सैराट(२०१६): एक वास्तव प्रेमकथा

समाज म्हणजे काय? संस्कृती म्हणजे काय? यावर बर्‍याचदा बर्‍याच कलाकारांनी आपल्यापुढे मांडलंय, सांगितलंय लिहिलंय. माझ्यासाठी समाज म्हणा वा संस्कृती म्हणा ती म्हणजे 'मी' आहे. प्रत्येकापुढे जन्मापासून वेगवेगळ्या गोष्टीचा संस्कार होत असतो. शुभंकरोतीपासून ते निखळ मैत्रीपर्यंत आणि जातींच्या उतरंडीपासून ते त्याच्या निरर्थकतेपर्यंत अनेक गोष्टींचा परिणाम या समाजातील प्रत्येक 'मी' वर होत असतो. प्रत्येक मी कडे परंपरा पुढे चालवायची की तिला टांग मारून किंवा ती पूर्ण अव्हेरून किंवा वाकवून काही नवं करायचं असे दोन पर्याय असतात. जेव्हा बहुसंख्ये मी दुसरा पर्याय निवडतात तेव्हा समाज व/वा संस्कृती बदलली असे आपण म्हणतो. कोणताही समाज एखाद्या नदीसारखा अनेक प्रतलांवर वाहत असतो. संथ न हालू शकणारा गाळ असलेला परंपरावादी 'मी' जितका खरा आहे तितकाच त्या गाळात रुतून न बसता मात्र त्या गाळासोबतच वेगळ्या वाटेने, वेगळ्या वेगाने वाहू पाहणारा "मी" सुद्धा खरा आहे. या दोन 'मी' ची झकाझकी अनिवार्य आणि अटळ आहे. जेव्हा नवीन प्रवाह मोठ्या प्रमाणात येतो तेव्हा अर्थातच त्या पुराची परिणिती जुना गाळ नदीच्या किनार्‍यावर फेकला जाण्यात होते आणि त्याची जागा नवे पाणी व जमा होऊ लागलेला नवा गाळ घेतो. पण जुना गाळ बाहेर फेकणे इतके सहज होत नाही. त्यामुळे जुना गाळ जोवर बाहेर फेकला जात नाही तोवरच्या घासाघिशीने पात्र प्रचंड गढुळतं. सध्याचा आपला समाजही याच गढूळतेला सामोरा जातोय. या बदलत्या ढवळलेल्या समाजाचं भेदक नि तरीही रंजक चित्रण म्हणजे 'सैराट'!

भारतात या गाळातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे जात! आणि नागराज मंजूळेच्या सिनेमांमध्ये ही जात एक पात्रच बनून सिनेमाभर असते. तीच सिनेमा घडवते आणि बिघडवते. 'सैराट' मध्येसुद्धा जात हे एक पात्र आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन अनेक बाबतीत हा चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण आहे. या परीक्षणात मी कथावस्तू अजिबात देणार नाहीये. यातील अनेक गोष्टी या थेट बघण्यातच मजा आहे. तेव्हा ज्यांनी चित्रपट बघितलेला नाही त्यांनी इथेच वाचन थांबवावे आणि आधी तडक जाऊन सिनेमा बघून यावा अजिबात चुकवू नये.  

सगळ्यात आधी या चित्रपटाची लांबी बरीच चर्चेत आहे. अनेकांना हा लांबलेला चित्रपट वाटतोय - त्यातही दुसरा भाग लांबल्याचे अनेकांचे मत आहे. माझ्या मते तसे अजिबात नाही. खरंतर या चित्रपटांत दोन वेगळ्या आणि एका चित्रपटात त्या एकमेकांना पूरक ठरतील का? अशी शंका यावी अश्या दोन भिन्न शैलींमध्ये आहे. चित्रपट पाहताना मला अनेकदा 'मसान' ची आठवण झाली. तिथे दोन कथासुत्रे दोन ढंगात एकमेकांच्या समांतर वाहत असतात. इथेही मध्यांतराच्या आधी आणि नंतर अशा दोन वेगळ्या शैली आहेत आणि दोन्हींचे आपले असे महत्त्व आहे. दुसर्‍या भागाचा वेग हा पहिल्याच्या तुलनेत संथ आहे हे खरे पण त्यातही अनावश्यक असे एकही दृश्य नाही. इतका वेळ गाव व परिसरात असताना असलेली भिती आणि वर वर्णन केलेल्या गाळातील 'जात' हे दोन्ही घटक अचानक इथे विरळ होतात. भिती किंवा असुरक्षिततेचे अस्तित्व प्रेक्षकाच्या मनात किंचित जिवंत असले तरी या संथ वेगामुळे, घडणार्‍या घटनांमुळे तो जरा सैलावतो. पहिल्या भागानंतर एकदम अ‍ॅलर्ट झालेल्या प्रेक्षकाला लोडा-तक्क्यांना टेकवून सैलावणं भाग पाडलं जातं.  लहान गावातून अचानक बदललेला शहराचा मोठा पट, नवे नाते, जुन्या गाठोड्याला वाहून नव्या जगात उभे राहणारे जोडपे,वेगळेच प्रश्न, आणि नात्यांमधील नवे चढ उतार याला त्या कथेतील पात्रांइतकाच प्रेक्षकही सरावणे गरजेचे ठरते. आणि पात्र व प्रेक्षक जेव्हा सुखान्ताकडे डोळे लावून बसतो तेव्हाच नागराज एक खणखणीत थप्पड लगावतो. तेव्हा यातील एक सेकंदही लांबी कमी करू नये असे माझे स्पष्ट मत आहे.

