द पॅशन ऑफ द ख्राइस्ट - मेल गिब्सन - २००४

थोडक्यात:

कुणीही कितीही प्रगती करा. माणसाच्या दु:खावरचा इलाज सापडलेला नाही आणि सापडणारही नाही. उदार मनाने केलेले क्षमा - ग्रेस - हेच त्या दुःखाचे एकमात्र उत्तर. जगभरातल्या सार्‍याच महात्म्यांनी आपल्या विलक्षण आयुष्यात या दुःखाला कवटाळण्याचा प्रयत्न केला आहे. घरदार फुंकून वार्‍यावर फिरणारा तुकाराम काय, आअणि मानवी भोगांनी व्याकूळ होऊन संन्यास घेणारा बुद्ध काय, त्यांच्या क्षमाशील नजरेमध्ये कित्येक दुर्दैवी जिवांनी आपल्या जिवाची तलखी शांतवली आहे.

याच महात्म्यांच्या जातकुळीतला येशू, अवघ्या मानवजातीच्या पापांची शिक्षा भोगत त्याने मरण आपलेसे केले. त्याच्या त्या मरणापूर्वीचे बारा तास चित्रित करणारा चित्रपट म्हणजे ’पॅशन ऑफ द ख्राइस्ट’.

पुढे:

या चित्रपटात कसलेही चमत्कार नाहीत. येशूची उपदेशवचने नाहीत. त्याचे माहात्म्य वर्णिलेले नाही. रूढार्थाने ज्याला गोष्ट म्हणता येईल असे काहीही या चित्रपटात नाही. येशूचे क्षमाशील तत्त्वज्ञान आणि त्यामागून जाणारे अनुयायी ज्यू धर्ममार्तंडांना सहन होत नाहीत. येशूला पाखंडी ठरवले जाते. जेरुसलेममधल्या रोमन राजप्रतिनिधीवर लोकमताचा दबाव आणून येशूला ’क्रूसिफाय’ करण्याची सजा फर्मावण्यात येते. येशू मात्र कसलाही बचाव न मांडता मरणप्राय यातना भोगत आपल्या क्रूसाचे ओझे वाहत टेकडीपर्यंत जातो. पशूलाच शोभेलशा निर्घृण क्रौर्यानिशी त्याला ठार केले जाते. एवढेच कथानक.  अंतिम सत्याचा साक्षात्कार झालेला माणूस कोणत्या पातळीवरचा शारीरिक छळ सोसू शकेल, ते येशूचा हा प्रवास दाखवून देतो. निरनिराळ्या आयुधांनिशी त्याच्यावर केले जाणारे अत्याचार, त्याचा मस्तकावर ठोकलेला काटेरी तारांचा मुकुट, त्याच्या जखमी खांद्यांवरूनच त्याने मरणस्थळापर्यंत वाहून नेलेला क्रूस - आाणि त्याचा हा छळ नि:शब्दपणे पाहणारे त्याचे अनुयायी आणि त्याची आई. त्याही परिस्थितीत आकाशातल्या बापापाशी या लोकांसाठी प्रार्थना करणारा येशू.

त्याला क्रूसावर ठोकले जात असते, तोवर तो तुमच्याआमच्यासारखा सर्वसामान्य पातळीवरचा माणूस असतो. एक चांगला, कनवाळू माणूस. पण माणूसच. त्याचा क्रूस जमिनीला लंबरूप उभा करण्यासाठी उचलला जातो आणि क्रूसासोबत वर वर उचलला जाणारा येशू बघता बघता क्षुद्र माणसांहून कितीतरी मोठा होत जातो.  हजार शब्दांनी साधले जाणार नाही, ते कॅमेर्‍याच्या या एका करामतीने साधले आहे. तशीच येशूची नजर. मरणाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्याची नजर धुंदावलेली नाही. कल्पनेतही सहन होऊ नयेत अशा यातना तो जिवंतपणी भोगतो आहे. पण काळजाचा ठाव घेणारी त्याची क्षमाशील, स्वच्छ नजर अखेरपर्यंत तशीच राहते. रक्तामांसाचा चिखल आणि त्याच्याशी संपूर्ण विरोधाभास साधणारी त्याची कनवाळू - पिंगट नजर. दृश्यात्मक विरोधाभासातून शब्दांच्या पलीकडचा परिणाम साधण्याचे हे अजून एक उदाहरण. आर्मेइक आणि लॅटीन भाषांमधले संवाद, उत्कट म्हणता येईलसे संगीत आणि मध्ययुगीन विचारसरणीचे जणू प्रतीकच असावा असा मंद पिवळसर उदासवाणा प्रकाश - यांमुळे हा अनुभव धारदार होतो. बाहेर पडताना मस्तक बधीर झालेले असते. येशूचे मरण आपण जणू त्याच्याबरोबरीनेच भोगलेले असते.

अशा प्रकारचे क्रौर्य पडद्यावर दाखवणे तसे धाडसाचेच. दाखवणार्‍याला त्या क्रौर्याचीच नशा चढते आहे की काय, असे वाटावे, इतके क्रौर्य. ते बीभत्सतेकडे झुकता कामा नये, तसेच अतिरेकापोटी अर्थहीनही होता कामा नये, ही मेल गिब्सनची कसोटीच होती. पण सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला दिलेले ‘U/AA’ प्रमाणपत्र दिले आहे. काही विषयांमधले गांभीर्य परिणामकारकपणे पोचवण्यासाठी भयप्रद हिंसा दाखवण्याची गरज असते हे सेन्सॉर बोर्डाने(ही!) मान्य करावे, ही या चित्रपटाच्या प्रामाणिक हेतूला आणि परिणामकारकतेला दिलेली सर्वात नेमकी दाद म्हणावी लागेल!

  • कलमवाली बाई

(pahawemanache@gmail.com)

 

द पॅशन ऑफ द ख्राइस्ट - चित्रपटाची /नाटकाची माहिती

द पॅशन ऑफ द ख्राइस्ट
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: मेल गिब्सन
  • कलाकार: जिम कॅविझल, मोनिका बेलुची, मारिया मॉर्गेस्टर्न, रिस्टो शोपॉ
  • चित्रपटाचा वेळ: १२२ मिनिटे / २ तास २ मिनिटे
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: http://www.boxofficemojo.com/movies/?id=passionofthechrist.htm
  • प्रदर्शन वर्ष: 2004
  • निर्माता देश: अमेरिका