इंडियन समर्स:काही फिक्शन-काही नॉन फिक्शन

१९३०च्या सुमारापर्यंत  भारतात  पूर्ण स्वराज्याची कल्पना स्थिरावली होती. अर्थातच, ब्रिटिशांनी त्यांचे राज्य टिकवण्याचे सर्व प्रयत्न केले.  १९३० ते १९४७ ही ब्रिटिश कारभाराची शेवटची काही वर्षं. राणीच्या वतीने देशाचा गाडा हाकणारे व्हाईसरॉय, गांधींचा मवाळ गट, रक्तरंजित क्रांतीवर विश्वास ठेवणारा सुभाषचंद्र बोस यांचा पक्ष, हरिजनांना माणूस म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न करणार्‍या आंबेडकरांचा गट आणि स्वातंत्र्यप्रेमाने भारलेले या सार्‍या गटांचे कडवे अनुयायी असं तेव्हाचं सर्वसाधारण चित्र बनलं होतं.  त्याशिवाय इंग्रजी माध्यमात शिकून तयार झालेली सरकारी नोकरांची पिढी आणि  भारतात आपला प्रति-इंग्लंड बनवून राहणारे इंग्रज हे ही होतेच.   या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवरचं हे  शेवटल्या काही वर्षांत घडणारं नाट्य ’इंडियन समर्स’ नावाच्या एका ब्रिटीश  मालिकेद्वारे समोर येतं आहे. या मार्चमध्ये  मालिकेचा दुसरा सीझनही सुरू झाला आहे.

ही मालिका पूर्णपणे इतिहासाची डॉक्युमेंट्री नाही आणि ब्रिटिशांच्या बाजूने केलेलं इतिहासाचं एकांगी चित्रणही नाही. भारतीय आणि इंग्रज या दोन्ही बाजूंनी घडणारे बदल, राजकीय घटनांचे ब्रिटिश व भारतीय या दोन्ही वर्तुळांवर होणारे परिणाम आणि दोन्ही बाजूंच्या वेगवेगळ्या स्तरांमधल्या लोकांची आयुष्यं या सर्व गोष्टींचं काही अंशी चित्रण असं हे साधारण प्रकरण आहे. भारतीय उपखंडातलं ऊन सहन न होऊन इंग्रज वर्षातले सहा महिने आपली राजधानीच सिमल्याला हलवायचे. हा काळ म्हणजे बरेच ब्रिटिश सिमल्यात राहायला येण्याचा. ज्या अधिकार्‍यांना तिकडे जाणं जमत नसे, त्यांच्या बायकांच्या रमण्याचं ठिकाणही सिमलाच. या सगळ्यांना रिझवायला क्लब्स तर मग हवेतच.  हो, ज्यांच्या फाटकावर ’भारतीय आणि कुत्र्यांना प्रवेश नाही’ अशा पाट्या लावल्या जात, तेच ते क्लब. पहिल्या सीझनमध्ये १९३२ सालच्या उन्हाळ्यातल्या सिमल्यात घडलेल्या प्रसंगांचं चित्रण तर सध्या सुरू झालेल्या दुसर्‍या सीझनमध्ये १९३५साली  घडलेल्या घटना दिसतात.

मालिकेची सुरवात होते ती आगगाडीने सिमल्याला जाणार्‍या प्रवाशांच्या आणि आगगाडीला समांतर चालत डोक्यावरून सामान वाहून नेणार्‍या भारतीयांच्या दृश्यानी. साधा सुटवंग प्रवासही दुष्कर असणार्‍या ठिकाणी पियानोसह प्रत्येक फर्नीचर आणि शोभेची वस्तू डोक्यावरून वाहून नेली जाते. इथे त्या वस्तूच्या गरजेपेक्षा ’आम्ही आम्हाला हवं ते तुमच्याकडून करवून घेऊ शकतो’ ही अघोषित दर्पोक्ती उठून दिसते. या इंग्रज प्रवाशांमध्ये अधिकारी, कारकून, पोलीस,  शिक्षक, मिशनरी या सार्‍यांचा भरणा तर आहेच. सोबत घरकामाचे गडी-मोलकरणी हेेही सोबत असणं आपसूक आलंच.

