नितळ - २००६

स्पॉयलर अलर्ट:- पुढील लेखनावरून थोडीफार कथा कळते

 

बाह्यदर्शनी आधुनिक वाटणारे खरोखरी विचारांनीही आधुनिक असतील याची शाश्वती नसते. मुळात मनुष्य हा बरेचदा सोयीस्करपणे दांभिकतेने वावरणारा प्राणी आहे. किंवा कधी कधी असं होतं की आपले स्वत:चे हितसंबंध खूप नाजूकपणे अडकलेले असतील तर कळतं पण वळत नाही अशीही परिस्थिती येते. कारण काहीही असो, काही लोक दुटप्पी वागतात आणि बरेचदा याच कारणामुळे लोकांबद्दल केलेले अंदाज हमखास चुकतात.

नीरजा ही बेंगलोरमधल्या एका हॉस्पिटलात काम करणारी हुशार नेत्रतज्ञ आहे. तिथेच काम करणार्‍या अनन्यचं आणि तिचं एकमेकांवर प्रेम आहे पण काही कारणाने त्यांचा इजहार-ए-मोहब्बत अजून झाला नाहीय.   त्याच्या आजीच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी सेकंड ओपिनियन अधिक तिला घरच्यांना भेटवणं अशा हेतूने तो तिला घरी बोलावतो. ती घरी येण्याआधी उपवर मुलाची मैत्रिण येणार म्हणून उत्साहात फेसाळणारं घर तिच्या अंगावरचे डाग पाहून शांत होतं.

अनन्यचे घर मोठे. कुटुंब मोठं उच्चविद्याविभूषित, तसेच समाजात चांगलेच स्थान असलेलं. आजोबा-आजी, आई-बाबा, काका-काकू व त्यांची दोन मुले, एक विधवा काकू-तिची मुलगी आणि एक अविवाहित आत्या असा याचा हा परिवार. मधल्या पिढीचा तिला नकार. मोठ्या घरात अंतर्गत मतप्रवाह, एकमेकांशी असलेले विसंवाद हळूहळू जाणवतात. हे सगळे लोक खरेतर वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघड्णीतून आलेले आहेत. प्रत्येकाची एक ठाम विचारांची बैठक आहे आणि त्यांच्या लेखी-त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहेत. तरी या खरंतर कोड नसलेल्या, जगाच्या लेखी सुंदर, सुशिक्षित व प्रतिष्ठित हे सगळं बाहेरून दिसणार्‍या लोकांमध्येही काही खूप चांगलंच चालेलं आहे असं नाही. त्यामुळे उत्तम आयुष्याचे हे निकष नव्हेत.  ’उस डोंगा परि रस नाही डोंगा’ उक्तीप्रमाणे या सर्वांच्याही पलीकडे मन चांगलं असायला हवं. नीरजाचं बाह्यरूप डोळ्यांच्या आजारामुळे न दिसणार्‍या आजीला तिच्या मनाचं सौंदर्य दिसतं. ’मुक्ता’ मध्येही मधल्या पिढीपेक्षा आजोबा अधिक समंजस आणि नव्या विचारांना मानणारे दाखवले होते. तसेच इथेही जुनी पिढी वयाबरोबर प्रगल्भ होत नवे बदल स्वीकारायला तयार दिसते व नवी पिढी अधिक विज्ञानाभिमुख होऊन हे सर्व चटकन स्वीकारते.

फ्लॅशबॅक्स मधून जाणवतं की तिला तिच्या कोडामुळे बरेचदा त्रास सहन करावा लागला आहे. आताही घरच्यांच्या आडून आडून विरोधामुळं अनन्यचं तिच्यासोबतचं वागणं बदललंय. किशोर कदमचं पात्र म्हणावं तर अस्थानी , म्हणावं तर तिला अनन्य नाही मिळाला तर तिला आयुष्यात दुसरा जोडीदार मिळू शकतो हे दाखवणारं. पण तो  आदिवासींसाठी समाजकार्य करतो इथं पर्यंत ठीक आहे. तो मागासवर्गीयच कशाला असायला हवा हे कळालं नाही.  पण तिने त्याला अखेरचं हो म्हणेपर्यंत चित्रपटाचा सुखांत शेवट येतो आणि ते घडत नाही.

नीरजाच्या त्वचेमधले व्हाईट पिगमेंटस कमी झाल्यामुळे तिच्या अंगावर , विशेषत: चेहर्‍यावर हे पांढरे चट्टे आहेत.  जिथे अनन्यची डॉक्टर  आई तिने कापलेली फळं केरात फेकते तिथेच त्याची आत्या त्वचातज्ञांना फोन करून खरं कारण विचारते.  अनन्यच्या भावंडाना त्याचीही गरज वाटत नाही. यापूर्वी पस्तीस वर्षांपूर्वीही या घरात आलेली सून आवडलेली नव्हती. तेव्हापासून आजवर घराण्याच्या विचारसरणीत काहीच फरक पडला नाही का असा जुन्या नावडतीला प्रश्न पडतो. दोन्ही वेळची कारणं वेगळी असली तरी शेवटी परिणाम एकच. थोडक्यात काय, शैक्षणिक , वैज्ञानिक आणि आर्थिक बाबतीत कितीही पुढे गेला तरी अजून समाजाची मानसिकता काही बाबतीत अद्याप बदलली नाहीय. जर चित्रपटमाध्यमातून काही प्रबोधन होतं अशा आशावादाला मात्र हा चित्रपट पुरून उरतो.

चित्रपटात गाणी कमी आहेत. परंतु आहेत ती लक्षात राहण्याजोगी आहेत, विशेषत: ’पानी सा निर्मल हो, मेरा मन’. सहज गुणगुणल्यासारखं अन कानात रूंजी घालणारं हे गोड गाणं आहे.   स्टारकास्ट अगदी तगडी आहे त्यामुळे अभिनयाच्या बाबतीत सिनेमा कुठे कमी पडत नाही. खरंतर चित्रपट अगदी सरळधोपट आहे. अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात आणि आपण चित्रपटात गुंतत जातो.

नितळ - चित्रपटाची /नाटकाची माहिती

नितळ
  • Official Sites:

    imdb
  • दिग्दर्शक: सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर
  • कलाकार: देविका दफ्तरदार, शेखर कुलकर्णी, विजय तेंडुलकर, दीपा श्रीराम, उत्तरा बावकर, रविंद्र मंकणी
  • चित्रपटाचा वेळ: ९२ मिनिटे / १ तास ३२ मिनिटे
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: 2006
  • निर्माता देश: भारत