Thirteen Reasons Whyच्या निमित्तानं..

२००७ साली प्रकाशित झालेल्या Thirteen Reasons Why या कादंबरीवर बेतलेली एक मालिका नेटफ्लिक्सनं या वर्षीच्या मार्च महिन्यात प्रदर्शित केलीय. अल्पावधीतच या मालिकेला खूप प्रसिद्धी मिळालीय. पण ही प्रसिद्धी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारची आहे. एकीकडे कलाकारांचा अभिनय, विषय, त्याची हाताळणी आणि सादरीकरणाची वाखाणणी होतेय, तर दुसरीकडे या मालिकेमधल्या काही दृश्यांवर आक्षेप घेतला जातोय आणि त्यातून चुकीचा संदेश तर दिला जात  नाही ना, अशा चर्चाही चालू आहेत.

१७ वर्षांची हॅना बेकर आत्महत्या करते, पण त्यापूर्वी तिनं आत्महत्या का केली याची १३ कारणं ती ऑडियो टेप्समध्ये रेकॉर्ड् करून ठेवते. यांतल्या प्रत्येक कारणाशी तिच्या शाळेतल्या कुणा ना कुणा व्यक्तीचा संबंध आहे. या ऑडियो टेप्स या १३ व्यक्तींना एकापाठोपाठ एक मिळण्याच्या तिने व्यवस्था केली आहे.  जर कुणी ही साखळी तोडली, तर या टेप्सची मूळ प्रत सार्वजनिक केली जाईल अशी धमकीही त्या टेप्ससोबत तिने दिलीय. मालिकेच्या सुरुवातीला हा टेप्सचा संच क्ले जेन्सन या तिच्या वर्गमित्राला मिळतो. हॅनाने आत्महत्या का केली हे जाणून घेण्याचा त्याच्यासोबत केलेला प्रवास हे या मालिकेचं कथासूत्र आहे.

मालिका फ्लॅशबॅक आणि आताचा काळ याच्यामध्ये फिरत राहते. हॅनाच्या रेकॉर्ड्स आणि त्या ऐकताना क्लेने त्या प्रसंगांची मनाशी केलेली उजळणी यांमुळे  कथा दोघांच्याही दृष्टीकोनातून पुढे जाते.  मालिकेच्या सुरुवातीलाच क्लेच्या डोक्याला खोक पडते. आपण गोष्टीच्या भूतकाळामध्ये आहोत की वर्तमानात याची जाणीव ती जखम प्रेक्षकांना करून देते. हॅना आणि क्लेचं कुटुंब या मालिकेत येणारच, पण इतरही १३ कारणीभूत व्यक्तींची ची कुटुंबं कमीअधिक प्रमाणात मालिकेत येतात.

स्रोत

हायस्कूलमधल्या मुलांचा विषय असल्यानं मालिकेत किशोरवयीन मुलं खूप आहेत. मुख्य पात्रं - म्हणजे डिलन मिनेट (क्ले) आणि कॅथरिन लँगफर्ड (हॅना) - असलेल्या या दोघांनी त्यांची कामं उत्तम केली आहेतच, पण इतर मुलांनीही सुंदर अभिनय केलाय. कमी-अधिक प्रमाणात कारणीभूत असलेल्या गोष्टींची मालिका एकसलग पाहणं... हे खूप तणावपूर्वक झालं असतंच, त्यामुळं कथनासाठी साठी वापरलेली भूतकाळ-वर्तमानकाळाची सांगड  किंवा नुसताच फ्लॅशबॅक न वापरता काही वेळा क्लेनं स्वत:च्या भूतकाळात घडलेले प्रसंग त्रयस्थासारखं पाहणं हे दर्शकाच्या दृष्टीनं चांगलं आहे.  आपण अगदी काही ना काही कारणामुळे कुणाच्या आत्महत्येला जबाबदार ठरलोय हे कळल्यानंतरचं मुलांचं बिथरणं, काळजीत पडणं आणि 'नाही, हॅना म्हणते ते सगळं खरं थोडंच आहे!' या निष्कर्षापर्यंत येणं तपशीलवार  आलंय. काही खल वाटणार्‍या पात्रांची दुखरी बाजू दाखवून, एखादा माणूस दिसतो तितका दुष्ट असतोच असं नाही हे दाखवून दिलं आहे. पात्रांची राखाडी - काळी-पांढरी नसलेली - बाजू दाखवून देणं साचेबद्ध वाटलं, तरी ते त्या पद्धतीनं दाखवलं गेलं नाहीय हीदेखील जमेची एक बाजू. गोष्टीच्या शेवटाकडे का होईना, पण मुलं पालकांकडे व्यक्त व्हायला, सत्य स्वीकारायला आणि आपल्या चुकांची जबाबदारी घ्यायला तयार होतात हेही खूप महत्त्वाचं आहे.

