सैराट: जळजळीत चित्रभाषा
कथा तशी नवी नाही. कुठे तरी ऐकलेली, पाहीलेली, अनुभवलेली आहे. या आधीही या प्रकारातील चित्रपट हिंदी किंवा मराठीत आलेले आहेत, मग सैराट मध्ये नवीन काय ? सैराट मधील जळजळीत वास्तव हेच याचे उत्तर म्हणावे लागेल. खरं तर गोष्ट सांगण्याची जी पद्धत नागराज मंजुळेने दिग्दर्शक म्हणून हाताळली आहे त्या समोर आपण आवाक् होतो. पहिल्या फ्रेम पासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंतचा प्रवास आपल्या मनात चांगल्या वाईट दोन्ही अनुभवांचे ठसे सोडून जातो. चित्रभाषेचा पुरेपूर वापर करून घेण्यात सैराट यशस्वी झाला आहे यात काही वाद नाही.
एक प्रेमी युगुल (अर्ची आणि परश्या) त्यांचं प्रेम,चोरून भेटणं, सतत एकमेकांशी फोनवर बोलत राहणं, या आजवर बघितलेल्या गोष्टींमधून चित्रपट आपल्याला प्रेमाने भरलेल्या स्वप्नात घेऊन जातो आणि सगळं गुलाबी छान छान सुरु असताना खाडकन कानाखाली मारावी तसं स्वप्नातून जागे करतो. सिनेमा वास्तवाला सामोरे जाण्यासाठी भाग पाडतो आणि इथेच दिग्दर्शकाने बाजी मारली आहे. जेव्हा अर्ची आणि परश्याचं प्रेम सगळ्यांसमोर उघडकीस येतं तेव्हा नेहमीच्या मळलेल्या वाटेवरून न नेता दिग्दर्शक आपल्यांना काट्याकुट्यांनी भरलेल्या पायवाटेने घेऊन जात थेट करमाळा ते हैदराबाद पर्यंत आणून सोडतो. यात आपल्याला साथ मिळते ती अजय-अतुल यांच्या गाण्यांची. दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, छायांकन आणि अभिनयामुळे सैराट उजवा ठरतोच पण कथा लांबलेली वाटते हे प्रकर्षाने जाणवत राहते. सुरुवातीला काही दृश्यांना टाळता आलं असत तर कथा अधिक प्रभावी ठरली असती. शेवटाकडे जाता जाता चित्रपट थोडा संथ होतो त्यामुळे मध्यंतरापूर्वीचा चित्रपट आणि मध्यंतरानंतरचा चित्रपट असे दोन भाग पाडता येतील. अगदी आपण दोन वेगवेगळे चित्रपट बघत असल्याचे जाणवत राहते पण त्यामुळे चित्रपट कंटाळवाणा होत नाही हेही खरे.
जातीपातीचं राजकारण, समाजातील दरी, वैचारिक मागासलेपणा सैराट मधून प्रकर्षाने दिसून येतात. शिक्षकाला कानाखाली मारण्यापासून ते क्रिकेट सामन्यात विरोधकांना उद्देशून केलेलं भाषण, तलवारीने कापलेला केक, भर रस्त्यात जोडप्यांना केलेली मारहाण अशी अनेक दृश्ये सांगता येतील ज्यातून मानवी स्वभावाचा मागोवा घेतला गेला आहे. स्वप्नांचा भंग झाल्यावर दोघांची झालेली दमछाक, पुढे काय हा भला मोठा प्रश्न आणि त्यातून दोघांनी स्वत:हून काढलेली उत्तरे. आपण अनुभवलेल्या गोष्टींशी दिग्दर्शक नव्याने आपली ओळख करून देतो. यात आपली दमछाक होण स्वाभाविक आहे. इथे जवखेडा प्रकरणाची आठवण होते.
एकंदरीत व्यावसायिकता आणि कलात्मकता अशा दोन्ही पातळ्यांवर सैराट यशस्वी ठरला आहे. अजय-अतुल याचं संगीत, विषयाची वेगळी मांडणी, नागराज मंजुळेच दिग्दर्शन आणि मन पोखरून टाकणार वास्तव यासाठी सिनेमा एकदा तरी नक्कीच बघायला हवा.
--पाहुणा लेखक सिद्धार्थ गायकवाड
सैराट (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