दुसर्‍या एका गोष्टीसाठी सैराट महत्त्वाचा आहे तो म्हणजे बहुतांश गोष्टींमध्ये 'स्टिरीओटाईप' मोडून काढणे. सशक्त स्त्री व्यक्तिरेखा आता भारतीय प्रेक्षकाला नवी राहिलेली नाही. मात्र त्यातही अर्चना अर्थात अर्चीच्या भूमिकेत रिंकू राजगुरू प्रचंड भाव खाऊन जाते. मुळात हे पात्रच मोठ्या नजाकतीने लिहिलंय. गावच्या पाटलाची पोर, तिचा गावभरचा दरारा, अंगात रुजलेली बेदरकार वृत्ती एकीकडे आणि स्वतंत्र विचारांची, आधुनिक, हुशार व प्रचंड चिकाटी असणारी एक शहाणी स्त्री अशा दोन प्रकारच्या व्यक्तिरेखा एकत्र होऊन ही भूमिका प्रेमकथेतील समर्पण करणार्‍या टिपिकल 'हिरॉईन'च्या स्टिरीयोटाइपला तर ती मोडतेच. त्याच सोबत सिनेमाच्या पूर्वार्धात ती 'माजावर आलेली मादी' ही भूमिकाही उत्तम वठवते. आपल्यात इंटरेस्टेड असणार्‍या नरांपैकी आपल्या नजरेत भरलेल्या व हळूहळू आवडू लागलेल्या नराला नवनवी आव्हाने देणे, त्याला अचंबित करणे, त्याला खिजवणे, त्याला झुलवणे, त्याच्यातल्या नराला पूर्ण कह्यात घेऊन मगच त्याचं होणं या बाबी मराठी चित्रपटांत नावाला राहिल्या आहेत. हीच मुलगी पुढे एकीकडे नवख्या जागी व आतापर्यंत राहिलेल्या परिस्थितीपेक्षा हलाखीच्या परिस्थितीत आल्यावरही आपला ताठ कणा आणि नावीन्यामुळे आलेली हुरहुर भिती यांचा मिलाफ तिच्या पात्रात कमाल उतरला आहे.

पण हिरॉईनपेक्षा मला वैशिष्ट्यपूर्ण वाटले ते यातील हीरोची अर्थात आकाश ठोसर याने साकारलेली परश्याची भूमिका - अभिनयाइतकंच त्या भूमिकेचं लेखन!एकीकडे रंगेल, आनंदी, हुशार आणि अर्चीच्या प्रेमात पागल झालेला मुलगा, पुढे जबाबदार प्रियकर वगैरे भूमिका आहेच. मधल्या एका वळणानंतर चित्रपटाच्या हीरोने मुलांचा सांभाळ करत स्कूटरवर मागे बसणे व हिरॉईनने स्कूटर चालवणे अश्या लहानसहान प्रसंगांतून एक पुरुष म्हणून - एक 'हीरो' म्हणून अनेक स्टिरियोटाईप तो उधळून लावतो. आपल्या प्रेयसीवर अतिप्रसंग होताना हा हीरो प्रतिकाराचा प्रयत्न करतो पण फार काही करू न शकणे काय किंवा प्रेयसीला जेवण येतच नाही म्हणून एकट्याने जेवण शिजवणे काय किंवा आत्महत्या करण्याची हिंमत नसणे काय किंवा भाज्या घेऊन येण्यासारखी घरगुती कामे करणे किंवा पाहुण्यांना ट्रेमध्ये चहा सर्व करणे काय अशा गोष्टी हा हीरो अगदी आनंदाने व अभिमानाने करतो. यात त्याचा राग, संशय आदी भावनाही वास्तवदर्शी आहे. 'हीरो बाईवर कध्धी कध्धी हात उगारत नै कित्ती कित्ती सत्शील' असा काहीही आव इथे नाही. असा अत्यंत माणसासारखा हीरो लिहिणे हे मला तुलनेने दिमाखदार हिरॉइन लिहिण्यापेक्षा अधिक कठिण काम वाटले आणि ते झक्क उतरले आहे!

