होऊ शकत नाही. त्यानंतर भारतात परतलेली जग्गू एका न्यूज चॅनलमध्ये पत्रकार म्हणून काम करत असताना पीकेला भेटते. त्यातून पीकेचा तोपर्यंतचा प्रवास, गळ्यातील लॉकेट हा त्याच्या मूळ ग्रहावर परतायचा रिमोट आहे वगैरे गोष्टी उलगडतात. आणि मग सुरू होतो 'देव शोधण्याचा खेळ'. पुढे काय होते, पीकेला देव का हवा असतो, तो त्याला मिळतो का, तपस्वीचा यात काय संबंध असतो, वगैरे गोष्टी यशावकाश व काहीशा संथपणे उलगडताना पाहण्यासाठी चित्रपट बघू शकता.

मुळात परग्रहावरून एखादा मानवसदृश्य प्रगत जीव पृथ्वीवर आला तर त्याला काय दिसेल? तो त्याच्या नजरेतून आपले जग कसे बघेल? जैविक तपशिलांच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपली समाजरचना, संकेत, नियम वगैरेंशी त्याची ओळख होऊ लागेल तेव्हा आपल्या समाजातील विसंगती त्याला जाणवतील का? अशा विचारांचा किडा खरंतर एखाद्या खतरनाक पटकथेला जन्म देऊ शकतो. एकूणच समाजाला आरसा दाखवण्याची मोठी संधी हा प्लॉट देतो. मात्र 'पीके'ने अनेकानेक उपलब्ध शक्यतांपैकी फक्त भारतीयांचा देवभोळेपणा, धर्मांधळेपणा आणि एकूणच देवाचा बाजार या कल्पनेभोवती चित्रपट उभारून आपल्याभोवती एक चौकट आखून घेतली आहे. ती नसती तर चित्रपटाने वेगळीच उंची गाठली असती. मात्र तो आपला निर्णय नसल्याने तो मुद्दा बाजुला ठेवू. अशी चौकट आखून घेतल्याने पटकथाकार व दिग्दर्शक यांना स्वैर मुशाफिरी शक्य होत नाही हे खरं आहे. मात्र दुसरीकडे याचा फायदा असा की पटकथा टोकदार होऊ शकते व त्या विषयाचे विविध पदर उलगडत अधिक नेमकेपणाने साकारता येऊ शकते. मात्र सदर चित्रपट तिथेही तोकडा पडतो. काहीसा संथ व विस्कळीत पूर्वार्ध संपल्यावर प्रेक्षकाला अशी आशा असते की उत्तरार्धात चित्रपट वेगही घेईल नि बांधेसूदही होईल. पण उत्तरार्धात चित्रपट अधिकच विस्कळीत आणि कमालीचा फिल्मी होत जातो. इतका की पूर्वार्धच बरा होता म्हणण्याची पाळी प्रेक्षकावर येते.

या चित्रपटात धार्मिक बाबतीत टीका करण्याचा धसका घेतलेले बोमन इराणींचे पात्र मोठे रंजक आहे. स्वतः राजकुमार हिरानीसुद्धा त्याच बेताने व सावटाखाली हा चित्रपट बनवत आहे हे मात्र काही वेळातच ढळढळीत दिसू लागते. एखाद्या धार्मिक परंपरेवर, लोकांच्या सवयीवर टीका केली की लगेच अन्य धर्मीयांमधील तत्सम विरोधाभासावरही टीका झालीच पाहिजे असा समाजवादी अट्टहास चित्रपटाचा चटपटीतपणा तर कमी करतोच, पण चित्रपट संथही होऊ लागतो. बाबा-बुवा वा मंदिरातील व्यापार दाखवला की पुढला सीन चर्चमधील व्यापाराबद्दल. आणि त्यानंतर एखाद्या मुस्लिम परंपरेतून होणारा फायदा दाखवणारा सीन. हे एका दृष्टीने इतके अनिवार्य का आहे हे समजू शकलो तरी त्यामुळे चित्रपटात तोचतोपणा येतो हे हिरानी यांच्या लक्षात येऊ नये हे काही पटत नाही. इथे हिरानी कल्पकता दाखवू शकलेले नाहीत.