मालिका गंभीर असल्यानं सतत एक तणाव जाणवत राहतो. अगदी शाळेतली मालिका असली, तरी हास्यविनोदाचे प्रसंग अगदीच अभावाने येतात. मधून-मधून येणारे गाण्यांचे तुकडे मात्र वातावरण निवळायला मदत करतात. आपल्या भारतीय हिंदी-मराठी मालिकांसारखं संगीत सतत कानावर आदळत नाही, पण संगीत हे गोष्टीचा महत्त्वाचा भाग असल्याचं मात्र जाणवतं. एखाद्या विशिष्ट मूडशी किंवा प्रसंगाशी जोडलं गेलेलं संगीत अर्थपूर्णपणे वापरून ते गोष्टीत घट्ट गुंफून टाकलं आहे.

या मालिकेवर काही देशांतल्या शाळांनी बंदी घातलीय. किमान शाळेच्या आवारात या मालिकेबद्दल चर्चा करण्यास परवानगी नसल्याची पत्रं पालकांना पाठवली गेली आहेत. कारणं आहेत- मालिकेत केलेलं आत्महत्येचं उदात्तीकरण आणि दाखवलेले बलात्काराचे प्रसंग. या आक्षेपांनंतर मालिकेच्या निर्मात्यांकडून एक बदल करण्यात आला आहे. मालिकेच्या सुरुवातीला आणि ज्या-ज्या भागांत हे विवक्षित प्रसंग आहेत, त्यांच्या सुरुवातीला इशारावजा संदेश दाखवलाजातोय. मालिकेची निर्माती सेलिना गोमेझ आणि इतर कलावंत या मालिकेबद्दल कोणत्या दृष्टीकोनातून विचार करतात, त्यांना विषयाचं गांभीर्य का जाणवतं, चित्रीकरणादरम्यान त्यांना कोणत्या भावनिक आंदोलनांतून जावं लागलं, याचा उहापोह दाखवणारा एक खास भाग नेटफ्लिक्सनं या मालिकेसोबतच प्रदर्शित केला आहे

स्रोत

मालिकेच्या सुरुवातीलाच दिसतो तो हॅनाचा तिच्या मरणोत्तर सजवलेला लॉकर, तिच्या स्मरणार्थ मुलांनी ठेवलेली फुलं आणि भेटवस्तू. अशा प्रकारे मृत व्यक्तीला श्रद्धांजली देणं ही जरी  अमेरिकन संस्कृती असली, तरी इथे आत्महत्या एखाद्या सोहळयासारखी तर साजरी केली जात नाही ना, असा प्रश्न ते पाहताना पडतो.. दुसरं म्हणजे, आत्महत्या करणं हा तिच्यासमोरचा शेवटचा पर्याय होता का, असाही प्रश्न पडतो. तार्किकदृष्ट्या पाहायचं, तर हॅनाच्या बाबतीत जे काही घडतं, ते सगळं एकाच व्यक्तीच्या बाबतीत दोन वर्षांहूनही कमी वेळात घडणं शक्य नाही. पण ठीक आहे, आपण त्यांना तेवढं सिनेमॅटिक स्वातंत्र्य देऊ. पण बरेच कटू प्रसंगही खंबीरपणे मागे टाकत हॅना पुढे जाते. तिला त्यांचं तितकंसं शल्य वाटलेलं दिसत नाही.  ती एका प्रेमळ कुटुंबात राहत असूनही जे काही घडलं त्याबद्दल तीच काय, मालिकेतलं कुठलंच पात्र आईबापांनी अनेकदा विचारूनही काही सांगत नाही. असंही शक्य आहे, आधीच्या सगळ्या प्रसंगांचं सावट हॅनाच्या मनावर राहिलं असेल आणि बलात्काराच्या प्रसंगानंतर त्या  सगळ्या गोष्टी एकत्र येऊन तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला असेल हेही एकवेळ मान्य. पण तिनं दिलेल्या अर्धवट माहितीच्या आधारावर शाळेतला समुपदेशक काहीही कारवाई करण्यास तयार नाही, हे स्पष्ट झाल्यावर ती आत्महत्या करते हे पटण्यासारखं नाही.

