मसान (२०१५) - सामाजिक स्थित्यंतराचे प्रभावी चित्रण

काही चित्रपट समीक्षकांचीच परीक्षा घेतात. म्हणजे ते कळण्यास कठीण असतात म्हणून नव्हे तर त्या चित्रपटात बुडी मारल्यावर समोर जे काही दिसतंय- त्यातून जे जाणवतंय- ते शब्दांत नेमकं पकडणे अधिकच त्रासाचं असतं. या चित्रपटातील चित्र बोलतात, दृश्य बोलतात, संवाद बोलले जातात, अतिशय हृद्य कथा असते, एकूण चित्रपटही काही ठाम विधान करतो पण एखाद्या डोंगरावर फिरताना भोवतालच्या ढगांतून चालावं, नी हळूहळू पूर्ण चिंब व्हावं पण नक्की कसे नी कधी भिजलो हे शब्दांत सांगता येऊ नये तशी आज माझी स्थिती 'मसान' (मराठीत अर्थ मसण किंवा स्मशान) हा चित्रपट बघून झाली आहे.

इंग्रजीत एक म्हण आहे 'एलिफंट्स डोन्ट लीप' अर्थात मोठे अजस्त्र हत्ती कधीही अचानक झेप घेऊ शकत नाहीत. भारतीय समाजही या हत्तीप्रमाणेच आहे. भवताल बदलतोय, वाढते शिक्षण, सोयी सुविधा, इंटरनेट आदी घटक आपापला परिणाम समाजावर करत आहेतच. मात्र समाज त्या वेगात कधीच बदलत नाही. नव्या जाणिवा, शिक्षण, माहिती जुनी मूल्ये मोडत असतात, नवी व्यवस्था घडवत असतात पण हे घडणे क्षणात होत नाही. एकाच वेळी एकाच समाजात अनेक परस्परविरोधी प्रवाह असतात. काही काळाच्या पुढे गेलेले तर काही काळापेक्षा मागेच रुतलेले. भारतीय समाजातील नव्या पिढीची मूल्यव्यवस्था विविध कारणांनी कूस बदलत आहे. हत्ती कात टाकतो आहे. नवी मूल्यव्यवस्था येतेय, नवा समाज घडतोय पण या नव्या पिढीला आपली वाट जुन्या बुरसटलेल्या, काहीश्या भाबड्या परंतू वेगवेगळ्या स्तरावरील दांभिक व्यवस्थेतून काढायची आहे. हा दोन स्थितींमधील स्थित्यंतराचे, संघर्षावस्थेचे प्रभावी चित्रण म्हणजे 'मसान'

प्रत्येक प्रभावी दिग्दर्शकाला चित्रपटांची कथा हा जरी चित्रपटाचा आत्मा वाटत असला/नसला, तरी दिग्दर्शकाला जे म्हणायचंय त्यासाठी निवडलेली कथा हा चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग असतो. कथेलाही आपली एक चौकट असते, एक भवताल असतो, एक दिशा असते. त्यामुळे प्रत्येकवेळी एकच एक कथा निवडून त्यात दिग्दर्शकाला जे म्हणायचंय त्याचे सगळे पदर येतीलच याची खात्री नसते. या चित्रपटासाठी दोन समांतर वाहणार्‍या नेमक्या कथा निवडून आपल्या पहिल्याच चित्रपटात 'नीरज घायवान' या दिग्दर्शकानं आपली वेगळेपण दाखवले आहे. हे वेगळेपण दोन कथांपर्यंतच मर्यादित नाही, तर त्या कथांच्या मांडणीत, हाताळणीत कमालीचे कसब आहे. खरंतर या मराठी दिग्दर्शकाने, हा हिंदी चित्रपट बनवताना बनारसमधील जीवनाचे इतके वास्तववादी चित्रण केले आहे की त्यातूनच त्याने चित्रपट बनवण्याआधी केलेला गृहपाठ व्यवस्थित दिसतो.