याशिवाय भारतीय मानसिकतेतील धार्मिक विरोधाभासावर मिश्कील टिपणी व टीका करणार्‍या या चित्रपटात खंडीभर तार्किक विरोधाभास व दोष आहेत. इथे त्यांची यादी देण्याचा मानस नाही - ते तुम्हांला जालावर अन्यत्र ढिगाने सापडतील. मात्र चित्रपट व्यावसायिकही हवा नि तो सामाजिक प्रश्नांना हातही घालणारा हवा यासाठी करण्याची कसरत हिरानी यांना 'मुन्नाभाई'मध्ये यशस्वीपणे जमली होती, तिच्या तुलनेत हा चित्रपट जरा फिका ठरतो. शिवाय बोमन इराणी, सौरभ शुक्ला वगैरे ताकदीच्या कलाकारांना दिलेला इतका कमी वाव चकित करून जातो.

इतर बाबतीत बोलायचे तर गीते आणि संगीत अतिशय वाईट आहेत. खरंतर शंतनू - स्वानंद किरकिरे यांच्याकडून कितीतरी चांगल्या गाण्यांची अपेक्षा होती. पण कित्येक प्रसंगातले संगीत हे येऊ घातलेल्या प्रसंगाची फक्त वर्दी देणारे आहे, तर बहुतांश संगीत हे टीव्ही मालिकांसारखे कर्कश आहे. (गाणी वगळता इतर संगीत शंतनू यांनीच दिले असल्यास त्यांच्या संगीतातील हा बदल धक्कादायक (नि दु:खदायकही) आहे. ध्वनी, संकलन, सिनेमॅटोग्राफी आदी बाबतीत चित्रपट चांगला असला तरी हल्लीच्या चित्रपटांशी तुलना करता विशेष असे नावीन्य काही नाही. अ‍ॅनिमेशन प्राथमिक असले तरी एकूण फ्लोला बाधा आणत नाही इतकेच. छायालेखन नावाचा प्रकार चित्रपटात आवश्यक असतो हे हिरानी यांना माहीत आहे की नाही असा प्रश्न पडावा, इतके भयाण छायालेखन आहे! प्रकाशयोजना अगदीच ढोबळ आहे. इतकी की अगदी जेलमधील किंवा रात्री बाल्कनीत घडणारे प्रसंगसुद्धा लख्ख ढोबळ प्रकाशात घडतात.

 

चित्रपटात फ्रेशनेस जर कशाने आला असेल, तर तो अनुष्का शर्माच्या छान लुकमुळे अन् तिच्या सहज वावराने. त्याव्यतिरिक्त संवादही खुसखुशीत आहेत. त्यांच्यामुळे या विस्कळीत चित्रपटात अनेकदा भरपूर हसू येते, क्वचित संवाद अंतर्मुखही करू शकतात. त्यामुळे अनेक तृटी जाणवल्या तरी चित्रपट बघताना कंटाळा अजिबातच येत नाही. मात्र एकत्रित भेळेचा विचार केला, तर चटकदार असे सगळे घटक असूनही एकसुरी कुरमुर्‍यांचं प्रमाण जास्त झाल्यावर जशी फोलपटं तोंडात येत राहतात, तशी काहीशी भावना हा चित्रपट पाहिल्यावर येते.

 

पी के - चित्रपटाची /नाटकाची माहिती

पी के
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: राजकुमार हिरानी
  • कलाकार: आमिर खान, अनुष्का शर्मा, बोमन इराणी, सौरभ शुक्ला, संजय दत्त
  • चित्रपटाचा वेळ: १५३ मिनीटे
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: 2014
  • निर्माता देश: भारत