कौल (२०१६): दुर्बोधतेला लिहिलेलं उत्कट पत्र
एखादी कलाकृती दुर्बोध आहे असं जेंव्हा लोक म्हणतात तेंव्हा ती कलाकृतीला दिलेली दाद असते का आम्हाला ती कलाकृती कळलीच नाही अशी आडवळणाने दिलेली कबुली असते ? मला वाटतं या दोन्ही शक्यता असतात. लोक म्हणतात ग्रेसच्या कविता दुर्बोध असतात, पण एका विशिष्ट रसिक वर्गात लोकप्रिय आहेतच. हीच बाब जीएंच्या काही कथांना आणि इंगमार बर्गमनच्या चित्रपटांना पण लागू पडते. दिग्दर्शक आदिश केळूस्करचा 'कौल ' हा दुर्बोध आहे हे एकदा मान्य केलं तर चित्रपटाला मिळणाऱ्या दोन टोकांच्या प्रतिसादाचा अर्थ हळू हळू लागायला लागतो. कौल व कौल पाहणारे प्रेक्षक आणि एका सुप्रसिद्ध लोककथेतला हत्ती व त्याच्याबद्दल अंदाज बांधणारे आंधळे यांच्यात विलक्षण साम्य आहे.म्हणजे गोष्टीतल्या आंधळ्यांप्रमाणे काही प्रेक्षकांना कौल हा उच्च अनुभूती देणारा चित्रपट वाटू शकतो, काही प्रेक्षकांना तो तांत्रिकदृष्ट्या सुपीरियर चित्रपट वाटू शकतो आणि let's be true काही लोकांना तो वेळेचा आणि पैशांचा अपव्यय पण वाटू शकतो आणि काही लोकांना निद्रानाशावरचा अक्सीर उपाय. मग मला 'कौल ' कसा वाटला ? मी मला चित्रपट पूर्ण कळला असा दावा नक्कीच करणार नाही. किबंहुना दिग्दर्शक आदिश केळुस्कर सोडून असा दावा किती लोक करू शकतील याबद्दल रास्त शंका आहेत. पण कौलने मला चित्रपट पाहण्याचा एक रसरशीत आणि जिवंत अनुभव दिला हे मात्र खरं. या चित्रपटाला चांगला किंवा वाईट ही विशेषण लावण्यापेक्षा वेगळा हे विशेषण लावणं अधिक योग्य ठरावे.
चित्रपटाची सुरुवात निश्तझे या तत्वज्ञाच्या एका कोट ने होते. निश्तझे त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ठार वेडा झाला होता. चित्रपटात वेडेपणाचे वारंवार उल्लेख नंतर येत राहतात हा योगायोग खचितच नसावा. 'शटर आयलॅण्ड ' मध्ये माणूस वेडा होतो म्हणजे नेमकं काय, किंवा वेड्या माणसाच उर्वरित जगाबद्दलच आकलन कस असेल अशा मूलभूत मुद्द्यांचा उहापोह केला होता. दोन्ही कलाकृतींचा पोत वेगळा असला तरी 'कौल ' त्यापुढे जाऊन प्रत्येक माणसाचं अगदी वेड्या माणसाचं जग हे त्याच्यासाठी तितकंच खरं असत अशी भूमिका ठामपणे मांडतो. संशयास्पद भूतकाळ असणारा कथेचा नायक कोकणातल्या एका निसर्गरम्य ठार खेड्यात आपल्यासारखाच हजारो निरर्थक गोष्टी करत जगत असतो. अतिशय निरर्थक गप्पा करणारा प्रिंसिपल, पेपरातल्या निरर्थक बातम्या वाचून दाखवणारा सहकारी, दशावतारात आयुष्याचा आनंद शोधणारे सहकारी, एक विटांपासून बनलेली गुहेसारखी खोली ह्या गोष्टी नायकाच्या छोट्या जगाचा भाग आहेत. पण एका उत्तररात्री एक म्हातारा त्याला माचीस मागण्याच्या निमित्ताने भेटतो आणि नायकाला एका अतींद्रिय अनुभवाची अनुभूती येते. म्हणजे हा अनुभव त्याच्यापुरता तरी अस्सल असतो. मग त्यामागची संगती लावण्यासाठी नायक पुन्हा त्या म्हाताऱ्याला भेटतो. तो म्हातारा वेडा