यातील पहिली कथा आहे देवी (रीचा चढ्ढा) या मुलीची. चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा रीचा ही कॉलेजवयीन मुलगी आपल्या संगणकावर पॉर्न बघत असते. एक मिस्ड कॉल येतो आणि स्वतःला सावरत ठामपणे ती बाहेर पडते. एका सार्वजनिक शौचालयात ती कपडे बदलून साडी नेसते, डोक्यावर टिकली लावते. पुढच्याच शॉटमध्ये एक तरुण तिला भेटतो. तोही जरा 'बन ठनके' आलेला असतो. दोघांची घालमेल म्हणा, थरार म्हणा त्यांच्या शारीर अभिनयातून नेमका पोचतो. एका साध्याशा हॉटेलात ते नवविवाहित जोडपे असल्यासारखे एक रूम घेतात आणि काही क्षणांत ते एकमेकांच्या मिठीत असतात. त्यांच्या आवेगाचा पुढला अध्याय सुरू होतो न होतो तोच दारावर एक जरबेची थाप पडते. देवीचा पार्टनर घाबरून लगेच कपडे घालणार त्याधीच पोलीस आत येतात आणि ती "रेड" घातल्याचे सांगतात. पोलिस तिचे नग्नावस्थेतले चित्रणही करतात तर तो मुलगा बाथरूममध्ये लपतो. जेव्हा ते बाथरूमचे दार फोडतात तेव्हा पोलिसांच्या भितीने त्या मुलाने नस कापून घेतलेली असते. त्यानंतर सुरू होतो तो देवीचा आणि बनारसमधील तिचे वडील विद्याधर पाठक (संजय मिश्रा) यांचा समाजव्यवस्थेशी, पोलिसांशी अविश्रांत झगडा. नेमका त्या मुलाचा मृत्यू होणे, पोलिसांनी हे प्रकरण बाहेर न येण्याची खबरदारी म्हणून ३ लाख रुपयांची केलेली मागणी, अश्या घटनाक्रमानंतर एकेकाळी प्राध्यापक असलेल्या या बापाने मुलीच्या आणि स्वत:च्या 'लज्जारक्षणार्थ' केलेला पैशाचा पाठलाग, आणि त्याच वेळी स्वतः देवीचा समजाची, स्वतःची सुरू असलेला झगडा अश्या अंगाने ही कथा पुढे सरकते.

दुसरी कथा आहे दीपक (विकी कौशल) या तरुणाची. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. मित्रांच्या घोळक्यातला एक नेहमीचा चेहरा. त्याच्या एका मित्राला एका मुलीला भेट द्यायच्या निमित्ताने त्याची भेट त्या मुलीची मैत्रीण शालू गुप्ता (श्वेता त्रिपाठी) हिच्याशी होते. काही वेळातच आपल्यासमोर सुरू होते एक गोड गुलाबी प्रेमकथा. एकमेकांशी परिचय करून घेण्यासाठी सायबर कॅफेत जाऊन आधी फेसबुक वरून शोधलेले नाव, त्यानंतर स्वतः फेसबुक खाते बनवून तिची करून घेतलेली ओळख, तिला भेटण्यातून उमलणारे त्यांचे नाते, (यातील एका प्रसंगात फुग्यांचा वापर फारच सुरेख केलाय) काही धाडसी प्रसंग, अधिक जवळीक आल्यावर घेतलेले पहिले चुंबन, त्याचा थरार, असा अतिशय हळुवारपणे कथेचा एकेक पदर उलगडतो. यात मेख अशी असते की शालू 'गुप्ता' असते तर दीपक बनारसमधील एका घाटावर मसण उपसण्याचा, प्रेतांची विल्हेवाट लावण्याचा खानदानी धंदा असणार्‍या कुटुंबातील असतो. परंपरेने हे काम त्यांचे कुटुंबीय करत असले तरी आपल्या मुलाने शिकून लवकर यातून बाहेर पडावे असे बापाला वाटत असते. या सगळ्यात शालू आपल्याशी संबंध ठेवेल का? या असमंजसासह कथा पुढे सरकते. पुढे शालू त्याला होकार देते. त्याला चांगली नोकरी मिळाल्यावर, वेळ पडल्यास घरातून सोडून पळून यायचीही समंजस तयारी दाखवते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते. एक अपघात दीपकचे सगळे आयुष्यच बदलून टाकतो. पुढे त्याची कथा असे काही वळण घेते की दीपकच्या आयुष्याची दशा आणि दिशा दोन्ही बदलण्याच्या सीमेवर येऊन ठेपतात.

