कूडे (२०१८): प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट

रूपांतरणं होताना स्वतःचा एक वेगळा रंग, गंध, पोत घेऊन येतात. मूळ कलाकृतीला कुठेही धक्का न लावता ती पूर्णपणे वेगळ्या प्रतलावर साकारणं, ही फार कठीण गोष्ट आहे. त्यासाठी माध्यमाची उत्तम जाण तर हवीच, पण आपल्या मातीतल्या अनुभवांचंही गाठोडं पाठीशी हवं. दोन विभिन्न संस्कृतींमधली साम्यस्थळं शोधता यायला हवीत. फार वर्षांपूर्वी जेव्हा पुलंचं 'ती फुलराणी' वाचलं होतं, तेव्हाची त्याची प्रस्तावनाही ठळकपणे आठवते. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या 'पिग्मॅलियन' या मूळ नाटकाला कुठेही धक्का न लावता 'ती फुलराणी' साकार झाल्याचं प्रस्तावनेत म्हटलं होतं. नंतर कधीतरी रत्नाकर मतकरींचं 'जादू तेरी नजर' हे नाटक पाहिलं आणि मग शेक्सपिअरचं 'अ मिडसमर नाईट्स ड्रीम' वाचण्याची इच्छा झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्या इंजिनीअरिंग कॉलेजच्या लायब्ररीत ते मिळालं. मनात भीती होतीच, समजेल की नाही याची. पण कळलं. वाचताना जाणवत होतं, की मतकरींचं नाटक म्हणजे शेक्सपिअरच्या मूळ नाटकाला दिलेला ट्रिब्यूटच होता. हे सगळं आठवण्याचं कारण, म्हणजे अलीकडेच पाहिलेला मल्ल्याळम चित्रपट 'कूडे'.

सचिन कुंडलकरचा 'हॅपी जर्नी' हाच मुळात माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी एक. निरंजन-जानकी, जानकी-अजिंक्य, निरंजन-अॅलीस यांच्या परस्पर नातेसंबंधांचा सुंदर कोलाज या चित्रपटातून रेखाटला आहे. 'कूडे' म्हणजे सचिनच्याच कथेचं अंजली मेनन या हुशार दिग्दर्शिकेने केलेलं रूपांतरण. गोव्यात घडणारा चित्रपट उटीमध्ये जातो, तेव्हा संदर्भ बदलतात. निसर्गचित्रं बदलतात. निरंजनचा योशे होतो. जानकीची जेनी होते. ऍलिसची सोफी होते आणि अजिंक्यचा क्रिश होतो. मूळ कथेचा गाभा तोच राहतो, पण दोन्ही चित्रपट डोळ्यांचं पारणं फेडतात.

१५ वर्षांच्या योशेला घरच्या आर्थिक ओढाताणींमुळे आईवडील दुबईला काम करण्यासाठी पाठवतात. त्याची बहीण जेनी सतत आजारी. तो दुबईला असताना जेनीचा मृत्यू होतो आणि योशेला घरी परतावं लागतं. परतल्यावर तो स्वतःचा शोध घेऊ लागतो आणि आपल्या प्रेयसीसह - सोफीसह - आयुष्य जगण्याचं कधीकाळी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतो. जेनीच्या प्रियकराबाबत - क्रिशबाबत - जेनीच्या मनात असलेल्या हळुवार भावनांचीही तो क्रिशला जाणीव करून देतो. आपल्या फुटबॉल कोचला - अश्रफलाही तो भेटतो आणि म्हातारपणात एकट्या पडलेल्या त्याची सोफीच्या मदतीने व्यवस्था लावून देतो.

