आयलंड सिटी (२०१६): एक झलक आपली, आपल्या बेटाची

आज हे परीक्षण अतिशय घाईने लिहायला बसलोय. मलाही चित्रपट बघून कित्येक महिने लोटलेत. मी हा सिनेमा पिफ-२०१६च्या फेस्टिव्हलमध्ये बघितला होता. त्यामुळे फार तपशिलातही लिहेन असं नाही पण लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आज "आयलंड सिटी" नावाचा चित्रपट रिलीज होतोय. असे काही चांगले सिनेमे कधी येतात, कधी जातात कळतही नाही. कदाचित हा सिनेमा सुद्धा त्यातलाच ठरेल. पण कथा, दिग्दर्शन, अभिनय इत्यादी सगळ्याच आघाड्यांवर हा चित्रपट "मस्ट वॉच" आहे. होता. माझ्यासारखे तुम्ही लकी नसाल आणि 'पाहावे'च्या रेकमेंडेशनवर एव्हाना विश्वास बसला असेल तर हे परीक्षण नंतर वाचा आधी तिकिट बुक करा!

भविष्याचा वेध घेणार्‍या मालिका, चित्रपट तुम्ही अनेक पाहिले असतील. मेट्रीक्स असो वा अवतार अश्या चित्रपटांनी भविष्याच्या नावाखाली एक पूर्ण काल्पनिक अवकाश उभा केलाय. मात्र त्यातील अवकाश, परिस्थिती, वातावरण सगळंच लेखकाच्या कल्पनेतील असल्याने वाटेल ते दाखवायला लेखकाला वाव आहे. "आयलंड सिटी" हा सुद्धा किंचित भविष्यात डोकावणारा चित्रपट आहे. पण गंमत अशी की हा अगदी काही दशके पुढील भविष्यात डोकावून दाखवतो (खरंतर तो भविष्यात घडतोय की वर्तमानात याचा संभ्रव व्हावा इतका तो किंचित भविष्यकाळ आहे). यात आपल्याला परिचित वातावरण दिसते, आपल्यासारखीच माणसे दिसतात, थोडक्यात सभोवती "मुंबई" नावाची 'आयलंड सिटी'च दिसते. पण नक्की काय बदललंय? तर नव्या सुविधा, यांत्रिकता, टीव्ही आदींमुळे माणसाची नैतिकता बदलली आहेच शिवाय तंत्रज्ञानाने माणसांवर वेगवेगळ्या प्रकारे अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. हे अधिराज्य इतकं हळुवारपणे गाजवलं जातंय की माणसालाही त्याचा पत्ता नाहीये.

यात तीन कथा आहेत. त्या एका मागोमाग एक दिसतात. त्यांचा एकमेकांशी खरंतर घनिष्ट संबंध आहे. यातील पहिल्या कथेत 'दिनेश पाठक' दिसतो. अनेकांप्रमाणे अगदी यंत्रवत एका अतिशय कडक शिस्तीच्या पॉश कॉर्पोरेट कंपनीत काम करणारा. सतत कंप्युटरमध्ये डोकं घालून सगळे जण काहीतरी करताहेत. भरपूर पगारांमुळे सुखवस्तू पण यंत्रवत काम करणारा. यात कंपनी पॉलिसी नुसार त्याला "बक्षीस" म्हणून एक दिवस 'मजा' करायला मिळते. पण 'मजा' म्हणजे काय करायचं हे कंपनीनंच ठरवलंय. त्या प्लॅनबरहुकूम मजा करताना आणि मजा केल्यावर नक्की काय होतं हे चित्रपटातच बघा. या कथेत विनय पाठक नेहमीप्रमाणे कातील काम करतो. त्याचा अभिनय या कथेला चार चाँद लावतो.