दोन्ही कथांत पुढे काय होते हे चित्रपटात पाहणे योग्य. मात्र या निमित्ताने दिग्दर्शकाने दाखवलेले समाजातील बदलांचे प्रतिबिंब असामान्य आहे. समाजातील बारीक सारीक बदल अत्यंत नजाकतीने एकेक पापुद्रा उलगडत समोर येतात. मुळात दोन सज्ञान व्यक्तींनी एका खाजगी खोलीत शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा नसताना जणू काही हे त्यांचे सांस्कृतिक कर्तव्य आहे अशा थाटात पोलिसांचे त्यांच्यावर तथाकथित "रेड" घालणे, आणि त्यात भवतालच्या कोणालाच - अगदी देवीच्या बापालाही -पोलिसांची चूक न वाटणे, थोर्थोर संस्कृतीची रक्षा करण्याचे ओझे एकट्या स्त्रीवर येऊन पडणे, नुसती रेड नाही तर तिचे चित्रण करून यूट्यूब वर टाकायची धमकी देत बापाकडून पैसे उकळणारा पोलीस, अगदी लहान दुकान असूनही यूट्यूब आदी गोष्टी विद्याधराला माहिती असणे, वेळ आल्यावर लोकांना धर्मज्ञान देणार्‍या विद्याधरने एका लहानग्याच्या मदतीने गंगेतून नाणी काढण्याचा जुगार खेळणे अश्या अनेक लहान मोठ्या प्रसंगांतून कथेवर पकड जराही ढिली न करता ही कथा ज्या अवकाशात घडते ते अवकाश, तो भवताल, तो काळ आणि तो समाज मोठ्या ताकदीने उभा राहतो. त्याच वेळी त्याच समाजात असलेली जातिव्यवस्था, शिक्षणाने एकूणच परिस्थितीत घडवलेला बदल, तंत्रज्ञानाने माणसांत आणलेली जवळीक, आणि एकीकडे या आधुनिकतेसह वाढलेल्या नव्या पिढीला एका मर्यादेहून जुन्या मूल्यांचे ओझे वाहायचे नसणे आदी गोष्टी दुसर्‍या गोष्टीद्वारे समोर येतात. दोन्ही गोष्टी त्याच अवकाशात, त्याच काळात अगदी त्याच शहरात घडत आहेत. त्या एकत्रितपणे एक मोठा कॅनव्हास एकत्र चितारतात.

कथेव्यतिरिक्त दोन्ही मुख्य पात्रांचे (रीचा चढ्ढा व विकी कौशल) यांनी चोख भूमिका केल्या आहेत. अतिशय बोलके चेहरे, नेमकी संवाद फेक, प्रकाश व कॅमेराचे उत्तम भान, नैसर्गिक व सहजपणे असलेला वावर आश्वासक आहे. संजय मिश्राजी नेहमीप्रमाणे व अपेक्षेनुसार खणखणीत! शालू गुप्ताच्या भूमिकेतील 'श्वेता त्रिपाठी' हिनेसुद्धा गरजेप्रमाणे गोड अभिनय केला आहे. देवी काय किंवा शालू काय दोघीही नव्या काळातील लहान शहरांतील सुशिक्षित व स्वतंत्र जाणिवा असलेल्या मुली मोठ्या ताकदीने उभ्या राहतात. 'निखिल सहानी' नावाच्या लहान छोकर्‍याने 'झोन्टा'ची - विद्याधरकडे वरकामाला असलेल्या लहान मुलाची - भूमिका या मोठ्या कलाकारांच्या तोडीस तोड साकारली आहे. पोलीस इन्स्पेटरच्या भूमिकेत 'भगवान तिवारी' यांनीदेखील लक्षात राहणारे काम केले आहे. या शिवाय या चित्रपटांत दिसणारे बनारस यावर एक वेगळा लेख लिहावा लागेल. तो मी लिहेनच कधीतरी.