या सिनेमाबद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे ही एक 'प्रेमकथा' आहे. प्रेमकथा हा प्रकार मराठीत नवा म्हणावा लागेल इतका दुर्मिळ आहे. म्हणजे प्रत्येक चित्रपटात प्रेम असतेच पण ते मालगाडीसारखे मुख्य एक्सप्रेसला रस्ता द्यायला सायडिंगला टाकलेले असते. नुसते इतकेच नाही तर मराठी (व पंजाबट्ट हिंदीही) चित्रपटांतील प्रेम इतकी कृत्रिम आणि बोलबच्चन असते की ते धादांत स्पॉन्सर्ड वाटते. एकतर 'स्वप्नील' मठ्ठ नि मधाळ गोग्गोड धादांत शोकेसी प्रेमकथा नाहीतर 'टाईमपास'छाप मराठी सीरियलचं शूटिंग नी पटकथा असावी अशा प्रेमकथा याच्या पलीकडे आपली गाडी काही सरकत नाही. सिनेमातली प्रेमकथा रसरशीत आणि जिवंत आहे. ती चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत दोघांमधील प्रेम आणि नाते यावरून हा चित्रपट जराही आपला फोकस हलू देत नाही. कोणत्याही उपकथाकाची ठिगळं न जोडता - किंबहुना प्रेमकथा हेच एक ठिगळ असल्यासारखे न वापरता - एक रसरशीत प्रेमकथा काय जादू करते हे मराठी प्रेक्षक ऑलमोस्ट विसरलाच आहे. दोन व्यक्तीममधील प्रेम, त्याचा कैफ, झिंग वगैरे रंगवताना बाकी पात्रांचं त्यांच्या प्रेमाबद्दलचं मत एका उपदेशपर वाक्यानेही ऐकवले जात नाही (ते कृतीतून दिसते). दुसरे असे की प्रेमावर फोकस असूनही ते प्रेम एका वास्तव जगात घडते. फेसबुक, मोबाईल, त्याचा बॅलन्स, मोठ्या शहरातील झोपडपट्ट्या, फसवाफसवी, भली बुरी माणसे यांच्या सानिद्ध्यात ते घडते. मैत्री, माया, असूया, राग, सत्तेचा माज, जातीपाती या सार्‍याच्या ताणतणावांसोबत त्या प्रेमाचा प्रवास चालू असतो आणि त्यामुळेच तो सच्चा ठरतो. 

शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिटेलिंग! ही तर मंजुळेची खासियत म्हणावी लागेल. अतिशय बारीक सारीक प्रसंगांतून तो प्रेम ज्या नजाकतीने उभं करतो त्याला तोड नाही. त्या नात्याचा, घटनांचा भवताल व त्या भवतालातील अनेक गोष्टींचं डिटेलिंग कमाल आहे! मग ते जाती नुसार साड्या नेसण्याच्या पद्धती असोत वा जातीनुसार बायकांच्या गळ्यात असणारे दागिने असोत. जात पंचायतीची भाषा असो, क्रिकेट म्याचची कॉमेंट्री देण्याची पद्धत असो की "पाटलाची पोर तुला आत्याबाई म्हणती" अशासारखे कहर नेमके संवाद असोत - मंजुळे रॉक्स!

थोडक्यात काय, दोन चोख चित्रपटांनंतर मंजुळे हा जराही-चुकवू-नये अश्या फारच मोजक्या भारतीय दिग्दर्शकांच्या यादीत जाऊन बसला आहे!

 

 

 

सैराट (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

सैराट (२०१६)
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: नागराज मंजुळे
  • कलाकार: आकाश ठोसर, रिंकू राजगुरू
  • चित्रपटाचा वेळ: २ तास ५० मिनिटे
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१६
  • निर्माता देश: भारत