'हॅपी जर्नी' बऱ्याचदा पाहिल्यानंतर 'कूडे' पाहत असल्यामुळे साम्यस्थळं शोधणं आपोआपच घडत होतं. पण सचिनने ज्या जागा जाणूनबुजून धूसर ठेवल्या आहेत, त्यांवर प्रकाशझोत टाकण्याचं काम अंजली मेनन यांनी उत्तमरीत्या केलं आहे. 'कूडे' कथा सांगताना कुठेही घाई करत नाही. कथेतला प्रत्येक पदर तो शांतपणे, विस्तृतरीत्या उलगडून दाखवतो. त्यामुळे चित्रपटाची लांबी वाढली असली, तरी तो कुठेही रटाळ होत नाही. निरंजनचं बालपण जे 'हॅपी जर्नी'मध्ये झरझर सरून जातं, ते 'कूडे' मध्ये अधिक विस्ताराने येतं. योशेचा नातेवाईक त्याला दुबईला न्यायला येतो, तेव्हाचा एक लहानसा प्रसंग आहे. लहानग्या योशेच्या खांद्याला तो माणूस नकोसा स्पर्श करतो. घरच्यांना निरोप देण्याच्या क्षणी ट्रेनमध्ये चढल्यानंतर योशेला झालेला तो स्पर्श त्याच्या आयुष्यात तिथे काय वाढून ठेवलं आहे, हे एका सेकंदात कुठल्याही संवादाशिवाय सांगून जातो. योशेबरोबर पळून गेल्यानंतर इतके दिवस सोफीचे बांधलेले केस ती मोकळे सोडते, हे तिच्या स्वातंत्र्याचं रूपक फार सुंदरपणे समोर येतं.

अॅलीस आणि निरंजनची प्रेमकथा, जानकीचं अजिंक्यवर असलेलं अव्यक्त प्रेम, या गोष्टीही 'हॅपी जर्नी'मध्ये फार संक्षेपाने येतात. 'कूडे'मध्ये योशे सोफीच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिला पळवून नेतो, हा भाग तर विस्ताराने येतोच, पण क्रिश आणि जेनीची अल्लड वयातली प्रेमकथाही फार सुंदररीत्या आणि सगळ्या बारकाव्यांसकट समोर येते. 'कूडे'मध्ये 'हॅपी जर्नी'पेक्षा व्यक्तिरेखांचा पसारा जास्त असूनही बांधीव पटकथेमुळे तो कुठेही फसत नाही. याचं श्रेयही अंजली मेनन यांचंच. 'हॅपी जर्नी'ची सिनेमॅटोग्राफी रंगराजन रामबद्रन यांची, तर 'कूडे'चा कॅमेरा लिटिल स्वयम्प यांचा. पण दोन्ही चित्रपटांना एका ओल्या, दमट, रोमँटिक वातावरणाचा स्पर्श जाणवतो. डोळ्यांना सुखावणाऱ्या असंख्य फ्रेम्स दोन्ही चित्रपटांत आहेत. 'हॅपी जर्नी'मधलं करण कुलकर्णीचं संगीत आणि 'कूडे'मधलं रघू दीक्षित आणि एम. जयचंद्रन यांचं संगीत दोन्ही चित्रपटांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं.

प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, पल्लवी सुभाष आणि सिद्धार्थ मेनन या सर्वांनीच 'हॅपी जर्नी'मध्ये उत्तम अभिनय केला होता. 'कूडे' अभिनयाच्या बाबतीत किंचितसा उजवा ठरतो. झुबिन या बालकलाकाराने छोट्या योशेचं भावविश्व उत्तम साकारलं आहे. नझरीया नझिम या गुणी अभिनेत्रीने जेनीची हॅपी-गो-लकी व्यक्तिरेखा छान वठवली आहे. क्रिशच्या भूमिकेत रोशन मॅथ्यूही गोड दिसलाय. अतुल कुलकर्णी यांनी कोच अश्रफ उत्तम साकारलाय. पण खरी कमाल केली आहे पृथ्वीराज सुकुमारन आणि पार्वतीने. योशे आणि सोफीच्या शांत, संयत व्यक्तिरेखा दोघांनी ज्या तन्मयतेने भूमिकेशी एकरूप होऊन रंगवल्या आहेत, त्याला खरंच तोड नाही. अतुल कुलकर्णीच्या निरंजनपेक्षा पृथ्वीराजचा योशे अधिक भावतो. इतर सर्व कलाकारांचाही अभिनय उत्तम. रणजित आणि माला पार्वती यांनी योशेच्या आईवडिलांची हतबलता उत्तम साकारली आहे. थोडक्यात सचिनच्या मूळ कथेला अंजली मेनन यांच्या पटकथेने आणि दिग्दर्शनाने चार चाँद लावले आहेत

कूडे (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

कूडे (२०१८)
  • Official Sites:

    imdb
  • दिग्दर्शक: अंजली मेनन
  • कलाकार: नझरीया नझिम, पृथ्वीराज सुकुमारन, रोशन मॅथ्यू
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: -
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१८
  • निर्माता देश: भारत