सर्व पात्रांच्या गर्दीत भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड विलिंग्डन हे आतापर्यंत पडद्यावर दाखवलेलं एकमेव वास्तवातलं पात्र. विलिंग्डन साहेबांचा स्वीय सचिव राल्फ व्हीलन, त्याची बहीण ऍलिस व्हीलन, त्याचा क्लार्क आफरिन दलाल व त्याचे कुटुंबीय, रॉयल सिमला क्लबची मालकीण सिंथिया कॉफीन, मिशनरी डग्लस रेवर्थ आणि त्याचे कुटुंबीय ही मालिकेतली काही महत्त्वाची पात्रं. मालिकेतल्या अधिकाअधिक घटना या राल्फ आणि आफरीन यांच्याभोवती फिरतात. अगदी मुघलांच्या काळापासून भारतात असलेल्या आणि आतापावेतो भारतीय सवयीही काही प्रमाणात अंगिकारलेल्यां ब्रिटीशांचं राल्फ प्रतिनिधित्व करतो. आफरीन हा स्वत: थोडासा दबलेला, भीडस्त, पण मोठं होण्याची महत्त्वाकांक्षा असलेला.  सुरवातीला तो ब्रिटिशांच्या बाजूने किंवा विरोधात यांपैकी दोन्हीही नाही. अगदीच परिघावरचं म्हणता येत नसलं तरी साधारण विवेक शाबूत असलेलं हे पात्र आहे. तर सिंथिया  स्वार्थी, कारस्थानी, नेटिवांचा दुस्वास करणारी, आपलं तेच खरं करणारी अशी ठार काळ्या छटेची बाई.

मालिका ब्रिटीश असली तरी राजकीय घटनांच्या बाबतीत बोलायचं तर ऐतिहासिक घटनांचं चित्रण बर्‍यापैकी तटस्थपणे झालंय असं म्हणायला हरकत नाही.  यातल्या बर्‍याचशा गोष्टी थेट इंग्रजांच्या विरोधात जाणार्‍या. त्यांचं निरर्थक समर्थन किंवा त्यामागची असलेली-नसलेली भूमिका मांडायचा प्रयत्नही किमान या पहिल्या सीझनमध्ये झाला नाहीय.  गांधीना सर्वांनी आपला नेता मानणं ही या इंग्रजांना न रुचणारी गोष्ट. म्हणून मग ते मतआरक्षणाचा मुद्दा काढतात. आंबेडकर-गांधींची युती न होऊ देण्याचा ते आटोकाट प्रयत्न  करतात. पुणे करारापूर्वी गांधींनी केलेल्या उपोषणामुळेत त्यांचं धाबं दणाणतं. पण त्याचा परिणाम आपल्यावर होतोय हे ही ते दिसू देत नाहीत. आंबेडकरांच्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारं एक पात्र, डॉ. कांबळे,  बर्‍यापैकी विस्ताराने इथं येतं. नेटिवांनी कोणत्याही प्रकारे डोईजड होऊ नये म्हणून त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवण्याचा प्रयत्न करणं, मारहाण करून कबुल्या घेणं आणि सरतेशेवटी ठारही मारणं याचीही उदाहरणं या मालिकेत इथे दिसतात. मध्येच एका पात्राच्या तोंडी “आपल्याला दुसरा भगतसिंग तयार व्हायला नकोय”  असं वाक्यही आहे. व्हाईसरॉय किंवा तत्सम लोकांना अभिवादन करण्याच्याची ब्रिटिशांच्या पद्धतीच्या तुलनेत भारतीयांची पद्धत खूपच अवमानकरक आहे. व्हॉईसरॉयच कशाला, साध्या इंग्रज-मालकांशी वागतानाही अतिआदराने वागायची पद्धत दिसते. भाषेचा अडसर हा एक मुद्दा असू शकतो, परंतु हावभावांवरूनही ही जनता दबलेली वाटते. मॉलरोडवर सूर्यास्तापूर्वी भारतीयांना प्रवेश नसणं किंवा कुठलेतरी राजे/संस्थानिक सिमल्याला भेट देणार म्हणूनही क्लबच्या प्रवेशद्वारावरची अवमानकारक पाटी काढण्यास सिंथियाचा नकार असणं, थेट एका इंग्रजाला कर्जाऊ रक्कम देणार्‍या रामू सूदला मिळालेली शिक्षा ही त्याच्या गुन्ह्याची शिक्षा नसून इंग्रजांची बरोबरी करण्याबद्दल मिळालेली शिक्षाची आहे हेही स्पष्टपणे मांडण्यात येतं.

