पिकादेरो (२०१५): निव्वळ प्रेमकथेपेक्षा बरंच काही (#पिफ२०१६)

वेगळ्याच प्रकारच्या आणि अनेकदा स्तब्ध करणार्‍या करड्या विनोदाने नटवून, समोर आलेल्या 'पिकादेरो' या अनोख्या प्रेम कहाणीला अनेक फिल्म फेस्टिव्हल्समध्ये मिरवण्याचा मान मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये 'सान सबॅस्टियन'  या पहिल्याच फेस्टिव्हलमध्ये 'क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड' जिंकून, इतर काही फेस्टिव्हल्समध्ये वाहवा मिळवत (एकूण ६ अवॉर्ड्स जिंकत), हा सिनेमा यंदाच्या 'पिफ २०१६'ला पुण्यात दाखल झाला. याच्या विनोदातील व चित्रीकरणातील वेगळेपणाने आणि महत्त्वाच्या समकालीन विधानामुळे हा सिनेमा दीर्घकाळ स्मरणात राहील हे नक्की.

या चित्रपटाची कथावस्तू अगदी साधी आहे. गोर्का (जोसेबा उसबिअगा) हा तीस वर्षांचा तरुण- या कथेचा नायक- आपल्या पालकांसोबत बास्क या स्पेनमधील एका भागातील एका गावात राहतो आहे. (बास्क हा स्पेनमधीलच एक स्वायत्त देश म्हणवला जातो). जितके सुस्त गाव, तितकीच 'सुशेगाद' माणसे! गावातील काही स्थानिक कारखान्यांच्या अस्तित्व तेथील नागरिकांच्या रोजच्या गरजा कशाबशा भागवते आहे. गोर्का एका स्क्रूड्रायव्हर इत्यादी गोष्टी बनविणार्‍या कंपनीत 'अप्रेन्टीस' म्हणून बिनपगारी कामावर असतो. त्याची भेट अ‍ॅन (बार्बरा गोएनागा) या 'आर्ट स्टुडंट'शी होते, आणि त्याच्या नेहमीच्या संथ, मंदावलेल्या आयुष्यात काहीतरी वेगळे घडण्याची गरज निर्माण होते.

या गावात जे राहताहेत - मग ते इतर कर्मचारी असोत व गोर्काच्या घरातील इतर व्यक्ती - त्यांनी आयुष्याची ही मंद लय, त्यातील सातत्य, कोणत्याही नावीन्याच्या आणि वेगाचा भाव अगदी स्वीकारलेला आहे, मात्र सध्याच्या आर्थिक डबघाईने त्यांना हैराण करायला सुरुवात केली आहे. ज्यांना थोडीही 'प्रगती'ची अथवा स्वत:च्या 'भविष्याची' आस आहे ते या गावातून बाहेर निघायच्या तयारीत आहेत. गोर्काचा सख्खा मित्र इनाकी (लँडर ओताओला) हासुद्धा त्यांच्यापैकीच एक. हे दोघे जेव्हा एकत्र दिसतात तेव्हा त्यांच्यातील संवाद हे कोरड्या विनोदाचे उत्तम उदाहरण ठरावे. गोर्कीचा 'निष्क्रिय' म्हणता येईल अशा स्वभावाची परमावधी तेव्हा दिसते, जेव्हा इनाकी आपल्या हातातील फळ (सफरचंद/केळे) गोर्कीपुढे धरतो, आणि ते गोर्की हातात घ्यायची तसदीही न घेता केवळ वाकून खातो.

चित्रपट सुरू होताच 'पिकादेरो' या शब्दाचे दोन अर्थ दाखवले जातात. एक म्हणजे 'रायडिंग स्कूल' आणि दुसरा म्हणजे 'सार्वजनिक ठिकाणाचा सेक्स करण्यासाठी वापर करणे'. जेव्हा अ‍ॅन आणि गोर्का भेटतात तेव्हा आपण दोघे एकमेकांना आवडतो हे त्यांना लवकरच समजते. मात्र दोघेही आपापल्या कुटुंबीयासमवेत राहत असल्याने 'एक व्हायचे' कुठे असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. अशा वेळी ते 'पिकादेरो'साठी काय काय प्रयत्न करतात, कुठे कुठे जातात, तिथे त्यांना काय अनुभव येतात याची 'रुक्ष-विनोदी' (ड्राय ह्युमर) कहाणी म्हणजे हा 'पिकादेरो'

