पिफ २०१५: +आॅस्कर नामांकीत चित्रपटः टिम्बकटू (२०१४)

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - पिफ - पुण्यात चालू आहे. दररोज भरपूर चित्रपटांची मेजवानी इथे पुणेकरांना मिळतेय. पैकी या महोत्सवाची सुरुवात 'टिम्बकटू' नावाच्या मॉरीटॉनियाचा दिग्दर्शन सिसाकोच्या ताज्या फ्रेंच/अरेबिक/तामाशेक चित्रपटाने झाली. उद्घाटनाचा चित्रपट हा सहसा केवळ चित्रपट म्हणूनच उत्तम नसतो, तर काहीतरी विशिष्ट नि अत्यंत महत्त्वाचे विधान करणारा असतो. गेल्या वर्षीच्या पिफमधील (२०१३-१४) 'आना अरेबिया' या उद्घाटनाच्या चित्रपटाप्रमाणे यंदाही 'टिम्बकटू'च्या रूपात अत्यंत सशक्त चित्रपट घेऊन पिफ सुरू झाला.

चित्रपटाबद्दल लिहिण्याआधी या शहराची पार्श्वभूमी, इतिहास थोडक्यात देणे अगत्याचे आहे. पश्चिम आफ्रिकेतील माली देशातील टिम्बकटू हे एक प्रसिद्ध शहर. आफ्रिकेतील विविध वाळवंटी मार्गांवरील हा एक महत्त्वाचा थांबा असल्याने कित्येक शतके हे शहर तसे बर्‍यापैकी प्रसिद्ध व स्थिरावलेले होते. इथे इस्लाम हा बराच जुना व चांगल्यापैकी मुरलेला आहे. हे शहर १३व्या शतकापासून ते १७व्या शतकापर्यंत इस्लामच्या अभ्यासाचे एक प्रमुख केंद्र म्हणून जगभरात प्रसिद्ध होते. माली राजवटीच्या काळात या शहराने सुवर्णकाळ पाहिलेला आहे. अनेक विद्वान, धर्मगुरू यांचे येणेजाणे, चर्चा, अभ्यास, व्याख्याने, शिकवणे वगैरे गोष्टींनी समृद्ध असे हे शहर होते. पुढे मोरोक्को आणि नंतर आर्मा लोकांनी इथे कब्जा केला नि या शहराचा सुवर्णकाळ संपला. नंतर बराच काळ फ्रेंचांनी इथे राज्य केले व १९६० मध्ये माली या देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर इथे इस्लामी मूलतत्त्ववाद्यांचा प्रभाव वाढू लागला. २०१२मध्ये अंसार दिने या गटाने टिम्बकटूवर कब्जा मिळवला आणि लोकांचे व्यक्तिस्वातंत्र्य हरपू लागले (नंतर फ्रेंचांच्या मदतीने असार दिने गटाला पुन्हा बाहेर हुसकावले गेले). ही सगळी पार्श्वभूमी देण्याचे कारण हे की एके काळी इस्लामच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे शहर असणार्‍या या शहरात अगदी कमी काळात इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी केलेले बदल, या चित्रपटात अतिशय प्रभावी पद्धतीने दाखवले आहेत.