कारणपरत्वे भारतात स्थलांतरित झालेल्या सगळ्याच ब्रिटीशांना इथं आल्यानंतर सुखाचे दिवस आले असतील असंही नाही. ’इंडियन समर्स’मध्ये अशा लोकांना स्वत: त्यांचे बांधवच कशी वाईट वागणूक देतात हे दिसतं. आर्थिकस्तराप्रमाणे क्लबात वागणूक  मिळणं हे तर होतंच पण भारतीयांचे कर्जबाजारी झाल्याची नामुष्की आणि म्हणून समाजाकडून आणखीच ताडलं जाणं हे देखील आहेच. स्त्रियांनी समारंभासाठी कपडे भाड्याने आणणं ही आपल्या नजरेला खूपच क्षुल्लक पण त्या समाजाच्या दृष्टीने चांगली घटना खचितच नाही.  आईबाप भारतात असताना  मुलांना ब्रिटनमध्ये नातेवाईकांकडे ठेवून त्यांचं शिक्षण करवणं, त्यामुळे वर्षानुवर्षं भावंडांच्या आणि आईबापांच्या भेटी न घडणं हासुद्धा त्यांच्या राहणीमानाचा एक भाग.  तसंच मिश्रवंशाची मुलं हे इंग्रजांच्या इथल्या वास्तव्याचं आणखी एक फलित. लेडी कारमार्थेनने चालवलेल्या  शाळेच्या निमित्ताने मालिका या मुलांचा प्रश्नही मांडते. सहसा इतिहासात हे सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय तुकडे विखुरलेले असतात, इथं त्यांचं एकत्रीकरण नाट्याला अधिक रंजक करतं.

आताचं सिमल्याचं इतकं आधुनिकीकरण झालंय की या मालिकेतलं सिमला चक्क मलेशियातल्या पेनांग इथं चित्रित करण्यात आलंय. जवळजवळ सर्व ठिकाणं त्यांना पूर्णत: नव्यानं उभारावी लागली आहेत. सुदैवाने त्यांना तिथे  भरपूर भारतीय लोक मिळाल्याने प्रसंग खरोखरी भारतात घडल्यासारखे वाटतात. मधून मधून पेरेलेले आणि मालिकेच्या सुरवातीला येणारे तबल्यावर वाजवलेले तुकडे तर अगदी चपखल.  