अर्थात हा चित्रपट या प्रेमकहाणीसोबत किंवा या ठिकाणाच्या शोधाव्यतिरिक्त इतरही बरेच काही महत्त्वाचे देऊन जातो. एकतर या सिनेमाचा उद्देशही केवळ प्रेमकहाणी  किंवा जोडप्याची 'गैरसोय' सांगणे नसून स्पेनच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवर मानवी कथानकातून भाष्य करण्याचा आहे आणि तो या चित्रपटात १००% उतरतो. आर्थिक डबघाईच्या परिस्थितीत 'कायमस्वरूपी नोकरी मिळणे हे आपल्या आयुष्याचे ध्येय असल्याचे' गोर्का सांगतो तेव्हा त्यावर आपल्याला थेट हसता येत नाही. तर याच नोकरीसाठी इनाकी जर्मन शिकत असतो किंवा अ‍ॅन स्कॉटलंडला जायचे म्हणते तेव्हा आपल्या देशात काम न मिळाल्याने एकूणच समाजावर होणारा परिणाम आणि त्यातून वाढत जाणारी कोरडी वा रुक्ष मानसिकता आपल्याला एकीकडे विचारात पाडते. 

अत्यंत सावधपणे साधलेल्या 'दृश्यचौकटी' (अर्थात फ्रेम्स) हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य. छायाचित्रण किंवा स्थिरचित्रणासारखे कित्येक प्रसंग कॅमेरा एकाजागी ठेवून चित्रित केले आहेत, त्यामुळे कथानकाची, पात्रांची आणि एकूणच परिसराची ठाय लय आणि त्यात येणारे अवरोध या दोन्हीचा अनुभव प्रेक्षकाला पुरेपूर येतो. शिवाय जणू अगदी फूटपट्टीने मोजून, काटेकोरपणे कॅमेरात बांधलेला भवताल चित्रपटाला वेगळाच फील देतो. निळा, सफेद आणि पिवळा या तीन रंगांवरचे दिग्दर्शकाचे प्रेमही पदोपदी दिसून येते. अश्या आर्थिक परिस्थितीत 'बास्क'मधील भवताल कितीही निसर्गसुंदर असला तरी संपूर्ण कथानकाला फॅक्टरी, रग्बीचे मैदान आणि रेल्वे स्टेशन अशा 'अधिभौतिकात्मक' (अर्थात मराठीत मटेरिअलिस्टिक) पार्श्वभूमीवर रंगवले जाते. कारण अशा परिस्थितीत निसर्गसौंदर्य, गाव किंवा माणसांचे स्वभाव कितीही चांगले असले तरी त्याचा स्थानिकांच्या आयुष्यात व एकूणच त्यांच्या निर्णयांमध्ये त्यांना कमीच महत्त्व दिलं जातं. काही लहानशा प्रसंगातून/पात्रांद्वारे (जसे डस्टबीन शोधणारी बाई, कुत्र्याला ओढत नेणारा मुलगा) एकूणच वैतागलेला समाज व्यवस्थित उभा राहतो.

अभिनयाच्या बाबतीत नायक-नायिका दोघेही भाव खाऊन जातात. बर्‍यापैकी अबोल नायक असूनही कुठेही तो मुखदुर्बळ वा शिष्ट वाटत नाही. त्याचबरोबर नायिकेने अनेकदा प्रयत्न करूनही काहीचा अवघडलेला नायक बघूनही, त्याला काही 'करण्याची' इच्छा नाही असे प्रेक्षकाला कधीच वाटत नाही. त्याच वेळी त्याच्या अवघडलेपणाचा अंधुकसा रागही येऊ लागतो तर काही वेळात त्याचे रूपांतर दोघांबद्दल आणि एकूणच परिस्थितीबद्दल कीव करण्यात होते. अर्थातच हेच दिग्दर्शकाला अपेक्षित आहे! गोर्काचे आजोबा आणि आईदेखील आपल्या छोटेखानी भूमिकेत तुफान मजा करतात.

सिनेमाच्या शेवटी जरी एकूण वातावरण दु:खाने आणि ताटातूट वगैरेने भारलेले असले तरी, भविष्यातील स्पेनमध्ये आलबेल होण्याच्या अल्पशा का होईना, शक्यतेच्या किंवा आशेच्या धाग्यावर, नायक नायिकांसोबत प्रेक्षक कधी लोंबकळू लागतो ते त्यालाही कळत नाही. इतक्या संथ गतीचा चित्रपटाचा भारतात तर नाहीच पण बाहेरही व्यावसायिकरित्या रिलीज होईल का कल्पना नाही. मात्र तुम्ही 'फेस्टिव्हली' सिनेमांचे चाहते असाल आणि शक्य असेल तर एखाद्या फेस्टिव्हलमध्ये चान्स मिळाला तर हा चित्रपट अजिबात सोडू नका.

पिकादेरो (२०१५) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

पिकादेरो (२०१५)
  • Official Sites:

    imdb
  • दिग्दर्शक: बेन शेरॉक
  • कलाकार: जोसेबा उसबिअगा, बार्बरा गोएनागा
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: बास्क स्पॅनिश
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१५
  • निर्माता देश: स्पेन