एकतर पूर्ण मालिका आत्महत्येभोवतीच फिरते. त्याची संभाव्य कारणं, आत्महत्येची प्रत्यक्ष प्रक्रिया, त्याला लागणारा वेळ, त्याची परिणामकारकता... या सगळ्याची चर्चा गोष्टीत होत असतेच. त्याबद्दल प्रेक्षकांना अनभिज्ञ ठेवलेलं आहे, असं नाही. मग प्रत्यक्ष आत्महत्येची रक्तबंबाळ दृश्य दाखवण्यामागे सनसनाटी वा धक्का देणे यापलीकडे नेमका काय हेतू असावा ते मला कळलेलं नाही. कदाचित ही आत्महत्या किंवा दोन्ही बलात्काराचे प्रसंग यांतलं क्रौर्य दिग्दर्शकाला ठसवायचं असेल, त्यासाठी ते प्रसंग अंगावर येणं त्याच्या दृष्टीनं आवश्यक असेल. तसं असेल, तर ते परिणामकारकपणे साधलं आहे. पण असं थेट क्रौर्य दाखवण्यापेक्षा निराळ्या मार्गांनी ही परिणामकारकता साधता येऊ शकते, असं माझं मत.  अशी प्रत्यक्ष न चितारलेली, सूचकपणे दाखवलेली, प्रेक्षकाच्या कल्पनेत घडणारी क्रूर दृश्यं अधिक काळ परिणाम ठेवून जातात, अधिक भेदक वाटतात.... हे एक कारण तर आहेच. पण या चित्रणामुळे परिणाम साधण्यापेक्षाही मालिकेबद्दल आक्षेप येण्याचीच शक्यता मला अधिक वाटते, जे मालिकेच्या हेतूलाच मारक होईल..

स्रोत

एकुणात या मालिकेच्या दृश्यभागाबद्दलचे आक्षेप मान्य आहेत. पण पौगंडावस्थेतल्या मुलांना मानसिक आधार देणार्‍या सिस्टिमची गरज आहे हे इथं अधोरेखित होतंय. शाळेत किंवा त्या वयांतल्या कॉलेजजीवनात इतर विद्यार्थ्यांकडून होणारी दादागिरी, एवढ्याशा चुकांचं झालेलं भांडवल, कधी घरच्यांच्या प्रमाणाबाहेरच्याअपेक्षा, तर कधी पालक समजूतदार असूनही मुलांनी स्वत:हून विनाकारण घेतलेलं अपेक्षांचं ओझं, घरच्यांसोबत असलेला संवाद किंवा विसंवाद, परीक्षेतलं यशापयश, करिअर, शिक्षणाच्या शेवटी तत्काळ नोकरी मिळणं-न मिळणं (प्लेसमेंट), स्पर्धेत टिकून राहण्यासाठीची उरस्फोड, यशस्वी-अयशस्वी प्रेमप्रकरणं, एकतर्फी प्रेम, शाळासोबत्यांच्या आर्थिक परिस्थितीशी नकळत स्वतःची केली जाणारी तुलना... तणावाला कारणीभूत ठरणार्‍या गोष्टींची यादी लहान नाहीय. महाविद्यालयीन शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाच्या पहिल्या सत्रानंतर कंपन्या उमेदवार शोधायला शैक्षणिक संस्थांत येतात. पण सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यातून नोकरी मिळणं शक्य नसतं. आणि खरं तर सगळं यशापयश त्या नोकरीशी जोडलं जाण्याची गरजही नाही. पण अनेक विद्यार्थी तसं मानतात आणि न मिळालेल्या नोकरीमुळे खचून जातात. त्यातून विद्यार्थ्यांच्या परस्पर नातेसंबंधांमध्ये अडचणी येतात. स्पर्धा-हेवे-दावे वाढतात. हीसुद्धा एक मोठीच समस्या आहे.

