बाप-मुलाचं सेक्सी नातं - सेक्स चॅट विथ पप्पू अँड पप्पा
वडील मुलाचं नातं मोठं गमतीदार असतं. या नात्याला खूप कंगोरे असतात. कधी वडिलांचा धाक असतो आणि तरीही सुसंवाद असतो , कधी वडील मित्राइतकेच मोकळेढाकळे असतात, तर कधी विसंवाद... वडील मुलाच्या नात्याची गंमत उलगडणारा छान आणि मनोरंजक अऩुभव घ्यायचा असेल, तर सेक्स चॅट विथ पप्पू अँड पप्पा ही वेब सीरिज पहायलाच हवी. वडील मुलाचं नातं त्याला लैंगिक कुतुहलाची जोड मिळाल्यावर काय धमाल उडते याचं चित्रण ही मालिका करते. लैंगिक विषयाचा बाऊ न करता मोकळेपणानं मुलांना समजावलं जाऊ शकतं असा संदेश ही मालिका देते. मात्र, स्पून फिडिंग आणि डायलॉगबाजी न करता मुलाच्याच भाषेत लैंगिक शिक्षण देण्याचा हा फंडा कमाल जमलेला आहे. एकुणात, पप्पू आणि त्याच्या पप्पांचं हे नातं 'सेक्सी' आहे.
सात वर्षांचा पप्पू उर्फ पुनीत वत्स, त्याचे पप्पा आनंद, त्याची मम्मी शिरीन, आज्जी उषा आणि आजोबा विश्वनाथ असं हे पंचकोनी कुटुंब. पप्पूला होणाऱ्या /बहीणीमुळे या कुंटुंबाला सहावा कोन मिळणार आहे. पप्पूचे आई-बाबा मॉडर्न आहेत. आजी आज्जीसारखीच आहे. मात्र, आजोबा जरा रिजिड आहेत. मुलांशी वागताना एक मर्यादा ओलांडायची नाही असं त्यांना वाटतं. असं वातावरण असलेल्या या कुंटुंबात पप्पूला सेक्सबद्दलचे अनेक प्रश्न पडू लागतात. खरंतर असे प्रश्न पडायचं त्याचं वय नाही. मात्र, आताच्या काळात झालेल्या माहितीच्या स्फोटानं लहान मुलांनाही अनेक प्रश्न पडतात. बाळ कसं जन्माला येतं इथंपासून सुरू झालेले त्याचे प्रश्न होमोसेक्शुअलिटीपर्यंत येऊ पोहोचतात. आताची पिढी टेक्नोसॅव्ही आहे. त्यामुळे पप्पूच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी पप्पूचे पप्पा पप्पूचीच भाषा वापरतात आणि सेक्ससारखा किचकट विषय एकदम सोपा करून टाकतात. मास्टरबेशन, होमोसेक्शुअॅलिटी, मासिक पाळी, कंडोम, प्रेगन्सी असे पाच विषय या मालिकेत हाताळण्यात आले आहेत.
मूल कसं जन्माला येतं या पप्पूच्या प्रश्नाचं उत्तर देताना पप्पा त्याला लॅपटॉपमधला युएसबी पोर्ट आणि युएसबीचं उदाहरण देतात. स्त्रीचं लिंग म्हणजे लॅपटॉपचा युएसपी पोर्ट आणि पुरुषाचं लिंग म्हणजे युएसबी. युएसबी पोर्टमध्ये युएसबी लावल्यानंतर जशी फाईल ट्रान्सफर होते, तसेच शुक्राणू रुपी फाईल ट्रान्सफर होते. काही काळानं बाळ तयार होतं आणि नंतर ते जन्माला येतं. इतक्या सोप्या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाचं निराकरण केलं जातं. पप्पूच्या प्रश्नांना उत्तरं देऊ नकोस असं पप्पांचे पप्पा म्हणजे विश्वनाथ आजोबा सांगत असतात. मात्र, मुलांना योग्य पद्धतीनं माहिती दिली पाहिजे, या मतावर पप्पा ठाम असतात. म्हणून ते पप्पूला नीट मार्गदर्शन करतात. या मालिकेच्या निर्मितीसाठी वाय फिल्म्सचं (यशराज फिल्म्सचा यंग ऑडियन्ससाठीचा विभाग) कौतुक करायला हवं. गोपाल दत्त, देवागं कक्कड यांनी समजून उमजून लेखन केलं आहे. सेक्ससारखा विषय असूनही तो आपली मर्यादा ओलांडत नाही. सेक्स कॉमेडी असली, ती व्हेज आहे आणि परिपूर्ण आहे. आशिष पाटील यांनी मालिकेची गंमत ओळखून त्यातला निरागसपणा दिग्दर्शनातून जपला आहे.
कबीर शेख, आनंद तिवारी, संजीदा शेख, सचिन पिळगावकर, अलका अमीन या सर्वांनीच उत्तम अभिनय केला आहे. विशेष कौतुक कबीर शेख उर्फ पप्पूचं. त्यानं ज्या निरागसतेनं हा पप्पू साकारलाय ते कमाल आहे. पप्पूचे पप्पा, म्हणजे आनंद तिवारीही अफलातून आहे. या अभिनेत्याची रेंज फार कमाल आहे. त्यानं ज्या कन्व्हिक्शननं हे पप्पा उभे केलेत, ते पहाताना मजा येते. पप्पा म्हणून त्याचं असलेलं प्रसंगावधान मजेशीर आहे. छोट्या छोट्या प्रसंगातून त्यानं मजा केली आहे.
भारतीय संस्कृतीला वात्सायनाच्या कामसूत्राची परंपरा आहे. खजुराहोला लैंगिकतेबाबतची अजोड शिल्प आहेत. वैचारिकदृष्ट्या आपली संस्कृती पुढारलेली असूनही आज परिस्थिती उलट आहे. सेक्स बाबत चर्चा करणं महापाप ठरतं. ही परिस्थिती बदलायला हवी. सेक्स ही गोष्ट खूप नाजूक आणि सुंदर गोष्ट आहे. त्याच्या सौंदर्याची चर्चा व्हायलाच हवी. नव्या पिढीला त्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तर द्यायलाच हवीत. पौंगडावस्थेत मुलांना जी चुकीची माहिती मिळते, त्यांच्या मनात जे गैरसमज निर्माण होतात, त्याचं वेळीच निराकरण करायला हवं. मात्र, त्यापूर्वी पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद हवा. कुठलाही उपदेशाचा डोस न पाजता, मनोरंजक पद्धतीनं, सोफिस्टिकेटेड पद्धतीनं, आजच्या भाषेत लैंगिक शिक्षण देणारी ही 'सेक्सी' वेब सीरिज आवर्जून पहावी अशीच.
---
ही वेबसिरीज युटट्युबवर इथे बघता येईल
सेक्स चॅट विथ पप्पु & पापा (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
