मेन डोन्ट क्राय: (पिफ २०१८ उद्घाटनाचा सिनेमा ): भावनांची रोलर कोस्टर राईड

मी यावेळच्या पिफच्या उद्घाटनाचा सिनेमा 'मेन डोन्ट क्राय' पाहिला आणि गेल्या वर्षीचं वाक्य पुन्हा लिहायला लागणार आहे की " गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी उद्घाटनाचा सिनेमा, सिनेमाची किमान समज असणार्‍या सामान्य प्रेक्षकापर्यंत पोचायला कठीण जाऊ नये - मात्र अगदीच हॉलिवूडपटाइतका सोपा, ढोबळही नसावा - अशा बेताने तोल साधून निवडला गेला आहे." आता हे पुरेसं स्पष्ट आहे, की उद्घाटनाला 'टिंबक्टु'सारखे उत्तम कथासूत्र आणि पूर्ण वेगळ्या तऱ्हेची व दर्जाची मांडणी असणारे सिनेमे  उद्घटनालादिसणार नाही. अर्थात 'मेन डोन्ट क्राय' हा चांगला सिनेमा आहे  पण माझ्यासारख्या दरवर्षी पिफ-वारी करणाऱ्यांकडून मात्र आधीच्या काही वर्षांची तुलना होणे अटळ आहे.

असो. तर सिनेमाकडे वळण्याआधी 'युगोस्लाव युद्धा'बद्दल किंचित लिहितो. १९९०च्या दशकात तत्कालीन युगोस्लावियामध्ये अनेक अंतर्गत युद्धे झाली त्यातून धर्म/वंश यांच्या आधारावर काही राष्ट्रे निर्माण झाली. गंमत अशी की कागदोपत्री ही राष्ट्रे एका करारान्वये शांततेत झाली आहेत. कोणत्याही बाह्य देशाने थेट आक्रमण न केल्याने याला बराच काळ जगात युद्ध म्हणूनही गणले न जाता अंतर्गत यादवी समजले गेले. त्या दरम्यान या भागांतील समाजाने केवळ आर्थिक झळ सोसली नाही तर अपार जीवितहानी सोबत खूप निर्घृण प्रकारही झाले. त्यात वंशविच्छेदाचे प्रयत्न, वांशिक हत्याकांडे, बलात्कार अशी कृत्ये या भागात सर्रास घडत होती. त्यामुळे इतर कोणत्याही युद्धांप्रमाणे इथेही युद्धोत्तर काळ हा अनेकांसाठी नव्या राज्यांची सुरुवात न राहता नव्या जाणिवांमुळे स्वत:वर निर्माण झालेल्या नव्या भाराची सुरुवात होती.

बोस्नियन दिग्दर्शक 'ॲलेक ड्र्ल्जेविक' (Alec Drljevic) आपल्याला या सिनेमात एका पर्वतराजीने वेढलेल्या हॉटेलात घेऊन  जातो. सध्या सीझन नसल्याने हॉटेलमध्ये प्रवासी नसले तरी एका वेगळ्याच प्रकारच्या लोकांचा गट जमला आहे. एल 'स्लोवेनियन' थेरपिस्ट आठ 'युगोस्लाव् युद्ध' लढलेल्या सैनिकांसोबत एक प्रयोग करतोय. सुरुवातीलाच तो त्यांना सांगतो "की जरी युद्ध संपून २० वर्षे झाली असली तरी तुमच्यासाठी ते अजूनही संपलेलं नाहीये" (म्हणून या कौंसिलिंगची गरज आहे). यानंतर काही रक्कम मिळेल या करारावर हे वेगवेगळ्या देशांचे नागरिक  (तसेच वेगळ्या वंशाचे व धर्माचेही) या हॉटेलात एकत्र येतात. दररोच्या बोलण्यात एकेकाने आपली कथा सांगायची असते. शत्रू वंशाच्या वा धर्माच्या व्यक्तीसोबत रहायला लागल्याने कावलेले हे सारे एकेक करू आपली कथा सांगू लागतात. मग सुरू होतो या गटाचा थरारक प्रवास. यातील काही वंश व राष्ट्र एकमेकांचे शत्रू समजतात तर काहींनी इतिहासात एकमेकांवर जुलूम केले आहेत. हळुहळू एकेकाची कथा सगळ्यांसमोर येऊ लागते आणि सिनेमा आपल्याला भावनांच्या व नाट्याच्या "रोलर कोस्टर राइड"वर घेऊन जातो. या सिनेमात एकदाही युद्धाचा प्रसंग न दाखवता त्या दरम्यान घडलेले नृशंस प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतात.

यात सगळ्यात कमाल कलाकारांची आहे. कथेत यातील प्रत्येक जण युद्धात सहभागी झालेला आहेच; शिवाय आत खोलवर काहीतरी बराच काळ लपलेलं आहे. शिवाय आठ जणांची सैन्ये एकमेकांसमोर असल्याने यातील एकाचा अभिनय जरी कमी पडला असता तरी या सिनेमाची मजा कमी झाली असती. पण यातील आठही जण आपापली भूमिका चोख बजावतात. अतिशय 'समतोल आणि नेमका' अभिनय यातील प्रत्येकाने केला आहे. त्याच बरोबर संवाद लेखन हा या सिनेमाचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. पण त्याचं श्रेय संवाद लेखना इतकंच दिग्दर्शकाच्या प्रयत्नांना जातं कारण हा सिनेमा बनवायच्या आधी तो एक डॉक्युमेंट्री बनवत होता तेव्हा तो अशा खऱ्या व्हेटरन्सना भेटला होता. त्याला त्या भेटींचा या सिनेमात नक्की उपयोग झाला असणार. बाकी तांत्रिक अंगे, दिग्दर्शन जागतिक दर्जाचे आहे यात वाद नाही. 

मात्र या सिनेमात मला काय आवडले असेल तर तर त्यातील नाट्य. 'पुरुषार्थ' कशास म्हणावे याची व्याख्या स्थल-काळ-व्यक्ती सापेक्ष असते. या कथेतील हे आठही जण कोणत्या ना कोणत्या कारणाने स्वत:च्या कोणत्याशा कृतीबद्दल पश्चातापदग्ध आहेत. 'त्या नियत क्षणी' आपण घाबरलो आणि आपण पुरेसे 'पुरुष' नव्हतो हा सल जसजसा बाहेर येऊ लागतो तसतशी प्रत्येकाची पुरुषार्थाची व्याख्या आणि स्वत:च्या प्रतिमेकडून असलेली धीटपणाची कल्पना एकूणच पुरुषार्थातील कठोरपणाला ज्याप्रकारे ठिसूळ करत जातात ते अनुभवणे हा एक अविस्मरणीय अनुभव देऊन गेला. 

थोडक्यात काय तर एकदाही युद्ध न दाखवता, युद्धस्य कथा अजिबात रम्य नसतात हे स्वत:ला कितव्यांदा तरी मी पटवून घेतलं. आणि तुम्हाला संधी मिळाली तर अजिबात चुकवू नका.

मेन डोन्ट क्राय (२०१७) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

मेन डोन्ट क्राय (२०१७)
  • Official Sites:

    imdb
  • दिग्दर्शक: ॲलेक ड्र्ल्जेविक
  • कलाकार: -
  • चित्रपटाचा वेळ: ९७ मिनिटे
  • भाषा: -
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१७
  • निर्माता देश: -