कथासूत्र (यात घटना व कथासूत्र अंशतः उघड केल्या आहेत.):
यात अनेक घटना घडताना दिसतात. त्यातील मुख्य कथा आहे किदान नावाच्या कुटुंबवत्सल बापाची. आता मूलतत्त्ववाद्यांनी कब्जा केलेल्या टिम्बकटूपासून काही अंतरावर किदान एका वाळवंटात - एका वाळूच्या टेकडीच्या आडोशाला - तंबूमध्ये आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहत असतो. सोबत बायको सातीमा, मुलगी टोया आणि गुराख्याचं काम करणारा इसान हा १२ वर्षांचा मुलगा राहत असतात. या कुटुंबांतील चौघा सदस्यांच्या परस्परसंबंधांची वीण प्रेक्षकांपुढे एकीकडे हळुवार उलगडत असताना दुसरीकडे टिम्बकटूमध्ये मात्र भीती आणि जबरदस्तीचे पर्व सुरू असते. संगीत, हसणे, सिगारेट्स वगैरेंवर तर बंदी आलेली असतेच, अगदी फुटबॉल खेळण्यावरही बंदी घातली जाते. दररोज कोर्टामध्ये होणारी शिक्षासुनावणीची अजब आणि निर्दयी प्रकरणे चित्रपटात मधेच दाखवली जातात. अशा परिस्थितीत गावकुसाबाहेर राहणार्‍या किदानच्या राहणीमानावर मात्र याचा विपरीत परिणाम झालेला नसतो. मात्र एके दिवशी एक अघटित घडते. त्यांच्याकडील एक गाय, नदीत लावलेल्या माशांच्या जाळ्यात गुंतते नि राग येऊन त्या जाळ्यांचा मालक असलेला एक कोळी त्या गायीला ठार मारतो. त्यावरून त्याच्याशी झालेल्या झटापटीत तो किदानकडून मारला जातो. आता मात्र किदानला या नव्या मूलतत्त्ववादी राज्यकर्त्यांचा नव्या कायद्याला सामोरे जाणे भाग पडते. त्याचे पुढे काय होते? त्याला कोणती शिक्षा देतात? त्याला ती भोगावी लागते का? वाळवंटात असलेल्या त्याच्या कुटुंबाचे काय होते? वगैरे प्रश्नांची उत्तरे या चित्रपटात मिळतातच; पण त्याहून बरेच काही अंतर्मुख करणारे सवाल हा चित्रपट प्रेक्षकांपुढे उभे करतो.
या चित्रपटात काय पाहावे असा प्रश्नच फोल आहे. प्रत्येक फ्रेम अन् फ्रेम, हरेक संवाद, हरेक प्रसंग इतका तपशीलवार विचार करून बनवलेला आहे की प्रेक्षक नुसता गुंततच नाही तर पूर्णपणे नजरबंद होतो. तांत्रिक अंगांचा विचार करायचा तर यातील विविध अंगांवर स्वतंत्र लेखन करता यावे. मात्र सर्वाधिक कमालीचे काही असेल तर या चित्रपटाचे दिग्दर्शन! एका लँडस्केपसमोर पूर्ण २ मिनिटे कॅमेरा स्थिर ठेवून, प्रेक्षकाला स्क्रीनच्या उजव्या कोपर्‍यापासून डाव्या कोपर्‍यापर्यंत नजर फिरवायला लावणारा एक नदीपात्रातील प्रसंग असो; किंवा फुटबॉलवरील बंदी दाखवणारे केवळ अफलातून दिग्दर्शन असो; दिग्दर्शकाला सलाम करण्यावाचून प्रेक्षकाकडे गत्यंतर उरत नाही. ध्वनी, प्रकाश, संगीत, संवाद, पटकथा, रंगभूषा, वेषभूषा अश्या कोणत्याच बाबतीत काहीही खटकू नये आणि एखादा "पर्फेक्ट" चित्रपट बघतोय असे प्रेक्षकाला वाटावे अशा ताकदीचा हा चित्रपट आहे.
कथा, संवाद, दिग्दर्शन आणि इतर तांत्रिक अंगे या सगळ्यांच्या पलीकडे जाऊनही हा चित्रपट आपल्याला काहीतरी देतो हेही लक्षात घेण्यासारखे आहे. हा चित्रपट फक्त करुण नि दु:खदायक प्रसंग दाखवून व्यवस्था किंवा मूलतत्त्ववाद यांवर प्रश्नचिन्ह उभे करून थांबत नाही, तर एकूणच धार्मिक मूलतत्त्ववाद आणि त्याद्वारे व्यक्तिस्वातंत्र्याचा होणारा संकोच यांतील परस्परसंबंधांवर एक अधिक ठाम व ठोस विधान करतो. साध्या साध्या वाटणार्‍या घटनांतून व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व नेमकेपणाने उलगडून देतोच. त्याचबरोबर धार्मिक परंपरांचा सहज व सर्वप्रथम तोटा कोणाला होत असेल तर तो महिलांना, हे सत्य स्थानिक नसून जागतिक आहे ही जाणीवही बळकट करतो.
एकूणच मूलतत्त्ववाद्यांच्या विचारसरणीतील फोलपणा, पोकळपणा अतिशय लहान प्रसंगातून, मात्र प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोचतो. स्थानिक मशिदीच्या प्रमुखाने इस्लामबद्दल विचारलेल्या साध्या प्रश्नांनाही धड उत्तरे देऊ न शकणारे सैनिक बरेच काही सांगून जातात. अन् हे सारे करत असताना ही मूलतत्त्ववादी मंडळीही माणसेच आहेत हेही दिग्दर्शक विसरत नाही. एकीकडे फुटबॉलवर बंदी घातलेली असताना दुपारची जेवणे झाल्यावरच्या फावल्या वेळात आपापल्या आवडत्या टीमची महती सांगणारे सैनिक किंवा लपून सिगारेट पिणारा त्यांच्याच टोळीचा मुखिया, अतिशय चतुर असा त्याचा ड्रायव्हर वगैरे एरवी सहजपणे काळ्या रंगात रंगवणे शक्य असलेली वा रंगवली जाणारी पात्रे या चित्रपटात मात्र माणसाचाच एक चेहरा म्हणून समोर येतात. यामुळेच त्या सैनिकांचा किंवा तिथे लोकांवर अन्याय करणार्‍या लोकांचा - अर्थात व्यक्तीचा - प्रेक्षकाला राग येत नाही की प्रेक्षक इस्लाम या विशिष्ट धर्माकडे बोट दाखवत नाहीत. एकूणच लादल्या जाणार्‍या मूलतत्त्ववादाविषयी प्रेक्षक व्यक्तिनिरपेक्ष विचार करू लागतो आणि इथेच हा सिनेमा जिंकतो!
सदर चित्रपट हा मॉरिटानियातर्फे ऑस्करसाठी पाठवलेला आहे आणि त्याला अंतिम ९ चित्रपटांमध्ये प्रवेशही मिळाला आहे. कान्स चित्रपट महोत्सवात याने बक्षिसेही जिंकली आहेत. हा चित्रपट ऑस्करही जिंकतो का ते पाहायचे. अर्थात हा सिनेमा व्यावसायिकरीत्या भारतात प्रसिद्ध होईल का, झाला तर कधी होईल, वगैरे माहीत नाही. मात्र ज्यांना शक्य आहे त्यांनी खास मोठ्या पडद्यावर (न पेक्षा किमान डीव्हीडी आणून तरी) हा चित्रपट आवर्जून बघावा ही जोरदार शिफारस!

टिम्बकटू - चित्रपटाची /नाटकाची माहिती

टिम्बकटू
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: आब्दरेहमान सिस्साको
  • कलाकार: -
  • चित्रपटाचा वेळ: 100
  • भाषा: -
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: 2014
  • निर्माता देश: फ्रान्स