बरेचदा या वयातली मुलं सगळं काही घरच्यांना मोकळेपणानं सांगत नाहीत. Thirteen Reasons Whyमध्ये तर पूर्ण मालिकाभर कुणीच आईबाबांशी मोकळेपणानं काहीच बोलत नाही.  अशा वेळेस त्यांच्यासोबत संवाद प्रस्थापित करणं थोडं अवघड होतं. इतर अमेरिकन मालिकांत दाखवल्याप्रमाणं त्यांच्याकडे शाळेतही एक समुपदेशकअसतो, असं दिसतं. पण करिअर कौन्सिलिंगपासून ते इतर अनेक व्यक्तिगत अडचणींपर्यंत सर्व गोष्टींसाठी एकच व्यक्ती उपलब्ध असल्याचं दिसतं. Thirteen Reasons Whyमधल्या समुपदेशकाकडे एकाच वेळी ६०० मुलांची जबाबदारी असल्याचं एका संवादातून कळतं. अशा परिस्थितीत तो प्रत्येक मुलाकडे किती लक्ष देणार हा प्रश्नच आहे.

स्रोत

भारतात ही परिस्थिती कशी हाताळली जात असावी हा मला पडलेला प्रश्न आणि त्याची माझ्यापुरती असलेली उत्तरं मी मांडण्याचा प्रयत्न करतेय. हे आकलन माझ्यापुरत्या परीघातलं असल्यानं त्याला मर्यादा आहेत हे मला मान्य आहे, त्यामुळं सरसकटीकरण अर्थातच नाहीय. भारतात शाळांमध्ये साधारणत: शिक्षकांचं मुलांकडे शैक्षणिक गोष्टींव्यतिरिक्तही लक्ष असतं. पण वयात येणारी मुलं शिक्षकांशी कितपत आणि कसा संवाद साधत असतील याची मला कल्पना नाहीय. इतर ठिकाणांबद्दल आणि विद्याशाखांबद्दल (आर्टस-कॉमर्स-मेडिकल-आर्किटेक्चर इत्यादी) मला माहीत नाही, पण मुंबई-पुण्यातल्या काही इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये प्रॉक्टर किंवा मेंटर पद्धती आहे. यात पहिल्या वर्षीच २० ते २५ मुलांना एक शिक्षक मेंटर (मार्गदर्शक) म्हणून दिला जातो आणि मूल ग्रॅज्युएट होईपर्यंत पुढची तीन-चार वर्षं तोच मेंटर त्या मुलांसाठी नेमलेला असतो. या पद्धतीत प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षकाचं खूप बारकाईनं लक्ष नसलं, तरी आपल्या २५ मुलांचे ’गुण’ साधारण दोनेक सत्रांत शिक्षकाला कळून येतात. कधी पालक, तर कधी विद्यार्थी शिक्षकाशी संवाद साधतात. त्यातून काही अप्रिय गोष्टी टाळल्या गेल्याचे अनुभव मी जवळून घेतले आहेत. पण काही ठिकाणी ही व्यवस्था पालकांना मुलांची कॉलेजमधली उपस्थिती कळवण्यापुरतीच मर्यादित असलेलीही पाहिली आहे.

’सातच्या आत घरात’ या सिनेमामध्ये सुहास जोशींचं पात्र "काय तुम्हांला हगल्यामुतल्या कसल्याही गोष्टींनी डिप्रेशन येतं!” असा शेरा मारतं. यातली अतिशयोक्ती सोडून दिली, तरी मुलांना कमीअधिक प्रमाणात मानसिक ताणाला सामोरं जावं लागतं हे सत्य आहेच. सिनेमा-मालिकांत मुलं शेवटपर्यंत, अगदी डोक्यावरून पाणी चाललं तरी, कुणाला काही सांगत नाहीत. तसं प्रत्यक्षात घडतंच असं नाही. याच वयातल्या विद्यार्थ्यांसोबतचा कित्येक वर्षांचा व्यक्तिगत अनुभव असा आहे, की दादागिरी (बुलींग), रॅगिंग किंवा अंगाशी येणारे नस्ते कारभार केल्यानंतर एक वेळ अशी येते; की मुलांची एकी फुटते आणि - भीतीपोटी म्हणा किंवा आपण कशात अडकायला नको म्हणून म्हणा - पण खरी माहिती, नावं हे सगळं समोर येतं. बरेचदा या गोष्टी फुटकळ असतात. पण त्या वेळीच सोडवल्यामुळं धाक बसतो आणि यात बळी पडलेल्या विद्यार्थ्याला मानसिक बळही मिळतं. इतर मुलांना प्रकरणाची सविस्तर माहिती नाही मिळाली, तरी योग्य तो संदेशही जातो. अर्थातच ही कामं अशैक्षणिक आहेत आणि त्यांची जबाबदारी शिक्षकांनी  घ्यावी का हा वादाचा मुद्दा आहेच. तरी मानवतेच्या दृष्टीकोनातून असे  वेळीच केले गेलेले

