मंटो (२०१८): एक तरल सिनेमा
शालेय वयात फाळणी या विषयावर "'गाड्याच्या गाड्या कापल्या" आणि हे म्हणजे "गांधींचं पाप" याव्यतिरिक्त आसपासच्या कोणी काहीही सांगितलं नव्हतं. त्यामुळे बालसुलभ सोपेकरणातून फाळणी म्हणजे 'जमिनीच्या' झालेल्या तुकड्यांबद्दला खंत करत, एखाद्या चर्चेत गांधीजींना व्हिलन ठरण्याचा सोपा मार्ग पत्करून शालेय वयापुरता तो चॅप्टर बंद केला होता. सुदैवाने पुढे वाचन वाढल्यावर राजकीय मतांत बदल झाले. मात्र तरीही फाळणी ही एक वाईट गोष्ट होती या पलिकडे फार संबंध नव्हता. कॉलेजमध्ये गेल्यावर, तोवर केवळ गप्पांत किंवा गोष्टींत आडून भेटणारी फाळणी, दोन लेखकांमुळे माझ्यासाठी पुन्हा सरसरून वर आली आणि मला हादरवून गेली; ते लेखन म्हणजे खुशवंत सिंग (ट्रेन टु पाकिस्तान) आणि 'सादत हसन मंटो' यांच्या कथा.
'मंटो'ची मी वाचलेली पहिली कथा म्हणजे "खोल दो". त्या कथेने जो आघात केला तो खूप खोलवरचा आहे. माझ्यासाठी ती कथा फाळणीशी कायमची जोडलेली आहे. ती कथा वाचल्यावर अंगावर त्या वयात आलेला काटा, आज त्यानंतर कितीतरी वाचिक आघात सोसूनही तितकाच टोकदार आणि खरा आहे. त्यानंतर यथावकाश त्याच्याच इतरही कथा वाचल्या पण या कथेने केलेला परिणाम वेगळाच!
या सगळ्या पार्श्वभुमीमुळे 'मंटो' हा सिनेमा बघायला जाताना एक वेगळी धाकधुक होती. मंटोचं आयुष्य त्याच्या कथांइतकंच दुःखाने भरलेलं आहे. त्यामुळे त्याच्या कथा आणि स्वत: मंटोची शोकांतिका सिनेमात कशी उतरते, याची खूप उत्सुकता होती. मंटोचं अचानक पाकिस्तानला निघून जाणं, त्याची व्यसनाधीनता, तेव्हाची एकूणच समाजात असणारी नैतिकता वगैरे अनेक बाबी सिनेमात येणं आवश्यक होतंच पण त्याचबरोबर मंटो हा लेखकाव्यतिरिक्त - त्याच्या बाहेर- असलेला निव्वळ माणूस म्हणून समोर येणं माझ्यासाठी नवं होतं.
"मंटो" ही गुंतागुंतीची फिल्म आहे - ती असणारच होती कारण मंटो गुंतागुंत असलेला आहे. मात्र ही गुंतागुंत सिनेमात तितक्याच प्रभावीपणे येते. मला सगळ्याच आघाड्यांवर हा सिनेमा आवडला. नवाजुद्दीन सिद्दिकीने उभा केलेला मंटो प्रत्यक्ष मंटोच्या किती जवळ होता हे माहीत नाही पण माझ्या डोक्यातील मंटोच्या प्रतिमेच्या तो खूपच जवळ जाणारा होता. अभिनयाच्या दृष्टीने इतर अनेक पात्रं चमकदार काम करून जातात पण नवाजुद्दीन सिनेमा पुर्णतः व्यापून आहे.
या सिनेमाच्या पटकथेवरही खूप मन लावून काम केलं आहे हे सतत जाणवतं. मंटोचं सुरवातीचा इस्मत चुगताई वगैरे मित्र परिवार, त्यांच्यातील साहित्यिक खुसखुशीत गप्पा, मंटो - इस्मत नातं, मंटो-श्याम नातं, मंटोचं मुंबईचं नातं, फाळणी, मंटोच्या मनात असलेली भिती, त्याने भारत सोडायचा घेतलेला निर्णय, त्याचं पाकिस्तानातील वास्तव्य, त्याच्या कथेवर चालणारा खटला, त्याची व्यसनाधीनता या सगळ्या आयामांना हा सिनेमा एकीकडे कवेत घेत असतोच, त्याच बरोबर त्याच्या सर्वात महत्त्वाच्या पाच कथाही आपल्यासमोर पेश होतात. पटकथेसोबतच "डर इस बात का नही की मुझे वो मारेगा या मारना चाहता है, डर ये है की मै भी ऐसे न सोचने लगु. हम उनसे अलग थोडेही है?" असे न विसरता येणारे संवाद या सिनेमात सर्वत्र पसरले आहेत.
हा सिनेमा 'बायोपिक' आहेच पण त्यासोबत एक पिरियड फिल्म आहे याचे भानही सुटत नाही. मरीन ड्राइव्ह वरचे जुने दिवे असोत किंवा लाहोरच्या गल्ल्यांवरील दुकानांच्या पाट्या असोत, जुन्या विंटेज गाड्या असोत किंवा लहान बाळांना दूध पाजायची बाटली असो काळाचं भान कुठेही सुटत नाही. वेषभूषा, केशभूषा इथपासून ते दारूची असोत किंवा चपलांची दुकानं असोत सर्वत्र त्या काळाची वैशिष्ट्ये भरून आहेत. पात्रांच्या बोलण्यातही तत्कालीन ताज्या लेखनाचे, सिनेमाचे संदर्भ येतात, गल्ल्यांमध्ये बरोबर त्या वर्षी रिलीज झालेल्या सिनेमाची पोस्टर दिसतात, रेडियोवरही लागणारी गाणी त्या काळात नेणारीच असतात.
अभिनय, लेखन, रंगपट वगैरे तांत्रिक बाजू बळकट असण्यासोबतच मंटोची शोकांतिका आपल्यासमोर अतिशय नजाकतीने उलगडण्याचे काम नंदिता दास हिने दिग्दर्शक म्हणून मोठ्या ताकदीने केले आहे. आजवर केवळ कथांमधून किंवा चरित्रात्मक लेखांमधून मंटोची एक प्रतिमा डोक्यात उभी राहिली होती. या सिनेमाने त्या प्रतिमेला एक ठोस चेहरा दिला आहे. मंटो जाणण्याच्या प्रवासात हा सिनेमा महत्त्वाचा ठरेल हे नक्की!
मंटो (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