दुसरी कथा आहे, एका दुर्घटनेत एक माणूस जायबंदी झाल्याने हॉस्पिटलात पडून आहे आणि घरी त्याची आई आणि बायको (अमृता सुभाष) तिच्या मुलासह राहतेय. नवरा हॉस्पिटमध्ये कोमात असल्याने या दोघींना अचानक एक मोकळं अवकाश आणि स्वातंत्र्य मिळतं. त्यातून त्या घरी एक "टि. व्ही. " आणतात. आणि मग त्यांचं आयुष्य टी. व्ही. मुळे कसं बदलतं हे अत्यंत विनोदी पद्धतीने दाखवलं आहे. त्यातील एका प्रसंगात तर मुलाच्या कोमात जाण्याने सांत्वन करायला आलेल्या ज्योती सुभाषने कमाल केलीये. यांच्या सीरियलच्या काही मिनिटे आधी ती येते. केवळ सीरियलची वेळ चुकेल या भितीने यांची घालमेल आणि त्याच वेळी ज्योती सुभाष यांचं निवांत चाललेलं बिस्किट पान त्या प्रसंगाने हसून मुरकुंडी वळते. टि. व्ही. तील पुरुषोत्तम हे पात्र आणि प्रत्यक्षातील नवरा/मुलगा यांत होणारी तुलना सगळंच प्रेक्षणीय! हसण्यासोबतच अर्थात याही कथेला एक वास्तवाचा आरसा दाखवणारी काळी किनार आहे.

तिसरी कथा एका निम्नमध्यमवर्गीय कुटुंबातील मोठ्या मुलीची आहे. ती कोणत्याशा कारखान्यात नोकरी करतेय. सावळी, बर्‍यापैकी अनाकर्षक अशी ती. तिचं लग्नही ठर(व)लंय. त्यात तिचं लग्न ज्याच्याशी ठरलंय तो तिला अजिबात 'न होणारा' (कपडे होत नाहीत तसा! ). तशात एके दिवशी तिला पत्र येतं. एका अनाम प्रियकराचं! गुलाबी पाकिटात बंद.. अतिशय रोमँटिक, गोड आणि वास्तववादी. आणि मग सुरू होतो शोध ते पत्र पाठवणार्‍या व्यक्तीचा. ती त्या पत्राला उत्तर पाठवते आणि त्याला प्रत्युत्तरं येत जातात. त्यात तिला कळतं का हे पत्र कोण पाठवतंय ते? ती पत्र कोण लिहून पाठवत असतं? त्यामुळे तिचं आयुष्य कसं बदलतं? या अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं सिनेमाच्या शेवटी मिळतात.

या सिनेमात सर्वाधिक दोन प्रबळ गोष्टी म्हणजे पटकथा आणि दिग्दर्शन. रुचिका ओबेरॉयचा हा पहिलाच चित्रपट. अनेक फिल्म फेस्टिव्हल्समध्ये दाखवला गेलाय आणि वाहवाही लुटलीये. या माध्यमावरची आपली मांड किती पक्की आहे हे तिने पहिल्याच चित्रपटात दाखवून दिलंय असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. अनेक लहान प्रसंगांतून ती बरंच काही सुचवते. शिवाय वरवर विनोद किंवा काळा विनोद असला तरी त्याहून पुढे जाऊन नुसतं गांभीर्यच नव्हे तर प्रेक्षकाला आत्मपरीक्षण करायला भरीस पाडण्याचं काम तिचे अनेक प्रसंग करतात. दुसरी गोष्ट म्हणजे पटकथा. ही अशी अतिशय बांधेसूद पटकथा हिंदी चित्रपटाला लाभणं म्हणजे दैवयोगच हवा. संवाद, कथा, पटकथा तिन्ही लेखन इतकं चोख आहे की यातील एकही शब्द काय एकही पॉजसुद्धा कमी करायला कोणी धजावू नये!

तीनही कथांमधील कलाकार आपापली कामं अपेक्षेनुसार चोख करतात. चित्रपटात आपापल्या परीने जान ओततात. दिनेश फाटक कमाल आहेच, पण मी काही अमृता सुभाषचा  फॅन नाही मात्र यात तिचा अभिनय कायच्या काय जमून आलाय! या सगळ्यांबरोबर यात दिसणारी 'मुंबई' आपल्याला स्तिमित करते! मात्र या कथेचा आशय  हा चित्रपट प्रत्येकाला जो आरसा दाखवतो (जो काळ्या विनोदात सर्वात महत्त्वाचा असतो ) तो नेमका आहे!

थोडक्यात काय तर एक अतिशय फ्रेश प्रयोग भारतीय सिनेसृष्टीत झालाय. फिल्म फेस्टिव्हल मध्येही तो लोकांना आवडलाय. आणि हल्ली अशा फिल्म्स चक्क कमर्शियली रिलीज होऊ लागल्यात. तर अशी संधी सोडू नका. आवर्जून बघा!

आयलंड सिटी (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

आयलंड सिटी (२०१६)
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: रुचिका ओबेरॉय
  • कलाकार: अमृता सुभाष, तनिष्ता चॅटर्जी, विनय पाठक
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१६
  • निर्माता देश: भारत