दुर्दैवाने या चित्रपटात दाखवलेल्या काही पारंपरिक गोष्टी समाजात इतक्या खोलवर रुजल्या आहेत की या चित्रपटाचा आशय समजून घेण्यास प्रत्येक जण तयार आहे की नाही अशी शंका मला याच प्रेक्षागृहातील इतर वयाने ज्येष्ठ प्रेक्षकांच्या आपापसातील संवादांतून, इतकेच नाही तर वृत्तपत्रांतील काही परीक्षणे वाचूनही आली. "देवी व तिच्या मित्राने हॉटेलात जाऊन शारीरिक संबंध ठेवण्याची 'चूक' केल्याचा काय परिणाम होतात..." अश्या अर्थाची वाक्ये त्या बोलण्यात/परीक्षणांत येतात. तेव्हा इतका चित्रपट बघूनही, या चित्रपटाने मुळात 'चूक काय बरोबर काय' या पातळीवरच झालेला बदल टिपणे जर समीक्षकच समजून घ्यायला तयार नसतील तर सामान्य लोक असा चित्रपट किती खुल्या दिलाने व डोक्याने बघतील याची शंकाच आहे.

बाकी, 'गँग्स ऑफ वासेपुर' आणि 'अग्ली'मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केल्यावर 'नीरज घायवान' यांनी आणलेला हा पहिलाच चित्रपट म्हणजे एक आवर्जून घेण्यासारखा अनुभव आहे. त्यातील दिसणारे पूर्णतः वेगळे बनारस वगैरे तर आहेच, त्याशिवाय अनेक बारकावे (जसे शालूने दुकानातून 'राग दरबारी' निवडणे तर दीपकने इंजिनियरिंगचे चौथ्या वर्षाचे पुस्तक इत्यादी), काही संवाद, ध्वनी यांची रंगत हा चित्रपट चित्रपटगृहात बघूनच येईल असे वाटते. परंपरा आणि आधुनिकता यांच्या घुसळणीत सध्या दांभिकतेचा एक चिखल झाला आहे. या कथेत पारंपरिकतेच्या बुरख्याआड लपलेले बनारस हे या दांभिकतेच्या जुनाट चिखलात लडबडलेल्या एका काळाचे - एका आचके खाणार्‍या मूल्यव्यवस्थेचा मसणवटा अश्या अर्थाचे - प्रतीक दाखवले आहे असे वाटत जाते. पुढे यातील दोन महत्त्वाची स्वतंत्र विचारांची आधुनिकतेकडे प्रवास करणारी खुल्या विचारांची पात्रे बनारस सोडून अलाहाबादच्या नव्या संगमाकडे जाणारे दाखवल्यावर तर मसान (अर्थात मसण) हे नाव अधिकच सार्थ वाटते.

कान्स चित्रपट महोत्सवात 'फ्लाय अवे सोलो' असे इंग्रजी नाव घेऊन प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन पारितोषिके जिंकणे अगदीच स्वाभाविक आहे.  कुमार गंधर्वांनी गायलेला कबीराचा 'उड जाएगा हंस अकेला' हा अभंग नीरजला आवडतो. त्यावरूनच सिनेमाला 'फ्लाय अवे सोलो' हे नाव द्यावं असं त्याने ठरवलं. तेव्हा या चित्रपटावरील समीक्षेला त्याच अभंगातील एक कवन नेमके ठरावे:

जब होवे उमर पूरी
जब छुटेगा हुकम हुजूरी
यम के दूत बडे मजबूत
यम से पडा झमेला ।।

उड जायेगा हंस अकेला
जग दर्शन का मेला ।।धृ.।।

मसान - चित्रपटाची /नाटकाची माहिती

मसान
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: नीरज घायवान
  • कलाकार: संजय मिश्रा, रीचा चढ्ढा, विकी कौशल, श्वेता त्रिपाठी, भगवान तिवारी
  • चित्रपटाचा वेळ: १२९ मिनिटे
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१५
  • निर्माता देश: भारत