एफ़-१/१०४ - आपल्या सो कॉल्ड सहिष्णुतेच्या मर्यादा उघडे पाडणारे नाटक

ते एक घर ....
त्या दोघांचे..
फक्त त्या दोघांचे?
अरे हो! घरातली झुरळं राहिलीच की!

ती दोघं..
स्वतंत्र, स्वायत्त, स्वयंपूर्ण..
त्याने बनवावे.. तिने खावे...
नि उरलेले फ्रिजात!!

एकदा काय झालं!
काय झालं?
त्यांनी घराला रंग काढायचा ठरवला!
हिरवा!

"आपल्या" सोसायटीत "त्यांचा" रंग!
तोही "नॉर्थ"चा रंगारी!
की लोक फक्त कुजबुजताहेत?
का फक्त भास आहेत?

छे छे, आपली कशी मल्टी कल्चरल, मल्टी लिंग्वल, कॉस्मो 'सोसायटी"!

नै का?

फक्त काही अपवाद आहेत... या सहिष्णू समाजाच्या सहिष्णुतेला!

====

विषय म्हटला तर नेहमीचा, आपल्या आजूबाजूला घडणारा, अनेकांसाठी इतका सहज साधा की पटकन न जाणवणारा. त्यात हल्लीची आक्रसलेली कुटुंबव्यवस्था. अनेक घरांमध्ये आता स्त्रिया व पुरुष दोघेही स्वतंत्र झालेले, स्वयंपूर्ण होत असलेले. आपल्या आवडी, आपले प्रश्न, आपले छंद जपणारे. पण ते खरंच स्वतंत्र आहेत? बाकी मते, इच्छा, आकांक्षा जाऊच द्या, साध्या साध्या गोष्टीत कप्पेकरण - वर्गीकरण करायला आणि लेबले लावायला उत्सुक असलेल्या समाजात चिन्हे, रूपके, प्रतिमा यांचा वापर होण्याऐवजी त्यांची हुकुमत सांभाळून जगावे लागतेय का? लोकशाही म्हणजे बहुसंख्यांनी अल्पसंख्यांवर लादलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणारी व्यवस्था झालीये का? यातून कोणीतरी, कोणतातरी वर्ग सुटलाय का? एकीकडे रंग, वास, चवी या सगळ्यांत व्यावसायिक प्रॉडक्शन्स एकसुरीपणा आणत असताना, दुसरीकडे माणसांची आयुष्य, जीवनपद्धतीही "घाऊक आणि ढोबळ" आणि म्हणूनच एकरेषीय होत चाललीयेत का? हे व असे अनेक प्रश्न मांडत मांडत "एफ्-१/१०५" हे आशुतोष पोतदार लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित नाटक आपल्या मनाचा पूर्ण कब्जा घेते.

नुसता विषय आणि त्यातून मांडलेले प्रश्न इथेच या नाटकाचे नावीन्य संपत नाही तर अनेक बाजूंनी हे नाटक एक फ्रेशनेस व नवेपणा घेऊन समोर येते. पहिल्याप्रथम सादरीकरण. एका मॉबने वेगवेगळ्या निनावी भूमिका साकारत नाटक पुढे नेणे ही नवी कॢप्ती नसली तरी इथे हा मॉब साधारतः अशा नाटकांत असतो तसा एका वेषभूषेतील, एका मेकअपमधील स्वत्व न दिसणारा नाहीये.  इथे मात्र प्रत्येकाला स्वतंत्र वेषभूषा आहे, एक खास प्रयोजन आणि भूमिका आहे आणि वरवर मॉब दिसत असला, एकसंध भासत असला तरी त्याचे प्रत्येकाचे आपले असे अस्तित्व आहे, विचार आहे. अगदी आपल्या समाजासारखेच त्याचे स्वरूप आहे. अर्थात त्यातील प्रत्येकाचा विचार हा  त्याचा स्वतःचा विचार आहे का? की तो विचार, स्वतःची ओळख ज्या गटातील सदस्य म्हणून करून देतो, त्या गटाचा आहे? मग कोणत्याही गटाशी बांधीलकी बाळगू न इच्छिणाऱ्या स्वतःचा विचार करणाऱ्या व तो कृतीत उतरवू पाहणाऱ्याचे काय होते? इत्यादी प्रश्न समोर येत असताना वेषभूषा, मॉबमधील व्यक्तींचे संवाद आणि सगळ्याचा एकत्रित परिणाम प्रेक्षकांवर होतो तो चपखल ठरतो.

दुसरे नाटकाचे बलस्थान म्हणजे अभिनय! सागर देशमुख, तृप्ती खामकर, मृण्मयी गोडबोले यांचा चोख अभिनय. अर्थात नावे माझ्या लक्षात राहिली तेवढीच घेतोय. या व्यतिरिक्त डॉन पेंटरची भूमिका केलेल्या कलाकाराचा अभिनयसुद्धा केवळ लाजवाब. (त्याचे नाव विसरलोय, जर तुम्ही बघितलेत तर प्रतिसादातून नक्की कळवा!) प्रत्येक कलाकाराचे टायमिंग, संवादफेक, पॉजेस, वावर आणि लावलेला आवाज नि  लकबी यात कशालाही नाव ठेवायला जागा नाही. ज्या ताकदीने नाटक लिहिले वा बसवले आहे त्याच ताकदीने ते प्रेक्षकांपुढे सादर होते. त्यातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे नाटकातील फ़्रेशनेस! समकालीन व्यामिश्र भाषा, वेषभूषा नेमक्या आहेतच; त्याचबरोबर संवादलेखन, पात्रयोजना, पात्रांचे सरासरी वय सगळ्याच गोष्टींमुळे नाटकातली एनर्जी लेव्हल उंचावते. त्याच वेळी पार्श्वभूमीवर दिसत राहणारी नेमकी आणि सुंदर चित्रे एकूण दृश्यअनुभवात महत्त्वाची भर घालत असतात. नेपथ्य फार नसले तरी स्टुल, बीन बॅग्जचा विविध प्रकारे केलेला वापरही मजा आणतो.

थोडक्यात सांगायचं तर समकालीन विषय, फ्रेश सादरीकरण आणि भरपूर उर्जेसह छान अभिनयाने वठवलेले नाटक बघायचे असेल तर ’एफ् १ /१०४’ या फ्लॅटमध्ये एकदा डोकवाच!

 

(चित्रे आसक्त कलामंचच्या फेसबुक पानावरून साभार)

एफ्-१/१०५ - चित्रपटाची /नाटकाची माहिती

एफ्-१/१०५
  • Official Sites:

  • दिग्दर्शक: मोहित टाकळकर
  • कलाकार: सागर देशमुख, मृण्मयी गोडबोले , तृप्ती खामकर
  • चित्रपटाचा वेळ: 90 Mins
  • भाषा: इंग्रजी, हिंदी, मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: 2014
  • निर्माता देश: -