हस्तक्षेप खूप उपयुक्त ठरतात, असा वैयक्तिक अनुभव आहे. काही नामांकित संस्थांमध्ये आठवडयातले किमान काही दिवस डॉक्टर आणि वैद्यकीय समुपदेशक / मानसोपचारतज्ज्ञ विद्यार्थांसाठी उपलब्ध असतात. या संवादात डॉक्टर-पेशंट या नात्यातलं खाजगीपणा जपलं जात असल्यानं इतर ठिकाणी व्यक्त न होणारी मुलं त्यांच्याकडे व्यक्त होतात असाही अनुभव आहे. अर्थात हे सगळं खाजगी संस्थांमध्ये होतं. माझ्या दहा-पंधरा वर्षांपूर्वीच्या अनुभवानुसार - सरकारी कॉलेजांत शिक्षक शिकवायलाच येत नाहीत असं दिसतं. मग त्यांना विद्यार्थ्यांची नावं आणि अडचणी कुठून माहीत असणार! आता ही कॉलेजेस स्वायत्त बनल्यानंतर परिस्थिती बदलली असावी अशी आशा आहे.

[१३ कारणांचा वृंद- स्रोत]

सर्वच ठिकाणच्या शाळा-कॉलेजेसना पुण्यामुंबईच्या मापात तोलणं आणि माझ्या अनुभवाच्या चौकटीत ठोकून बसवणं योग्य नाही, हे मात्र इथे मान्य केलं पाहिजे. इतर छोट्या-मोठ्या गावांतल्या शाळा-कॉलेजांत जाणारंया मुलांना, किंवा कमी गुण असल्यानं वा मोठ्या संस्थांची फी परवडत नसल्यानं कमी दर्जाच्या- कमी सोयीसुविधांच्या शाळा-कॉलेजात प्रवेश घेतलेल्या मुलांना हा मानसिक आधार कुठून कसा मिळतो हा मला पडलेला प्रश्न आहे. पण त्याचं उत्तर माझ्याकडं नाहीय. मानसिक आधाराची गरज, खचणं, डिप्रेशन हे सगळे श्रीमंती-शहरी चोचले आहेत असा सूरही कधी-कधी ऐकायला मिळतो. खरंतर अशी विधानं ही गरजूंची  उपेक्षा करण्यासारखं आहे, समस्येवरचं उत्तर नाही. दुसर्‍या बाजूनं पाहता व्यक्त होणं हेही विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांवरचं उत्तर नाहीय. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत आणि व्याप्ती वेगवेगळी असू शकते. गरज आहे ती आधार पुरवणार्‍या व्यवस्थेची आणि तिच्या योग्य अंमलबजावणीची, ज्यामुळं अशा अप्रिय घटना टाळल्या जाऊ शकतील. मुलांनी अशा मालिका पाहण्यावर किंवा तिच्याबद्दल चर्चा करण्यावर बंदी आणणं हाही उपाय नाहीय. मुळातच हे वय बंड करण्याचं आहे, त्यामुळं ज्यावर बंदी असेल  ते आधी करण्याची इच्छा होण्याची शक्यता अधिक आहे.

 

Thirteen Reasons Whyनं आधीच अस्तित्वात असलेल्या काही प्रश्नांना पुन्हा एकदा ढवळून वरती आणलं आहे हे मात्र खरं...

 

१३ रीझन्स व्हाय - चित्रपटाची /नाटकाची माहिती

१३ रीझन्स व्हाय
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: ब्रायन यॉर्की
  • कलाकार: ऍमी हरग्र्वीव्ज, कॅथरिन लँगफर्ड, डिलन मिनेट
  • चित्रपटाचा वेळ: १३ तास
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१७
  • निर्माता देश: अमेरिका