म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असतो. नायकाची मानसीक स्थिती पण ढासळलेली आहे की काय असा प्रेक्षकांना तोपर्यंत संशय आलेला असतो. मग चित्रपटाचा पुढचा भाग प्रश्नोत्तरांचा आहे. नचिकेता यमदेवाला जीवन-मृत्यू याबद्दल जे मूलभूत प्रश्न विचारतो त्या प्रकारची प्रश्नोत्तर. वरकरणी हा दोन वेड्यांमधला संवाद वाटला तरी तो संवाद अनेक मूलभूत मुद्द्यांना स्पर्श करतो. ह्या संवादाचा पंचवीस ते तीस मिनिटाचा भाग चित्रपटाचा हायलाईट म्हणता येईल असा आहे. हा भाग प्रेक्षकांना गोंधळून पण टाकणारा आहे. संवाद /गाणे आणि त्यांना पडद्यावर सपोर्ट करणारी दृश्य अशा साच्याची आपल्या सगळ्यांना सवय आहे. पण इथे म्हातारा बोलत असताना पडद्यावर जी visuals दिसतात त्याचा मेळ अनेकदा लागत नाही. अर्थात ही प्रेक्षक म्हणून माझी वैयक्तिक मर्यादा. पण चित्रपट पूर्णपणे समजलाच पाहिजे हा अट्टाहास अनेकदा चित्रपटाचा आस्वाद घेण्याचा अनुभव बिघडवू शकतो. एखादं न उलगडणार कोड जस डोक्यात ठाण मांडून बसतो तशी कौलची काही दृश्य डोक्यात ठाण मांडून बसतात. हा चित्रपट जिगसॉ पझल सारखा आहे. पडद्यावरचे दोन तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणे ह्या मर्यादित हेतूने न बनवलेला एक दुर्मिळ चित्रपट.
हा चित्रपट जितका दिग्दर्शकाचा आहे तितकाच ध्वनी संयोजन करणाऱ्या रित्विक पाठक -पियुष शाह यांचा आहे. कल्लोळ, निरवता, अंगावर येणारी पक्ष्यांची कर्कश किलबिल, एका पावसाळी गूढ पहाटे धुकं चिरून जाणाऱ्या ट्रकचा 'धुम ' हॉर्न अशा ध्वनीच्या विविध छटा चित्रपटाला एका निराळ्या उंचीवर नेऊन पोहोंचवतात. अमेय चव्हाण यांची सिनेमॅटोग्राफी कोकणच्या गूढरम्य सौंदर्याला न्याय देते. चित्रपट चित्रित करताना आणि शॉट डिव्हिजन करताना चव्हाण आणि दिग्दर्शक आदिश केळुस्कर यांच्या चर्चांचं डॉक्युमेंटेशन झालं असेल (बिहाइंड द कॅमेरा सारखं काही ) तर ते कधीतरी प्रेक्षकांसमोर यायला पाहिजे. चित्रपट खूप चालावा अशी प्रत्येक निर्माता -दिग्दर्शकाची इच्छा असतेच. पण 'कौल 'हा चित्रपट तिकीटखिडकीवर लोकांची झुंबड उडेल अशा प्रकारातला नाहीये याची जाणीव चित्रपटाशी संबंधित लोकांना असेलच. मी जो शो पाहिला त्याला फारसे प्रेक्षक उपस्थित नव्हते. हा review येइपर्यंत बहुतेक चित्रपटगृहातून बहुतेक उतरलेला पण असेल. हे एक स्वतःला रसिक म्हणून घेणाऱ्या समाजाचे दुर्दैव.
'कौल' बद्दल हा चित्रपट चांगला आहे किंवा वाईट आहे असं एक सामान्य विधान करून त्याची वासलात लावता येणार नाही. ज्यांना तो चित्रपट मुळीच आवडला नाही अशा लोकांच्या अनुभवाचा आणि समजेचा पण आदर करायलाच हवा. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अनुभव आहे. 'कौल ' म्हणजे दिग्दर्शक आदिश केळुस्करने दुर्बोधतेला लिहिलेले एक सुंदर प्रेमपत्र आहे. बहुतेकांना ते आकळणार नाही काहीजण मात्र त्या दुर्बोधतेच्याच प्रेमात पडतील.
कौल (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
