बापजन्म (२०१७): ऑल्मोस्ट बाप सिनेमाचा जन्म
हा वेडा झालेला आहेय! गांडो थयो छे! विकास नाही हो, हा सिनेमा! अहो खरंच! आणि हो आता तो अगदी सुटला, मोकळा मोकळा झालाय. तो म्हणजे निपुण नाही हो, तो म्हणजे हा मराठी सिनेमा हो! शिवाय 'फ्यामिली ड्रामा, क्वामेडी आनं जोडीला टोट्टल वायझेड मसाला' असं सगळं मिळून आलंय.. ताबडतोप जा आणि खेळ उतरायच्या आत बघा!
कळलं ना मी काय म्हणतोय? नाही? तुम्ही म्हणजे ना! या मराठी शिर्यली पाहणं बंद करा आधी. एकच डायलॉग तीन अँगलने ऐकल्याशिवाय कळतच नाहीएत तुम्हाला. ऐका! मी आताचा निपुण धर्माधिकारी लिखित दिग्दर्शित 'बापजन्म' हा सिनेमा पाहून आलोय आणि तो बाप सिनेमा आहेय! कळलं? अजून तपशिलात ? बरं सांगतो, मी स्टुरी जराही न सांगण्याचा प्रयत्न करेन पण तरी सिनेमाचा काही भाग समजला तर माजी कॉलर धरायची नाही काय? हा!
निपुण धर्माधिकारी माहितीये का? हा तोच 'अमर फोटो स्टुडियो' या सध्या भयंकर गाजलेल्या नाटकाचा डायरेक्टर. आपण त्याही नाटकाबद्दल इथेच बोललो होतो. आठवलं? हांगाश्शी! तोच तो! ते नाटक काय किंवा 'नौटंकी साला'चे डायलॉग्ज आणि पटकथा काय किंवा 'कास्टिंग काउच'ही वेबसिरीज काय, या सगळ्यात निपुण आहे. तो असलं कायकय करत असतो त्यामुळे त्याने काहीही बनवलं तरी मी सहसा चुकवत नाही. म्हणूनच 'बापजन्म' या त्याच्या सिनेदिग्दर्शनातील 'डेब्यु'बद्दल भयंकर उत्सुकता होती आणि कुठेतरी वेगळं काहीतरी बघायला मिळेल अशी अपेक्षासुद्धा.
तर, या सिनेमात त्याने अपेक्षाभंग केलेला नाही. नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचा मराठी सिनेमा त्याने दिला आहे. भारी काहीतरी करायचं म्हणजे लांब चेहरे करून क्लिष्ट, दुर्बोध काहीतरी द्यायचं ही आपली पारंपरिक फ्याशन. पण त्याला छेदत व्यावसायिक गणितं, साधेपणा सांभाळत, आपल्यातल्या आच्रटपणाला मोकळं सोडण्याचं धाडस दाखवणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी तो एक. हा सिनेमाही टोट्टल आच्रट्ट आहे. पण त्या आचरटपणाला एक लय आहे, दिशा आहे आणि मुख्य म्हणजे नवनीत किंवा विकासच्या इसापनीतीसारखे सारखे तळटीपेत तात्पर्य/बोध प्रेक्षकाला भरवलेले नाहीत. सिनेमातल्या कित्येक गोष्टी या केवळ सिनेमातच घडू शकतील अशा 'काहीही' आहेत पण त्या खऱ्या वाटायला लावून त्यावर प्रेक्षकाला दोन तास मनसोक्त हसवत, रडवत नि प्रसंगी स्तब्ध करत ही 'गोष्ट' वाहत राहते.
मी या सिनेमाची गोष्ट काही सांगणार नाहीये ती तुम्ही बघाच. यात तुम्ही विचार करू शकता (आणि करू शकणार नाही) ते सारं आहे. यात एकीकडे भारताची गुप्तचर यंत्रणा आहे तर दुसरीकडे चड्डीत पाल गेली म्हणून गडबडा लोळणारा नोकर आहे, एकीकडे विचित्र परिस्थितीत - परिस्थितीमुळे - मिळेल त्या फटीतून नि मिळेल त्या काडीचा आधार घेत कसेही वाढलेले कौटुंबिक नातेसंबंध आहेत नि दुसरीकडे असे वाढूनही (किंबहुना असेच वाढल्याने) संडासच्या पाइपबाहेर आपोआप उगवलेल्या पिंपळासारखा चिवटपणा या नात्यांमध्ये दिसतोय. यात (नक्की) मेलेली पण गाण्यातून भेटणारी सुरेल आई आहे तर (बहुतेक) मरायला टेकलेला (नि तरी रोज ५ किलोमीटर धावणारा) बाप आहे. यात मुलीचं सासरी एकरूप होणं आहे तर चक्क मुलालाही स्वत:च्या माहेरची - माहेरच्या घराची असणारी आस आहे. रडणारा मुलगा नि बाप आहेत तर भावाने ऑफर करताच आढेवेढे न घेता सहज दारू पिणारी (नि त्यात स्वतःचा चॉइस नि टेस्ट बाळगणारी) बहीण आहे, शिवाय एकीकडे फ्लॅशबॅकमध्ये सिनेमा पिरीएड फिल्म होतो तेव्हाचं अचूक दृश्यभान आहे तर दुसरीकडे आताच्या काळातील पेहरावातील बारीक बाबी नि बदल सहज टिपलेले आहेत. शिवाय सचिन खेडेकर नि पुष्कराज चिरपुटकरची धमाल केमेस्ट्री आहे. तर अभिनय, संगीत, संवाद, ध्वनी वगैरे कोणत्याही बाबतीत जर्राही ओशटपणा किंवा तुपकट गोष्टींना थारा नाहीये की "शेवटी बै काहीतरी भार्री मेसेज हव्वाच हं! " असा लाडिक दिग्दर्शकीय 'डायरेक्टर्स हट्ट' नाहीये. त्यामुळे बाप-अपत्यांच्या नातेसंबंधांवर आधारील मराठी सिनेमा म्हटल्यावर जे जे काही डोळ्यांसमोर येतं त्यापैकी हरेक प्रतिमा भिरकावून देणाऱ्या बाबींनी बनलेला तरी आड्यन्सला ढसाढसा रडवणारा नि खदखदा हसवणारा हा अस्सल मसाला वायझेड सिनेमा अनुभवायला एकदा तरी नक्की बघा!
खरंतर सिनेमा प्रेडिक्टेबल होत गेलाय. शिवाय नाही म्हणायला याचा फिल्मी क्लायमॅक्स टाळता आला असताही; पण शेवटी सिनेमा व्यावसायिक आहे आणि बघणारा प्रेक्षकवर्ग मराठी शिर्यलींवर पोसलाय याचाही विचार त्याला करावा लागला असेलच. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करून, पहिलाच सिनेमा इतका बाप तर हा इसम पुढे काय बनवेल असा विचार करत, माझ्या अपेक्षांचं ओझं त्या निपुणच्या डोक्यावर टाकून, त्याच्या पुढल्या नाटक किंवा सिनेमाचं मी आगाऊ बुकिंग करतोय इतकं नक्की!
ता. क. ज्यांनी 'नवं ट्रेलर' (इथे दिलंय ते नाही) बघितलेलं नाहीये, त्यांनी ते न बघता सिनेमाला जावं. ट्रेलरमध्ये एक कळीची गोष्ट कळते त्यामुळे सिनेमाचा पुर्वार्ध काहीशी कमी मजा देऊ शकतो.
बापजन्म (२०१७) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