एकूणात मालिकेचं कथाबीज, मांडणी आणि सादरीकरण चांगलं असलं तरी काही त्रुटीही प्रकर्षानं जाणवतात. मालिकेचा पहिला भाग पाहताना अर्धावेळ नक्की काय चाललंय हे समजत नाही. सिमल्याला येणार्‍या रेल्वेतून खूप सारी पात्रं येतात. त्यांच्या व्यक्तिरेखा, परस्परसंबंध, कथेशी असलेला संबंध प्रयत्नपूर्वक समजून घ्यावे लागतात. पहिल्याच भागात आफरीन राल्फचं दोन-तीन नग्न स्त्रियांसोबतचं चित्र काढतो पण पुढच्या भागांत राल्फ हा स्त्रीलंपट असण्याचे किंवा त्याच्या प्रेमपात्रांखेरीज इतरजणींसोबत रमण्याचे असे काही संदर्भ येत नाहीत. मुळात ब्रिटीश हे शिष्टाचार नात्झी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ब्रिटीश राल्फचं  नोकरां/आफरीनसमोर प्रेयसीसोबत कुठेही समागम करणं किंवा कचकचून चुंबनं घेणं विसंगत वाटतं.  सिंथिया नेटिवांच्या अस्तित्वाची दखल घेणंच नाकारते.   पण राल्फ नोकरांना घरच्यांसारखी देत असलेली वागणूक लक्षात घेता हे थोडं विचित्र वाटतं. राल्फ आणि ऍलीस यांच्या जोडीसारखीच राल्फची प्रेयसी मॅडलीन आणि युजीन ही अमेरिकन बहिणभावंडांची जोडी. युजीन सिंथियाला भरीस पाडून मॅडलीन आणि राल्फचं प्रकरण जुळवतो. इतक्या उकाड्यातही हातमोजे घालण्यावरून ब्रिटीश बायकांच्या जेव्हा चर्चा चालत,  (फक्त चर्चा, कारण सगळ्याच जणी काही हातमोजे घालत नाहीत!) ही मॅडलीन मात्र नूडल स्ट्रॅप ड्रेसेस्‌ घालून फिरते हे‍ ही बरंच विसंगत.

 इकडे भारतीय वातावरणात आपली बाजारपेठ किंवा घरं दाखवताना जिकडेतिकडे उगीचच ’तोहफा’ सिनेमातल्यासारख्या साड्या सोडल्या आहेत.  मिशनरी ड्ग्लसची सहकारी लीना, खरंतर जन्मापासून भारतीयच. पण तिची साडी नेसण्याची ढब ही सिनेमात दाखवल्या जाणार्‍या वेश्यांची आठवण करून देते. याउलट आफारीनची प्रेयसी, त्याची बहीण किंवा आई (लिलिएट दुबे) यांचे  पेहराव व्यवस्थित पारशी आहेत.  खरंतर आफरीन स्वत:च (निकेश पटेल) हा दिसण्या-वागण्यातून पारशी वाटत नाही.  लीना सिंड्रेलाची कथा भारतीय करून सांगते, पण भूगोल शिकवताना मात्र इंग्लंड, आयर्लंड, स्कॉटलंड इत्यादी ठिकाणांचा शिकवते.

या सगळ्या त्रुटी असल्या तरी कथा आणि मांडणीमध्ये ’इंडियन समर्स’ सरस आहे यात वाद नाही. भारताचा स्वातंत्र्यलढा हा आपलाच इतिहास. सर्वसाधारण परदेशी मालिकांमध्ये एखादं भारतीय पात्र दिसण्याच्या काळात ही एक आख्खी मालिकाच आपल्या मातीसोबत नातं सांगत आलीय. संदर्भ, ठिकाणं आणि घटनाही आपल्या परिचयाच्या. अशा सर्व गोष्टींमुळे मालिका अगदी जवळची वाटते.  १९३२ च्या कालमानात चालू झालेली आणि कुणी एकच एक असा प्रस्थापित नायक नसलेली ’इंडियन समर्स’ ही मालिका १९४७पर्यंत भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये झालेली राजकीय उलथापालथ दाखवतेय.  एका बाजूने आपण इतिहास पाहिला, वाचला, ऐकला आणि शिकलाही आहेच. पाहूयात दुसर्‍या बाजूने यात आणखी काय दडलंय ते!!

 

इंडियन समर्स - चित्रपटाची /नाटकाची माहिती

इंडियन समर्स
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: चार्ल्स पेटिसन
  • कलाकार: ज्युली वॊल्टर्स, निकेश पटेल
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: 2015
  • निर्माता देश: -